नवीन लेखन...

मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता

The Road that transformed Mumbai into Bruhanmumbai

मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत..

आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व आपल्या लक्षात येत नाही..हे दुर्लक्ष नव्हे कारण आपल्याला त्याची माहिती नसते..असाच एक आद्य रस्ता मुंबईला बृहन्मुंबई बनवण्यास कारणीभूत आहे..तो आता निवृत्त झालेल्या वयोवृद्ध माणसासारखा शांत होऊन एका बाजूला पहुडलेला आहे..या रस्त्याला फारशी वर्दळ नसते..पिक अवर्सला, शाळांच्या वेळात काय वर्दळ असेल तेवढीच..बाकी सर्व शांत, शांत..!

दादर टी.टी. वरून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने ठाण्याच्या दिशेने निघालो की प्रथम आपण पोहोचतो तो सायन हॉस्पिटलच्या समोर..आता फ्लाय ओव्हर सोडून आपण खालच्या रस्त्याने निघालो की आपण थेट पोहोचतो ते इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या तोंडाशी. इस्टर्न एक्सप्रेस हायवे सायनला जिथून सुरू होतो, त्याच्या वीस-पंचवीस पावलं अलिकडे आपल्या डाव्या हाताला हायवेपासून फुटून एक रस्ता जाताना दिसतो..हा रस्ता चुनाभट्टीला, म्हणजे आताच्या हार्बर रेल्वेच्या ‘गुरु तेग बहाद्दूर नगर’ या स्टेशनाकडे, जातो व पुढे कुर्ल्याला मिळतो..

हाच तो मुंबईला ‘बृहत’ बनवून तिला उपनगरांची जोड देण्यास कारणीभूत ठरलेला मुंबईचा ऐतिहासिक रस्ता, ‘सायन काॅजवे’..! याचं आताचं नांव ‘एन.एस.मंकीकर मार्ग’..

p-29218-1

आता थोडसं मागच्या काळात जाऊ.. १६६१ मध्ये पोर्तुगीजाकडून मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात आली. मुंबईची हद्द तेंव्हा माहीम-सायनपर्यंतच मर्यादित असून त्यापुढच्या मिठी नदी (माहीमची खाडी) पलीकडील ठाणे-वसई व पुढचा भूभाग ‘साष्टी’म्हणून ओळखला जायचा व या विस्तृत भूभागावर पोर्तुगीजांच राज्य होतं. एका अर्थाने मिठी नदी म्हणजे ब्रिटीश व पोर्तुगीज यांच्या राज्यामधील नैसर्गिक हद्द होती..आपल्या हद्दीच्या रक्षणाकरिता ब्रिटीशानी मिठीच्या दक्षिण तीरावर सायन, धारावी व पश्चिमेस माहीम असे तीन किल्ले राखले होते ते त्यासाठीच..सन १७३९ मध्ये चिमाजीअप्पांनी पोर्तुगीजांकडून साष्टी हस्तगत केली आणि या बेटांवरचा पोर्तुगीज अंमल संपून मराठ्यांचं राज्य आलं…पुढे काही वर्षांनी सन १७७५ मध्ये रघुनाथराव पेशव्यांशी झालेल्या एका करारान्वये साष्टीची बेट व्यापाराकरिता म्हणून ब्रिटीशांच्या ताब्यात देण्यात आली..हा संपूर्ण इतिहास हा स्वतंत्र विषय असल्याने त्याचा इथे विचार केलेला नाही..

साष्टीचा भूभाग ब्रिटीशांच्या ताब्यात तर आला परंतु मधल्या मिठी नदीच्या विस्तृत पात्रामुळे साष्टीमधील वांद्रे-कुर्ला व त्यापलीकडील परिसराशी संपर्क साधनं तेवढ सोप्प नव्हत..साष्टीशी त्वरित संपर्कासाठी मधली खाडी बोटीने पार करून पलीकडे जाण शक्य असलं तरी प्रॅक्टीकल नव्हतं..आता ब्रिटीशांना या खाडीवर कायमस्वरूपी रस्त्याची किंवा पुलाची निकड ब्भासू लागली आणि बऱ्याच विचारानंतर कंपनी सरकाने खाडीत ( नदीत) भरणी करून रस्ता -काॅजवे- बनवायचा निर्णय घेतला..ब्रिटीशशासीत मुंबईच्या मुळ सात बेटांमध्ये भरणी घालून बेटं जोडण्याचं काम याच सुमारास बऱ्यापैकी पुर्ण होत आलं होतं..

p-29218-2

सायन काॅजवे बांधण्याचा निर्णय झाला तेंव्हा मुंबईचा गव्हर्नर होता जोनाथन डंकन. जोनाथन डंकनने हा रस्ता सन १७९६ मध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आणि कामास सुरुवात केली..आर्थिक अडचणी, प्रशासकीय दिरंगाई तेंव्हाही होती..नेमका त्याच दरम्यान, म्हणजे १८०२-१८०३ च्या दरम्यान देशात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांचे तांडेच्या तांडे देशभरात अन्नाच्या शोधात निघाले होते. त्यातलेच काही लोक मुंबईच्या हद्दीत येऊन थडकले..इथे पैशांच्या अभावी रस्ता बांधायला विलंब होत होता..मोठ्या प्रमाणावर दुष्काळी भागातून आलेले लोक पाहिल्यावर जोनाथन डंकनच्या डोक्यात या लोकांकडून अन्नाच्या मोबदल्यात रस्त्याचे काम करून घेण्याची कल्पना अली आणि बघता बघता पुढच्या दोन-तीन वर्षात, सन १८०५ साली हा रस्ता बांधून तयार झाला आणि मुंबई बृहन्मुंबई होण्याच्या दिशेने सुसाट सुटली..पुढच्या काळात साष्टीतील ठिकाणं मुंबईची उपनगर म्हणून ओळखली जाऊ लागली त्याची सुरुवात या रस्त्याने केली..हा रस्ता मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवण्यास कारणीभूत ठरला..जोनाथन डंकनचा सन्मान म्हणून या रस्त्याला ‘डंकन-सायन काॅजवे’ असं सार्थ नांव देण्यात आलं..आज नांव जरी बदललं असलं तरी हा रस्ता अजुनही ‘डंकन काॅजवे’ म्हणूनच ओळखला जातो..

या रस्त्याच्या सायन बाजूकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत एक संगमरवरी कोनशीला होती व त्यावर या रस्त्याच्या निर्मितीची व निर्मात्याची थोडक्यात माहिती होती..ही पाटी सध्या गायब आहे..आपल्या महानगरपालिकेने रस्ता दुरुस्तीच्या वेळेस ती काढून टाकली असावी बहुदा..त्या पाटीचा माझा शोध सुरूच राहाणार आहे.

‘रोजगार हमी’तून बांधला गेलेला देशातील हा पहिला रस्ता असावा..अर्थात तेंव्हा शब्द जन्माला आला नव्हता..दुष्काळी भागातून आलेल्या मजुरांकडून हा रस्ता बांधण्यासाठी तेंव्हा ५०,५७५ रुपये खर्च आला. हाच रस्ता सरकारी पैशाने बांधला गेला असता तर किमान दीड-दोन लाख रुपये खर्च आला असता असा उल्लेख बहुतेक सर्व जुन्या पुस्तकांतून आढळतो..

हा रस्ता बांधण्यासाठी सरकारला आलेला खर्च वसूल करण्यासाठी ‘टोल’ आकारला गेलेलाही हा देशातील पहिला रस्ता म्हणायलाही हरकत नाही..या रस्त्यावरून वरून येणाऱ्या बैल किंवा घोडागाडीला जोडलेल्या बैल किंवा घोड्यांच्या संख्येवर टोल आकारला जायचा..पुढे सन १८३१ सालात सरकारच्या लक्षात आले की या रस्त्याला आलेला खर्च कधीचाच भरून निघाला आहे, तेंव्हा सरकारने ताबडतोब यावरील टोल बंद करून टाकला..टोल बंद करण्याची सूचना या टोल नाक्यावर वसुलीचे काम करणाऱ्या एका साधारण ब्रिटीश कामगाराने केली होती हे विशेष..! आजच्या पार्श्वभूमीवर हे चित्र जरा विपरीत वाटते ना?

आणखी एक..सायनच्या मुख्य रस्त्यावरून आपण जेंव्हा या रस्त्यावर जायला डावीकडे वळतो, त्याच कॉर्नरवर आपल्याला एक जुनाट, पडीक अवस्थेत असलेलं सरकारी पिवळट रंगच घर दिसत. हे बहुतेक जूनं टोल वसुलीचं ऑफिस असावं किंवा मग सायन स्टेशन जवळची आयुर्वेदिक कोलेजची रस्त्यालगतची इमारत टोलचं कार्यालय असाव अशी दाट शंका येते..काही पुस्तकांत हे कार्यालय सायन पोलिस स्थानकाच्या शेजारी असल्याचाही उल्लेख आहे..याचीही नीट माहिती मिळत नाही..

हा रस्ता बांधला गेला आणि मुंबईमध्ये पार ठाणे, कल्याण व त्याही पुढेपासून लोकांची व मालाची आवक व्हायला सुरुवात झाली..मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व्हायला खरी सुरुवात झाली ती या रस्त्यामुळे.. माहिमचा कॉजवे त्याच्या खूप नंतर म्हणजे सन १८४३ ला बांधला गेला व रेल्वे त्याच्याही नंतर म्हणजे १८५३ साली सुरु झाली..इस्टर्न एक्सप्रेस हायवे व पश्चिमेचा सीएसटी रोडही नंतरच बांधला गेला.

असा हा एके काळचा मुंबई-साष्टी जोडणारा, वर्दळीचा महामार्ग आता मात्र निवृत्त होऊन शांतपणे एका बाजूला पहुडला आहे..अतिवर्दळीचं, गोंगाटाचं, ट्राफिक जामचं सायन अगदी लगटून असूनही त्या वर्दळीचा याच्याशी काहीच संबंध राहिलेला नाही..कधी जमल्यास, कृतज्ञता म्हणून, थोडीशी वाकडी वाट करून या रस्त्यावरून एक फेरफटका जरूर मारून या, त्यालाही बरं वाटेल..!!

जाता जाता –

याच रस्त्यावर सायन पासून पुढे आलो की काही अंतरावर आपल्या उजव्या हाताला एक पुरातन शिवमंदिर दिसतं..या मंदिराला लागून एक तळंही आहे..हे शिवमंदीर अतीप्राचीन असल्याचं सांगितलं जातं..सायनच मूळ नांव ‘शिव’ असून इंग्रजांनी त्यांच्या स्पेलिंग मध्ये “SION” असं केलं हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे..(उदा. ‘गांवकर” ची स्पेलिंग सरळ ‘Gavkar’ अशी न करता ‘Gaonkar’ केली, तसं झालाय हे बहुतेक. कदाचित अनुनासिक उच्चारामुळे असाव..पण मग ‘शिव’मध्ये अनुस्वार कुठेच नसताना असं का झालं असाव? ). माझ्या मते सायनच मुळ नांव ‘शिव’ म्हणजे भगवान शंकरावरून आल असावं व त्याला कारणीभूत हे प्राचीन मंदिर असावं..कारण आपण ‘शीव’ हे मूळ नांव समजतो ते ‘हद्द’ या अर्थाने परंतु ‘हद्द’ असण्यासाठी मुळात कोणाचे तरी राज्य असावे लागते..मुंबईचा राजकीय इतिहास पाहता मुंबईवर व शेजारील साष्टीवर अनेक घराण्यांनी, शाह्यानी, युरोपियनानी वेळोवेळी राज्य केलेलं लक्षात येत..त्या सर्वांची हद्द वेळोवेळी बदलत होती. राज्य कोणाचंही असलं तरी ह्या भागात त्या काळात कोळी समाजाची व ती ही तुरळक वस्ती असावी आणि त्यांची बोली लक्षात घेता ते हद्दीला ‘शीव’ न म्हणता ‘वेस’ म्हणत असण्याचीच शक्यता जास्तं वाटते..याचाच अर्थ ब्रिटिशानी केलेली Sion अशी स्पेलिंग ‘शीव’ची म्हणजे हद्दीची नसून ‘शिव’ची म्हणजे शंकराची असावी..मसजिद व सांताक्रुझ ही अशीच आणखी दोन उदाहरणं.।!!

p-29218-3ज्या जोनाथन डंकनने हा रस्ता बांधला तो डंकन हा ‘हिंदू डंकन’ म्हणून प्रसिद्ध होता. ह्याची आपल्या हिंदू धर्मशास्त्रावर अमाप श्रद्धा होती..ह्याच डंकनन वाराणसी येथील संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता..देशात होणाऱ्या भ्रुणहत्या थाबवण्यासाठी कायदा करण्यास प्रथम सुरूवात करणारा जोनाथन डंकनच होता..

असा हा जोनाथन डॅकन मुंबईतील फोर्ट विभागात असलेल्या ‘गव्हर्नर हाऊस’मध्ये १८ आॅगस्ट १९११ रोजी मरण पावला..आपल्या मृत्यू पश्चात आपल्या समाधीवर एखाद्या ‘हिंदू’चा पुतळा कोरण्यात यावा अशी इच्छा डंकनने प्रदर्शित केली होती व त्यानुसार त्याच्या समाधीवर एका ‘हिंदू’ पंडीताची प्रतिमा संगपरवरी म्युरल रुपात कोरली गेलीय आणि ती आपल्याला चर्चगेटच्या सेंट थोमस चर्चमध्ये आजही बघायला मिळते….

हिंदू माणसाचं म्युरल एका ख्रिस्ती माणसाच्या समाधीवर धारण करणारं सेंट थॉमस हे जगातील बहुदा एकमेव चर्च असावं आणि असं करणारा डंकनही पहिला व शेवटचा ख्रिश्चन असावा ..! आपणही एकदा या चर्चमध्ये जाऊन हे सर्व प्रत्यक्ष बघून यावं..

सोबत डंकनच्या चर्चमधील समाधीवर असलेलं ‘हिन्दू’ म्युरलचा मी काढलेला फोटो देत आहे..

— गणेश साळुंखे
9321811091

संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द माडगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. शिंगणे – आचार्य १८९३
३. ‘स्थल-काल’, ले. अरुण टिकेकर -२००४

मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला – लेख १७

टिप

1. ब्रिटीशांच मुंबईवर राज्य होत म्हणजे फक्त पश्चिमेस माहीम व पूर्वेस सायन एवढ्याच भूभागावर त्याचं राज्य होत..तेंव्हा मुंबई एवढीच होती आणि आजही महानगर पालिकेच्या रेकॉर्डवर मुंबई एवढीच आहे..पश्चिम रेल्वेवरील वांद्रेपासून पुढे व मध्य रेल्वेवरच्या कुर्ल्यापासुनची पुढची सर्व ठिकाण उपनगर म्हणून अधिकृतरीत्या ओळखली जातात..

2. मुंबई हे सर्वांचं आश्रयस्थान आहे असं सर्वच म्हणतात परंतु मुंबई हे माझे घर आहे असं म्हणताना सहसा कोणी आढळणार नाही..आपल्या घराची जशी आपण आपुलकीने देखभाल करतो, त्याला जपतो, घराचा इतिहास जपला जातो, अभिमानाने मिरवला जातो.. धर्मशाळेबाबत अशी कोणतीच भावना कोणाच्या मनात नसते..आपल्या मुंबईचं नेमकं हेच झालंय.।

3. चीमाजीआप्पा ते रघुनाथराव या काळातला इतिहास प्रदीर्घ मोठ्या सखोल अभ्यासाचा विषय आहे. परंतु तो आपला विषय नसल्याने इथे त्याचा केवळ संदर्भासाठी उल्लेख केलेला आहे..

थोडंसं सोबतच्या फोटो विषयी..!

‘डंकन काॅजवे’वरील लेखासोबत दिलेल्या ‘गुगल इमेज’ मध्ये माझ्या अनेक मित्रांनी काॅजवे नेमका कुठे सुरू होतो असं विचारलं आहे..

फोटोमधील Estern Expressचा ‘E’ जीथून सुरू होतो तीथे डावीकडे Railway Colony च्या दिशेने जो रस्ता जातोय, तोच ‘डंकन काॅजवे’..

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..