नवीन लेखन...

मानवी वंशवृक्षाची पाळंमुळं

मानवी वंशवृक्षाचा पसारा प्रचंड आहे – तो अवघ्या जगभर पसरला आहे! तसंच मानवी वंशवृक्ष पुरातनही आहे – तो काही लाख वर्षांपूर्वी निर्माण झाला आहे! या मानवी वंशवृक्षाची वाढ कुठून, कशी होत गेली, हे शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून गेली अनेक वर्षं केला जात आहे. अलीकडच्या अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण संशोधनात, मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीचा गेल्या वीस लाख वर्षांतला माग काढला गेला आहे. प्राचीन काळच्या मानवसदृश जातींच्या व आजच्या माणसाच्या जनुकीय आराखड्यांवर आधारलेल्या या संशोधनात, मानवसदृश जातींच्या व माणसाच्या या मागाबरोबरच त्यांच्या स्थलांतराचाही आढावा घेतला गेला आहे. इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं हे संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

प्रत्येक सजीवाला त्याचे गुणधर्म हे त्याच्या पेशींतील जनुकांच्या रचनेनुसार प्राप्त होतात. जनुक म्हणजे सजीवाच्या पेशीतल्या डीएनए रेणूंतल्या विशिष्ट रासायनिक रचना. पेशींतील जनुकांच्या संपूर्ण माहितीला, सजीवाचा ‘जनुकीय आराखडा’ म्हटलं जातं. सजीवाच्या जनुकीय आराखड्यात विविध कारणांनी कालानुरूप बदल होत जातात. हे जनुकीय बदल त्या सजीवाच्या स्वरूपात बदल घडवून, त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात. आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या जनुकीय आराखड्यांची प्राचीन काळातील सजीवांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना करून त्या सजीवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करता येतो. अस्तित्वात असलेल्या सजीवाचा जनुकीय आराखडा, त्याच्या रक्तातल्या किंवा त्याची त्वचा, केस, वा एखाद्या उतीतल्या पेशीतील डीएनए रेणू वेगळे करून, त्यावरून तयार करता येतो. प्राचीन काळातल्या सजीवाच्या बाबतीत त्याच्या उपलब्ध अवशेषांतून डीएनए रेणू वेगळे करून, त्यावरून जनुकीय आराखडा तयार केला जातो.

अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवाच्या उत्क्रांतीवरील आपल्या संशोधनात, विविध प्रकल्पांद्वारे आणि प्रयोगशाळांद्वारे तयार केलेले, सात हजारांहून अधिक जनुकीय आराखडे वापरले. हे जनुकीय आराखडे जगभरच्या २१५ नमुन्यांतून तयार केले गेले आहेत. यांत विविध मानवी वंशांच्या, तसंच प्राचीन काळातील निअँडरटाल, डेनिसोव्हन यासारख्या विविध मानवसदृश जातींच्या जनुकीय आराखड्यांचा समावेश आहे. या संशोधकांनी, प्रथम सर्व जनुकीय आराखड्यांची एकमेकांशी तुलना केली. या तुलनेद्वारे या संशोधकांना, जनुकीय आराखड्यांत वेगवेगळ्या काळात झालेले सुमारे चौसष्ट लाख बदल सापडले.

त्यानंतर या सर्व बदलांचं या संशोधकांनी सूक्ष्मस्तरावर विश्लेषण केलं. या विविध जनुकीय बदलांचं स्वरूप, जनुकीय आराखडा ज्या अवशेषांतून काढला गेला त्या अवशेषांचं ठिकाण, अवशेषांचा काळ, अशा विविध माहितीचा या विश्लेषणात वापर केला गेला. त्याचबरोबर हे विविध जनुकीय बदल घडून येण्यास किती काळ लागतो, हेही लक्षात घेतलं गेलं. या सर्व माहितीच्या आधारे हे संशोधक, एका अभिनव संगणकीय प्रारूपाद्वारे विविध मानवी वंशांच्या भूतकाळात खोलवर शिरले आणि त्यांनी वीस लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा, प्रचंड मानवी वंशवृक्ष उभा केला. माणसाशी आणि त्याच्या पूर्वजांशी संबंधित अशा सुमारे तेवीस कोटी वेगवेगळ्या फांद्यांपासून हा वंशवृक्ष तयार झाला आहे. या वंशवृक्षाद्वारे निअँडरटाल, डेनिसोव्हन, होमो सेपिअन्स (आजचा माणूस), इत्यादी जातींच्या निर्मितीमागे असणारे बदल कसे घडून आले, हे समजू शकतं. तसंच कुठली जाती ही केव्हा व कशी उत्क्रांत झाली असावी, याचीही कल्पना येते.

आतापर्यंतचा उपलब्ध पुरावा हा, आजच्या माणसाचा म्हणजे होमो सेपिअन्सचा जन्म सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत झाल्याचं दर्शवतो. अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनानंही या निष्कर्षांना दुजोरा दिला आहे. मानवी मुळं ही आफ्रिकेत खोलवर रुजली असल्याचं, हे संशोधन दर्शवतं. या संशोधनातून निघालेला, यासंबंधीचा एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, आपले पूर्वज हे सुमारे पावणेतीन लाख वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात ईशान्य आफ्रिकेत वसतीला होते. मात्र याच काळात आपले काही पूर्वज मध्य आणि मध्यपूर्व आशियातही राहात होते. त्यानंतरही दीर्घ काळ म्हणजे अगदी बहात्तर हजार वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या पूर्वजांची वसती ही प्रामुख्यानं ईशान्य आफ्रिकेतच, आजच्या सुदानच्या परिसरात असल्याचं, या संशोधनातून दिसून येतं.

या संशोधनातून निघालेले काही निष्कर्ष हे अपेक्षित असले तरी, काही निष्कर्ष मात्र अगदी अनपेक्षित आहेत. अशाच एका अनुपेक्षित निष्कर्षानुसार, ऑस्ट्रेलिआजवळच्या, प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी या बेटावर सुमारे १,४०,००० वर्षांपूर्वीपासूनच माणूस राहू लागला होता. आतापर्यंत सापडलेल्या प्रत्यक्ष पुराव्यापेक्षा हा काळ तब्बल एक लाख वर्षं अगोदरचा आहे. अमेरिकेच्या बाबतीतले निष्कर्षही असेच आहेत. माणूस हा अमेरिकेत १८,००० वर्षांपूर्वी पोचला असल्याचं जरी आज उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार दिसून आलं असलं, तरी अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन माणूस अमेरिकेत ५६,००० वर्षांपूर्वीच पोचला असल्याचं दर्शवतं. आजच्या पापुआ न्यू गिनी बेटावरील आणि ऑस्ट्रेलिआतल्या काही मूळ रहिवाशांत, आशियात निर्माण झालेल्या डेनिसोव्हन वंशाचे अंश लक्षणीय प्रमाणात असल्याचंही या संशोधनातून दिसून आलं आहे.

अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनामुळे, मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे. मानवी उत्क्रांतीचा माग घेण्याचे असे प्रयत्न पूर्वीही केले गेले आहेत. परंतु अँथनी विल्डर वोह्नस आणि त्यांचे सहकारी मानवी वंशवृक्षाच्या अगदी पाळामुळांत पोचले आहेत. इतका मोठा आणि इतक्या जुन्या काळापर्यंत नेणारा असा वंशवृक्ष प्रथमच तयार केला गेला आहे. हे संशोधक आता आपल्या पद्धतीत आणखी अचूकता आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत. त्यांना या मानवी वंशवृक्षात अधिक तपशील भरायचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी काहीना काही जनुकीय संबंध असतोच. याचा अर्थ संपूर्ण मानवी उत्क्रांती ही एकाच वंशवृक्षाच्या स्वरूपात दाखवणं, शक्य व्हायला हवं. आपल्या पद्धतीत अधिक अचूकता आणल्यानंतर, सर्व मानवी व मानवसदृश जातींना अशा एकाच वंशवृक्षाद्वारे दर्शवणं, शक्य होणार असल्याची खात्री या संशोधकांना वाटते.

— डॉ. राजीव चिटणिस.

छायाचित्र सौजन्य: Oxford University – Big Data Institute, John Gurche-Chip Clark and Maayan Harel, Oxford University – Big Data Institute

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..