नवीन लेखन...

अर्थाने समर्थ होण्याचा स्वार्थ

ख्रिस्त पूर्व काळात विकसित झालेल्या सिंधू खोऱ्यातील सभ्यतेमध्ये प्रगत आणि भरभराटीची आर्थिक व्यवस्था होती. सिंधू खोऱ्यातील लोक शेती, पाळीव प्राणी, तांबे, कांस्य आणि कथील यापासून अवजारे आणि शस्त्रे बनवत तसेच मध्यपूर्वेतील काही देशांशी व्यापारही करत. वैदिक युगात शेती ही लोकांची मुख्य आर्थिक क्रिया होती, परंतु दुसऱ्या शहरीकरणामुळे उत्तर भारतात अनेक शहरी केंद्रे वाढली, त्यामुळे व्यापाराला मोठी चालना मिळाली.

प्राचीन भारतीयांचे मध्य पूर्व, रोमन साम्राज्य आणि दक्षिण पूर्व आशियासारख्या दूरच्या देशांशी व्यापारी संपर्क होते. अनेक भारतीय व्यापारी वसाहती इतर देशांमध्ये स्थायिक झाल्या. बहुतेक भारतीय लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते आणि खेड्यातील अर्थव्यवस्था स्वावलंबी होती. शेती हा लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय होता आणि गावाच्या अन्नाची गरज त्यातच भागत असे. तसेच कापड, अन्न प्रक्रिया आणि हस्तकला यासारख्या उद्योगांसाठी कच्चा माल उपलब्ध करून दिला जात असे.

शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर वर्गातील लोक न्हावी, सुतार, डॉक्टर, सोनार, विणकर इत्यादी देखील आपापला व्यवसाय करत असत. शहरे आणि शहरी केंद्रांमध्ये नाण्यांद्वारे व्यापार होत असे, परंतु खेड्यांमध्ये वस्तुविनिमय ही आर्थिक क्रियाकलापांची मुख्य व्यवस्था होती. जाती आणि पोटजातींच्या व्यवस्थेने कामगारांचे विभाजन सुनिश्चित केले आणि शिक्षकांना प्रशिक्षण प्रदान करून संघाप्रमाणे कार्य केले.

ढाक्याची मलमल, बंगालची कॅलिको, काश्मीरची शाल, कापड आणि हस्तकला, मिरपूड, दालचिनी, अफू आणि नीळ यांसारखी कृषी उत्पादने सोने आणि चांदीच्या बदल्यात युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये निर्यात केली जात. 16व्या शतकात युरोपीय लोकांच्या आगमनाने व्यापार आणि वाणिज्य पूर्णपणे बदलले. युरोपीय लोकांनी मुख्यत्वे मसाले, हस्तकला, सुती कपडे, नीळ इत्यादींवर लक्ष केंद्रित केले. सर्व युरोपीय शक्तींपैकी ब्रिटिशांनी सर्वात मजबूत सिद्धता  करून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना भारतातून हाकलून दिले. हळुहळू ब्रिटिशांनी राजकीय वर्चस्व संपादन करून भारतावर ताबा मिळवला आणि स्वतःच्या गरजेनुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा नाश केला. ब्रिटीश राजवट भारतात स्थापन झाल्यावर भारतातून संपत्तीचा निचरा होऊ लागला.

ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा औद्योगिक व पायाभूत सुविधा अतिशय खराब होत्या. स्वातंत्र्यानंतर भारताने नियोजित आर्थिक विकासाचा पर्याय निवडला. जड उद्योग विकसित करणे ही मुख्य गरज होती. त्यामुळे वेगाने औद्योगिकीकरण सुरू झाले. येथे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपली आर्थिक धोरणे समाजाभिमुख होती आणि राज्य नियंत्रित होती. भारताने संमिश्र अर्थव्यवस्था पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. पण ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1990च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय धोरणकर्त्यांना हे लक्षात आले की, राज्य नियंत्रित अर्थव्यवस्था जवळपास 45 वर्षांत अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही.

तेव्हा उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणावर आधारित आर्थिक धोरण राबविण्याचे ठरले. उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या या युगात, भारताने अर्थव्यवस्थेच्या काही क्षेत्रांमध्ये वेगवान वाढ पाहिली आहे, जरी भारताने नवीन आर्थिक धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली, तेव्हा चांगले परिणाम अपेक्षित होते. अर्थशास्त्राचा अभ्यास का महत्त्वाचा आहे, हे समजून घेण्यासाठी प्रथम अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.

सामाजिक विज्ञान मानले जाते, समाजात दुर्मिळ संसाधनांची देवाणघेवाण कशी होते हे समजून घेण्यासाठी अर्थशास्त्र वैज्ञानिक पद्धती वापरते. अर्थशास्त्रज्ञ सरकारमधील धोरणे विकसित करण्यासाठी उपयुक्त सिद्धांत आणि तंत्रांचा अभ्यास करतात कारण त्यांना आजच्या जगात कार्यक्षमता कशी निर्माण करायची याचे सखोल ज्ञान आहे. तर, अर्थशास्त्र महत्त्वाचे का आहे? कारण आणि परिणाम ह्यामधील संबंधांची ही चौकशी आर्थिक वाढीला प्रभावित करण्यासाठी महत्त्वाची आहे. संसाधनांचे वाटप कसे करावे याबद्दल सल्ला देताना अर्थशास्त्रज्ञ, नोकरी, बाजार आणि संपूर्ण समाजावरील जोखीम आणि फायदे पाहतात.

आजच्या गतिमान, आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या किमान प्राथमिक गरजांचा विचार करून फक्त चालत नाही, तर बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा देखील स्वीकार करावा लागतो. आज आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखात आणि दुःखात आपल्याला शारीरिकदृष्ट्या साथ-सोबत करणारं, मानसिक आधार देणारं, अंतर्मनाला धीर देणारं, आर्थिकदृष्ट्या सक्षमता देऊ करणारं, सामजिक पत निर्माण करणारं, शैक्षणिक प्रगतीची दिशा दाखवणारं, कौटुंबिक एकोपा टिकवणारं, आपली नातीगोती जपणारं, उणिवा दूर करणारं, आपल्या जाणिवा जपणारं, आपल्या जाणिवांना नेणिवेपर्यंत घेऊन जाणारं, आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारं आपलं हक्काचं साधन हे दुसरं-तिसरं कोणतंही नसून ते म्हणजे आपण पै पै जमवलेलं धन अर्थात आपला स्वतःचा पैसा असतो. आपल्या सर्वांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली धन-दौलत.

आपलं धन ह्या शब्दांमधूनच आपल्या स्वतःच्या पैशाविषयीच्या भाव-भावना प्रकट होत असतात. आपल्याला आपल्या स्वतःच्या धनाविषयी असलेलं प्रेम आणि त्यामुळेच निर्माण झालेलं आपल्या पैशाबरोबरचं नातं अतूट असतं. आपण शरीरानं आपल्या घरापासून दूर असतो तेव्हा देखील आपल्या मनात आपलं धन आणि आपलं घर हे घर करून राहिलेलं असतं. ही घरघर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असल्याप्रमाणे अनुभवली जात असते. आपलं मन आणि धन एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या असतात. आपल्या मनातलं धन आणि धनाढ्य मन, तसंच मनातलं घर आणि घरातलं मन ह्या दोन्हींचा मेळ आपण घालू शकलो पाहिजेत. पै पै जमवलेली जमाराशी आपल्या स्वतःसाठी अथवा घरासाठी वापरताना आणि मुख्य म्हणजे ती मिळवताना तसंच जमवताना अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहात नाही. आपलं प्रत्येक स्वप्न साकार होताना आपल्याला मिळणारा आनंद निश्चितच निराळा असतो. पण ही स्वप्न साकारण्यासाठी आपल्या पैशाची यथायोग्य बचत करणंही तितकंच जरुरीचं असतं.

अत्याधुनिकीकरण आणि काही प्रमाणात अंधानुकरण यामुळे एकूणच आपल्या राहणीमानात बरेच बदल होत असतात. हे होणारे बदल एका अर्थी आपला विकासच घडवत असतात. आपले केवळ नीटनेटके राहणे हे पुरेसं नसून आपण चारचौघांमध्ये वेगळे आणि आकर्षक दिसणे आवश्यक झालं आहे. मुळातच सुंदर असणं आणि आकर्षक दिसणं ह्या दोन्ही गोष्टी जरी सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या असल्या, तरीही केवळ सुंदर असणं सुद्धा पुरेसं नसून आकर्षक दिसणं आणि त्यासाठी नीटनेटकं राहणं आवश्यकच असतं. यामुळेच सुंदर असण्यापेक्षाही सुंदर दिसण्यासाठी काहीजणांचा कल असतो. त्यामुळे सुंदर आणि आकर्षक राहणीमानासाठी निश्चितच आर्थिकदृष्ट्या काही तरतूद करणं अनिवार्य असतं. ह्या राहणीमानाची नुसती सवय होऊन चालत नाही, तर असं राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी थोडाफार खर्चही करावा लागणं स्वाभाविक असतं. एका दिवसाची सुंदरता ही कदाचित खिशाला परवडेल देखील, परंतू ती वर्षानुवर्षे टिकवणे निश्चितच खर्चिक ठरते. त्यासाठी अर्थकारण समजून घेऊन आपल्या उणिवा दूर करणं क्रमप्राप्त ठरतं.

एकूणच आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि प्रत्येक अनुभव सुखद असण्यासाठी आवश्यकता असते ती आपल्या पैशाच्या योग्य वापराची, बचतीची आणि गुंतवणुकीची. प्रत्येकाच्या ज्याप्रमाणे गरजा वेगवेगळ्या असतात, त्याचप्रमाणे उत्पन्न अथवा आपल्या हाती येणारा पैसा देखील कमी-अधिक प्रमाणात आपल्या पदरी पडत असतो. खरं कसब आपल्या हाती असणाऱ्या पैशाचा योग्य वापर आणि बचत आपण कशाप्रकारे करतो त्यातच असतं. अनेकदा असा गैरसमज असतो की, जो अर्थार्जन करतो, तोच ते उत्तम प्रकारे करू शकतो. पण खरं तर असं काही नाही. केवळ सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात अर्थक्रांती घडवून आणण्याचं काम आपण स्वतः करू शकतो. आपलं जीवन सार्थ करणारं अर्थ मिळवण्याचा स्वार्थ असणं जरुरीचं आहे, अन्यथा सारं काही व्यर्थ ठरणार आहे.

–विद्यानंद वाचस्पती

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..