वाळकेश्वरच्या सुप्रसिद्ध रस्त्यावरील ‘तीन बत्ती’ तिठ्यापाशी वाळकेश्वर या ऐतिहासिक परिसराची माहिती देणारा एक स्टीलचा फलक एका खाजगी संस्थेने लावलेला आहे. या फलकावरील मराठी भाषेतील माहिती, माननीय राज्यपालांचे जन संपर्क अधिकारी श्री. उमेश काशिकर यांनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. या पाटीवरील लिखाणासाठी माझं नांव त्या पाटीवरील माहितीखाली लिहून मला श्रेयही देण्यात आलं आहे. श्री. उमेश काशिकरांच्या या औदार्याबद्दल मी त्यांचा आणि त्या संस्थेचा आभारी आहे..! दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची अहमिहीका लागलेल्या आजच्या दिवसांत असं औदार्य दुर्मिळ आहे आणि म्हणून त्याची किंमत मोठी आहे..
ही पाटी नेमकी कुठे आहे?
तर, गिरगाव चौपाटीवरून एक रस्ता समुद्राला डाव्या कवेत घेऊन वर चढत ‘राजभवन’च्या दिशेने जातो. हा रस्ता ‘वाळकेश्वर रोड’ या नांवाने सर्वसामान्यांना परिचित आहे. हा रस्ता पुढे ‘तीन बत्ती’ या प्रसिद्ध ठिकाणाशी पोहोचतो. इथे हा रस्ता आणखी दोन भागात विभागतो. दोन पैकी एक रस्ता नाकासमोर सरळ राजभवनाच्या मुख्य दरवाजापाशी जातो, तर दुसरा हेअरपिन टर्न घेत उजव्या बाजूला आणखी वर चढत मलबार हिल वरील ‘सह्याद्री’ या सरकारी अतिथीगृहाच्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याच्या दिशेने जातो. या नाक्यावर वर्षा बंगल्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडावरच, तीन बत्ती नाक्यावर वर एक लहानशी पोलीस चौकी आहे. खालच्या बाजूने या पोलीस चौकीपाशी वरच्या रस्त्यावर जायला एक लहानसा दगडी जिना आहे आणि या जिन्यापाशीच ही पाटी लावलेली आहे. येता-जाता रस्त्यालगतची ही पाटी पाहाता येते..
गोष्ट दिड-दोन वर्षांपूर्वीची आहे. एका रविवारी दुपारी १२-१२.३०च्या दरम्यान मला काशिकर साहेबांचा फोन आला आणि त्यांनी वाळकेश्वराच्या परिसरात, त्या परिसराची माहिती देणारा फलक एका संस्थेला लावायचा असून, त्यावरील माहिती मराठी व इंग्रजी भाषेत लिहिण्यासाठी त्या संस्थेने त्यांना विनंती केली आहे, असं मला सांगीतलं. काशिकर साहेबांनी इंग्रजी मजकूर तयार केला होता आणि मराठी मजकूर मी तयार करून द्यावा, अशी विनंती काशिकरांनी मला केली. मी लगेच होय म्हणून सांगीतलं.
काशिकरसाहेबांचं नांव या कामामागे असल्यामुळे आणि हा परिसर अती हाय प्रोफाईल आणि मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आदी महत्वाच्या व्यक्तींची ये-जा या रस्त्यावरुनच होत असल्याने माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव झाली. अवघ्या दहा-पंधरा ओळीत या परिसराचं यथार्थ चित्र वाचणारासमोर उभं करायचं आव्हान मोठं होतं.
पुढचे दोन-तीन तास बसून, संदर्भ घेऊन मी अनेक ड्राफ्ट केले आणि रद्दही केले. असं करत करत एक ड्राफ्ट मंजुरीसाठी काशिकरसाहेबांकडे पाठवला आणि साहेबांना तो ड्राफ्ट पसंतही पडला. त्यांनी पुढे तो त्या संस्थेकडे पाठवला आणि त्या संस्थेनेही तो मंजूर केला. पुढे ही घटना मी विसरून गेलो. नंतरही दोन-तीनवेळा राजभवनात काशिकरसाहेबांची भेट घेतली, पण हा विषय विस्मृतीत गेल्याने यावर कधी आमचं बोलणंच झालं नाही.
आज मी राजभवनावर श्री. काशिकरसाहेबांना भेटायला गेलो असता, त्यांनी ती पाटी तीन बत्ती नाक्यावर लावल्याचं सांगून आणि ती आवर्जून जाऊन बघा असं सांगीतलं. मी धावतच तिकडे गेलो आणि डोळे भरून ती पाटी, पाटीवरील मजकूर आणि त्याखाली काशिकरसाहेबांसोबत कोरण्यात आलेलं माझं नांव पाहिलं. काय आनंद झाला म्हणून सांगू..?
मित्रांनो, वाळकेश्वरसारख्या परिसराची माहिती देणाऱ्या फलकावर माझं नांव कोरलेलं असणं आणि ते नांव ती पाटी तीथे असेपर्यंत त्यावर असणं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे;आणि हे भाग्य मला काशिकरसाहेबांमुळे लाभलं आहे याची मला जाणीव आहे.
त्या रस्त्याने येणा-जाणारी एखादी व्यक्ती त्या पाटीवरील मजकूर वाचून खाली आमची नांवही वाचत असेल. त्या व्यक्तीला माझी ओळख पटणार नाही, पण माझे शब्द मात्र तीच्यापर्यंत पोहोचत असतील, याचा मला जास्त आनंद आहे..
— © नितीन साळुंखे
9321811091
सोबत त्या पाटीचे फोटो पाठवित आहे.
Leave a Reply