उत्खननात सापडलेल्या वस्तू म्हणजे त्या विशिष्ट ठिकाणच्या, जुन्या काळच्या संस्कृतीची ओळख असते. या वस्तूंद्वारे त्या-त्या संस्कृतीचा अभ्यास केला जातो. आतापर्यंत अभ्यासले जात असलेले असे पुरावे हे मुख्यतः दृश्य स्वरूपाचे होते. यापुढे या अभ्यासासाठी आणखी एक घटक उपयुक्त ठरणार आहे. हा घटक दृश्य स्वरूपाचा नसून तो अदृश्य स्वरूपाचा आहे. हा घटक म्हणजे त्या वस्तूंना येणारे वास. वस्तूंना येणाऱ्या वासांद्वारे, त्या वस्तू कोणते पदार्थ साठवण्यासाठी वापरल्या होत्या, ते कळू शकतं. त्यावरून त्या संस्कृतीतील जीवनमानाची कल्पना येते. प्राचीन वस्तूंना येणाऱ्या वासांवर आतापर्यंत फारसं संशोधन झालेलं नाही. परंतु आता मात्र प्राचीन वस्तूंच्या वासानं संशोधकांचं लक्ष वेधलं आहे.
वासांशी संबंधित नव्या संशोधनात इजिप्तमधील उत्खननाचा मोठा वाटा आहे. इजिप्तमधील उत्खननात प्राचीन काळातली अनेक थडगी सापडली आहेत. या थडग्यांत त्या काळच्या प्रथेनुसार अनेक पदार्थ ठेवलेले असतात. यांत विविध सुगंधी द्रव्यांपासून ते खाद्यान्नापर्यंतच्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ ठेवलेली काही भांडी उघडी असतात, तर काही भांडी बंद केलेली असतात. बंद भांड्यांतील पदार्थांचा शोध घेताना, या इतिहासकालीन भांड्यांची मोडतोड होऊ द्यायची नसते. त्यामुळे भांड्यात कोणते पदार्थ ठेवले आहेत, ते शोधणं आव्हानात्मक असतं. अशा बंद भांड्यांतील पदार्थ ओळखण्याचा एक लक्षवेधी प्रयत्न, इटलीतील पिसा विद्यापीठातल्या इलारिआ देगानो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच केला आहे. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, इजिप्तमधल्या एका प्राचीन थडग्यात सापडलेल्या वस्तूंवरचं आहे. हे संशोधन म्हणजे याच थडग्यावरच्या, ‘टीटी८’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या संशोधन प्रकल्पाचा भाग आहे.
इटलीतील ट्युरिन येथील ‘म्यूझिओ एगिझिओ’ या वस्तुसंग्रहालयाचे संचालक एर्नेस्टो शिआपरेल्ली यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या शतकाच्या सुरुवातीला पुरातत्त्व संशोधनासाठी दक्षिण इजिप्तमध्ये एक मोहीम गेली होती. या मोहिमेतील संशोधकांना १९०६ साली, नाईल नदीच्या काठावरील लक्सर या शहराच्या परिसरात केलेल्या उत्खननात, एका पुरातन थडग्याचा शोध लागला. कोसळलेल्या दरडींखाली गाडलं गेलेलं हे थडगं, आतून अत्यंत चांगल्या स्थितीत टिकून राहिलं होतं. इ.स.पूर्व १४५० ते इ.स.पूर्व १४०० या दरम्यानच्या काळात थेबान इथे बांधलेलं हे थडगं, ‘खा’ या त्या काळातल्या एका उच्चपदस्थ वास्तुतज्ज्ञाचं आणि ‘मेरिट’ या त्याच्या बायकोचं आहे. या थडग्यात सापडलेल्या वस्तूंची एकूण संख्या साडेचारशेच्या आसपास होती. या वस्तूंत विविध प्रकारची भांडी, चंबू, सुरया, बुधले, पेट्या, अशा अनेक वस्तूंचा समावेश होता. यांतील काही वस्तू उघड्या होत्या, तर काही वस्तू बंद होत्या. इजिप्तच्या राजघराण्यातील नसलेल्या एखाद्या व्यक्तीच्या थडग्यात, इतक्या विविध वस्तू सापडल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. या थडग्यात सापडलेल्या वस्तू त्यानंतर ट्युरिनला ‘म्यूझिओ एगिझिओ’ वस्तुसंग्रहालयात नेऊन ठेवण्यात आल्या. यांतील बहुतेक सर्व बंद वस्तू न उघडता तशाच जतन करण्यात आल्या आहेत.
लक्सरहून आणलेल्या या वस्तूंपैकी काही भांड्यांना गोडसर वास असल्याचं मत, या वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. त्या काळच्या प्रथेनुसार, थडग्यातल्या या भांड्यांत अन्न व इतर पदार्थ ठेवले असण्याची शक्यता होती. या भांड्यांत नेमकं काय ठेवलं असावं, हे शोधण्याचं काम इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलं. या संशोधकांनी, यांतील बंद भांडी न उघडता, अत्याधुनिक साधनाद्वारे या भांड्यांतील पदार्थांचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘जर्नल ऑफ आर्किऑलॉजिकल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
एखाद्या पदार्थाला जो वास येतो तो, त्या वासाला कारणीभूत ठरणाऱ्या संयुगाचे रेणू हवेत पसरत असल्यामुळे. प्राचीन भांड्याच्या बाबतीत, भांडी बंद केली असली तरी, ती पूर्णपणे हवाबंद नसतात. त्यामुळे अशा भांड्यांतल्या पदार्थांतील रेणू अल्प प्रमाणात का होईना, परंतु भांड्याबाहेरील हवेत पसरत असतात. या रेणूंची रासायनिक ओळख पटली तर, त्या बंद भांड्यांत कोणते पदार्थ आहेत, याचा काहीसा अंदाज बांधता येतो. अनेक वेळा या पदार्थांचं विघटनही झालेलं असतं. परंतु विघटनाद्वारे निर्माण झालेले रेणूसुद्धा मूळ पदार्थांबद्दल अंदाज बांधण्यास उपयुक्त ठरू शकतात. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा सर्व रेणूंचा शोध घेण्यासाठी, ‘मास स्पेक्ट्रोमीटर’ या प्रचलित साधनाच्या एका अत्याधुनिक आवृत्तीचा वापर केला.
मास स्पेक्ट्रोमीटरच्या या अत्याधुनिक आवृत्तीत प्रथम काही छोट्या आयनीभूत रेणूंची निर्मिती केली जाते व या आयनीभूत रेणूंच्या माऱ्याद्वारे वासाला कारणीभूत ठरणाऱ्या, हवेतल्या रेणूंचं हळूवारपणे माफक आयनीभवन केलं जातं. याच वेळी या आयनीभूत रेणूंभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं जातं. चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली हे आयनीभूत रेणू, आपापल्या वस्तुमानानुसार व विद्युतभारानुसार वेगवेगळ्या मार्गानं प्रवास करतात व त्यामुळे आपापल्या प्रकारानुसार एकमेकांपासून वेगळे होतात. वेगळ्या झालेल्या या विविध प्रकारच्या रेणूंच्या प्रमाणावरून त्यांचं हवेतलं प्रमाण कळू शकतं. नाकाला न जाणवेल इतक्या क्षीण वासातले अत्यल्प प्रमाणातले रेणूसुद्धा ओळखू शकण्याइतपत हे साधन संवेदनशील आहे.
इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संशोधनासाठी खा आणि मेरिटच्या थडग्यात सापडलेल्या, बंद व उघड्या अशा सुमारे पन्नास वस्तूंची निवड केली. या वस्तू नॅलोफॅन या नावे ओळखल्या जाणाऱ्या बहुवारिकाच्या हवाबंद पिशव्यांत ठेवण्यात आल्या. वस्तूंतील पदार्थांपासून पुरेसे रेणू बाहेर पडून ते पिशवीतील हवेत मिसळण्यासाठी, या संशोधकांनी एक आठवडा जाऊ दिला. त्यानंतर विशिष्ट प्रकारच्या सुयांद्वारे, या पिशव्यांतील थोडीशी हवा बाहेर ओढून घेऊन त्या हवेचं, या अत्याधुनिक साधनाद्वारे रासायनिक विश्लेषण केलं.
इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या विश्लेषणात वेगवेगळ्या प्रकारचे रेणू सापडले. यांत हायड्रोकार्बन, कार्बोहायड्रेट, अॅल्डिहाइड, अल्कोहॉल, अमिनं, प्रथिनं, अशा विविध गटातल्या रेणूंचा, तसंच इतरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण रेणूंचा समावेश होता. यातील काही रेणू हे भांड्यांतल्या मूळ पदार्थांचा भाग असावेत, तर काही रेणू हे मूळ पदार्थांच्या विघटनामुळे निर्माण झाले असावेत. या विविध रेणूंच्या अस्तित्वावरून, काही भांड्यांत तेल साठवलं असल्याचं, तर काही भांड्यांत ममी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेणासारखे स्निग्ध पदार्थ ठेवल्याचं दिसून येत होतं. काही भांड्यांत सुगंधी द्रव्यं साठवून ठेवली असावीत. एका भांड्यात बार्लीचं पीठ असल्याची शक्यता दिसत होती. काही भांडी फळं, भाज्या, कडधान्यांसारख्या खाद्यपदार्थांचं अस्तित्व दर्शवत होती, तर काही भांड्यात सुकी मासळी ठेवली असल्याची शक्यता होती. काही भांड्यांत मधही साठवला असावा.
इलारिआ देनागो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून, ’वास’ या अदृश्य पुराव्याद्वारे प्राचीन इजिप्तच्या अभ्यासातली एक महत्त्वाची पायरी गाठली गेली आहे. कारण इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेले हे वास सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीचे आहेत! या वासांद्वारे ओळखल्या गेलेल्या, उघड्या तसंच बंद भांड्यांतील या विविध पदार्थांची आता समकालीन पुराव्यांशी सांगड घातली जाईल व त्यातून त्या काळच्या प्रथा-परंपरांचं चित्र अधिक स्पष्ट होण्यास मदत होईल. खा आणि मेरिटच्या थडग्यातील वस्तूंचा हा अभ्यास फक्त या थडग्यापुरता मर्यादित असणार नाही… तर तो त्या काळच्या इजिप्तमधील संपूर्ण संस्कृतीचाच अभ्यास ठरणार आहे.
आता जाता जाता थोडंसं… वासावरच्या या संशोधनामुळे, वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञही आता एक नवा विचार करू लागले आहेत. उत्खननात सापडलेल्या पदार्थांना येणारे वास कालानुरूप अत्यंत क्षीण झालेले असतात. तरीही या संशोधनात वापरलेल्या साधनासारखी साधनं वापरून, हे वास ओळखता येणं आता शक्य होणार आहे. विविध रसायनांद्वारे या वासांची कृत्रिमरीत्या निर्मिती करून, त्यांच्या वापराद्वारे वस्तुसंग्रहालयातल्या वस्तूंना अधिक वास्तव स्वरूप देणं, आता शक्य होईल. भूतकाळातल्या गंधांच्या या प्रचितीमुळे, वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या दृष्टीनं हा तर एक जिवंत अनुभव असणार आहे!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Bernard M. Adams/egyptmyluxor.weebly.com, www.egyptianhistorypodcast.com, Jacopo La Nasa
Leave a Reply