ग्रामीण, निमग्रामीण भागातल्या लोकांचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध असावा यात काही नवल नाही. या निसर्गाच्या सान्निध्यातूनच पाळीव तसंच वन्य पशु-पक्षी जगत हे या जीवनाचं एक महत्वाचा घटक बनून गेलेले असतं. कृषीउद्योग आणि पशु संवर्धन हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे, ग्रामीण जगतामधे पशु संवर्धनाला मानाचं स्थान असावं हे उघडच आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकन जीवन प्रणालीमधे निसर्गाला आणि त्या अनुशंगाने पशु पक्षांच्या संवर्धनाला खूपच महत्व आहे. या संवर्धित नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कॅंपिंग, हायकिंग, हंटिंग, फिशिंग अशा विविध छंदांसाठी करून घेऊन, लक्षावधी अमेरिकन्स आपलं जीवन निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करून समृद्ध करून घेत असतात.
या लोकांचं शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यप्राणी जीवनासंबंधित छंदांचं (फोटोग्राफी, वन्यप्राणी अवलोकन वगैरे) वेड किती जबरदस्त आहे याची कल्पना २००६ च्या एका अहवालावरून येते. त्या साली ८७.५ दशलक्ष अमेरिकन्सनी या छंदापायी १२,२०० कोटी (१२२ बिलीयन) डॉलर्स खर्च केले. यापैकी ३० दशलक्ष लोकांनी आपला मासेमारीचा शौक पुरा केला, १२.५ दशलक्ष लोकांनी आपली शिकारीची हौस भागवून घेतली तर ७१.१ दशलक्ष लोकांनी वन्यप्राणी जीवनाचं अवलोकन, फोटोग्राफी असले छंद पुरे करून घेतले.
शिकारीच्या आकारमानानुसार अमेरिकेतल्या शिकारीचे तीन प्रकार होतात.
मोठ्या प्राण्य़ांची शिकार – यात मुख्यत: हरीण, एल्क (आपल्याकडच्या बारशिंग्यासारखं हरीण), अस्वल आणि जंगली टर्कीचा समावेश होतो. यात हरणांची शिकार करणारे १०.१ दशलक्ष, आणि टर्कीची शिकार करणारे २.६ दशलक्ष हे संख्येने सर्वाधिक.
लहान प्राण्यांची शिकार – यात ससे, खारी, फेसंट्स (जंगली कोंबड्या) आणि क्वेल (छोट्या रानकोंबड्यांचा प्रकार) हे मुख्यत्वे येतात.
स्थलांतरित पक्षांची शिकार – यात प्रामुख्याने ऋतुमानानुसार स्थलांतर करणार्या बदकं, गीज, कबुतर अशा पक्षांचा समावेश होतो.
गावाकडल्या बर्याच लोकांसाठी शिकार हा निव्वळ एक छंद न रहाता दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भागच असतो. गावातल्या फार्मस्वर जावं तर बंदुका म्हणजे आयुष्याचा एक घटकच वाटायला लागतात. जनावरांच्या गोठ्याच्या दरवाज्याआड, गॅरेजमधे, पिक-अप ट्रकच्या मागच्या अंगाला, बंदुका कायमच पडलेल्या असतात. उभ्या पिकात घुसणारी हरणं, शेळ्या-मेंढ्या किंवा वासरांनाच ठार करणारे कायोटी किंवा क्वचित लांडगे, परसदारात येऊन घरातल्या कुत्र्या मांजरांवर हल्ले करणारी अस्वलं किंवा बागेतल्या भाजी पाल्याची नासधूस करणारे ससे किंवा रकून्स बघितले की या बंदुकांचा उपयोग ठायी ठायी कसा होत असेल, हे जाणवल्याशिवाय रहात नाही. उगाच नाही आज अमेरिकेत २५० दशलक्ष बंदुका आहेत.
या सार्या शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यजीवनाच्या सान्निध्याच्या ओढीचं मूळ, सतराव्या- अठराव्या शतकातील, अमेरिकेचा गोर्या लोकांना अनभिज्ञ असा अफाट विस्तार धुंडाळून, हा खंडप्राय देश पायतळी घालणार्या धाडशी बहाद्दरांमधे सापडतं.
क्रमशः ….
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply