नवीन लेखन...

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग २

The Wild-Life in America - Part 2

ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक हिरवी भिंत अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला पलीकडे पसरलेल्या जंगल, दर्‍या आणि माळरानांपासून वेगळं करते. सुरवातीला अटलांटिक महासागर ओलांडून येणार्‍या निर्वासितांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. ऍपेलेशियन पर्वतराजीची नैसर्गिक सीमारेषा हीच सुरवातीच्या वसाहतीसाठी विस्ताराची लक्ष्मणरेषा होती. परंतु या अगदी सुरवातीच्या काळापासूनच काही अस्वस्थ, धडपड्या, साहसी लोकांना या नैसर्गिक सीमेच्या आत स्वत:ला बंदिस्त करून घेणं मंजूर नव्हतं. हे लोक वेगवेगळ्या देशातून, संस्कृतीतून आले असले तरी त्या सर्वांमधे काही समान गुणधर्म होते – स्वावलंबन, धाडसी वृत्ती, अज्ञाताचा वेध घेण्याचं वेड, एकांडी शिलेदार प्रवृत्ती आणि कमालीच्या अवघड परिस्थितीवर मात करण्याचा मनोनिश्चय. या लोकांमधे काही केवळ अज्ञाताचा वेध घेऊ बघणारे वेडे साहसवीर होते, काही शिकारी किंवा फासेपारधी होते, काही व्यापार उदीमाची संधी शोधणारे होते तर काही केवळ धनाच्या लालसेने संकटावर मात करू बघणारे होते. या लोकांना वसाहतींच्या थोड्याफार सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून, शेतीभातीसारख्या एका जागी जखडून टाकणार्‍या जीवनपद्धतीपासून, कौटुंबिक जबाबदार्‍यांपासून मोकळीक मिळवायची होती.

अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दक्षिणोत्तर पसरलेल्या या वसाहतींतून हे साहसी लोक, ऍपेलेशियन पर्वतराजीच्या वेगवेगळ्या डोंगर रांगांतून, दर्‍याखोर्‍यातून, निबीड अरण्यातून पश्चिमेकडे पुढे सरकण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होते. सतरावं शतक संपता संपता, ऍपेलेशियन पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागांतून, झाडं झुडपं कापत थोड्या फार वाटा या लोकांनी तयार केल्या. त्यामानाने उत्तरेकडच्या अधिक निबीड जंगलांतून अशा वाटा तयार करायला थोडा अधिक वेळ लागला.

यातील बहुतेक बहाद्दर इतिहासाला अज्ञातच राहिले. कैक जणांनी, जंगलातल्या वन्य प्राण्यांशी दोन हात करता करता, नद्या ओढे ओलांडण्याच्या प्रयत्नात, पर्वतराजीतल्या अफाट थंडीत काकडून किंवा वैराण वाळवंटात अन्न-पाण्यासाठी तडफडून आपले प्राण गमावले. स्थानिक रेड इंडियन लोकांशी या लोकांचा संपर्क कायमच यायचा. त्यातील काही टोळ्या सौम्य आणि सौजन्यशील असायच्या. यातील बर्‍याच धाडसी लोकांना या रेड इंडियन जमातींनी आपल्यात मोठ्या आनंदानं सामील करून घेतलं. बरेच जण या रेड इंडियन जमातींकडून शिकार, मासेमारी, प्राण्यांचा माग काढण्याच्या कला शिकले. यातल्या थोड्याफार जणांनी रेड इंडियन बायकांशी लग्न करून संसार देखील थाटले.

पण याच्याच उलट काही रेड इंडियन जमाती फारच क्रूर आणि लढावू वृत्तीच्या होत्या. त्यांच्या संपर्कात येणं म्हणजे संकटालाच आमंत्रण! सुरवातीच्या या साहसी लोकांपैकी बर्‍याच जणांनी, या अशा क्रूर टोळ्यांच्या हाती पडून आपले प्राण गमावले. काही टोळ्या अशा पकडलेल्या गोर्‍या लोकांना जबरदस्तीने आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करायच्या. मग त्यासाठी या गोर्‍या लोकांच्या डोक्यावरचे केस उपटून काढायचे, त्यांना विवस्त्र अवस्थेत थंड पाण्यात बरेच वेळा बुचकळून काढायचे (जेणे करून त्यांचे अशुद्ध पांढरे रक्त धुवून निघेल), त्यांच्या अंगावर चित्र विचित्र रंगरंगोटी करायची, इत्यादी प्रकार केले जायचे.

हे गोरे साहसवीर अशा धाडसी मोहीमांवर निघताना कमीत कमी जाम्यानिम्यानिशी निघायचे. हरणाच्या कातडीचं जाकीट, मोठाले बूट, बंदुक, गोळ्यांची पिशवी, चाकू आणि कुर्‍हाड घेतली की हे लोक जंगलात शिरायला तयार व्हायचे. पाठीवरच्या चामड्याच्या पिशवीत असायचा एक शेकोटी पेटविण्यासाठी चकमकीचा दगड, एक घोंगडी, तंबाखू आणि मीठ. पुढचा आठवडा, महिना किंवा वर्षभर देखील, हे लोक जेंव्हा शिकार मिळेल तेंव्हाच खाऊ शकायचे. घरी परतायचा मार्ग सापडेलच याची शाश्वती नसायची. त्यामुळे हे लोक जर हाती पायी सुखरूप परत येऊ शकले आणि आपल्याबरोबर मारलेल्या जनावरांची वाळवलेली कातडी विकण्यासाठी घेऊन येऊ शकले तर नशीबवान म्हणायचे.

क्रमशः …. 

— डॉ. संजीव चौबळ 

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..