अमेरिकेतला कायोटी हा एक रानटी कुत्र्याच्या जातकुळीतला प्राणी आहे. त्याला प्रेअरी वुल्फ असे देखील नांव आहे. अफ्रिकेतले वाईल्ड डॉग्ज (जंगली कुत्रे) किंवा पूर्वी आपल्या महाराष्ट्रात आढळणारे कोळ्सुंदे, हे अशाच रानटी कुत्र्याच्या जातकुळीतले प्राणी. कायोटी हा उत्तर आणि मध्य अमेरिकेत सर्वत्र आढळतो. ग्रे वुल्फ हा युरोपीयन – रशियन वंशाचा आहे; तर कायोटी हा पूर्णपणे अमेरिकेतच उगम पावलेला आहे. यांच्या बर्याच जाती – उपजाती आहेत. डोंगराळ भागातले कायोटी अंगाने थोडे मोठे आणि करडॆ असतात तर रुक्ष माळरानावरचे कायोटी अधिक मातकट, पिवळसर रंगाचे असतात.
कायोटी सहसा जोड्यांनी फिरताना आढळतात. परंतु त्यांचे छोटे कळप मात्र पाच-सहा जणांचे मिळून झालेले असतात. त्यांना बीळं करून त्यात रहायला आवडत. यांचा शक्यतो रात्री संचार असतो, पण क्वचित दिवसादेखील दर्शन देतात. आम्ही पेनसिल्व्हेनियाला असताना आमच्या यू.एस रूट ६ चा मार्ग म्हणजे सारा झाडी झुडपांनी भरलेला टेकड्यांचा प्रदेश. एकदा संध्याकाळी ७-७॥ वाजता लॅबमधून घरी परत येत असताना त्या सामसूम रस्त्यावर अचानक रस्त्याच्या एका बाजूच्या झाडीतून कायोटीची एक जोडी बाहेर आली आणि झपझप चालत रस्ता ओलांडून दुसर्या बाजूला नाहीशी झाली. मी गाडी थांबवून आसपास बघायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा काही पत्ता लागला नाही.
कायोटीचे मोठे प्रतिस्पर्धी म्हणजे लांडगे. जिथे लांडग्यांचं प्रमाण कमी होतं तिथे कायोटींची संख्या वाढते. अर्थात लांडग्यांपेक्षा कायोटी हे मनुष्यवस्तीच्या अधिक जवळ राहू शकतात. जानेवारी ते मार्च हा त्यांच्या मीलनाचा काळ असतो, आणि दोन महिन्या नंतर साधारणपणे पाच-सहा पिल्लं जन्मतात. कायोटींचं मुख्य खाद्य म्हणजे उंदीर, खारी, ससे, प्रेअरी डॉग्स (बीळात रहाणारे घुशीसारखे छोटे प्राणी) वगैरे. कधी कधी ते साप, सरडे, पक्षी किंवा हरणाची देखील शिकार करतात. थंडीच्या दिवसांत जेंव्हा भक्ष मिळणं कठीण असतं तेंव्हा कायोटींना फळं, पालेभाज्या, कंदमुळांवर देखील गुजराण करावी लागते. पश्चिमेकडच्या राज्यांमधे शेळ्या मेंढ्या, लहान वासरे यांच्यावर देखील त्यांचा डोळा असतो. त्यामुळे शेतकर्यांना, रॅंचर्सना डोळयात तेल घालून आपल्या जनावरांचं रक्षण करावं लागतं.
पूर्वी कायोटी फक्त पश्चिमेकडच्या राज्यांमधे आढळायचे. परंतु हळू हळू त्यांनी स्वत:ला मनुष्यवस्तीशी जुळवून घेतलं आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीपासून त्यांचे क्षेत्र वाढतच चाललं आहे. पूर्वी लांडग्यांचं क्षेत्र सर्वदूर पसरलेलं होतं, परंतु जसजशी मनुष्यवस्ती वाढू लागली तसतसं लांडगे खोल जंगलात, डोंगरांत जाऊन दडू लागले आणि मनुष्यवस्तीच्या दबावापुढे त्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. याचा फायदा घेऊन कायोटींनी आपलं क्षेत्र वाढवत नेऊन सर्वत्र आपला कबजा करून टाकला. आता तर ते मनुष्यवस्तीच्या अधिकाधिक जवळ सरकू लागले आहेत. कधी कधी गावांतल्या कचर्याच्या पेट्यांजवळ त्यांचं दर्शन होऊ लागलं आहे. त्यांचं धारिष्ट्य एवढं वाढलं आहे की दूरच्या उपनगरांमधेच नव्हे तर मोठ मोठ्या शहरांमधे देखील ते आढळू लागले आहेत. एका अहवालानुसार शिकागो शहर आणि त्याच्या उपनगरांमधे मिळून सुमारे २००० कायोटी आहेत. वॉशिंग्टन डी.सी. आणि न्यूयॉर्क सारख्या प्रचंड शहरांमधे देखील कायोटींचे वास्तव्य आहे. दिवसा ते शहरांमधल्या मोठमोठ्या बागांमधे किंवा दाट झाडींच्या ठिकाणी लपून रहातात आणि रात्री भक्षाच्या शोधार्थ बाहेर पडतात. अशा मोठ्या शहरांमधे शक्यतो ते उंदरांसारख्या प्राण्यांवर, पाळीव कुत्र्या मांजरांवर तसेच रस्त्यावर मरून पडलेल्या प्राण्यांवर गुजराण करतात.
क्रमशः ….
— डॉ. संजीव चौबळ
Leave a Reply