नवीन लेखन...

अमेरिकेतील वन्यप्राणी जीवन – भाग ८

The Wild-Life in America - Part 8

अमेरिकेतल्या अस्वलांमधे ग्रीझली बेअर्स आणि ब्लॅक बेअर्स हे दोन प्रकार. ग्रीझली अस्वलं कॅनडामधे आणि अमेरिकेच्या वायव्येकडच्या राज्यांमधे प्रामुख्याने आढळतात. कॅनडा आणि अमेरिकेमधली सीमा रेषा ही उघडीच असल्यामुळे या सीमेलगतच्या भागात ग्रीझलीज मोकळेपणाने दोन्ही देशांमधे ये जा करत असतात. एकंदर ग्रीझलीजची संख्या सुमारे ६०,००० असावी असा अंदाज आहे. त्यांतील बहुतेक कॅनडातच आहेत तर अमेरिकेच्या वायोमींग, मॉंटेना, आयडॅहो, वॉशिंग्टन या राज्यांमधे मिळून १५०० ग्रीझलीज असावेत.

काळ्या अस्वलांच्या मानाने ग्रीझलीज आकारमानाने खूपच मोठे असतात. ४००-५०० किलो वजनाच्या या ग्रीझलीजना काळ्या अस्वलांप्रमाणे सराईतपणे झाडावर झरझर चढता येत नाही. अशा प्रकारे पलायनाचा मार्ग खुंटल्यामुळे संकटाची थोडीशी जरी शंका आली तरी ग्रीझलीज आक्रमक बनतात. विशेषत: लहान बच्चे बरोबर असले तर मादी फारच आक्रमक बनते. ग्रीझलीजच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍या लोकांपैकी सुमारे ६०% मृत्यू हे अशा चवताळलेल्या माद्यांमुळे होतात. ग्रीझलीज शक्यतो माणसांपासून दूर रहाण्याचा प्रयत्न करतात. ग्रीझलीजच्या परिसरात कॅंपींग करण्यासाठी जाणार्‍या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागते. ग्रीझलीजचे घ्राणेंद्रीय फारच तीक्ष्ण असते, आणि कॅंपच्या जवळपास निष्काळजीपणाने टाकलेलं खाद्य किंवा डबे म्हणजे संकटाला निमंत्रणच ! एकदा का ते कॅंप्सच्या जवळ यायला चटावले की ते धीट बनतात आणि माणसावर हल्ले करायला मागे पुढे पहात नाहीत. बर्‍याचदा अशा ग्रीझलीजना गोळी घालून ठार मारण्याशिवाय पार्क रेंजर्सपुढे काही उपाय रहात नाही. त्यामुळे अशा कॅंपसमधे दोन झाडांच्यामधे उंचावर एक दोरी लावून त्यात शिंकाळ्यासारखं खाद्य बांधून ठेवण्याची पद्धत असते.

शक्यतो काळी अस्वलं, ग्रीझलीजच्या प्रदेशात फिरकत नाहीत परंतु पाईन नट्स, एकॉर्नस, बेरीज असा काही शाकाहारी आहार दोघांच्याही आवडीचा असल्यामुळे, त्याच्या शोधार्थ ग्रीझलीज कधी कधी काळ्या अस्वलांच्या प्रदेशात प्रवेश करतात. कधी ग्रीझलीज आणि काळ्या अस्वलांची आमने सामने गाठ पडलीच तर ग्रीझलीजच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमतेमुळे, काळी अस्वलं घाबरून पळ काढतात. वायोमींग राज्यातल्या यलोस्टोन नॅशनल पार्क या जगप्रसिद्ध राष्ट्रीय उद्यानामधे ग्रीझलीज आणि लांडगे ह्या कट्टर शत्रूंची अनेकदा एकमेकांशी गाठ पडते. बहुतेक वेळा लांडग्याच्या कळपाने एखाद्या एल्कची शिकार केलेली असते आणि शिकारीच्या वासानं एखादं ग्रीझली ऐनवेळी तिथे येऊन टपकतं. मग लांडग्यांचा कळप आणि ग्रीझलीचा, उंदीर-मांजराचा खेळ चालतो. ग्रीझलीच्या मोठ्या आकारमानामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे, लांडगे ग्रीझलीवर समोरासमोर हल्ला करण्याचं धाडस करत नाही. कधी गनिमी कावा करून एखादा लांडगा ग्रीझलीचं लक्ष विचलीत करतो आणि तोवर बाकीचे लांडगे भक्षाचे लचके तोडून पळ काढतात. तर कधी कधी दोन तीन लांडगे एकत्र येऊन ग्रीझलीच्या पुठ्ठ्यावर पाठीमागून हल्ले करून त्याला बेजार करून सोडतात. ग्रीझलीचा आहार शाकाहारी, मांसाहारी असा संमिश्र असतो. मूस, हरीण, एल्क, बायसन, करीबू अशा प्राण्यांची शिकार करण्यात ग्रीझलीचा हातखंडा असतो. कधी कधी काळ्या अस्वलांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडायला देखील ते मागे पुढे पहात नाहीत. ग्रीझलीजना मासे देखील फार आवडतात, त्यामुळे नद्या, ओढ्यांच्या उथळ भागात उभं राहून, पंजाच्या फटक्याने सामन, ट्राउट, बास जातीचे मासे मारून ते खातात. ग्रीझलीजना मेलेल्या प्राण्यांचं मांस खाण्याचं देखील वावडं नसतं.

थंडीचा मोसम जवळ येऊ लागला की ग्रीझलीज भरपूर खाऊन शरीरामधे चरबीचा संचय करून घेतात. थंडीच्या ऐन कडाक्यात ६००० फुटांवर, उत्तरेकडच्या डोंगर उतारांवर, खोबणी, बीळांमधे जाऊन ग्रीझलीज झोपी जातात (hibernation). थंडीचे हे काही महिने ते पूर्णपणे झोपूनच काढतात. परंतु काही ठिकाणी मात्र जिथे वर्षभर अन्न मिळतं, तिथे ग्रीझलीजना असं थंडीमधे झोपी जावं लागत नाही.

ग्रीझलीजचा संचार कॅनडा आणि अमेरिकेच्या उत्तरेकडच्या राज्यांपुरता सिमीत असला तर त्यामानानं काळी अस्वलं सर्वत्र आढळतात. अलास्कापासून खाली मेक्सिकोपर्यंत आणि अटलांटिक पासून पॅसिफिकपर्यंत सर्वत्र त्यांचा संचार असतो. तपकिरी रंगाची अस्वलं (त्यात ग्रीझलीज देखील आले) ही युरेशियातून आलेली तर काळ्या अस्वलांचा उगम सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी अमेरिकेतच झाला. काळी नर अस्वलं १५०-१७५ किलो वजनाची असतात (काही थोराड नर चक्क ३००-३५० किलो वजनाचे असतात) तर माद्या १००-१५० किलो वजनाच्या असतात. काळी अस्वलं साधारणपणे जंगलात आणि झाडाझुडपांच्या गर्दीमधे रहाणं पसंत करतात. परंतु कधी कधी शेतांच्या कडेला, माळरानात देखील ही आढळतात.

हिवाळ्यात, झाडांच्या मोठ्या ढोल्यांमधे, मोठ्या दगडांच्या किंवा ओंडक्यांच्या खाली, नद्यांच्या सुकलेल्या पात्रांमधे तयार झालेल्या खबदाडीमधे, बीळांमधे, ती झोपी जातात. पेनसिल्व्हेनियामधे डोंगराळ, दाट झाडींच्या भागामधे काळी अस्वलं खूप आहेत. काही वेळा स्थानिक वर्तमानपत्रांमधे त्यांच्या बातम्या यायच्या. काही वेळा या डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमधे, एखाद्या घराच्या डेक खाली, अडगळीमधे जागा शोधून, एखादं काळ अस्वल झोपी गेलेलं हिवाळ्यात आढळून यायचं. मग वनखात्याचे लोक येऊन त्याला गुंगीचं औषध देऊन पकडायचे आणि दूर जंगलात सोडून यायचे. कधीतरी कोणाच्यातरी आवारामधे अस्वलांचे ठसे दिसणं, बागेच्या कुंपणांच्या खांबांवर, झाडांच्या बुंध्यांवर त्यांच्या नखांचे ओरखाडे दिसणं हे देखील बरेचदा व्हायचं. आडवाटेच्या रस्त्यानं जाताना तर बरेचदा एखादं एकांड अस्वल किंवा मादी आणि एखाद दुसरं पिल्लू दुडक्या चालीने रस्त्याच्या कडेच्या गवतातून चालताना दिसायचे.

स्प्रिंग सीझनमधे नव्यानेच जन्मलेले बछडे बिळांतून, ढोल्यांतून बाहेर पडून हिंडा फिरायला लागतात. बछड्यांच्या जवळपासच त्यांची आई देखील असते आणि संकटाची चाहूल लागताच ती बछड्यांना झाडावर चढायला लावते. पहिला हिवाळा संपेपर्यंत बछडे सततच आई बरोबर असतात आणि साधारणपणे दीड वर्षांचे झाले की स्वतंत्रपणे हिंडू लागतात. काळ्या अस्वलांचा आहार देखील संमिश्र असतो. छोटी फळं, बिया, यांच्याच बरोबरीने कीटक, वाळवी, मुंग्या, मधमाश्या वगैरे देखील त्यांच्या आहारात असतात. खारी, उंदीर सश्यांसारख्या छोट्या प्राण्यांबरोबरच हरणाची छोटी शावकं देखील ते मारतात. मरून पडलेल्या प्राण्यांचं मांस देखील त्यांना वर्ज्य नसते. ग्रीझलीज प्रमाणे काळ्या अस्वलांना देखील सामन, ट्राउट हे मासे पकडून खायला आवडतं. ग्रीझलीजच्या मानाने काळी अस्वलं मनुष्यवस्तीच्या बरीच जवळ येतात. कॅंप साईट्सवर येऊन तंबूंच्या आसपास पडलेलं खाणं धुंडाळणं हा त्यांचा आवडता उद्योग असतो. गावांमधे येऊन कचर्‍यांचे डबे शोधायला किंवा शेळ्या, मेंढ्या, वासरांवर हल्ले करायला देखील हे मागे पुढे पहात नाहीत.


अमेरिकेतल्या वन्यप्राणी जीवनाच्या मानाने भारतातले वन्यप्राणीजीवन कैकपटींनी अधिक वैविध्यपूर्ण आणि रोमांचक आहे, यात काही वाद नाही. गीरच्या जंगलात उरलेले थोडेफार एशियन वंशाचे सिंह, एशियन हत्ती, वाघ, काझीरंगाच्या जंगलातले गेंडे, उडत्या घारी, कच्छच्या वाळवंटातली वन्य गाढवे, हिमालयात आढळणारे स्नो लेपर्डस, नाना प्रकारचे पक्षी, साप, ….. किती नावे घ्यावीत? दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या अद्भूत नैसर्गिक ठेव्याची आपण अक्षम्य अशी हेळसांड करत आहोत. जंगले नष्ट होत चालली आहेत. कित्येक पशूपक्षांच्या जाती नष्ट झाल्या आहेत, होत आहेत. जंगलांच्या आसपास रहाणार्‍या खेडुतांची जीवनप्रणाली आणि वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने यांच्यातील संघर्ष वाढतच जात आहे. शेती, नागरी वस्त्या आणि तथाकथित आधुनिकता आपले पाश फैलावून, निसर्गाचा आणि त्याच्याशी निगडीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहे.

अमेरिकेची इतर अनेक बाबतीत नक्कल करण्याचा प्रयत्न करणारे आपण, त्यांच्याकडून, निसर्ग आणि वन्यप्राणीजीवनाच्या संवर्धनाच्या बाबतीत काहीतरी शिकणार आहोत का?

— डॉ. संजीव चौबळ 

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..