बहुदा माझ्या जन्मापासूनच रेल्वेप्रवासाचं बाळकडू मला मिळालं असावं. माझे वडील, काका व इतर नातेवाईक या साऱ्यांकडून रेल्वेशी संबंधित जुनी-नवीन अनेक प्रकारची माहिती सतत माझ्या कानांवर लहानपणापासून पडत असे. आम्ही चांगले संस्कार माझ्यावर घडत गेले. त्यातील रेल्वे प्रवासाची आवड निर्माण होणे हाही एक महत्त्वाचा भाग होता.
लहानपणी `मोठा झाल्यावर तू कोण होणार?’ असा साचेबंद प्रश्न विचारला जात असे, त्यावर माझे उत्तर तयार असे. ` मी इंजिन ड्रायव्हर होणार!’
मी रेल्वेत नोकरी केली नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून माझं रेल्वेप्रेम अबाधित आहे. रेल्वे प्रवासाचे नियोजन करणं, त्याकरिता विविध रेल्वेमार्गांचा सखोल अभ्यास करणं, टाइम-टेबलचं वाचन यासारख्या गोष्टीत मी तासन्तास रममाण होतो. काळ, वेळ, भूक याचं भानही राहात नाही. माझ्या जीवनातील आनंदात रेल्वे प्रवासाचा फार मोठा वाटा आहे.
माझ्या कळत्या वयापासून आमच्या वैद्यांच्या घरात रेल्वेचा विषय वारंवार डोकावतच असे. परंतु पुढे माझा परममित्र श्री चंद्रशेखर उर्फ चंदू दीक्षितमुळे माझ्या रेल्वेवरील प्रेमात मोठीच भर पडली. रेल्वेवरील प्रेमाकारणाने दोघांच्या मैत्रीची गाठ इतकी पक्की बांधली गेली होती, की निव्वळ या रेल्वेप्रेमापोटी दरवर्षी आम्ही भारतभर रेल्वेने मनमुराद भटकलो. देशाच्या कानाकोपऱ्यात जिथपर्यंत रेल्वेचं जाळं पोहोचतं, तिथपर्यंत रेल्वेनेच प्रवास करावयाचा व पुढे टॅक्सीने मुक्काम गाठावयाचा….. `विमानाने प्रवास’ हा विषय आम्ही कधी विचारातही घेतला नव्हता. एकदा चंदू दीक्षितने एकट्याने एकवीस दिवस संपूर्ण भारतभर `इंडियन रेल टिकीट पास’ (Indian Rail Ticket Pass) काढून रेल्वेने प्रवास केला होता.
माझ्या आठवणीतला पहिला लोकल प्रवास मी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी रात्री माझ्या कुटुंबियांसमवेत बोरीबंदर ते परळ असा केला होता. त्यावेळी मी जेमतेम चार-पाच वर्षांचा होतो. बोरीबंदर स्टेशन विजेच्या रंगीत दिव्यांच्या माळांनी लखलखत होते. बोरीबंदर स्टेशनच्या घुमटाखालील रेल्वे इंजिनची प्रतिकृती विजेच्या दिव्यांच्या रोषणाईने हजारो लोकांचे लक्ष वेधून घेत होती. ते नयनरम्य दृश्य पाहून लोकलने घरी परतताना आम्ही दोघे भावंडं त्या दिवशीच्या अभूतपूर्व गर्दीत गुदमरून, घाबरून आमच्या आई-वडिलांचे हात घट्ट पकडून उभे होतो. परळ स्थानकात उतरताना आम्ही चौघे गर्दीच्या लोंढ्याबरोबर प्लॅटफॉर्मवर अक्षरशः फेकलो गेलो होतो. तो एक विलक्षण थरारक अनुभव होता. अशी जीवघेणी गर्दी मी परत कधीच अनुभवलेली नाही.
माझ्या जवळ रेल्वेसंबंधित निरनिराळ्या माहितीचा, अनुभवांचा एक अमूल्य खजिना आहे. लहानपणापासून ते आजपर्यंत माझ्या या आवडत्या खजिन्यात नित्य नवी भर सतत पडत आली आहे.
इंजिन स्टेशनमध्ये शिरत असताना चा त्याचा रुबाब मला भावतो. हुस् हुस्स फुस फुस असा आवाज करीत जाणाऱ्या गाडीचा, रुळावरील सांधे बदलताना होणारा खडखडाट व त्यातून उत्पन्न झालेली एक लय मला आकर्षून घेते. रेल्वेचे प्रवासी डबे, स्टेशने, वेटिंग रूम्स म्हणजे खरोखरच करमणुकीच्या जागाच आहेत. गाडीच्या उघड्या खिडकीतून वा या दारातून दिसणारी निसर्गाची विविध रुपं, साथीला गाडीच्या वेगाची लय, सर्वच गोष्टी तुमच्या मनाला उभारी देतात. एकदा प्रवास सुरू झाला की काळजी, नैराश्य, आजारपण यांची कोळीष्टकं आपोआप अदृश्य होतात.
रेल्वेच्या संबंधातील विषयांची व्याप्ती फारच मोठी आहे. इतिहास, रेल्वे बांधणी, विविध मार्ग, गाड्या, प्लॅटफॉर्मस, वेटिंग रुम्स, स्टेशनांच्या इमारती, तांत्रिक माहिती…. खरंतर या जंत्रीला शेवटच नाही, या सर्वांमधून मिळणारी माहिती शोभादर्शकातून म्हणजेच `कॅलिडोस्कोप’ मधून दिसणाऱ्या रंगीत काचेच्या तुकड्यांच्या क्षणचित्रांसारखी रंजक आहे.
या रेल्वे प्रवासाच्या आवडीमुळे मी उत्तरेकडील हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, काश्मिरी ते अतिपूर्वेकडील सप्तकन्या (अरुणाचल प्रदेश) कन्याकुमारीपासून द्वारका असा जवळजवळ संपूर्ण भारत फिरलो. भारतातील अनेक सुप्रसिद्ध स्थळांचे दर्शन पदरी पाडून घेतलं. संपूर्ण युरोप प्रवास रेल्वेने करण्याचा अनोखा आनंद लुटला.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply