अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील तानसेनाच्या घराण्याशी थेट संबंध होता. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी झाला. त्यांचे वडील पद्मविभूषण अल्लाउद्दीन खाँ हे त्या काळातील भारतीय संगीतातील एक अग्रणी व्यक्तित्व होते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे वडील व काका फकीर अफताबुद्दीन यांच्याकडून संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. बारा वर्षांहून अधिक काळ दिवसाला १८ तासांहून अधिक काळ सराव करणाऱ्या अली अकबर खाँ यांना त्यांचे वडील वयाची शंभरी पार केली तरी संगीताचे धडे देत होते. १९७२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर उस्तादांनी घराण्याची संगीताची परंपरा अखेरयत कायम ठेवली. वयाच्या १३ व्या वर्षी अलाहाबादला पहिला जाहीर कार्यक्रम करणाऱ्या खाँसाहेबांनी २० व्या वर्षी एचएमव्हीसाठी लखनौला ध्वनिमुद्रण केले. जोधपूर घराण्यात राजगायक म्हणून सात वर्षे काम करत असतानाच त्यांना उस्ताद हा पहिला सन्मान बहाल केला गेला. लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांच्या विनंतीवरून १९५५ ला न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम केल्यापासून त्यांना व भारतीय शास्त्रीय संगीताला साऱ्या संगीत विश्वाचे दरवाजे खुले झाले. १९५६ मध्ये कोलकात्ता येथे त्यांनी अली अकबर संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. पाश्चिमात्य जगाचा शास्त्रीय संगीताकडे असलेला ओढा पाहून १९६५ मध्ये अमेरिकेत संगीत केंद्र सुरू केले.
कॅलिफोर्नियात अली अकबर संगीत महाविद्यालय स्थापन केल्यानंतर स्वित्झर्लण्डमध्येही त्यांनी त्याची शाखा उघडली. जगभर दौरे करणाऱ्या उस्तादांनी चेतन आनंद यांच्या आँधिया, आयव्हरी-र्मचट यांच्या हाऊस होल्डर, सत्यजित रे यांच्या देवी, बर्नाडो बटरेलुस्सी यांच्या लिटल बुद्धा इ. चित्रपटांनाही त्यांनी पाश्र्वसंगीत दिले. भारतीय अभिजात संगीताला जगभर मान्यता मिळवून देणाऱ्या उस्तादांचे पौर्वात्य व पाश्चिमात्य संगीतविश्वात असंख्य चाहते आहेत. जगविख्यात व्हायोलिन वादक लॉर्ड येहुदी मेन्युहिन यांनी तर त्यांचे ‘ग्रेटेस्ट म्युझिशियन इन द वर्ल्ड’ असे वर्णन केले होते. भारताच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त संयुक्त राष्ट्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना सरोदवादनाचा कार्यक्रम करण्याची विनंती भारतीय राजदूतवासाने केली होती. अमेरिकेत त्यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप बहाल केली होती. त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. खाँसाहेब पाश्चात्य आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील अढळ ध्रुवतारा म्हणून गेली पाच दशके ओळखले जात होते. अली अकबर खाँ यांचे १८ जून २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply