MENU
नवीन लेखन...

राइट बंधूंचे पहिले मोटारचलित विमानोड्डाण

हवेत उडण्याची इच्छासुद्धा माणसाला पूर्वीपासून होती. खांद्याला सुपांसारखे पंख बांधून ते हाताने फडफडवण्याचे अनेक प्रयोग माणसाने केले. पण स्वतःचे वजन उचलून काही काळपर्यंत हवेत तरंगत ठेवण्याइतका जोर लावत राहणे त्याला शक्य झाले नाही मात्र बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्यात यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधी जमलेली होती. पण राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं.. या हवेपेक्षा जड विमानाचं तंत्र काय आहे?

हवेपेक्षा जड असूनही हवेमध्ये तरंगण्यासाठी ती वस्तू गतिमान असावी लागते. अशा उडत्या वस्तूवर एकाच वेळी चार दिशांनी चार प्रकारचे जोर कार्य करीत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी तिला खाली खेचते तर गतिमान हवा वर उचलते. या वर उचलण्याला ‘लिफ्ट’ (उचल) म्हणतात. पुढे जाण्यासाठी जो जोर लावावा लागतो त्याला ‘थ्रस्ट'(धक्का) असे नांव दिले आहे. या पुढे जाण्याला हवेकडून होणाऱ्या प्रतिकारामुळे ती वस्तू मागे ओढली जाते, याला ‘ड्रॅग'(ओढ) म्हणतात.

मुख्यतः पुढे जाण्याच्या क्रियेमुळे लिफ्ट व ड्रॅग या दोन्ही प्रतिक्रिया निर्माण होतात. कमीत कमी थ्रस्टची आवश्यकता लागणे, जास्तीत जास्त लिफ्ट मिळवणे व दिशा, वेग आणि उंची यावर चांगला ताबा ठेवणे हे विमान तयार करून उडवण्याच्या कलेतील कौशल्य आहे.

विमान बनवून उडवण्याचा नाद लागण्यापूर्वी विल्बर आणि ऑर्विल या राइट बंधूद्वयांनी सायकली दुरुस्त करण्यापासून सुरू करून त्याच्या सुधारित आवृत्या तयार करून विकण्यापर्यंत मजल मारली होती. याच काळात विमाने उडवण्याचे जे प्रयोग जगभर सुरू होते त्याच्या बातम्यांकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. यातील बहुतेक सारी उड्डाणे अयशस्वी होऊन अल्पावधीत खाली कोसळत असत. सायकल चालवायला न शिकलेला माणूस कसा तोल जाऊन खाली पडतो या गोष्टीबरोबर याचे साम्य आहे असे त्यांच्या लक्षात आले व विमान उडत असतांना त्याचा तोल कसा सांवरला पाहिजे याचा विचार ते करू लागले. याची कारणे समजून घेऊन त्यावर उपाय शोधून काढण्याचे आव्हान नजरेसमोर ठेऊन ते या क्षेत्रात उतरले. त्या काळात रेडीमेड विमाने बनवून विकणा-या कंपन्या नव्हत्या. हा छंद जोपासणारे लोक स्वतःच आपल्याकडील माहिती व कल्पनेनुसार वर्कशॉप्समधून ती बनवून घेत. तशाच प्रकारे राइट बंधूंनी अनेक विमाने बनवली, त्यात फेरफार केले, लक्षात आलेल्या चुका सुधारल्या आणि सुचत गेलेल्या सुधारणा अंमलात आणल्या. त्या काळातील विमाने म्हणजे फक्त सळ्यांचा एक सांगाडा असायचा. त्याभोवती कापड गुंडाळून त्याचे पंख बनवले जात. उड्डाण जेमतेम कांही मिनिटेच टिकायचे. विमान चालवणारा माणूस या सांगाड्यालाच धरून तेवढा काळ तिथे बसायचा किंवा त्यावर आडवा पडायचा. सुरुवातीच्या काळात जमीनीवरून कांही मीटर वर उडणे याचेच मोठे अप्रूप होते आणि शंभर दोनशे मीटर उडल्यानंतर त्या परिसरात कुठेही व कसेही खाली पडण्याची त्या साहसी वीरांच्या मनाची तयारी असायची. त्यामुळे आभाळात गेल्यावर अधांतरी झालेले विमान इतस्ततः भरकटणार हे गृहीतच धरलेले असायचे.

राइट बंधूंनी मात्र वेगळा विचार करून हे सर्व बदलायचे असे ठरवले. विमानाच्या रचनेत त्यांनी इतर अनेक क्रांतिकारक सुधारणा केल्या असल्या तरी आभाळात उडत असतांना विमानाचा तोल सांवरण्यायाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना ही त्यांनी जगाला दिलेली सर्वात महत्वाची देण आहे.

आकाशात अधांतरी उडणारे विमान डाव्या उजव्या बाजूला, पुढे मागे व वर खाली अशा तीन प्रकारे कलंडू शकते. यांना ‘रोल’, ‘पिच’ व ‘यॉ’ अशी नांवे दिली आहेत. आपण गादीवर झोपून डाव्या उजव्या कुशीवर वळत लोळतो तसे विमानाच्या एका बाजूचा पंख खाली आणि दुसरा वर गेला तर ते रोल झाले. समोरील डोके खाली किंवा वर आणि मागील शेपूट त्याच्या विरुद्ध जाण्याला पिच म्हणतात. मोटारीचे स्टिअरिंग फिरवल्यासारखे एकाच पातळीत राहून घड्याळाच्या कांट्याप्रमाणे फिरणे हे यॉ झाले. सायकलवर बसलेला माणूस स्वतःच्या शरीराची हालचाल करून हँडलच्या आधारे जसा आपला व सायकलचा तोल सांभाळतो, पॅडल मारून वेग वाढवतो, ब्रेक लावून तो कमी करतो, तशाच प्रकारे विमान चालवणा-या माणसाला आवश्यक त्या सर्व कृती स्वतः कशा करता येतील याचा विचार त्यांनी केला. विमानाच्या चारी बाजूला हवाच हवा असल्याने हे सर्व हवेकडूनच करवून घेणे आवश्यक आहे हे ही त्यांनी जाणले. हवेपेक्षा जड, इंजिनाच्या शक्तीवर आणि पूर्णपणे पायलटच्या हुकुमानुसार हवेत उडत राहून वाहतुकीचं साधन म्हणून उपयुक्तता सिद्ध करणारं विमान राईट बंधूंना बनवायचं होतं.

विमानाचे पंखाचा आकार एअरोफाइलच्या तंत्राद्वारेच ठरवतात. राइट बंधूंच्या काळात एअरोफॉइल्सचा एवढा अभ्यास झालेला नव्हता. पण राइट बंधूंना त्यामागील मूलभूत तत्वांची चांगली जाण होती. त्यांनी आपल्या विमानांच्या पंखांना थोडा बाक आणला, त्यांच्या कडा व कोपरे दुमडले, अशा प्रकारचे प्रयोग करून पाहिले. यासोबतच उडणाऱ्या पक्ष्यांचा जबरदस्त अभ्यास या दोघांनी सुरु केला. त्यात त्यांना दिसलं की डावीउजवीकडे वळायचं असलं की पक्षी त्या बाजूला झुकतात. या हालचालीने आपोआप हवेत वळण्याची क्रियाही होते. खूप वर्षं खूप चिकाटीने संशोधन करुन आणि खूप वेळा अयशस्वी प्रयोग करुन राईट ब्रदर्स अधिकअधिक पक्के होत गेले, म्हणजे त्यांचं डिझाईन पक्कं होत गेलं आणि ते स्वतः मात्र वारंवार धडपडून हाडं-सांधे मोडून खिळखिळे होत गेले.

१९०१ आणि १९०२ मधे भरपूर ग्लायडर्स बनवल्यावर आणि त्यांची बरीच हाडतोडू चाचणी उड्डाणं केल्यावर १९०३ मधे राईट जोडगोळीनं त्यांचं पहिलं इंजिनावर चालणारं विमान ऊर्फ “पॉवर्ड एअरक्राफ्ट” बनवलं. त्याचं नाव होतं “राईट फ्लायर -१”. चाळीस फूट लांबलचक अजस्त्र पंख आणि एकूण सांगाड्यावर कव्हर म्हणून साधं सुती मलमलीसारखं कापड वापरलं होतं. लाकडापासूनच विमानाचा गरगर फिरणारा पंखा ऊर्फ प्रॉपेलर बनवला होता. त्याच्या पात्यांच्यी लांबी आठ फूट होती. म्हणजे राईट बंधूंपेक्षाही त्यांचे पंखे जास्त उंच होते. १४ डिसेंबरच्या उड्डाणाच्या वेळी विल्बरने इंजिन चालू करुन फ्लायर-१ ला क्षणभर हवेत उडवलं. पण उडताक्षणीच ते स्टॉल होऊन, म्हणजेच पंखांवरची “लिफ्ट” गमावून खाली कोसळलं. विल्बर तर ठेचकाळलाच पण विमानाचीही थोडी मोडतोड झाली.

आणि मग उजाडला ऐतिहासिक दिवस. १७ डिसेंबर १९०३….. ऑर्विलने १९०३ साली केलेले पहिले सुनियंत्रित उड्डाण १२ सेकंदात १२० फूट दूर गेले, म्हणजे सेकंदाला १० फूट किंवा ताशी ७ मैल. त्याच दिवशी विल्बरनेही ५९ सेकंदात ८५३ फूट अंतर उडून पार केले. म्हणजे सेकंदाला सुमारे १४ फूट आणि ताशी १० मैल. हा तर माणसाच्या धांवण्याचा वेग झाला. तिसरा प्रयत्न पुन्हा ऑर्विलने केला आणि इतिहास घडला. विमान हवेत फार उंच नव्हतंच; पण इंजिनाच्या शक्तीने आणि पायलटच्या कंट्रोलने विमान उडणं ही प्रचंड अद्भुत घटना होती. आपल्या विमानात अनेक सुधारणा करून आणखी दोन वर्षांनी १९०५ साली विल्बर राइट याने ते विमान सलगपणे सुमारे चाळीस मिनिटे उडवून सुमारे २४ मैलांचे अंतर कापले. तत्पूर्वीच्या दोन वर्षात जगातील सर्व विमानांनी केलेल्या सर्व उड्डाणांच्या वेळेची बेरीज सुद्धा इतकी झाली नसती. त्याच्या उडण्याचा वेगही वाढून त्या काळी धांवणा-या मोटारगाड्यांच्या इतपत तासाला सुमारे ३६ मैल इतका झाला होता. राइट बंधूंच्या आधीच्या काळात विमाने कधी हवेत उडलीच तरी ती वा-यावर भरकटत जात होती. त्यामुळे त्यांचा वेग वारा वाहण्याच्या गतीवर सर्वस्वी अवलंबून होता. या जागी आणखी थोडी माहिती देणे जरूरीचे आहे.

राइट बंधू जन्माला येण्यापूर्वीच अनेक मानवनिर्मित ग्लाइडर्स आकाशात उडवली गेली होती एवढेच नव्हे तर वाफेच्या इंजिनावर सुरू होणारे एक विमानसुद्धा उडवले गेले होते. राइट बंधू सुद्धा त्यांच्या प्रसिद्ध उड्डाणापूर्वी काही वेळा आकाशात थोडे उडून परत खाली आले होते पण ती उड्डाणे पूर्णतः यशस्वी झाली नव्हती. दर वेळेस त्यांचे काही ना काही अंदाज चुकायचे किंवा काही तांत्रिक बिघाड उत्पन्न व्हायचे. त्यांच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाच्या आठवडाभरच आधी सॅम्युअल लँगली या गृहस्थाने अशाच प्रकारचे स्वयंपूर्ण विमान उडवण्याचा प्रयोग केला होता. त्याचा सुद्धा तो दुसरा प्रयोग होता. तो जर यशस्वी झाला असता तर स्वयंपूर्ण विमानाच्या शोधाचे श्रेय त्यालाच मिळाले असते व राइट बंधूंना अगदी हातातोंडाशी आलेला घास हातातून निसटलेला पाहावा लागला असता. अगदी भारतातही १८९५ मध्ये मुंबईमध्ये शिवकर बापूही तळपदे यांनी वेदांच्या अभ्यासाच्या सहाय्यानेही विमान उडवल्याचा उल्लेख आहे. सहज लक्षात न येण्यासारखी एक मेख म्हणजे या दिवशी एक पायलट म्हणून ते दोघे बंधूही पहिल्यांदाच सगळं शिकत होते. आज सर्व देशांमधे शेकड्यांनी फ्लाईंग स्कूल्स असतात. जे काही शिकायचं ते स्वानुभवातून हाच पर्याय राईट बंधूंसमोर होता.

“विमान” या अफलातून यंत्राची प्रत्यक्ष आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालण्याचा मोठ्ठा प्रवास त्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९०३ ला फक्त सुरु झाला होता.

संकलन:

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..