रंगभूमी अभिनेत्री कुसुमताई कुलकर्णी हेगडे यांचा जन्म २४ जुलै १९२४ रोजी ठाणे येथे झाला.
सन १९४२ चे आंदोलन ऐन भरात होते. ठाण्यातही प्रभात फेऱ्या, परदेशी कापडांची होळी आणि जोडीला सशस्त्र उठावाची तयारी सुरू होती. विद्यार्थी आपापल्या शाळा-महाविद्यालयातून बाहेर पडून आंदोलनात सहभागी होत होते. ठाण्यातले मारुतीकुमार ठाणेकर, प. स. भागवत, नाथा ताम्हाणे असे कार्यकर्ते भूमिगत झाले होते. अण्णा ताम्हाणे आणि त्यांच्या पत्नी सरोजिनी ताम्हाणे या भूमिगतांच्या संपर्कात होत्या. या भूमिगतांनी ठाण्याच्या सेशन कोर्टात बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यांच्याच एका कामगिरीसाठी त्यांनी ठाण्यातल्या एका युवतीची निवड केली. कळव्याजवळील खारीगाव येथे काही सामान पाठवायचे होते. मात्र पोलिसांच्या नकळत आणि योग्य माणसांकडेच ते जायला हवे होते. त्यासाठी ही युवती ठरल्याप्रमाणे पांढरी साडी आणि हिरवा ब्लाऊज नेसून गेली. कळव्याच्या पुलाजवळ तिच्या पोशाखावरून तिची ओळख पटवून एकजण तिच्याजवळ आला. त्या व्यक्तीनेही ठरल्याप्रमाणे विशिष्ट पोशाख केलेला होता. मग ती युवती त्या व्यक्तीच्या मागून चालू लागली. खारीगावात एका घराजवळ आल्यावर त्या व्यक्तीने खुणेची शीळ वाजवली आणि गोठ्यात लपलेले भूमिगत कार्यकर्ते बाहेर आले. तसे त्या युवतीने त्यांना बरोबर आणलेले सामान दिले आणि काही घडलेच नाही अशा थाटात ती ठाण्यातल्या आपल्या घरी परतली. १९४२च्या आंदोलनात भूमिगतांना जिवावर उदार होऊन मदत करणारी ती युवती म्हणजे ‘कुसुम दामोदर हेगडे’ जिने पुढे ‘कुसुम कुलकर्णी’ या नावाने त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
स्वातंत्र्यचळवळ ते रंगभूमी असा विलक्षण प्रवास करणाऱ्या कुसुमताईंचे वडील दामोदर हेगडे हे तेव्हाच्या ‘बी. बी. ॲन्ड सी. आय.’ रेल्वेत नोकरी करत होते. मात्र घरातील वातावरण गांधीवादी विचारसरणीने भारलेले होते. त्यामुळे आपल्या इतर भावंडांप्रमाणेच कुसुमताईही लहानपणापासून राष्ट्रीय मेळ्यांमध्ये भाग घेऊन देशभक्तीपर गाणी सादर करत असते. ठाण्यातील ‘न्यू गर्ल्स स्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. पण ४२च्या आंदोलनामुळे ते अर्धवट राहिले. ठाण्यात सेवा दलाच्या अनेक शाखा सुरू झाल्या. त्यातील गावदेवी मैदानावर भरणाऱ्या ‘गांधी शाखे’चा पहिला शाखा नायक कुसुमताईंचा लहान भाऊ लीलाधर हेगडे होता. त्यामुळे कुसुमताईपण सेवा दलाच्या शाखेत जाऊ लागल्या आणि सेवा दलाच्या कला पथकात सहभागी झाल्या. ४२च्या चळवळीत कुसुमताईंना पाच महिन्यांचा तुरुंगवास घडला. तेव्हा त्यांना तुरुंगात मणिबेन पटेल, मृदुलाबेन साराभाई यांचा सहवास लाभला होता. तुरुंगातच या महिला कैद्यांनी नाटक बसवले. मामा वरेरकरांचे ‘सत्तेचे गुलाम’. त्यात सुप्रसिद्ध लेखिका मृणालिनी देसाई यांनी ‘वैकुंठ’ची भूमिका तर कुसुमताईंनी खलनायक ‘केरोपंत’ साकारला होता. या सगळ्या चळवळीच्या दिवसांतच १५ एप्रिल १९४५ रोजी कुसुमताईंचा राजाभाऊ कुलकर्णींबरोबर विवाह झाला. साने गुरुजींना ज्यांना आपली मुले मानली होती. त्यातले एक म्हणजे राजाभाऊ. मुंबईत झालेल्या या लग्नाला साने गुरूजी उपस्थित होते. लग्नानंतर दादरच्या वनमाळी हॉलमध्ये सेवादल मेळावा झाला. हाच लग्नाचा स्वागत समारंभ होता. लग्नानंतर काही दिवस कुसुमताईंनी राजाभाऊंबरोबर कापड उद्योगातील कामगारांसाठी काम केले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या. सेवादलाच्या कलापथकामध्ये कुसुमताईंनी पु. ल. देशपांडे लिखित ‘पुढारी पाहिजे’, व्यंकटेश माडगूळकर लिखित ‘बिनबियांचे झाड’ अशा लोकनाट्यातून समरसून कामे केली. या लोकनाट्यात त्यांच्याबरोबर राम नगरकर, निळू फुले, वसंत बापट, लीलाधर हेगडे, सुधा वर्दे, प्रमिला दंडवते असे सहकलाकार काम करत होते. कुसुमताईंच्या रंगमंचीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने दिशा आणि वळण मिळाले ते आत्माराम भेंडे यांच्या ‘कलाकार’ या संस्थेत. सेवादलाच्या मदतीसाठी मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेले ‘उद्याचे जग’ हे नाटक दिग्दर्शित करण्यासाठी आत्माराम भेंडे आले होते आणि त्यांच्यामुळे कुसुमताई प्रायोगिक रंगभूमीच्या प्रवाहाकडे ओढल्या गेल्या. यानंतर मुंबई मराठी साहित्य संघाने आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवात आचार्य अत्र्यांचे ‘कवडी चुंबक’ सादर करण्यात येणार होते. त्यात कुसुमताईंना भूमिका मिळाली. या प्रयोगाय खुद्द अत्रे तर होतेच. सोबत प्रबोधनकार ठाकरे, अनंत काणेकर, वसंत बापट, अनंत हरी गद्रे, शिरीष पै असे आघाडीचे साहित्यिकही होते. कुसुमताईंचे पती राजाभाऊ कुलकर्णी हे कामगार चळवळीत कार्यरत होते. त्यामुळे घर चालवण्यासाठी म्हणून कुसुमताईंनी व्यावसायिक रंगभूमीकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि मराठी रंगभूमीला एक दमदार अभिनेत्री मिळाली. मो. ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन संस्थेच्या ‘भटाला दिली ओसरी’ या नाटकामधून कुसुमताईंनी आपला व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास सुरू केला. नाट्यनिकेतनच्या ‘धाकटी आई’,’भूमिकन्या सीता’,’वहिनी’ या नाटकांबरोबरच लोकप्रियतेचे विक्रम मोडणाऱ्या ‘तो मी नव्हेच’ मध्येही कुसुमताईंनी काम केले. त्यानंतर पणशिकरांच्या ‘नाट्यसंपदा’या संस्थेच्या ‘वेड्याचं घर उन्हात’,’अश्रूंची झाली फुले’ या नाटकांमधून कुसुमताईंनी आपले अभिनयाचे कौशल्य दाखवले.
कुसुमताईंचे नाव मराठी रंगभूमीवरच्या एका महत्त्वाच्या कलाकृतीशी जोडलेले आहे आणि ती कलाकृती म्हणजे लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतीचित्रे’ या आत्मकथनावरील एकपात्री प्रयोग. कुसुमताईंचे चुलत बंधू सीताकांत हेगडे यांनीच मूळ पुस्तकावरून रंगावृत्ती तयार केली होती आणि या एकपात्री कार्यक्रमाचे दिग्दर्शन नाटककार विजय तेंडुलकर यांनी केले होते. त्यामुळेच नंतर ‘सखाराम बाइंडर’साठी तेंडुलकरांनी कुसुमताईंचे नाव दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लक्ष्मीच्या भूमिकेसाठी सुचवले. मध्यमवर्गिय जाणिवांना आणि दिवाणखान्याच्या चौकटीतल्या नाटकाला धक्का देणाऱ्या ‘सखाराम बाईंडर’मधील लक्ष्मी कुसुमताईंनी अफलातून रंगवली आणि मराठी नाट्य इतिहासात स्वतःचे स्थान निर्माण केले. पुढे वयोमानानुसार नाटकाचे दौरे झेपत नाहीसे झाल्याने कुसुमताईंनी रंगभूमीवरून एक्झिट घेतली. मात्र १९८२ साली आलेल्या ‘उंबरठा’ चित्रपटातील भूमिकेमुळे पुन्हा एकदा त्यांच्या अभिनय कौशल्याचे दर्शन रसिकांना झाले.
कुसुम कुलकर्णी यांचे ७ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
– मकरंद जोशी.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply