नवीन लेखन...

जीवन त्यांना कळले हो

लौकिक अर्थाने आयुष्याची संध्याकाळ झाली असताना हे ज्येष्ठ दुसर्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाची पहाट उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीराचे वाढते वय किंवा दर वर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातले तारुण्य कधीच संपवू शकणार नाहीत. खरे तर त्यांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणे ही बरे वाटत नाही. कारण व्योमनाप्रमाणे शरीर सोडले तर त्यांच्या उत्साहात, समजशीलतेत, बुद्धिमत्तेत तीळमात्र फरक पडला नाही.


‘मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो!’  कविवर्य बा. भ. बोरकरांच्या काव्यपंक्ती. आज समाजात वयाने आणि अनुभवाने अनेक श्रेष्ठ ज्येष्ठ आहेत ज्यांना पाहून वाटते की खरेच या सन्माननीय जेष्ठांना जीवन कळले आहे. लौकिक अर्थाने आयुष्याची संध्याकाळ  झाली  असताना हे ज्येष्ठ दुसर्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाची पहाट उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीराचे वाढते वय किंवा दर वर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातले तारुण्य कधीच संपवू शकणार नाहीत. खरे तर त्यांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणे ही बरे वाटत नाही. कारण शरीर सोडले तर त्यांच्या उत्साहात, समजशीलतेत, बुद्धिमत्तेत तिळमात्र फरक पडला नाही. अशा काही खरंच गुरुतुल्य व्यक्तींबाबत लिहायचे तर रमेश पतंगे या ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांबद्दल लिहिले नाही तर लेखाला अर्थच उरणार नाही. रमेश पतंगे यांनी 40 च्यावर पुस्तकं लिहून समाजात समरस विवेकपूर्ण जागृती केली.

समाजाला भेडसावणार्या प्रश्नांचा मागोवा घेणे, त्या प्रश्नाना भिडत त्याची उत्तर शोधणे, समाजातील तरुणाईला त्यामध्ये सक्रिय सहभागी करून घेणे हे रमेश पतंगे यांचे व्रतच. समाजात विषमता, फूट, विद्रोह असंतोष माजवून देश समाजाला तोडू पाहणार्या देशद्रोही शक्ती विरोधात जबरदस्त विवेकपूर्ण ताकदीचे देशप्रेमी वैचारिक योद्धा निर्माण व्हावेत यासाठी ते काम करतात. त्यांच्या कार्याची ही बाजू सहसा कुठे उल्लेखली जात नाही. या कामासाठी गुरुवर्य रमेश पतंगे आज प्रत्येक क्षण याच कार्यात व्यतीत करतात. समरस एकसंघ समाजासाठी त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. अर्थात ते केवळ वयाने ज्येष्ठ नाहीत, तर बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे ‘मी’ पण गळून गेले आहे. मला तर ते समरस समाजाचे पालकच वाटतात. साठी आली की निवृत्त झालो, वय झाले आता काय करायचे? असे बोलणारे आणि तसेच वागणारे बहुसंख्य लोक आहेत. पण या सगळ्यासाठी रमेश पतंगे यांचे ज्येष्ठत्व म्हणजे एक नंदादीपच आहेत. समाजात असे श्रेष्ठ नंदादीप आपल्या कार्यकर्तृत्वचा दीप प्रकाश प्रदीप्त करत असतात.

वयाच्या ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर व्यक्तीची परिस्थिती अशी असते की, सांसारिक, कौटुंबिक जबाबदारीतून व्यक्ती मोकळी झालेली असते. मोहपाश बर्यापैकी सुटलेले असतात. साहजिकच एकटेपणा वाटू शकतो. पण आपला एकटेपणा इतर ज्येष्ठ नागरिकांच्या जगण्यासाठी खर्ची करणारे एक माननीय ज्येष्ठ आहेत. विलास करंदीकर इगतपुरीला त्यांचा माउली वृद्धाश्रम आहे. वृद्धाश्रमातील सगळ्यांना काका अगदी भावाच्या मायेने सांभाळतात. वृद्धाश्रमात येणारे आजी-आजोबा अर्थातच स्वखुशीने इथे येत नाहीत. पण या वृद्धाश्रमात काका आणि आश्रमातील इतर सेवाकर्मी सगळ्यांना जीव लावतात. त्यामुळे त्यांचा एकटेपणा कमी होतो. त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सुसाह्य होते. असेच एक ज्येष्ठ ठाण्याचे मोहन अत्रे. अखंड भारत या संकल्पनेशी नाळ जुडलेले अत्रे. ते रा.स्व. संघांचे स्वयंसेवक असून एका खासगी कंपनीत कामाला होते. निवृत्त झाल्यानंतर काय करावे? हा प्रश्न त्यांना पडलाच नाही. नोकरी करत असताना सुटीच्या दिवशी समाजकार्यासाठी वेळ देता यायचा. पण निवृत्तीनंतर 365 दिवस समाज कार्यासाठी, अखंड भारत संकल्पनेसाठी वेळ देता येतो असे त्यांचे म्हणणे आणि त्यानुसार वागणेही. तरुणाईमध्ये अखंड भारत संकल्पना रुजावी यासाठी ते काम करतात.

असो, काही वर्षांपूर्वी मी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय येथे गेले होते. या हॉस्पिटलमध्ये कोणताही उपचार नाममात्र शुल्कात होत असल्याने इथे रुग्णांची खूप गर्दी असते. प्रत्येक उपचारासाठी अत्याधुनिक व्यवस्था असल्याने हॉस्पिटल खूप मोठे. छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रभरातून लोक इथे येतात. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले की, आपल्याला हव्या त्या ओपीडीमध्ये, हव्या त्या डॉक्टरपर्यंत कसे पोहोचायचे हा संभ्रम अनेकदा अनेकांना पडतो. हॉस्पिटलमध्ये तशा सूचना जरी लिहिलेल्या असल्या तरी ग्रामीण भागातून आलेल्या अल्पशिक्षित रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना त्या लिहिलेल्या सूचना वाचता येत नाहीत. तसेच काही वयोवृद्ध रुग्ण एकटेच उपचारासाठी आलेले असतात. मी पाहिले की अत्यंत सुहास्य वदनाने या रुग्णांना मदत करण्यासाठी ज्येष्ठ स्त्री-पुरुष तिथे उपस्थित होते. व्हीलचेअरवर रुग्णांना बसवून त्यांच्या डॉक्टरकडे नेण्यापासून, त्यांच्यासाठी विविध रांगांत उभे राहण्यापासून ते रुग्णाचे समुदेशन करण्यापर्यंत सगळी कामं हे ज्येष्ठ स्त्री-पुरुष करत होते. हे कोण होते? तर हे परिसरातील ज्येष्ठ नागरिक होते. निवृत्तीनंतर मोकळा वेळ होता. तो या रुग्णालयात रुग्णांची मदत करण्यासाठी ते वापरत होते. या सगळ्यांचे मृदू बोलणे, रुग्णाला स्वतःचा अनुभव सांगत त्याची भीती दूर करणे, रुग्णांना इतरही काही समस्या असतील तर त्यावर सगळ्यांनी एकत्र येत मार्ग काढणे ही कामं हे ज्येष्ठ आनंदाने करत होते.

स्वतःचे पैसे, ऊर्जावेळ खर्च करत समाजासाठी काम करणारे हे सगळे अनाम समाजदूत. ज्येष्ठांचे कार्य आठवताना चेंबूरच्या रमेश ओवळेकर यांची आठवण न झाली तर नवल. निवृत्तीनंतर उदरनिर्वाहपुरता शिल्लक त्यांनी ठेवली. बचतीच्या पैशातून ते समाजकार्य करतात. समाजकार्य करताना आर्थिक कमतरतेमुळे अडलेल्या व्यक्तींना ते मदत करतात. दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्था यांचा समन्वय करण्याचे काम ते करतात. एखादा सामाजिक उपक्रम केवळ पैशासाठी किंवा इतर मदतीसाठी अडला तर सरळ त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सर्वोतोपरी सहकार्य ते करतात. या सगळ्यांबद्दल विचार करताना वाटते की ‘संध्याछाया भिववती मजला’ असे वाटत असेल का? माझ्या मते नाही. कारण या सगळ्या ज्येष्ठांच्या मनात नेहमीच मांगल्याची पहाट उमललेली असते. ज्या पहाटेमध्ये समाजाचा उत्कर्षाचा सूर्योदय निर्माण करण्याची क्षमता असते.

–योगिता साळवी

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..