प्रकाशन दिनांक :- 10/10/2004
कोणत्याही मोठ्या घटनेची सुरुवात अगदी लहान कारणापासून होत असते. कधी-कधी ते कारण इतके लहान असते की त्याकडे सगळ्यांचेच हमखास दुलर्क्ष होते. या दुलर्क्षाची खरी किंमत मोजायची वेळ येते तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असतो. ही वास्तविकता वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रजीवनात सर्वत्र सारख्याच प्रमाणात आढळते. व्यक्तिगत जीवनातील अशा दुलर्क्षाचे परिणाम त्या व्यक्तिपुरते आणि फार फार तर त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित राहतात, परंतु सामाजिक आणि राष्ट्र जीवनातील अशा दुलर्क्षाची किंमत संपूर्ण समाजाला, राष्ट्राला भोगावी लागते. पृथ्वीराज चव्हाणने महंमद घोरीला जिवंत सोडण्याची एक क्षुल्लक चूक केली आणि त्याचे निनाद पुढील शेकडो वर्षे भारतात उमटत राहिले. त्यामुळे राष्ट्राची नीती, धोरण आणि ध्येय ठरविताना अतिशय दक्षता घेणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने म्हणा अथवा दुलर्क्षामुळे; परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या धुंदीत अशा अनेक क्षुल्लक बाबींकडे दुलर्क्ष झाले. पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वी बीजरूपात असलेल्या त्या समस्यांचे आज वटवृक्ष झाले आहेत. ‘मुळात’ झालेल्या चुकांचे आता ‘फांद्या छाटून’ परिमार्जन करण्याचा प्रयत्न होत आहे. जुन्या चुका दुरुस्त करण्याच्या प्रयत्नात नव्या चुका करण्याचाच हा प्रकार!
कोणतीही समस्या हाताळताना त्या समस्येचा व्यापक विचार करून समस्येच्या मुळाशी जाणे भाग असते. समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्याचा तोच एकमात्र प्रभावी मार्ग आहे; परंतु तसे होत नाही आणि तसे करण्याची कुणाला गरजही वाटत नाही, दुर्दैवाची बाब हीच आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखायची म्हणजे काय तर पोलिसी बळाच्या धाकाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवायचे! परंतु या पद्धतीने गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यात आपल्याला यश आले
आहे काय? तसे ते कधीच राखता येत नाही. गुन्हेगार गुन्ह्यांसाठी का प्रवृत्त होतो, त्या कारणांचा शोध घेऊन, ती कारणेच समूळ नष्ट करायला पाहिजे. मुलत: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे प्रमाण एक टक्काही
नसते आणि हे प्रमाण
कोणतीही व्यवस्था असली तरी कायम राहणार आहे. अगदी प्रभू रामचंद्राच्या काळात, रामराज्यातदेखील ते होते! परंतु इतर गुन्हेगार मात्र व्यवस्थेचे बळी ठरुन गुन्ह्यांकडे वळलेले असतात. कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झालेला असतो. त्यांचा रास्त हक्क डावलल्या गेला असतो. प्रस्थापित व्यवस्थेत न्याय मिळण्याची आशा संपुष्टात आली असते. त्यामुळे त्यांच्याजवळ हाती शस्त्र घेऊन स्वत: न्यायनिवाडा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. अशा लोकांना गुन्हेगार समजून त्यांचा खात्मा करणे हा योग्य मार्ग नव्हे. अशा उपायाने माणसं मारता येतील, परंतु त्यांनी चेतविलेली बंडाची ठिणगी विझणार नाही उलट या लोकांच्या बलिदानाने ती ठिणगी अधिक प्रखर तेजाने जळू लागेल. एखाद्या भुकेल्या माणसाला प्रामाणिक प्रयत्नानंतरही पोटभर भाकर मिळत नसेल तर टाचा घासून उपासमारीने मरणे किंवा त्याच्या भाकरीचा हक्क ज्याने हिरावला त्याचा मुडदा पाडून आपली हक्काची भाकर मिळविणे, हे दोनच पर्याय त्याच्यासमोर उरतात. मुळातच भेदरलेल्या वृत्तीची माणसे पहिला पर्याय स्वीकारतात आणि त्यांच्या मरणाची साधी दखलही घेतल्या जात नाही; परंतु ज्यांची मनं जिवंत आहे, हृदयात आग आहे, अशी माणसे या अन्यायाविरुद्ध पेटून उठतात. आतंकवाद किंवा नक्षलवादाचा जन्म तिथेच होतो. सत्याठाह, उपोषण, आत्मक्लेश, कोणी एका गालावर झापड मारली तर दुसरा गाल समोर करण्याची भाषा आता इतिहासजमा झाली आहे. ही भाषा बोलणारे आणि ही भाषा समजून घेणारे आता पृथ्वीतलावर उरले नाहीत. ज्यांनी ही भाषा समजून घ्यावी अशी अपेक्षा असते त्यांची सद्सद्विव
कबुद्धी जागृत असावी लागते, त्यांच्यात तेवढी नैतिकता असावी लागते. ती आता उरली नाही, अन्यथा पहिल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली नसती. माणुसकीची भाषा संपल्यानेच आज अतिरेकाच्या भाषेचे चलन वाढले आहे. एक सुप्त आग आतल्या आत धुमसत आहे. वेळीच त्याची दखल घेतल्या गेली नाही तर एक दिवस ही आग सगळ्यांनाच जाळून राख करेल. बंदुकीच्या गोळीने प्रत्येक समस्येचा निकाल लागू शकत नाही. तसे असते तर आज जगात समस्याच शिल्लक राहिल्या नसत्या. महाबलाढ्य अमेरिकाही आज शस्त्रसंपन्नतेच्या बळावर आपल्या नागरिकांना शांततेची, सुरक्षेची हमी देऊ शकत नाही. सारी भौतिक सुखे पायाशी लोळण घेत असतानादेखील अमेरिकन जनता प्रचंड भेदरलेली, अस्वस्थ आहे. थोडक्यात काय तर गुन्हेगारांना संपवून गुन्हेगारी संपणार नाही; तर सर्वसामान्य असणाऱ्या लोकांना गुन्हेगारीकडे वळविणाऱ्या वाटा नष्ट केल्या पाहिजे; परंतु तसा प्रयत्न होत नाही. परिणामी गुन्ह्यांच्या, गुन्हेगारांच्या संख्येत निरंतर वाढ होत आहे. पोलिस दलावर प्रचंड ताण पडत आहे, तुरुंग अपुरे पडत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, समाजात खऱ्या अर्थाने सुदृढ शांतता निर्माण करायची असेल तर थोडी वेगळी वाट चोखाळावी लागेल. सर्वात प्रथम गुन्हेगारांकडे पाहण्याचा तथाकथित सभ्य समाजाचा, सरकारचा आणि प्रसार माध्यमांचा दृष्टिकोण बदलायला हवा. नक्षलवाद्यांचेच उदाहरण घेऊ या! नक्षलवाद्यांकडे देशाचे शत्रू या भावनेनेच सगळे पाहतात. त्यांना पकडून तुरुंगात डांबणे किंवा त्यांना ठार करणे, हाच नक्षलवाद संपविण्याचा एकमेव मार्ग आम्हाला माहीत आहे. परंतु विशी-पंचविशीतील तरुण नक्षलवादाकडे का आकर्षित होतात, ज्या हातांनी देशाचे भवितव्य घडवायचे ते हात आज बंदूक घेऊन रानोमाळ का भटकत आहेत, याचा विचार कोणीच करत न
ही. त्यांच्या काही मागण्या असतील, तक्रारी असतील तर त्या समजून घ्यायला कुणी तयार नाही. डाकू वाल्याला महर्षी वाल्मीकी बनण्याची संधी देणारी आपली परंपरा आज गोठून गेली आहे. संवेदनाहीन झाली आहे. नक्षलवाद्यांचा मार्ग कदाचित चुकत असेल, परंतु या चुकीच्या मार्गावर त्यांना ढकलणारे आम्हीच आहोत, हे विसरता येत नाही. सनदशीर मार्गाने लढा देऊन आपल्या मागण्या मांडण्याची अपेक्षा आपण सगळ्यांकडूनच करीत असतो. या सनदशीर मार्गाने किती लोकांच्या मागण्या मान्य झाल्या, किती लोकांना न्याय
मिळाला हे सांगण्याची तसदी सरकार घेणार आहे काय? पर्याय
नसतो तेव्हाच माणूस टोकाची भूमिका घेतो. शांततापूर्ण आंदोलनाला तर सरकार साधी भीकही घालत नाही. लाखोली डाळीचाच प्रश्न घ्या, सनदशीर मार्गाने हे आंदोलन तब्बल 40 वर्षे चालले तेव्हा कोठे सरकारला जाग आली. लाखोळी डाळीवरील बंदी उठवण्याची मागणी सरकारने मान्य केली; परंतु तसा अध्यादेश काढावा म्हणून शांतीलाल कोठारींना पुन्हा एकदा उपोषण करावे लागले. नेहमीच्या कोडगेपणाने सरकारने सुरुवातीला या उपोषणाची दखल घेतली नाही. स्थानिक वृत्तपत्रात बातम्या झळकल्या; परंतु जोपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमांनी कोठारींच्या उपोषणाची दखल घेतली नाही तोपर्यंत सरकार दरबारी कुठलीही हालचाल झाली नाही. अखेर उपोषणाच्या 13व्या दिवशी सरकारी यंत्रणा थोडीफार हालली आणि कोठारींचे उपोषण संपुष्टात आले. सांगायचे तात्पर्य सनदशीर, सभ्य मार्गाने केलेल्या आंदोलनाला सरकारलेखी काहीच किंमत नाही. हा अनुभव आता सार्वत्रिक झाला आहे. त्यामुळेच न्याय देण्याच्या प्रस्थापित व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे जिवंत मनाची माणसे, विशेषत: तरूण वर्ग न्यायाच्या अपेक्षेत आपले आयुष्य घालवायला तयार नाही. त्यांना तात्काळ
्याय हवा आहे. अन्यथा ते स्वत:च आपल्यापरीने न्याय मिळवतील. आज नक्षलवादी म्हणून ज्यांची हेटाळणी केली जाते, देशाचे शत्रू ठरवून ज्यांना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे, मुळात तेसुद्धा प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्यायाचे बळी आहेत. नक्षलवादाला जन्म आम्हीच दिला आहे. देशोन्नतीच्या चमुने नुकताच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड या दुर्गम आदिवासी भागात नक्षलवाद्यांच्या एका नेत्यासोबत संवाद साधला. त्यावेळी त्याच्या बोलण्यातून प्रस्थापित व्यवस्थेने आम्हाला न्याय नाकारला असाच सूर प्रगट झाला. नक्षलवाद्यांच्या मागण्या वैयक्तिक स्वरूपाच्या नाहीत. आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील समानतेच्या मुद्यावर त्यांचा लढा सुरु आहे. ही समानता प्रस्थापित करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी शस्त्र हाती घेऊन थेट सरकारलाच आव्हान दिले आहे. त्यांचा हा मार्ग कदाचित योग्य नसेलही, परंतु या तरुणांना हाती शस्त्र घ्यायला भाग कोणी पाडले? स्वातंत्र्याच्या पंच्चावन वर्षांनंतरही सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम कोणामुळे राहिली? पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच योग्य नियोजन झाले असते तर ही विषमता निर्माण झालीच नसती. त्यावेळी शासनकर्त्यांनी दूरदृष्टीने निर्णय घेतले असते तर आज या तरुणांना हा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची आवश्यकता भासली नसती. 80 च्या दशकात पंजाबमध्ये आतंकवाद फोफावला तो अशाच कारणांमुळे! पंजाबी जनतेच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने दुलर्क्ष केले. ‘आनंदपुर साहिब ठराव’ हा केवळ पंजाबी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाराच ठरला. अखेर पंजाबी जनतेच्या मनातील ठिणगीचा भडका उडाला आणि पंजाबी तरूण हाती शस्त्र घेऊन सरकारविरुद्ध लढायला उभा ठाकला. या असंतोषाची योग्य दखल न घेता त्यातही राजकारण करण्यात आले. परिणामी भिंद्रानवाले नावाचा भस्मासूर पंजाबात उभा झाल
ा. अखेर छोट्याशा मलमपट्टीने बरी होणारी जखम नीट करण्याकरिता ऑपरेशन ब्ल्यू स्टार नावाची जीवघेणी शस्त्रक्रिया करावी लागली. सरकारच्या चुकांमुळे, अन्यायामुळे त्रस्त झालेला युवक कंटाळून शस्त्र घेऊन उभा झाला की, सरकार सरळ त्याला देशद्रोही, आतंकवादी किंवा नक्षलवादी संबोधून मोकळे होते. या लोकांचा अतिरेक सरकारला दिसतो, स्वत:च्या चुका मात्र दिसत नाहीत. एकेकाळी राज्यात कापसाला सरकारतर्फे मातीमोल भाव दिला जात होता. त्याचवेळी शेजारच्या राज्यात मात्र कापसाला चांगला भाव होता. एका राज्यात सोने ठरणारा कापूस दुसऱ्या राज्यात मातीमोल कसा ठरतो, या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नव्हते. शेवटी शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून आम्ही सीमापार आंदोलन राबविले. आमची ही कृती आम्हाला सरकारच्या लेखी आतंकवादी ठरवून गेली. त्यावेळी आतंकवाद्यावर लावतात तीच कलमे माझ्यावर लावण्यात आली. माझी बाजू मांडण्याकरिता देशोन्नतीसारखे सक्षम व्यासपीठ मला उपलब्ध होते म्हणून ठीक, अन्यथा सरकारने मलाही आतंकवादी, नक्षलवादी घोषित करायला कमी केले नसते देशोन्नतीमधून जेव्हा या आंदोलनासंदर्भात जनमताचा रेटा वाढला तेव्हा अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. आज कथित नक्षलवाद्यांना असे कोणतेच व्यासपीठ उपलब्ध नाही. देशोन्नतीशी बोलतांना नक्षलवाद्यांच्या नेत्याने ही खंतदेखील व्यक्त केली. नक्षलवाद्यांची वाट आज चुकली असली तरी ही चूक करण्यासाठी ते विवश होते हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची बाजूदेखील समजून घेतली पाहिजे. त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित झाला पाहिजे. एकेकाळी चंबळच्या खोऱ्यात आपल्या दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या अनेक डाकूंना जयप्रकाश नारायणसारख्या लोकनेत्यांनी याच मार्गाने राष्ट्राच्या मूळप्रवाहात आणले. नक्षलवादीही राष्ट्राच्या मूळप्रव
ाहात सामिल होऊ शकतात. फक्त गरज आहे ती पुन्हा एका जयप्रकाश नारायणांची, न्याय देण्याची व्यवस्था अधिक सुगम, जलद आणि पारदर्शक करण्याची आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशातील कोणत्याही व्यक्तीला आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटू न देणारी आदर्श शासन पद्धती निर्माण करण्याची!
— प्रकाश पोहरे
Leave a Reply