शेवंता आपल्या पारू नावाच्या मुलीबरोबर एका खेडेगावात रहात होती. दिवसभर मोलमजुरी करुन आलेला दिवस ढकलत होती. गेल्या अनेक रात्री तिच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत तिला आपल्या तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलीची चिंता वाटायची.
त्याला कारणही तसंच होतं. पंधरा वर्षांपूर्वी तिनं आधीच्या नवऱ्याला सोडून बाबूरावशी दुसरं लग्न केलं होतं. आधीच्या नवऱ्याच्या छळाला कंटाळून तिनं पदरात असलेल्या दोन वर्षांच्या मुलीसह बाबूरावशी लग्नाच्या जुगाराचा डाव पुन्हा एकदा लावला होता.
मात्र तिची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली होती. दोन वर्ष एकत्र राहिल्यानंतर तो पुन्हा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ लागला. तो अधूनमधून यायचा व तिच्याशी भांडायचा. बिचारी शेवंता नशिबाला दोष देत दिवस काढत होती.
पाच वर्षांपूर्वी असाच बाबूराव एका संध्याकाळी दारु पिऊन शेवंताकडे आला. रात्री जेवण झाल्यावर त्याची नजर आपल्या सावत्र मुलीकडे गेली व त्याच्यातला सैतान जागा झाला. तो शेवंता समोरच पारूवर बळजबरी करु लागला. शेवंतातील आईने, दुर्गाचे रूप धारण केले व बाबूरावला पोलीसांच्या ताब्यात दिले.
पोलीसांनी बाबूराववर बळजबरीचा गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी पाच वर्षांसाठी तुरुंगात केली. गेली पाच वर्षे शेवंता व पारू चार ठिकाणी धुणंभांडीची कामं करुन दिवस काढत होत्या.
शिक्षेची मुदत संपण्याच्या आधीच जानेवारी महिन्यात बाबूराव तुरुंगातून बाहेर पडला व त्याने पहिल्यांदा शेवंताला गाठले. तिच्या तक्रारीवरूनच त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्या गोष्टीचा त्याला सूड घ्यायचा होता. त्याने दारु पिऊन दोघींना पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. शेवंताने लागलीच पोलीसांकडे जाऊन त्याच्याबद्दल तक्रार केली, मात्र पोलिसांनी काहीएक कारवाई केली नाही. गेले चार महिने बाबूराव छळत राहिला आणि त्या मायलेकी सहन करीत राहिल्या.
गेल्या सोमवारी दुपारच्या वेळी बाबूराव शेवंताकडे दारु पिऊन आला व शिवीगाळ करु लागला. पारूवर पुन्हा बळजबरी करु लागला. शेवंता मधे पडली तर तिलाही तो दाद देईना. दोघांचे भांडण सुरु झाले. पारूची सहनशक्ती आता संपली होती. तिने घरातला हाताला लागलेला लाकडी दांडा उचलला व बाबूरावच्या तोंडावर जोर लावून मारला. क्षणार्धात बाबूराव रक्तबंबाळ अवस्थेत अंगणात कोसळला. एका फटक्यातच त्याला त्याच्या कर्माची सजा मिळाली.
यावेळी पोलीस तातडीने आले. त्यांनी दोघींना ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरु केली…
या सत्यघटनेची बातमी, मंगळवार, १८ मे २१ च्या ‘लोकमत’मध्ये आलेली मी वाचली आणि मला १९६५ साली प्रदर्शित झालेला भालजी पेंढारकर यांचा ‘साधी माणसं’ हा चित्रपट प्रकर्षाने आठवला. त्यातील पारु लोहारीण, तिच्यावर बळजबरी करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला लाकडाच्या एका फटक्यातच यमसदनास पाठविते…त्याचीच ही पुनरावृत्ती होती…
आजही अन्यायाविरुद्ध अशा अनेक पारूंना महिषासुर मर्दिनीचा अवतार नाविलाजास्तव घ्यावा लागतो…त्यांना खरं तर अशा स्वतःचं शील वाचविण्यासाठी केलेल्या खुनासाठी शिक्षा होऊ नये…मात्र न्यायदेवतेच्या डोळ्यांवर तर पट्टी बांधलेली आहे…
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२०-५-२१.
Leave a Reply