२०१७; माझ्यासाठी आयुष्याला वेगळ वळण देणारं वर्ष. या वर्षाने मला खुप काही दिलं. मी ज्यांना माझं समजत होतो ती माणसं प्रत्यक्षात किती खुज्या विचारांची होती, हे मला या वर्षाने दाखवलं. सगळं सपलं, आता कसं होणार, असं वाटून २०१७च्या अगदी सुरुवातीस माझ्या मनात दाटलेली निराशा, आज वर्ष संपताना माझ्या मनाच्या आत तर सोडाच, बाहेरच्या दहा-पाच किलोमिटरच्या परिघातही दिसेनासी झालीय. मला या वर्षाने प्रचंड आत्मविश्वास दिला आणि त्यामुळेच ‘तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे सद्गुरू वामनराव पैंचं वचन या वर्षात मी अक्षरक्ष: जगलो आणि माझं मन मोकळं, निरभ्र झालंय..! निराशेच्या पोटी आशाही जन्म घेऊ शकते हे माहित होतं, ते अनुभवताही आलं, हे मला या वर्षात समजलं..हे मला या वर्षाचं अनमोल देणं..!!
मला हा आत्मविश्वास दिला शब्दांनी, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो, त्या माझ्या ‘मराठी’ भाषेने. शब्दांनी, माझ्या मातृभाषेनै माझ्या आयुष्यात वर्षाच्या सुरुवातीला निर्माण झालेली नकारात्मक पोकळी सकारात्मक करण्याचा मार्ग दाखवला..
सर्वांसाठी सारखी असणारी ५२ की ५५ मराठी मुळाक्षरं मला अगदी लिहा-वाचायला येऊ शकलं, तेंव्हापासूनच भुरळ घालत आली आहेत. वाचनाचा नाद, वेगवेगळ्या वयात बदलत गेलेली आणि वाढत्या वयानुसार समजत गेलेली वाचनाची चव, यांनी मला इतकं अबोल देणं दिलं आहे, हे मला याच सन २०१७ मधे जाणवलं आणि इतक्या वर्षांच्या वाचनाने मना-रक्तात भिनलेली ती ५२ की ५५ मुळाक्षरं त्यांच्या स्वरांच्या साजासकट उलट-सुलट, परंतू काहीतरी निश्चित अर्थ निर्माण करणाऱ्या क्रमाने, माझ्या बोटांतून मोबाईलच्या किबोर्डच्या माध्यमातून मोबाईलच्या स्क्रीनवर उतरत गेली.
वाचनामुळे विचार करायची सवय नकळत लागली होतीच, ते कधी तरी मनात रुजलेले माझे विचार या निनित्ताने स्क्रिनवर उमटू लागले आणि थ्री-जी, फोर-जी बॅंडविड्थच्या माध्यामातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचू लागले आणि मग सुरू झाला एकच आनंद सोहळा,दु:ख-निराशेला पुरून वर आणखी दशांगुळे उरलेला..
देह-जागा-वेळ हे सारं सारं विसरून मी लिहू लागलो. अनेकांपर्यंत पोहोचू लागलो, या माध्यमातून असंख्य अपरिचित, दहा जन्मांचे दूरस्थ सोबती असावेत असे मित्र-मैत्रिणी मला शब्दांनी दिले..चेहेऱ्यांवर मुखवटे चढवलेल्या माणसांपेक्षा चेहेरे नसलेली माणसं सच्ची असतात, हे मला या काळात समजलं. शब्दांची ताकद, शब्दांची मोहीनी काय असते, हे मी या वर्षभरात अनुभवंल..या जगात निराशेला, ऱ्हस्व विचारांना जागाच नव्हती, एवढं माझं सारं अवकाश शब्दांमुळे आशेने भरून गेलं..
ज्या माणसांना मी आजाराचा मजबुत बुंधा समजत होतो, त्या सडलेल्या फांद्या होत्या, याची जाणीव मला या वर्षभरात झाली. सुरुवातीला त्यांच्याबद्दल मनात निर्माण झालेली घृणा नंतरच्या काळात नाहीशी झाली आणि त्याची जागा त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने घेतली. कृतज्ञता याचसाठी, की जर त्यांचा आधार मला सोडावा लागला नसता, तर मला माझ्या पंखातलं बळ आणि उड्डाणाची रेंज मला कधी कळलीच नसती..ती मला या वर्षात समजली म्हणूनही हे वर्ष माझ्यासाठी बहुमोल ठरलं..
आणखी अशा अडचणीच्या काळात माझी पत्नी व सर्वच कुटुंब माझ्यासोबत खंबिरपणे उभं आहे याचा विश्वासही मला या वर्षाने दिला..
मित्रा, २०१७ मी तुझा फार फार आभारी आहे..तू मला खुप काही दिलंयस..
गुडबाय, तू परत येणार नसलास, तरी माझ्या मनात सतत जिवंत असणारायस..!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply