Unlimited…???… Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे .. आणि तितकीच फसवी देखील ….जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच…. Upper Limit मात्र कमी जास्त होऊ शकतं…. म्हणजे कुठलं ना कुठलं Limit हे असतंच… उदाहरणार्थ जेव्हा आपण Limited थाळी खायला जातो तेव्हा हॉटेल मालकांनी ठरवलेलं Limit असतं आणि Unlimited थाळी खायला जातो तेव्हा आपलं म्हणजे खाणाऱ्यांचं Limit असतं …. जे व्यक्तीपरत्वे कमी जास्त असू शकतं …. एरवी घरी २ पोळ्या खाणारा तिथे ५ खाईल , ८ खाईल … किंवा ५-६ च्या ऐवजी एकदम २१ गुलाबजाम सुद्धा खाईल …. त्यामुळे थाळी Unlimited असली तरी शेवटी Limit हे असतंच … आजकाल मिळणाऱ्या Unlimited data plan चं ही तसंच … कोणी 5 GB वापरेल तर कोणी 500 GB… तरी देखील Unlimited च्या या चक्रात आपण अडकतोच …
या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली असेल असा विचार करायला लागल्यावर एकदम डोळ्यासमोर आली ती बर्फाच्या गोळ्याची गाडी आणि आणि तिथे उभं राहून गोळा खाणारा लहानपणीचा मी … … गोळा खाताना “भैय्या ..थोडा शरबत डालो …आणि…. भैय्या …थोडा बरफ डालो… असं म्हणत , एका गोळ्याच्या किमतीत जवळ जवळ दिड गोळा खाण्याचा आनंद काही वेगळाच असायचा …. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा नेहमी “थोडं अजून” हवं असतं …ते मिळवण्यात जास्त आनंद असतो …. मग अशा “थोडा है .. थोडे की जरुरत है” प्रकारचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर आले आणि ही गोष्ट सर्वव्यापी आहे हे पक्कं झालं …
दुधवाल्या काकांनी दुधात कितीही पाणी घातलं तरी ठरलेलं दुध दिल्यानंतर उगाच माप किटलीत घालून थोडसं extra दुध पातेल्यात ओतल्यावर चमकणारा गृहिणींचा चेहरा …
परीक्षा संपल्याची वेळ होऊन सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करेपर्यंत supervisor नी दिलेला बोनस वेळ मिळाल्यावर आनंदी होणारा विद्यार्थी …
भाजी घेतल्यावर भाजीवाल्यांनी उगाच बांधून दिलेली थोडीशी मिरची – कोथिंबीरिची पुडी घेताना खुश होणारे कुठलेसे आजोबा ….
रात्रभर गाढ झोपूनही सकाळी अलार्म वाजल्यानंतर “ शेवटची ५ मिनिटं “ झोपण्यात खरं समाधान मिळतं हे कुणीही अमान्य करणार नाही ..
शनिवार – रविवार सुट्टी मिळूनही जोडून सोमवारी एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर तिचं स्वागतच असतं …
Due Date साठी मुबलक वेळ मिळूनही deadline नंतर मिळणारा १-२ दिवसाचा Grace period महत्वाचा वाटतो …
४ तासांची संगीत मैफिल ऐकूनही शेवटी फर्माईश म्हणून २ मिनिटांचा गायला जाणारा एखादा अंतरा हवाहवासा वाटतो …
पोटभर पाणीपुरी , शेवपुरी , भेळ खाऊन सुद्धा शेवटच्या “मसाला पुरीचा” पूर्णविराम मिळाल्याशिवाय मन तृप्त होत नाही ….ही आणि अशी अनेक उदाहरणं ………
तेव्हा मनुष्य प्राण्याची हीच “ थोडं अजून “ असलेली मानसिकता हळूहळू व्यापारी वर्गानी , विक्रेत्यांनी En-cash केली … आणि यातून पुढे त्याच किमतीत १० % जास्त टूथपेस्ट किंवा पावडर दिली जाऊ लागली … पुढे पुढे फ्री चा जमाना आला … साबणावर पेन फ्री … चहा बरोबर बरणी फ्री ते अगदी Buy 3 get 1 फ्री … वगैरे वगैरे ….वेगवेगळ्या वस्तूंसाठी , वेगवेगळ्या ग्राहक वर्गासाठी विविध ऑफरचं खतपाणी घालून हे “ थोडं अजून” मानसिकतेचं झाड व्यवस्थित रुजवलं आणि पद्धतशीर वाढवलं ………एवढंच काय तर याच “ थोडं अजून “ चा फायदा घेत एका प्रथितयश शीतपेय कंपनीनी आपल्या जाहिरातीत “ ये दिल मांगे मोअर “ अशी tagline च दिली आणि त्यातूनही बक्कळ नफा कमावला …. काळानुरूप payment modes बदलले आणि digital युगात या “ थोडं अजून” ची जागा घेतली ती आजकाल मिळणाऱ्या Reward Points आणि cash back नी … एकंदरीत काय तर या मानसिकतेला वय , जात, धर्म , भाषा , लिंग , आर्थिक स्तर असं कुठलाही बंधन नसतं ….
ठराविक सेल च्या दिवशी mall मध्ये उसळणारी तुडुंब गर्दी , women’s day ला स्वस्तात मिळणारी पाणीपुरी खायला अलिशान कार मधून येऊन रांग लावणाऱ्या महिला .. happy hours साठी धडपडणारे पुरुष , Introductory Offer चा लाभ घेण्यासाठी Online उड्या मारणारी e तरुणाई .. हे सगळे यावर शिक्कामोर्तबच करतात ..
अखेरीस या अशा सगळ्याचा परमोच्च बिंदू … ज्याच्या अजून पुढे जाणं केवळ अशक्य ….ते म्हणजे अर्थात हे Unlimited प्रकरण …….. आपण सगळे या Unlimited च्या जाळ्यात कळत नकळत इतके ओढले गेलोय की बरेचदा केवळ जास्त मिळतंय म्हणून आपण नको असताना देखील घेतो आणि आपला कसा फायदा झाला असं मानसिक समाधान मिळवतो … कोण्या एका IT तज्ञाचं एक छान वाक्य आहे …””If you want to sell your product But there is no need ..then first create the need”” …. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर आधी ती गरज निर्माण करा … म्हणजे मग गरज निर्माण झाल्यावर लोक ती गोष्ट आपणहून घेतील … पूर्वी ट्रंककॉल असताना किंवा मोबाईल च्या सुरुवातीच्या काळात फोनवर बोलणं महाग होतं … तेव्हा आपण अगदी मोजकं , कामापुरतं बोलायचो … मग हळूहळू ते बोलणं स्वस्त केलं आणि आपल्याला कामाशिवाय किंवा बरेचदा वायफळ बोलण्याची सवय लागली … भलीमोठी बिलं यायला लागली आणि ते स्वस्त करण्यासाठी आता आपण Unlimited calling plan घ्यायला लागलो …. home delivery करणं , AC, Car ते अगदी smart Phone … आधी या कधीच गरजा नव्हत्या पण आता सभोवतालची परिस्थिती अशी काही आहे की या गोष्टी आता चैन नाही तर गरज झालीय आणि म्हणून आपण त्यासाठी पैसे मोजतो …. अर्थात हे सगळं बदलत्या काळाप्रमाणे प्रगती पथाच्या दिशेने जाणारं असल्याने त्यात वावगं काही नाही …. तर …तशीच आता आपल्याया Unlimited ची सवय झालीय … इतकं की आता amusement park च्या तिकिटात सुद्धा आपल्याला Unlimited rides हव्या असतात …
एकीकडे आपण गरज नसतानाही बरेचदा उपलब्ध आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त घेतो तर काहीना गरजे पुरतं देखील मिळत नाही हे वास्तव आहे …. अशाच एका Food Outlet च्या बाहेर ठेवलेल्या कचरा पेटीतून काही भूकेली लहान मुलं ,लोकांनी टाकलेल्या Dish मधून “”उरलेलं अन्न”” वेचून खात होती …. ज्यांच्याकडे शून्य आहे त्यांना शून्यापेक्षा “थोडं अजून“ मिळावं असं वाटणारच ना …. “मन हेलावून” टाकणाऱ्या त्या प्रसंगानी ही जाणीव मात्र करून दिली की आपल्याकडे Unlimited असूनही कधी कधी आपण असमाधानी असतो पण इतरांनी टाकलेलं Limited अन्न कोणासाठीतरी Unlimited थाळी सारखं असतं आणि तेवढ्याश्या नी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान ….. तेही Unlimited असतं ………..
आपला प्रवास मात्र “थोडं अजून” पासून सुरु होऊन “”व्हाया Unlimited “” पुन्हा “थोडं अजून” वर येतो …
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply