थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते. त्यांना पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या. थोरले बाजीराव पेशवे हे ६ फुट होते, असा इतिहासात उल्लेख आहे, भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हाव असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे. भपकेबाज पोशाखाचा त्याला तिटकारा होता, स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता, नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते – निळा, गंगा, सारंगा आणि अबलख अगदी त्यांचे दाणावैरण पाणी स्वत: बघत. खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाल होतं. उण्यापुर्यां ४० वर्षांच्या आयुष्यात थोरले बाजीराव यांनी अतुल पराक्रम गाजवला.
१७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा(डिसेंबर,१७२३), धर(१७२४), औरंगाबाद(१७२४), पालखेड(फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद(१७३१) उदयपुर(१७३६), फिरोजाबाद(१७३७), दिल्ली(१७३७), भोपाळ(१७३८), वसईची लढाई(मे,१७,१७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया थोरले बाजीराव पेशवे जिंकले आहेत. एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील हे एकमेव सेनापती आहेत.
पहिल्या बाजीराव यांनीच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि सातार्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश याने छत्रसाल बुंदेलावर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता. आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण, दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. “जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥” – याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने – उन्मत्त क्षत्रिय सत्ताधिशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने “जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा “गजांतमोक्षाचा” हवाला देउन बाजीरावाकडे मदतीची याचना केली.
पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजीरानेच “बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?” अशी स्तुति केली. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजिरावास दिली, जेणेकरून बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील.
या शिवाय बाजीरावास “काशीबाई” ही प्रथम पत्नी होतीच. काशीबाई पासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडून समशेरबहादूर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला. चिमाजी अप्पा हे बाजीराव यांचे धाकटा भाऊ. चिमाजी अप्पा यांनी देखील कोकण घाट आणि किनार्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.
थोरले बाजीराव पेशवे यांचे २८ एप्रिल १७४० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply