नवीन लेखन...

थ्री सिस्टर्स

सेंट जॉनमध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीत, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे मराठी युवक आता आमचे मित्र बनले होते. एक भाषा, एक देश या नात्याने विदेशातली आमची ओळख घट्ट बनली होती. न कळत आपलेपणा निर्माण झाला होता. आम्ही दिवसभर पर्यटन स्थळाना भेटी देऊन यायचो नि ते ऑफिसची आपली ड्युटी संपवून घरी परतायचे. मग रात्री चर्चेचा तास रंगायचा. कुठे गेलो होतो ? काय, काय पाहिले? कसे आहे…. ? बरीच चर्चा रंगायची. एक दिवस त्यांनी मिस्कीलपणे  हसत सहज विचारले,

‘थ्री सिस्टर्स’ पाहिलात का ?’

त्यांच्या बोलण्यातील मिस्किलपणामुळे मी कांहीसा गोंधळलो. त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला नाही. मात्र त्यामुळे मनाला उत्कंठा लागली. म्हणून मीच विचारले,
‘थ्री सिस्टर्स !’ ……. काय भानगड आहे ?

‘भानगडबिनगड कांही नाही, बंदराशेजारी हा एक पॉईंट आहे. पहा आणि जाणून घ्या’
सेंट जॉन नदीवरील भव्य पूल पार करून बंदराशेजारील नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आम्ही सलग दोन दिवस फेरफटका मारला होता. पण ‘थ्री सिस्टर्स’ पॉईंट आमच्या निदर्शनास आला नव्हता. त्यांच्या मिस्कील बोलण्यामुळे ‘थ्री सिस्टर्स’ भानगड जाणून घेण्याची ओढ लागली. संतोषीला याबाबत विचारले त्यावर ‘आपण तिथे उद्या जाऊ’ असे ती म्हणाली.

दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलोही. प्रिन्स विल्यम स्ट्रीट रस्त्याच्या शेवटच्या टोकावर एका उंचवट्यावर हे ठिकाण आहे. इथून दूरवर पसरलेला फंडीचा उपसागर स्पष्ट दिसतो. सेंट पेट्रीक स्क्वेअरच्या शेजारी एका खांबावर तीन लाल दिवे दाखवित संतोषी म्हणाली,

‘याच त्या थ्री सिस्टर्स ……..!’

‘लाल दिवे ……. थ्री सिस्टर्स …..’ कांहीच अर्थबोध होत नव्हता. मी गोंधळून तिला प्रश्न केला.

‘हे तर तीन लाल दिवे, यात एवढे काय आहे ?’ माझी कन्या विचारी नि तेवढीच भाऊकही आहे. ती म्हणाली,

‘पप्पा, तुम्ही शिक्षक आहात. त्या तीन दिव्यांच्या मागे कांही इतिहास असू शकतो; तो जाणून घ्या. लाल दिव्यांच्या शेजारी असलेली माहिती वाचा म्हणजे लक्षात येईल.’

गोष्ट दिसायला साधी असली तरी त्याच्या मागे दडलेला इतिहास कांही वेळा मोठा असतो. तो जाणून घेतल्यानंतर त्यामागच्या लोकांच्या भावना नि त्याचे महत्व समजून येते. या तीन लाल दिव्यांच्यामागे अशीच एक कथा आहे. ‘थ्री सिस्टर्स’ (तीन बहिणीं) …. नावावरून कोणा तीन बहिणीची यामागे कथा असावी हे समजण्यास वेळ लागला नाही. तीन दिवे हे त्या तीन बहिणींचे जणू प्रतिकच आहे.

दिव्याच्या रुपात या तीन बहिणी शेकडो वर्षे उभा आहेत. महासागरत वादळ, वाऱ्यात  अडकलेल्या प्रवाशांना दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. पर्यटन स्थळ म्हणून पहाण्यासरखे इथे विशेष कांही दिसणार नाही, परंतु एक स्मारक म्हणून त्याचे संवर्धन करण्यामागची भावना व उद्देश मला महत्वाचा वाटला.

मी तीन लाल दिव्यांच्या स्तंभाशेजारी गेलो. स्तंभावर असलेल्या तीन दिव्यांकडे निरखून पाहिले. पण केवळ दिवे पाहून कांही उमजण्या सारखे नव्हते. शेजारीच एक माहिती फलक दिसला. स्वाभाविक ओढीने मी फलकाशेजारी गेलो. तेवढ्याच उत्कंठेने त्यावर लिहिलेली कथा वाचली. इंग्रजी नि प्रेंचमध्ये कथा अगदीच थोडक्यात लिहिली होती. मी पुन्हा, पुन्हा ती वाचली नि जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती सत्य कथा कि दंत कथा हे सांगता येणार नाही; मात्र त्या मागचा उद्देश समाज प्रबोधनाचा होता नि आहे, हे लक्षात आले.

रात्रीची वेळ. तीन बहिणी महासागराच्या किनाऱ्यावर उभ्या होत्या. समुद्रात गेलेल्या आपल्या प्रियकरांची त्या आतुरतेने वाट पहात होत्या.  एव्हाना सर्वत्र गडद आंधार दाचला. सोसाट्याचा वारा सुरू झाला. उफाळलेल्या वादळाबरोबर समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटांचा भयंकर आवाज, त्यांच्या काळजाचा थरकाप उडवून द्यायचा. त्यामुळे त्यांच्या मनात भितीचे वादळ घोंघाऊ लागले. त्या दीनवाने आपल्या प्रियकरांना हाका मारू लागल्या. अन्नपाण्याविना त्यांच्या प्रतीक्षेत त्यांनी संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत जागून काढली.

समुद्रात गेलेल्या त्यांच्या प्रियकरांचे पुढे काय झाले, याचा कुठे स्पष्ट उल्लेख आढळला नाही. परंतु त्या काळात समुद्रात जाणे किती धोक्याचे होते. पाठिमागे तुमचे लोक तुमची आतुरतेने वाट पहात आहेत, वेळेत नि सुखरुप परत या हाच संदेश देण्याचा या कथेमागे उद्देश आहे हे निश्चित. हे तीन दिवे म्हणजे त्या तीन बहिणींचे प्रतिक आहे.
या दंत कथेत वास्तविक अंश असू शकतो. परंतु आज या लाल दिव्यांचा दिशा दर्शक म्हणून वापर होत आहे. बंदराकडे येणाऱ्या जहाजाना रात्रीच्या अंधारात योग्य मार्ग दाखविण्याचे काम हे दिवे करतात. किनाऱ्यापासून तीन मैल दूर समुद्रात असलेल्या खलाशांना हे दिवे दिसतात. तिन्ही दिवे दिसल्यास आपण  योग्य दिशेने जात असल्याची त्यांना खात्री होते. परंतु केवळ दोन किंवा एकच दिवा त्यांच्या दृष्टीस पडल्यास आपल्या मार्गक्रमणाची दिशा चुकल्याचे त्यांच्या निदर्शनास येते व ते योग्य दिशेला आपले जहाज वळवितात.

थ्री सिस्टर्स लॅंपच्या जागी 1842 मध्ये एका खांबावर एकच तेलाचा दिवा लावण्यात आला होता. पुढे 1847 मध्ये सेंटजॉन गॅस कंपनीने नाविकांना दिशादर्शक म्हणून त्याच ठिकाणी एक गॅसचा दिवा उभा केला. एका पायलट बोटमध्ये प्राण गमविलेल्या खलाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेंटजॉन आयर्न वर्क्सने 1967 मध्ये त्याचे तीन दिव्यांमध्ये रुपांतर केले. आज समुद्रातून प्रवास करणाऱ्या खलाशांना या ‘थ्री सिस्टर्स’ (तीन दिवे) वरदान ठरले आहेत. समुद्र सपाटीपासून 42 फूट उंचीवर हे दिवे आहेत. या आधी पाहिलेले लाईट हाऊस आणि थ्री सिस्टर्स दिव्यांच्या उभारणीचा उद्देश दूरवर सहसागरात गेलेल्या लोकांना दिशा दाखविणे हाच आहे.

— मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..