नवीन लेखन...

प्लास्टिकला करुया हद्दपार

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा ढीगभर आल्या. त्याहीपेक्षा मोठा ढीग आता आपल्याला निस्तनाबूत करायचा आहे असा संकल्प ह्या दिवशी सर्वांनी मिळून करावा ही इच्छा बाळगून ही एक प्रामाणिक प्रयत्न.

हा ढीग आहे प्लास्टिकचा. आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई,कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो. प्रत्येकाने मनातल्यामनात एक शपथ घ्या की आजपासून मी प्लास्टिकचा, विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने बंद करेन. आणि रोज दोन जणांना ह्याप्रमाणे प्रवृत्त करेन. पुढे त्यांनाही तोच मेसेज फोरवर्ड करायला सांगून देशाला प्लास्टिकच्या टाईम बॉम्ब पासून मुक्त करेन. दोनाचे चार, चाराचे आठ, आठाचे सोळा असे वाढत वाढत फक्त ३० दिवसात त्रेपन्न कोटी अडुसष्ट लाख सत्तरहजार नऊशेबारा लोकांना हा संदेश जातो. ही गणिताची किमया आहे. ह्याची मुहूर्तमेढ करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा चांगला दिवस नक्कीच नाही.

झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य आपण रोज कुठेनाकुठे ऐकतोच. पण प्रत्येकाला ते शक्य होत नाही. म्हणून असलेल्या झाडांना व्यवस्थित पोषण मिळेल अशी किमया आपण नक्कीच करू शकतो. ह्याविषयी मी वाचलेले एक संशोधन सांगतो.

एका शास्त्रज्ञाने समान जातीची काही बियांची पेरणी कुंड्यांमध्ये केली. दुसऱ्या काही कुंड्यांमध्ये पण तशीच पेरणी केली. पहिल्या कुंड्यांच्या मातीमध्ये प्लास्टिकचे बारीक तुकडे करून टाकले आणि दुसऱ्या गटातील कुंड्यांमध्ये फक्त माती टाकली. दोन्ही गटातील कुंड्यांना समान सूर्यप्रकाश, पाणी टाकले. सुमारे दोन महिन्यांच्या अंतराने त्या दोन्ही कुंड्यांच्या रोपट्यांची उंची पहिली. प्लास्टिकचे तुकडे टाकलेल्या कुंड्यांमधील रोपटी सरासरी २५% लहान होती. फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण बंद केला तरीही भाज्यांचे/ फळांचे उत्पादन २५% ने वाढेल आणि भाव आपोआपच कमी होतील.

प्लास्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्स ह्या दोन रसायनांचा वापर केला जातो. ह्यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वात अधिक निर्मिती ह्या रसायनांची होत आहे. मागणी तसा पुरवठा ह्या न्यायाने हे उत्पादन प्रचंड प्रमाणात होते. शरीरातील संप्रेरेकांचा समतोल बिघडवून पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन कमी करणे आणि स्त्रियांमधील एफ. एच. एस. आणि एल. एच. हॉर्मोन्सचे संतुलन ह्याने बिघडते. बिस्फिनॉल ए व थॅलेट्स मध्ये असलेले झेनोइस्ट्रोजेन संप्रेरकाचा (हॉर्मोनचा) विपरीत परिणामामुळे हे बदल होतात असे संशोधनात सिद्ध झाले. ह्याच्या सेवनामुळे प्रजननक्षम वयात पियुशिका ग्रंथीच्या संतुलनावर आघात होऊन गर्भाशयाच्या आतील आवरणाचा अवाजवी विस्तार (एन्डोमेट्रिओसिस), गर्भाशयाच्या आतील आवरण गर्भाशयाच्या मांसाला चिरून बाहेर पसरणे (अॅडिनोमायोसिस), बीजकोशात फुगलेल्या साबुदाण्या प्रमाणे सॅक होणे (पी.सी.ओ.एस.) असे विकार उत्पन्न होऊन वंध्यत्व येते. ह्या रसायनांमुळे मेंदूच्या प्राकृत क्रिया बिघडतात, कर्करोग होण्याची शक्यता वाढते, हृद्रोगाचा धोका संभवतो, मधुमेह, चरबी वाढणे, स्मृतिभ्रंश, अपस्मार असे विकार होण्याची शक्यता बळावते. हे धोके लक्षात आल्यापासून अनेक देशांमध्ये अन्न व औषधी प्रशासनाने त्यावर बंदी घातली.

हे आपल्या शरीरात कसे जाते ?

प्लास्टिकचा वारेमाप वापर खाद्यपदार्थांच्या किंवा अन्य वस्तूंच्या पॅकिंगसाठी केला जातो. त्यातील खाद्य / पेय / वस्तू वापरून झाल्यावर त्या आवरणाचा पुढे काहीही उपयोग नसतो म्हणून हे प्लास्टिक फेकून दिले जाते. फेकलेले प्लास्टिक शेवटी मातीतच गाडले जाते. उन्हाने जमीन तापल्यावरह्यातील विषारी घटक मातील मिसळले जातात आणि त्याच मातीत आपण अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे झाडांच्या मुळातून हे रसायन शोषले जाऊन त्याची हानीकारक शृंखला परत मनुष्याच्या आरोग्याला शह देण्यासाठी तयार होते. मातीत फेकलेल्या प्लास्टिकचा किमान १००० वर्ष नाश होत नाही. त्यामुळे मातीचा कस कमी होतो परिणामी अन्नधान्याचा तुटवडा होण्याची भीती ही पण एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. प्लास्टिक पाण्यावर तरंगते. त्यामुळे पृथ्वीवर फेकलेल्या प्लास्टिकचा काही भाग मातीतून शेवटी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नद्यांच्या प्रवाहातून समुद्रात जातो. जलचर प्राणि आणि माशांची प्रजनन क्षमता ह्याने खालावते आणि त्यांच्या शरीरातही ह्या रसायनांचा साठा होऊ लागतो. मासे खाणाऱ्यांनाही त्यातून बिस्फिनॉल ए आणि थॅलेट्स मिळू लागते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे आरोग्यासाठी उत्तम आहेत हे निर्विवाद सत्य आहे. पण बाजारात मिळणाऱ्या ह्या खाद्यपदार्थांवर क्वालिटी कंट्रोलचा लगाम कोण लावणार आणि कसा लावणार?

आपण काय करू शकतो?

पूर्वी विनोदाने म्हटले जायचे की मुंबईचा माणूस घरातून बाहेर पडतांना  “पेरूचापापा” घेऊन निघतो. पेरूचापापा म्हणजे पेन, रुमाल,  चाव्या, पास आणि पाकीट. काळानुसार आता त्यात मोबाईलची भर पडली आहे. घरात हा मोबाईल ठेवण्याची जागा एका कापडी पिशवीमध्ये नक्की करावी. म्हणजे घरातून बाहेर पडतांना आपोआप ती पिशवी बरोबर घेतली जाईल आणि प्रजनयंत्रणेला संरक्षण देण्यासाठी आपला हातभार लागेल. रोज लागणारी भाजी किंवा फळे आणण्यासाठी ह्या पिशवीचा उपयोग केला तरी प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी करता येईल. त्यातून घेतलेल्या भाजीमध्ये बिस्फिनॉल ए आणि थॅलेट्स असणारच आहे पण काही काळाने येणाऱ्या भाज्यांमध्ये तरी ह्या विषारी रसायनांचे प्रमाण कमी होऊ शकेल. मागणी तसा पुरवठा हा व्यापाराचा केंद्रबिंदू आहे. मागणी कमी करून ह्या निर्मात्यांना पुरवठा कमी करण्यास भाग पाडूया. आजच्या घडीला दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई ह्या ४ महानगरांमधील प्लास्टिक कचरा दर दिवशी ६१ लाख किलो पेक्षा जास्त तयार होतो असे अभ्यासले गेले आहे.

१) प्रवासाला जातांना घट्ट झाकणाची हलकी स्टेनलेस स्टीलची बाटली जवळ ठेवा

२) बाजारात जातांना बारा महिने एक कापडी पिशवी जवळ बाळगा

३) हॉटेलमधून काही पार्सल घेण्यासाठी जातांना एक स्टेनलेस स्टीलचा डबा बरोबर घेऊन जा

४) सरबते किंवा थंड पेय पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर करू नका

५) मुलांना शाळेत मधल्या सुट्टीचा खाऊ स्टीलच्या डब्यात द्या

६) बाजारातून धान्य खरेदी करतांना कागदी पिशवीचा आग्रह धरा किंवा सरळ कापडी पिशवीत घ्या

७) फ्रोजन पदार्थ प्लास्टिकमध्ये पॅक केलेली असतात म्हणून त्यांचा वापर टाळावा

८) घरात धान्य/ मसाले/ चहा/ साखर ठेवण्यासाठी स्टीलचे किंवा काचेचे डबेच वापरावेत

९) घरात किंवा ऑफिसमध्ये एक नजर फिरवा. आपल्याला अनेक गोष्टी प्लास्टिकच्या दिसतील. त्यांना पर्याय शोधा. उदा. सोपकेस, पाण्याच्या बाटल्या, डबे इ. स्टीलची सोपकेस, तांब्या, पातेली अशा कितीतरी वस्तू आपल्याला सहज बदलता येतील.

१०) काही प्लास्टिकच्या वस्तू वापरल्याने त्याचे दुष्परिणाम त्वरित दिसत नाहीत. परंतु त्या वस्तू फेकून दिल्यानंतर त्यापासून होणारे  “प्लास्टिक प्रदूषण” आपल्याला नक्कीच रोखता येईल ह्याची जाणीव ठेवावी.

चाणक्य नीतीनुसार साम, दाम, दंड आणि भेद अशा चार गोष्टी नियम पालनासाठी अमलात आणल्या जातात. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचे परिणाम लोकांच्या आणून दिले तर दाम, दंड आणि भेद ह्या शिक्षांचा वापर करण्याची वेळच येणार नाही. प्लास्टिक काही व्यसन लावणारी वस्तू नाही. तंबाकू, धुम्रपान किंवा मद्यपानावर सक्तीची बंदी आणण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद नक्कीच अमलात आणण्याची गरज पडेल. तशी गरज ह्याबाबतीत पडू नये. फक्त धोकादायक परिणाम निदर्शनास आले तरी कापडी पिशवीचा वापर आणि वर सांगितलेले काही नियम पाळणे कोणालाही सहज शक्य आहे. प्लास्टिकचा बेसुमार वापर चालू राहिला तर ह्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांवर होऊन ते मोठमोठ्या आजारांना बळी पडण्याची शक्यता आहे. म्हणून आजच शपथ घेऊया “ज्याठिकाणी मला शक्य होईल त्याठिकाणी मी प्लास्टिक वापरणार नाही आणि इतरांनाही ह्यासाठी प्रोत्साहित करेन”. स्वातंत्र्य दिनाचा हा संकल्प खऱ्या अर्थाने देशाला मान दिल्यासारखा ठरेल.

— डॉ. संतोष जळूकर
7208777773
srpljalukar@gmail.com

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 34 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..