मी राहातो त्या दहिसर पश्चिमेला, माझ्या इमारतीशेजारीच एक बसस्टाॅप आहे. स्टेशनच्या अगदी नजिक असूनही अजिबात वर्दळ नसलेलं, दहिसर पश्चिम हे मुंबईतलं एकमेंव रेल्वे स्थानक असावं. जी काही गर्दी-गडबड होईल, ती गाडी आल्यावर, एरवी निवांत.
तर, माझ्या घराशेजारच्या या बसस्टाॅपवर गेले पंधरा-विस दिवस एक बाई, तिची पांच-सहा वर्षांची मुलगी आणखी एक एखाद वर्षाचं मुल, असे तिघंजण वास्तव्याला आहेत. वास्तव्याला म्हणणं चुकीचं आहे, आसऱ्याला आहेत. बसस्टाॅपवर राहायची पाळी आली म्हणजे ते रस्त्यावरचे किॅवा कुठंच आसरा नसलेले असणार हे ओघानंच येतं. दोन-तिन प्लास्टीकच्या पिशव्यांतला संसार, बसस्टाॅपवर वाळत घातलेली त्यांची चिरगुटं, एक फाटकी छत्री आणि डोक्यावर बसस्टाॅपचं कधीही काढून घेतलं जाईल असं छप्पर, बस एवढाच तिचा प्रपंचं असावा. असावा म्हणजे आहेच. स्टाॅपवर वाळत घातलेल्या तिच्या आणि तिच्या मुलीच्या कपड्याच्या चिंध्या म्हणजे मला तरी तिच्या ‘संसारा’च्या उडालेल्या चिंधड्या दिसतात. आश्चर्य म्हणजे ती त्या चिंधड्याही जीवापाड जपताना दिसते. ते तिचं संरक्षक कवच असावं बहुदा. आश्चर्य वैगेरे गोष्टी माझ्यासारख्या स्वयंघोषीत प्रतिष्ठीत माणसाला, त्या बाईचं ते परिस्थितीनं शिकवलेलं स्वाभाविक जगणं असावं.
बसस्टाॅपवर लोक एक तर कुठं तरी जायचं म्हणून येतात किंवा कुठून तरी आलेले असतात म्हणून उतरतात. बसस्टाॅप हा काही लोकांचा कायमचा पत्ता नसतो. या सवत्स बाईचं मात्र तसं नसावं. ही बाई कुठून आली हे तिला माहित असावं परंतू कुठं जाणार हे मात्र तिला माहीत नसावं. स्वत: आली की कुणी आणून सोडलं, हे ही तिलाच माहिती असावं, परंतू हा स्टाॅप मात्र तिचा सध्याचा कायमचा पत्ता असावा. ‘स्टाॅप’ या शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ बहुदा तिलाच बरोबर समजलाय किंवा तिच्या परिस्थितीनं तिला समजावलाय किंवा तिचा तिनंच बिचारीने समजून घेतलाय.
अशी खुप माणसं मुंबईसारख्या शहरात रोज दिसतात. काय करतात, कशी जगतात, पाऊसपाण्यातून कसे दिवस व रात्र ढकलतात हे त्या परमेश्वरालाच ठाऊक. आम्ही चार सुरक्षित भिंतीत असुनही कोण काळजी असते, तिथ ही बाई रात्री बसस्टाॅपच्या तुटपुंज्या जागेत छत्रीचा आडोसा करून, मुलांनी कुशीत घेऊन झोपते. ती खरंच झोपत असेल का हा ही प्रश्नच आहे. शहरात वासनेनं वखवखलेली गिधाडं काय कमी नसतात हे पेपरात येणाऱ्या बातम्यांवरून कळतं. त्यात ती स्वत: आणि नकळत्या वयातली ती अश्राप पोर, याची काळजी तिला झोपू देत नसणार. कदाचित, कदाचित त्या मुलीचा जन्मही तशाच एखाद्या अपघातातून झाला असावा, कुणी सांगावं आणि तशी पाळी पुन्हा येऊ नये याचीही चिंता तिला असू शकेल..
ही बाई कुणाकडे भिक मागताना दिसत नाही. चागल्या घरातली असावी कारण कपडे फाटके असले तरी व्यवस्थित असतात. तिला कुणी काही देतानाही दिसलं नाही कधी. पैसा काय असतो याची जाणंही नसणारी तिची मुलगी, त्या बसस्टाॅच्या शेजारीच असलेल्या चाॅकलेट-केकच्या भल्यामोठ्या दुकानाकडे लक्षही न देता, तिच्या वयाला शोभेसं एकटीच काही तरी खेळत असते, ते तिला समजूत आल्यानं, की त्या गोष्टी आपल्यासाठी नाहीतंच अशी समज करून घेतल्यानं? आणि तिची आई असलेली ती बाई, शुन्यात नजर लावून बसलेली असते. काय विचार चालू असतील तिच्या मनात? आपल्यावर अशी पाळी का आली, याचा विचार करत असेल का ती, की त्याच्याही पलिकडे ती पोहेचली असेल, आणखी १०-१५ वर्षांनंतर माझं कसं होणार, हा प्रश्न मला आताच पडलेला असतो, तिला तर पुढच्या क्षणाची भ्रांत आणि भिती असेल, तर मग ती काय करत असेल, असं विचारंचं एकच मोहोळ माझ्या मनात उठतं आणि माझा पांढरपेशा सुरक्षित अंगरखा चढवून मी विचारांच्यां त्या चावऱ्या माशा हाकलण्याचा निष्फळ प्रयत्न करतो.
ह्या बाईनही कुठंतरी कोणाच्यातरी पोटी जन्म घेतला असेल. त्यांचंही बालपण कदाचित कौतुकांत गेलं असेल, ती ही कुणाचीतरी भावंडं असेल. मग आता तिची ती भावंड कुठं असतील, तिच्या मुलीच्या भवितव्याविषयी ती बाई काही विचार करत असेल का, की ते ही भगवंताच्या भरवश्यावर सोडून दिलं असेल, तसं असेल, तर मग भगवंताबद्दल तिच्या काय भावना असतील, तिला लहानपणच्या आठवणी येत असतील का, कोणत्याही माणसाला बोलावसं वाटतं, आपलं कुणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं, मग तिचं म्हणणं ती कुणाला सांगत असेल आणि मग कोण तिचं ऐकत असेल, अश्या असंख्य प्रश्नांची न थांबणारी मालिका माझ्या मनात तयार होते.
या प्रश्नांची उत्तरं त्या बाईकडे मिळतीलंही कदाचित पण तिच्याशी बोलायचं कसं, हा खास मध्यमवर्गीय संस्काराचा प्रश्न मला पडतो. येता जाता रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या-मांजराच्या डोक्यावर हात फिरवून, त्याला एखादं बिस्कीट भरवणारा मी, एका जीवंत माणसाशी बोलायला का बिचकतो, हे माझं मलाच कळत नाही. इथं ती बाई आहे म्हणून कदाचित तसं होत असेल, तर मग अशी अनेक माणसं नेहेमी रस्त्यावर असतात, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा असुनही मी तसं का करू शकत नाही, हा ही प्रश्नच आहे.
कदाचित महसत्ता होऊ घातलेल्या देशाचा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या विवंचनेत असलेला प्रतिष्ठीत नागरीक असणं, हे मला तसं करू देत नसावं, कुणास ठावूक?
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply