ती गेली सोडून आम्हां
कसे सोबती जाऊ सांगा
रहावं लागे टिपून आसू
मागे सारे सावरायला
किती काय नि किती काय
गोळा तिने केले असते
करू काय या सर्वांचे
कुठे जाऊ सांगा पुसायला?
तुझा लेक शोधतो आई कुठे
आत्या, काकू कि मावशीत तू दिसे?
कुणातच नसे तुझी छवी
कसे समजावू,सांभाळू अजाण लेकराला?
सुगरणीविना चूल मुकी दिसे
तांब्या कळशी ओशट दिसे
पोटाच्या खळगीसाठी शोधतो मी दाही दिशा
आवडे काय तुला, आहेच कोण विचारायला
देवघर आता सुनेसुने
उंबऱ्यात नाही रांगोळीचे सडे
सणावाराला सुके कोरडे
घर पडलेय आवरायला
सवय करतोय आम्ही दोघे
राहतोय उभे एकमेकांसवे
होईल हळहळू सवय तुझ्याविना
पण वेळ हवा गं थोडा पुढे जायला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply