चीन दहशतवादाचे समर्थन करणारा देश
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावात चीनने खोडा घातल्यामुळे चीनने भारताशी पारंपरिक शत्रुत्व असल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. म्हणूनच पाकिस्तानशी जरी शस्त्राने लढा देत असलो, तर चीनची आर्थिक कोंडी कशी करता येईल याचा आता विचार करावाच लागेल. या प्रस्तावात भारताची साथ देणा-यांपेक्षा साथ न देणा-यांचा विचार जास्त करावा लागेल. कारण दहशतवाद भारताला त्रासदायक ठरू शकतो.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या समितीपुढे चीनने पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर केला आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा भारताचा प्रयत्न चौथ्यांदा अपयशी ठरला. त्यामुळे चीन हा आपला शत्रुराष्ट्रच आहे आणि पाकिस्तानप्रमाणेच त्याच्याकडे पाहणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला पाठीशी घालणारा चीन हा या भूमिकेमुळे दहशतवादाचे समर्थन करणारा देश ठरतो.चीनला जी भारताची फार मोठी बाजारपेठ मिळाली आहे, ती बंद करून चीनची आर्थिक कोंडी करणे ही काळाची गरज आहे.
चीन शिनजियांगमध्ये १३ हजार दहशतवाद्यांना अटक
शिनजियांग प्रांतातील मुस्लिमांना ज्या ठिकाणी ठेवण्यात आले त्यावरुन चीनवर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे कारण संयुक्त राष्ट्राच्या मते ही नजरकैद आहे. २०१४ पासून शिनजियांगमध्ये १५९९ दहशतवादी टोळया संपवल्या असून १२,९९५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून २०५२ स्फोटक उपकरणे जप्त केली असून ३०,६४५ लोकांना शासन केले आहे. बेकायदा धार्मिक साहित्याच्या ३ लाख ४५ हजार २२९ प्रती जप्त केल्याची माहिती चीनने दिली आहे.
मात्र चीन जिहादी दहशतवादाला फारसा घाबरत नाही कारण त्यांनी या दहशतवादाला अक्षर शहा चिरडून टाकलेले आहे.
चीनची निर्यात घटली
अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे समोर आलेल्या आकडीवारी प्रमाणे चीनची निर्यात डिसेंबरमध्ये घटली असून ती 221.25 अब्ज डॉलर्स झाली. गेल्या दोन वर्षातील चीनच्या निर्याती घटण्याची हा नीचांक आहे. यामुळे जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे चीनच्या अडचणी वाढल्या आहेत.
या घटीमुळे चीनी अर्थव्यवस्था कमकुवत होऊ शकते. चीनचा युरोपियन महासंघ, अमेरिका व आसियान देशांची व्यापार घटत आहे. या परिस्थीतीचा भारताला कसा फ़ायदा करुन घेता येइल?
चीनचे काय करायचे?
चीन पाकिस्तान मागे उभा राहिल्याने पाकिस्तानची ताकद वाढती राहाणार आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की चीनशी आपण कसे वागायचे. आपण चीनशी वागताना घाबरून वागतो कारण चीनची आर्थिक आणि लष्करी ताकद भारतापेक्षा खूप जास्त असल्याने आपण त्यांच्याशी सांभाळून वागतो. भारताने असे दबून राहिले पाहिजे का तर नाही. सद्यपरिस्थितीत भारत चीनविरोधात स्वसंरक्षण करण्यास समर्थ आहोत. चीनला याची जाणीव असली पाहिजे की ते जसे राष्ट्रीय हित सांभाळतात तसेच भारतही स्वतःची राष्ट्रीय हिते सांभाळण्यास सक्षम आहे.
चीनच्या आर्थिक नाडय़ा आवळा
चिनी उत्पादनांवर बंदी घालून त्यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे. फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही, तर खाण्या-पिण्यापासून ते आमच्या देवधर्मापर्यंत प्रत्येक गोष्टीत चीन घुसला आहे. या चीनचे हे मार्केट बंद करून, चिनी मालावर बंदी घालून चीनचे नाक कापून काढण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षात आम्ही इतके चीनमय झालो आहोत की घरात आमच्या फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्राची घुसखोरी झाली. चिनी देव आमच्या घरात घुसले. लाफिंग बुद्धा, तीन पायांचा बेडूक, कासव, घंटा आणि बरेच काही. आमच्या उत्सवातील डेकोरेशन आणि विद्युत रोषणाईतही चीन चमकू लागला. फटाक्यांच्या आतषबाजीतही चिनी फटाके आले. आहारात तर घुसले आहेतच, पण चायना सिल्क साडी, चायनीज कुरता हे वस्त्रप्रावरणही बदलले. आमच्या उद्योगांवर अन्याय करत आहोत. आता दहशतवादाला खतपाणी घालणा-या चीनच्या आर्थिक नाडय़ा कशा आवळता येतील, याचा विचार आता सरकारने केला पाहिजे. स्वस्तातला चिनी माल हद्दपार करून देशी मालाला प्रोत्साहन देत आता चिनी मालाची होळी करण्याची वेळ आली आहे.
चीनशी दबूनच का वागायचे?
आपल्याकडे लगेच चीनविरोधात गोष्टी करता येईल ते म्हणजे चीन बरोबरचा व्यापार तुट कमी करणे. चीन भारताला अनेक गोष्टी निर्यात करतो आहे. परंतू भारताकडील वस्तू मात्र चीन आयात करत नाही. भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचे असंतुलन 63 बिलियन डॉलर इतके आहे. सध्याच्या सरकारच्या काळात दोन्ही देशांतील व्यापारी असंतुलन कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ही तफावत कमी होण्याऐवजी ती 75 टक्क्यांनी वाढली आहे. स्वतःवर भारताने एक बंधन घालून घेतले होते की चीनशी दबूनच वागायचे ते आता थांबवायला हवे. चीन जेंव्हा भारताविरोधात कोणतेही कृत्य करेल त्यावेळी त्यांच्याकडून भारतात निर्यात होणार्या १०० किंवा १५० वस्तूंवर लगेचच अँटी डम्पिंग ड्युटी आणि आयात कर लावण्याची गरज आहे जेणेकरून भारतामध्ये वस्तूची आयात करणे चीनला अशक्य होईल. अशाच प्रकारचे व्यापार युद्ध चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू आहे. भारताच्या बाजारपेठेची गरज चीनला अधिक आहे. कारण अमेरिका -चीन दरम्यान व्यापार युद्ध सुरू असल्याने त्यांना अमेरिकेची बाजारपेठ मिळणे शक्य नाही. त्याशिवाय युरोपची बाजारपेठ चीनच्या विरोधात जात आहे. त्यामुळे भारताने चीन वर आर्थिक दबाव टाकला पाहिजे. मग चीन काय करेल तर भारताच्या निर्यात करणार्या वस्तूंवर निर्यातशुल्क लावेल पण त्याने चीनचे नुकसान होणार आहे. भारताकडून आयात ही चीनच्या निर्यातीपेक्षा 20 टक्केच आहे. व्यापार युद्धात चीनचे नुकसान अधिक होणार आहे.
मित्र देशांचा चीनविरूद्धच्या व्यापारयुद्धात वापर
बाकीच्या देशांनाही हे सांगितले पाहिजे की चीन सर्व जगाच्या हिताविरूद्ध वागत आहे कारण दहशतवाद हा पूर्ण जगासमोर असलेले मोठे आव्हान आहे. त्यामुळे इतर जगाचा वापर चीनविरूद्धच्या व्यापारयुद्धात केला पाहिजे. चीनच्या बाबतीत अमेरिका कठोर झाली आहे.याचा आपण फ़ायदा करुन घेतला पाहिजे.
इतर देश भारताच्या बाजूनेच असल्याने त्यांचा वापर नक्कीच करू शकतो. चीनला हे दाखवले पाहिजे की भारत चीनविरोधी लढाईसाठी तयार आहोत. त्यासाठी आपण मानसिक तयारी ठेवावी लागेल.
पुढच्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी भारताला सज्ज व्हावं लागेल. त्या दृष्टीने देशांतर्गत बाजारपेठीतल्या सर्व संधींचा नीट उपयोग करून घेण्याचं धोरण आखावं लागेल. सरकार आणि उद्योगसंस्था यांनी या दिशेने एकत्रितपणे प्रयत्न केले तर भारताला हे संक्रमण पार करता येईल.
चीनविरोधात नवी आघाडी
चीनने जर भारताशी व्यापार युद्ध सुरू केले तर त्याकरता आपला देश तयार आहे का? आपण चीनला करत असलेली निर्यात ही त्यांनी भारतात केलेल्या निर्यातीच्या फक्त 20 टक्के आहे. यामुळे आपण जर चीनी निर्यातीवर डम्पिंग ड्युटी किंवा कर लावले तर नुकसान हे चीनचे होणार आहे आपले फारच कमी. मात्र काही वस्तूंची किंमत वाढू शकते त्याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे. कारण मला जर धडा शिकवायचा असेल तर त्यामध्ये एक या लंब्या लढाई करता आपण तयार झाले पाहिजे तरच चीनला वाटणी वरती आणता येईल.
इतर मित्र देशांचा वापर करून चीनविरोधात नवी आघाडी उघडली पाहिजे. गरजेच्या वेळी चीन जसा पाकिस्तानच्या मदतीला धावून येतो तसेच साऊथ इस्ट एशियातील देश म्हणजे व्हिएतनाम, इंडोनेशिया, जपान या देशांचा वापर चीन विरोधात आघाडी बनवण्यात केला पाहिजे. भारताची कारवाई अधिक आक्रमक होईल अशी आशा करूया. सध्या भारतात निवडणुकांचे पडघम वाजताहेत त्यामुळे चीनविरोधात कशी कारवाई करायची यावर चर्चा केली जावी. जे कोणतेही सरकार सत्तेवर येईल त्यांनी मोठ्या प्रमाणावर चीनविरोधातील कारवाई सुरू केली पाहिजे.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply