स्थळ : १० वी ‘ब’ वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
मराठेसर पाच मिनिटे ‘राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती’समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.
‘प्रफुल्ल अग्निहोत्री’
“Present Sir”…..
सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
(सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
‘हेमंत बावकर’
“Yes Sir”
हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
(मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.
‘प्रविण रेगे’
“नमस्ते गुरुजी !”
‘ऑं ?’…..धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
आपण चुकून तळकोकणातील
“जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे.”मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी ‘ब’ च्या ऐवजी १० वी ‘फ’ चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.
प्रविण मार्तंड रेगे !
चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या ‘आल्बम’ कादंबरीत लिहितात…
“आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो.”
मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.
शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर “सारस्वतांचा उपाध्ये” अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)
जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,”थांब टकल्या भांग पाडते”सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या ‘हसत खेळत’ नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे “कमी तिथे आम्ही” या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.
पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?
तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
“भय्या, पानीपुरी कैसा दिया ?”
‘आठ आणा’
“एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?”
‘सात’
“हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?”
प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
(या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
‘ठीक है बाबा, आठ पुरी देगा !’
“ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !”
प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.
कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.
१९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.
तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ‘विवाहितेस जाळले’ अथवा ‘तरुण बुडाला’ अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.
तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण “आदमी सडक का” हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.
तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.
प्रविण मार्तंड रेगे !!
संदीप सामंत.
९८२०५२४५१०
१४/०३/२०२२.
Leave a Reply