मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता मोदकाच्या पाकळ्या खूप सुंदर करतात.
मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ. इतर वेळी चतुर्थी सोडल्यास मोदक सहसा कोणी करत नाही, पण गणपतीचे १० दिवस मात्र सर्व जण आवर्जून तो करतात.
मोदक हे भारताच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण किनारपट्टीवर स्थानिक पक्वान्न म्हणून प्रसिद्ध आहेतच. संस्कृत व मराठी प्रमाणेच ओरिया, गुजराती व कोंकणी भाषेतही त्यांना ‘मोदक’च म्हणतात. तमिळ ‘मोदक’ वा ‘कोळकटै’, मल्याळी भाषेत ‘कोळकटै’, कानडी भाषेत ‘मोदक’ किंवा ‘क़डबू’, तेलगू भाषेत ‘कुडुमु’ म्हणतात. उकडीचे मोदकाप्रमाणेच पण टोक व मुखऱ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कौळकटै हे केरळ व दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूत हे कोळकटै गणपतीचाच नेवैद्य मानले जातात.
तसेच ओरिसा, आसाम, बंगाल येथे तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला ‘पीठा’ म्हणतात. आज बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक उपलब्ध आहेत.
सादर करत आहे मोदकाचे विविध प्रकार..
— संजीव वेलणकर , पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply