अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच मध्यमगती आणि ऑफब्रेक मारा करत १४१ विकेट्स टिपल्या. मात्र २२ वनडेच त्यांच्या वाटय़ाला आल्या. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने १९७६-७७ मध्ये भारताचा दौरा केला. त्यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन कसोटी मोठ्या फरकाने इंग्लंडला जिंकून देण्यात ग्रेग यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्णधार म्हणून भारताचा यशस्वी दौरा रहिला.
सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्ड सिरिज क्रिकेटमुळे टोनी यांची इंग्लंडसाठीची कारकीर्द केवळ पाच वर्षाची राहिली.
वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ग्रेग यांनी अनेक आघाडीच्या आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटूंनाही वळवून घेतले. यामुळे संबंधित क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे ते लक्ष्य बनले. वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळल्याने टोनी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपुष्टात आली. वर्ल्ड सिरिज बंद झाल्यानंतर ग्रेग ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली.
समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. क्रिकेटचा चांगला अनुभव तसेच रोखठोक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘चॅनेल नाइन’मधून तब्बल ३३ वर्षे क्रिकेट समालोचन केले. खेळादरम्यान काही मजेशीर प्रसंग घडला की, ग्रेग यांच्या खोचक समालोचनाने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध व्हायचे. मैदानावरील अंपायर्सच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या (डीआरएस) प्रणालीला विरोध केल्यानंतर ग्रेग यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. टोनी ग्रेग यांचे निधन २९ डिसेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट