माझा भविष्य/ग्रह या सर्वावर फारसा विश्वास नाही पण केव्हां केव्हां ग्रहांवर अविश्वास दाखवून एखाद्या गोष्टीचा कार्यकारणभाव सिध्द करतां येत नाही.
आतां हेच पहा ना !
मी जर तुम्हाला सांगितलं की गोमु टूर लिडर म्हणून एका सुप्रसिध्द ट्रॕव्हेल कंपनीतर्फे युरोपला ४९ जणांना टूरला घेऊन गेला, तर तुमचा तरी विश्वास बसेल कां या बातमीवर ?
आणि ती खरीच आहे हे कळल्यावर गोमुचे ग्रहच
त्याच्यावर प्रसन्न झाले असं वाटेल की नाही ?
अशक्य वाटणारी चांगली गोष्ट दुसऱ्याच्या बाबतीत घडली तर ती त्याच्या चांगल्या ग्रहांमुळे असं मानून आपल्याही यशापयशाची जबाबदारी ग्रहांवर ढकलून मोकळं होणं सोप्पं असतं.
▪
नेहमीप्रमाणे तात्पुरता बेकार असतांना गोमु एका मित्राच्या मदतीने एका टूर कंपनीत लागला.
त्या कंपनीची युरोप टूर्ससाठी ख्याती होती.
भारतातही त्यांच्या टूर्स असत.
त्यानी गोमुला आपल्या टूर लिडर्सच्या टीममध्ये घ्यायचं ठरवलं.
गोमुचं ट्रेनिंग लौकरच सुरू झालं.
सुरूवातीलाच ट्रेनिंगसाठी एका सिनियर टूर लिडरबरोबर गोमुला युरोपला पाठवायचंही ठरवलं.
ती टूर सुरू व्हायला तीन महिन्यांचा अवधी होता.
गोमु खुशींत होता.
युरोपची टूर त्याला कामाचा भाग म्हणून फुकट मिळणार होती.
त्याने तर युरोपची टूर म्हणून सूट शिवायचा बेतही बेतला होता.
परंतु त्याचा टूर लिडर म्हणाला की सूट घालावा लागत नाही.
किंबहुना सुटाबुटांतला टूर लिडर प्रवाशांना आपलासा वाटत नाही.
साधेच कपडे चालतात.
तेव्हां तो बेत त्याने रद्द केला.
नाही तरी रेडीमेड सुटाच्या किंमती पाहून त्याचा सूटाचा बेत बारगळलाच असता.
▪
त्यानंतर रोज संध्याकाळी गोमु एक तास मला युरोपच्या वेगवेगळ्या शहरांची व त्यातल्या प्रवासी स्थळांची माहिती याच्याबद्दल लेक्चर देऊ लागला.
त्याबरोबरच तो माझा युरोपच्या इतिहासाचा क्लासही घेऊ लागला.
युरोपमध्ये राजेशाही कधीपर्यंत होती.
एकेका राष्ट्रांत लोकशाही कशी आली.
दोन महायुध्द आणि त्यातल्याही दुसऱ्या महायुध्दाच्या कहाण्या, त्या युध्दांमुळे प्रसिध्द झालेली गांव/शहरं आणि या सर्व धामधुमीत शिल्लक राहिलेली किंवा नंतर उभारलेली प्रेक्षणीय स्थळे, ह्या सर्वाचा तो माझा क्लास घेऊ लागला ?
रोज ट्रेनिंगमध्ये तो जे ऐके ते सर्व मला सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नसे.
“पक्या, पिसाचा मनोरा किती अंशानी कलला आहे सांग बघू?” असं त्याने म्हटलं की मी जरा बाहेर नाक्यावर जाऊन येतो, असं सांगून सटकत असे.
▪
अखेर तो दिवस उजाडला.
गोमुची सगळी जय्यत तयारी झाली होती पण गोमु प्रत्यक्षात जाईपर्यंत मला कांही तो जाईल याची खात्री नव्हती.
गोमुचा जायचा दिवस उजाडला.
माझी बॕगही त्याच्याबरोबर युरोपला जायला तयार झाली.
गोमुकडे बॕगच नसल्यामुळे माझ्या बॕगला हे भाग्य लाभत होतं.
टूर करून ती धड परत यावी म्हणून मी मनोमन प्रार्थनाही केली आणि गोमुला बॕगची काळजी घ्यायलाही सांगितलं.
अर्थात “अरे, एकदा मी रेग्युलर टूर लिडर झालो की तुला लंडनहून दहा बॕगा आणून देईन.” हे आश्वासन त्याने दिलेलं होतचं.
तर ती बॕग आणि एक हातांत धरायची एक छोटी बॕग घेऊन गोमु तयारीने आला.
रात्री एक वाजताची फ्लाईट होती.
पण गोमुला एअरपोर्टवर सहापासूनच जायचं होतं.
तसं सर्व प्रवाशांना नऊला एअरपोर्टला बोलावलं होतं.
परंतु मुंबईबाहेरून येणारे प्रवासी आपआपल्या सोयीप्रमाणे लौकर पोहोंचण्याची शक्यता होती.
म्हणून टूर लिडरने गोमुला सहालाच पोहोचायला सांगितले होते.
तो टूर लिडर स्वतः मात्र नऊनंतर येणार होता.
▪
गोमु आणि मी सहाच्या आधीच टॕक्सीने एअरपोर्टवर पोहोंचलो.
टॕक्सीचे पैसे मीच दिले.
मित्राला एवढी संधी मिळत असतांना मी लहानसहान खर्चाचा विचार करणं बरोबर नसलं दिसतं.
माझ्या एका विमानतळावर नोकरी करणाऱ्या मित्राच्या ओळखीने मी गोमुबरोबर आंत जाऊ शकलो.
गोमु एका हातांत प्रवाशांची यादी आणि एका हातांत मोबाईल घेऊन फिरू लागला.
जरा कुणी इकडेतिकडे घुटमळतांना दिसला की गोमु त्याला विचारी, “xxx यांची युरोप टूर कां ?”
असा बराच वेळ गेला आणि मग सोलापूरचे कुळकर्णी आजोबा-आजी गोमुला प्रथम सांपडले.
आजोबा सत्तरीचे तर आजी पासष्टच्या.
पण दोघांचाही उत्साह शाळेंतल्या पहिल्या सहलीला जाणाऱ्या मुलांचा होता.
गोमु तावडींत सांपडताच त्यांनी त्याला नाना प्रश्नांनी भंडावून सोडले.
त्यांना भूक लागली होती.
पॕकेजमध्ये नऊच्या आधी प्रवाशांना कांही द्यायचं नव्हतं.
पण कुळकर्णी आणि नंतर पुण्याहून आलेली आणखी दोन जोडपी, ह्या सर्वांनी गोमुला एअरपोर्ट लाउंजमधील एका रेस्टॉरंटमध्ये न्यायला भाग पाडलेच.
अर्थात हा खर्च त्यालाच म्हणजे पर्यायाने मलाच करायचा होता.
▪
गोमुचे सगळे म्हणजे ४९ प्रवासी आले तरी प्रमुख लिडरचा पत्ताच नव्हता.
गोमु सतत त्याला फोन करायचा प्रयत्न करत होता.
४९ जणांच चेक ईन करण्याची वेळ आली आणि टूर लिडरचाच पत्ता नव्हता.
फोन कांही लागत नव्हता.
टूर कंपनीच्या आॕफीसला फोन करण्यांत अर्थच नव्हता.
कारण ते सहालाच बंद होई.
पण गोमुने धीर सोडला नाही.
तो मला म्हणाला, “पक्या, हा फोन थोडा वेळ तुझ्याकडे ठेव आणि हा नंबर मिळवायचा प्रयत्न करत रहा. कांही झालं तरी तिकीटे रद्द होता कामा नयेत. मी आमचं सर्वांचं चेक इन करून परत येतो. तोपर्यंत टूर लिडर येईल.”
▪
त्याने सर्वांचे पासपोर्ट गोळा करायला सुरूवात केली आणि एका आजी-आजोबांच्या लक्षात आले की त्यांनी जपून आठवणीने पाकीटांत ठेवलेले त्यांचे पासपोर्ट पाकिटासकट घरीच राहिले.
प्रथम दोघे एकमेकांना दोष देऊ लागले.
नंतर दोघेही रडकुंडीला आले.
घरी फोनही लागेना.
घरनं पासपोर्ट घेऊन यायला कोणाला सांगितलं तरी आता तो पोहोचणं शक्य नव्हतं.
त्यांचे टूरचे पैसे फुकट नसते गेले.
कंपनीने पुढच्या कोणत्या तरी सहलींत त्यांना सामावून घेतले असते.
पण तिकीटाचे जादा पैसे भरावे लागले असते. ते निराश होऊन परत निघणार होते.
तोंच त्यांच्या नावाची अनाऊन्समेंट झाली.
त्यांचे पासपोर्ट एअरपोर्टच्या कँटीनमध्ये सांपडल्याचे व येऊन ओळख पटवून नेण्याचे सांगण्यात आले.
पुन्हां दोघं एकमेकांना दोष देऊ लागले.
गोमु दोघांना घेऊन कँटीनला गेला व त्यांचे पासपोर्ट मिळाले.
गोमु चेक इन करायला गेला.
▪
मी गोमुकडून फोन घेतला खरा पण मी कांही फोन करत बसलो नाही.
उलट फोन यायची वाट पहात बसलो आणि फोन आलाच.
टूर लिडरचा नाही तर कंपनीच्या प्रमुखाचा.
जो सिनियर टूर लिडर येणार होता त्याचा पाय फ्रॕक्चर होऊन तो हॉस्पिटलांत पडला होता.
त्याच्याऐवजी तात्काळ पाठवायला दुसरा कुणीही उपलब्ध नव्हता.
तेव्हां आता टूरची सारी जबाबदारी गोमुवर होती.
सतत फोनवर त्यांच्याशी संपर्क ठेवून ती टूर त्यालाच न्यायची होती.
त्यासाठी ते जादा भत्ता देणार होते.
दोन तीन दिवसांत दुसरा एक सिनीयर टूर लिडर त्यांना येऊन मिळणार होता.
गोमु चेक इन करून आल्यावर मी त्याला ही बातमी सांगितली.
मला वाटलं होतं की तो चिडेल पण
गोमुचा आत्मविश्वास जबरच म्हणायचा.
तो म्हणाला, “मला वाटलंच होतं. पक्या, बघ, मी ह्या म्हाताऱ्यांना कसं युरोप फिरवून खूश करून आणतो ते.”
नंतर कांही वेळाने इतर प्रवाशांसमवेत गोमु आणि ४९ टूरकरांना घेऊन विमान आकाशांत झेपावलं.
माझ्या मनांत तेव्हां संमिश्र भावना होत्या.
मित्राला युरोपला जायला मिळाल्याचा आनंद आणि अननुभवी मित्र हें काम पार पाडू शकेल कां ही चिंता.
▪
नंतर काय काय झालं ते गोमुच्याच शब्दांत खाली दिलं आहे.
“पक्या, ४०-५० लहान मुलांची सहल घेऊन कुठेही जावं पण ४९ जण, ज्यांत ३८ म्हातारे, साॅरी, ज्येष्ठ नागरीक आहेत अशांची सहल घेऊन जाणं म्हणजे महा कर्म कठीण.
विमानात बसण्यापासूनच सुरूवात झाली.
सर्वांना जोडी जोडीनेच बसायच होतं.
ज्या जोडप्यांचे नंबर बाजू बाजूला आले नव्हते, ते सगळे आपल्याला जागा बदलून हवी म्हणून अडले.
फक्त एकजण खूष होता.
बायकोपासून लांब आणि दोन मुलींच्या मध्ये त्याची सीट होती.
तो फारच समंजसपणे म्हणत होता, “अरे, काय फरक पडतोय ? कुठल्याही सीटस असल्यामुळे ? सर्वच सीटस् मिलानलाच जाणार ह्यं, ह्यं.. !“
पण त्याची बायको शेराला सव्वाशेर होती.
तिने आपल्या बाजूच्या तरूणाला नवऱ्याबरोबर सीट बदलायची विनंती केली.
तो तरूण अगदी खुशींत गेला आणि नवरोबांना गुपचूप बायकोच्या बाजूला येऊन बसावं लागलं.
बाकीच्यांना हवी ती सीट मिळवून देण्यासाठी मला बरेच जणांना हात जोडून विनंती करायला लागली.
▪
बसून दोन मिनिटे पण झाली नसतील, तोंच एकाला पाणी हवे झाले.
मग सर्वांना आठवलं त्यांना पण तहान लागली आहे.
सतत बेल वाजत राहिली.
आणि एअर होस्टेसेसच सौजन्य संपले.
शेवटी एकदा टेक आॕफची अनाऊन्समेंट झाली आणि विमान धावू लागलं.
प्रथमच विमान प्रवास करणाऱ्यांपैकी एक बाई बेल्ट सोडवून उभं रहायचा प्रयत्न करू लागल्या.
त्यांना वर ठेवलेल्या आपल्या पिशवींतली लवंग काढायची होती.
‘विमान लागलं तर जवळ असलेली बरी’ असं म्हणत ती उभी रहायला बघत होती पण सीट बेल्ट सोडवण्यांत तिला यश मिळालं नाही.”
गोमुच्या टूरच्या ह्या सुरूवातीवरूनच मला गोमुने टूर लिडर म्हणून कशी कामगीरी केली असेल याची उत्सुकता वाटू लागली.
— अरविंद खानोलकर.
Leave a Reply