नवीन लेखन...

धार्मिक संस्कृतीच्या खुणा

तीर्थक्षेत्र

भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर – हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल. ही संस्कृती जाणून घ्यायची असेल तर धार्मिक पर्यटन गरजेचे आहे. येथील इतिहास, संस्कृती, पौराणिक संदर्भ इत्यादींचा अभ्यास जाणून घेतल्यास हा प्रवास जास्त आनंददायी होतो.

रामेश्वर मंदिरातील लांबच लांब १००० खांबांचे प्राकार तर श्रीनगरमधील शंकराचार्यांची टेकडी. गुजरातेत सोमनाथ व पूर्वेला दक्षिणेश्वर कालीमाता मंदिर. या चार चौकोनातही भरपूर काही बघण्यासारखे आहे.

खजुराहो, कोणार्क सूर्यमंदिर, बारा ज्योर्तिलिंगे, चारधाम यात्रा, पवित्र नद्यांचे उगमस्थान, साधू महंतांचे धार्मिक आश्रम व मठ अशा अनेक पर्यटन स्थळांची मांदियाळी आपल्या देशात उपलब्ध आहे. काही लोक धार्मिक पुण्यश्लोकी भावनेने या ठिकाणी येतात तर काही स्थापत्यविशारद, हजारो वर्ष टिकलेल्या वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी तर अनेकजण येथील नद्या, डोंगरे, वाळवंट, समुद्र, निसर्ग अनुभवण्यासाठी येतात.

भारतासारख्या प्रचंड विस्तारीत देशात अनेक पंथ, भाषा, संस्कृती उदयाला आल्या. समाजजीवन देव देवतांचे उपासक होते. गावागावातून, खेड्या पाड्यातून राम, सीता, कृष्ण, शंकर, पार्वती, विष्णू, लक्ष्मी अशा अनेक देवतांची देवळे आढळतात. देवळामधून होणाऱ्या भजन, कीर्तन, प्रवचन याद्वारे लोक एकत्र येत. दिवसभरच्या श्रमानंतर थोडासा विरंगुळा व मनोरंजन. या सर्व माध्यमातून त्या काळातील संस्कृती व समृद्धी पाहावयास मिळते. अनेक धार्मिक वास्तूंना राजाश्रय लाभल्याने भव्य वास्तू निर्मिली गेली. आजही या वास्तूत आपली भारतीय धार्मिक संस्कृती दिसून येते. आजच्या काळात या सर्व ठिकाणी जाण्यासाठी सोयीसुविधा भरपूर असल्याने प्रवास सुकर व आनंददायी होतो.

भारतीयांना हिमालयाचे आकर्षण आहे. उत्तरेपासून पूर्वेस पश्चिम बंगालपर्यंत पसरलेल्या या पर्वत रांगेत अनेक धार्मिक स्थळे आहेत. शांत, बर्फाच्छादित डोंगरांच्या कुशीत असलेल्या या देवळातील आरती, घंटानाद इत्यादींचे आकर्षण जनमानसात भरपूर आहे. याच पर्वतरांगांत असलेले चारधाम म्हणजे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जमनोत्री. युद्धोत्तर पापक्षालनासाठी पांडवांनी शंकराचे दर्शन घ्यायचे ठरविले. हे ओळखून कैलासपती बैलाचे सोंग घेऊन गुरांच्या कळपात शिरले. चाणाक्ष भीमाने हे ओळखून धरायला गेला असता तो बैल जमिनीत गुडूप होऊ लागला. भीमाने त्याचे बाशिंड पकडून पूर्ण गुडूप होण्यापासून रोखले. तेच केदारनाथचे शिवलिंग. थोडीशी तिरकी व जमिनीत लुप्त झालेली पिंडी प्रस्तुत देवस्थान बारा ज्योर्तिलिंगांपैकी असल्याने पवित्र मानले जाते. देवळापर्यंत पायी जावे लागते. पण हल्ली हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध आहे. बद्रीनाथ हे चार धामातील दुसरे स्थान आदि शंकराचार्यांना नवव्या शतकात अलकनंदेच्या प्रवाहात सापडलेली शालिग्रामची पद्मासनात बसलेली ही मूर्ती सापडली. इथे सोळाव्या शतकात मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. अनेकदा जीर्णोद्धार झालेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत सहज बसने जाता येते. गंगोत्री व जमनोत्री ही उरलेली दोन पवित्र स्थाने. भारतातील सर्वात पवित्र नदी गंगेचे उगमस्थान म्हणजे गंगोत्री. गोमुख येथे हिमनदीतून हिचा उगम झाला आहे. उगमापाशी हिला भागीरथी म्हणतात. पुढे देवप्रयाग येथे अलकनंदेला मिळते व पुढे गंगा म्हणून प्रवाहित होते. अमरसिंग थापा नावाच्या गुराख्याने गंगोत्रीचे देऊळ बांधले आहे. गंगेएवढीच पवित्र नदी म्हणजे यमुना हिचा उगम म्हणजेच यमनोत्री जयपूरची महाराणी गुलेरिया हिने याठिकाणी देऊळ बांधले. बर्फाच्छादित हिमालयाच्या कुशीत असलेल्या येथे गरम पाण्याची नैसर्गिक कुंडे आहेत.

वरील चारधाम यात्रा गढवाल निगम आयोजित करते. या यात्रेस ऋषीकेश येथून सुरुवात होते. थंडीमध्ये ही धामे बंद असतात.

गंगा जिथे हिमालयातून मैदानी मुलखात प्रवेश करते ती जागा म्हणजे हरिद्वार येथे सुंदर घाट बसविण्यात आले आहेत. सायंकाळी होणारी गंगेची आरती, गंगेचा प्रवाह, त्यात सोडलेले दिवे अनुभवल्याशिवाय त्यातील रोमांच, आनंद समजणारच नाही. जवळच २८ कि.मी. वर ऋषीकेश नितांत सुंदर आहे. येथूनच चारधाम यात्रेला सुरुवात होते. आदि शंकरांच्या आगमनानंतर या स्थानाचे महत्त्व वाढले व नावारूपास आले. गंगे काठावरचे सुरेख आश्रम व गंगेवरचे झुलते पूल पाहण्यासारखे.

भारताचा मुकुटमणी जम्मू व काश्मीर हे नंदनवन हिमालयातील नयनरम्य ठिकाणे. या राज्यात अनेक सुंदर देवस्थाने वसली आहेत. वैष्णोदेवी हे त्यातीलच एक पवित्रस्थान. तिरुपतीनंतर सर्वात जास्त भाविक दर्शनास येणाऱ्या या देवळात सरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या तिघींच्या पूजा होतात. त्रेता युगातील एका विष्णुभक्ताची कन्या वैष्णवी. वयाच्या नवव्या वर्षी तपश्चर्येला निघून गेली. पुढे हीस प्रभू रामचंद्र भेटले व त्यांच्या आज्ञेनुसार तिने उत्तरेत माणिक नामक गुहेत वास्तव्य व तपश्चर्या केली. रामाच्या रावण विजयासाठी नऊ दिवस प्रखर तपश्चर्या केली. म्हणूनच उत्तरेत नवरात्रीच्या दिवसात रामायणाचा पाठ केला जातो. जम्मूपासून ४५ कि.मी. असलेल्या कटरा येथून वैष्णोदेवी यात्रेस सुरुवात होते. आता हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे.

हिमालयातील बर्फ वितळू लागल्यावर गुहेत ठिबकणाऱ्या पाण्यापासून पिंडी तयार होते. ती ‘अमरनाथ गुफा’ शंकराने पार्वतीला जीवन तत्वज्ञान सांगितले ती जागा. ५००० वर्षाचा इतिहास असलेली ही यात्रा काश्मीरमधील पहलगामपासून सुरू होते. फक्त उन्हाळ्यामध्ये काही काळासाठी ही गुहा व पिंडी दिसते. बालताल व चंदनवाडी येथूनही मार्ग आहे. यात्रेसाठी भक्तांची नाव नोंदणी आवश्यक आहे.

हिमालयातील हिमाचल प्रदेशात एक वैविध्यपूर्ण देऊळ आहे. ‘हिडींबा मंदिर’. भीमाशी विवाह झाल्यानंतर तिने सात्विकवृत्ती तपश्चर्या करून मिळविली. त्यानंतर लोक तिचे भक्त झाले व त्यांनी मंदिर उभारले. पगोडा शैलीतील हे मंदिर गर्द वनराईत असून संपूर्ण लाकडी व कोरीवकामयुक्त आहे.

बर्फाच्छादित उत्तरेतून थोडे खाली विस्तृत मैदानी मुलखात प्रवेशिल्यावर पश्चिमेतील राजस्थान, गुजरात पासून मध्यप्रदेश, बिहार, पं. बंगाल, ओरीसा येथील संपन्न, पौराणिक व धार्मिक तीर्थस्थळ आपणास आकर्षून घेतात. येथील धार्मिक स्थानांचा थोडा उहापोह.

बिहारमधील गया येथील ‘विष्णुपाद’ मंदिर हे हिंदूचे एक पवित्र स्थान मानले जाते. गंगातिरी असलेल्या इथे लोक त्यांच्या पितरांना मोक्ष मिळावा या हेतूने क्रियाकर्म करतात. विष्णूच्या पाऊलखुणा असल्याची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. सांप्रत देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी १७८७ साली बांधल्याचे संदर्भ सापडतात. मंदिर बांधणीसाठी गेलेल्या मराठी कुटुंबाचे पुनवर्सन करण्यात आले. म्हणूनच की काय इथे मराठमोळा ‘अनरसा’ हा पदार्थ सहज उपलब्ध असतो.

रामकृष्ण परमहंस सारख्या थोर विभूतींच्या वास्तव्याने पावन झालेली पश्चिम बंगालमधील हुगळी नदीच्या काठी असलेले दक्षिणेश्वर कालीमंदिर. राशोमानी नावाच्या राणीने १८५५ मध्ये हे देऊळ बांधले. कोलकत्ताजवळील सियालदा स्थानकापासून १४ कि. अंतरावर आहे. दक्षिणेश्वर इतकेच पवित्र स्थान व देवीच्या ५१ शक्तीपीठापैकी एक असलेले काली घाट मंदिर कोलकाता शहरातच आहे. मूळ झोपडीवजा असलेले हे देऊळ १८०९ साली पुनर्रचित केले गेले. कोलकत्ता शहराची ओळख म्हणून प्रसिध्द आहे.

बंगालच्या उपसागराचा सुंदर सागरतट, उज्जवल सांस्कृतिक व आदिवासी परंपरा असलेला प्रदेश म्हणजे ओरिसा. या राज्यातही बरीच सुंदरा भव्य दिव्य देवाळे आहेत. त्यातील एक राजधानी भुवनेश्वर शहरात असलेले १००० वर्षे जुनं लिंगराज मंदिर. शंकराचे हे देऊळ जजाति केसरी राजाने बांधल्याचा उल्लेख सापडतो. शिवलिंगाबरोबरच इथे विष्णूची शाळिग्राम रूपातली मूर्तीही आढळते. भाविक ‘हरिहर’ या नावाने देवाला पूजतात.

भारतातील प्रमुख चार धामापैकी एक, वैष्णव पंथीयांचे पवित्र स्थान, शंकराचार्यानी स्थापिलेल्या प्रमुख मठापैकी एक म्हणजे जगन्नाथपुरी, आषाढ शुध्द द्वितीयेला सुरू होणारी रथ यात्रा येथील प्रमुख आकर्षण. १२ व्या शतकात बांधलेल्या या देवळात श्रीकृष्ण बलराम व सुभद्रा यांच्या वैशिष्टयपूर्ण लाकडी प्रतिमा आढळतात.

पुरीपासून ३५. कि.मी. असलेले पुरातन सुरक्षित वास्तू असलेले स्थान म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर. कृष्ण पुत्र सांब याने बांधल्याचा उल्लेख आहे, समुद्रतटी असल्याने बराच काळ रेतीत बुडालेले होते. १८९३ मध्ये प्रथम उकरून काढण्यात आले. बरेचसे भग्नावस्थेत असलेले हे स्थान म्हणजे गतकालीन वैभव, वास्तुकला, संस्कृतीचा उत्तम नमुना.

समर्थ महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी राज्य केलेला मध्यप्रदेश प्रांत सांस्कृतिक व कलात्मक वारसा लाभलेल्या या प्रदेशात बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन पवित्र स्थान म्हणजे ओंकारेश्वर व महांकाळेश्वर. नागरी शैलीतील ही देवळे भाविकांना आकर्षून घेतात. त्याचप्रमाणे देशविदेशी पर्यटकांत प्रसिध्द असलेले खजूराहो मंदिर व तेथील श्रृंगारिक शिल्पे चंडेला वंशाच्या राजाने बांधल्याचा उल्लेख सापडतो. जबलपूरहून जाण्यास सोयीचे आहे.

भारतातील येणाऱ्या देशीविदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण म्हणजे राजस्थान. बऱ्याच देवळांची संख्या असलेल्या या राज्यातील दुर्मीळ व प्रमुख देवस्थान म्हणजे पुष्कर येथील दत्तगुरू मंदिर. आठव्या शतकात आदिशंकराचार्यांनी पुनर्बांधणी केल्याचा उल्लेख सापडतो. प्रसिध्द ‘कॅमल फेअर’ हा उंटाचा मेळाही येथेच भरतो. याच राज्यातील करणीमाता मंदिर नामक एक वैचित्रपूर्ण मंदिर आहे. बिकानेर जवळील देशनोक गावातील या मंदिरातच इतरत्र उंदीर फिरताना दिसतात. एरवी घृणास्पद असलेल्या या प्राण्याला भाविक अंगा खांद्यावर खेळवताना दिसतात. करणामाता या संत स्त्रीने आपल्या जमातीच्या लोकाना यमदेवापासून वाचविले व त्यांचा पुनर्जन्म होईपर्यंत आपल्या भोवती उंदराच्या रूपात ठेवले. या स्त्रीचे मंदिर २० व्या शतकात गंगासिंग राजाने बांधल्याचे सांगितले जाते. भाविकच नाही तर पर्यटक कुतूहलापोटी या देवळास भेट देतात.

राजस्थानाच्या खालच्या बाजूस असलेले गुजरात राज्यही धार्मिक स्थळासाठी प्रसिध्द आहे. वेरावळ जवळ समुद्रकाठी बारा ज्योतिर्लिगांपैकी एक पवित्र क्षेत्र सोमनाथ वसलेले आहे. पुराणानुसार चंद्राने प्रथम हे देऊळ सोन्यात बांधल्याचा उल्लेख सापडतो. भीमदेवसोलंकी याने सांप्रत देऊळ चुनखडी व दगडात बांधले आहे. महम्मद गझनीने १५ वेळा लुटूनही पुनःपुन्हा बांधलेले व आज ताठ उभे असलेले हे देऊळ म्हणजे भाविकांचा धार्मिकतेवर असलेला अटळ विश्वास !

चारधामापैकी एक असलेली द्वारका गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यालगत स्थित आहे. श्रीकृष्णाने बांधलेले हे देऊळ बऱ्याच वेळा डागडुजी होऊन सोळाव्या शतकात त्याची पुनर्बांधणी झाली आहे. संत मीराबाईला इथे मोक्ष मिळाल्याचे सांगण्यात येते.

विंध्य पर्वताच्या कुशीतून आपण दख्खनच्या विस्तीर्ण पटांगणात येतो. परकीय आक्रमणापासून सुरक्षित राहिलेल्या या राज्यामध्ये असंख्य भव्य दिव्य देवळांची मांदियाळीच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र केरळ व तामिळनाडू या सहा राज्यात हजारोंच्या संख्येने तीर्थस्थाने असून प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात त्यांचा परामर्श पुढीलप्रमाणे.

महाराष्ट्रात गावोगावी देवळे आहेत. राज्याची कुलस्वामिनी म्हणजे करवीरवासिनी अंबाबाई विष्णूने महालक्ष्मीचे रूप घेऊन कोलासूर नावाच्या असुराचा संहार केला ते ठिकाण. मराठ्यांच्या उदयानंतर हे देऊळ भरभराटीस पावले. कर्नाटक राज्य तेथील पुरातन वास्तुशिल्प देवळे यासाठी सर्वश्रुत आहे. असंच एक सुंदर देऊळ म्हणजे उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिर. या मंदिरामागचे धार्मिक अधिष्ठान म्हणजे वैष्णव संत माधवाचार्य व्दैत संप्रदायाची शिकवण देऊन कृष्णपूजेसाठी ठिकठिकाणी आठ मठांची स्थापना केली. मठाधिपती बदलीचा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो. आजही हे कार्य अविरत चालू आहे. या देवळातील मूर्तीचे दर्शन एका छोट्या झरोख्यातूनच घ्यावे लागते. जगातील सर्वात श्रीमंत देऊळ म्हणजे आंध्रमधील तिरूपती देवस्थान. २८०० फूट उंच एका टेकडीवर वसलेले हे देऊळ, हिंदु धार्मियांचे एक पवित्र स्थान मानले जाते.

देशाच्या दक्षिण टोकास असलेली दोन संपन्न व प्रगत राज्ये म्हणजे केरळ व तामिळनाडू. केरळमधील प्रमुख देवस्थान म्हणजे त्रिशूर जवळील गुरूवायूर येथील श्रीकृष्ण मंदिर. ब्रह्मा व वायू याने स्थापन केल्यामुळे या क्षेत्रास गुरूवायूर म्हटले जाते.

भारतातील देवळाचा प्रदेश म्हणून तामिळनाडूची ओळख आहे. चेन्नई शहरापासून थेट खाली कन्याकुमारीपर्यंत असंख्या देवळे विखुरलेली आहेत. बहुतेक सर्व देवळे अजून व्यवस्थित व एकसंघ आहेत. याच राज्यातील ‘पेरिया कोविल’ म्हणजे मोठं देऊळ म्हणजे तंजावर येथील ‘बृहदीश्वर मंदिर’ श्रध्दा भक्ति, सामाजिक उन्नती या सर्वांचा सुंदर मिलाफ येथे बघावयास मिळतो. इ.स. ९८५ नंतर राज – राज चोलन या संपन्न समर्थ राजाने हे देऊळ बांधले. धार्मिक महतीपेक्षा ऐतिहासिक वास्तू म्हणून हे जास्त प्रसिध्द आहे. भरतमुनींच्या नाट्य शास्त्रांची अधिष्ठता दैवत म्हणजे चिंदबरम् येथील ‘नटराज’ मंदिर हे एकमेव देऊळ असे आहे की जिथे शंकाराची नटराज मुद्रेतील मूर्ती आहे. भरतनाट्यमचे असंख्य विद्यार्थी आपली कला येथे प्रथम सादर करतात, या देवळास अर्पण करतात. आपल्या देशातील धार्मिक स्थलांचा आवाका मोठा आहे. सर्वच देवळांची ओळख लेखाच्या मर्यादेमुळे देता येणार नाही. तरी नामोल्लेख आवश्यक आहे.

 

  • हिमालयातील ‘रवीर भवानी ज्वालाजी’, हरयाणातील कुरूक्षेत्र, राजस्थानमधील नाथव्दारा, खटुश्याम, उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वर, मथुरा कृष्ण मंदिर व वृंदावन,
  • बंगालमधील बेलूर मठ, उदयपूरमधील एकलिंगजी.

महाराष्ट्रातील ११ मारूती, अष्टविनायक, आंध्रमधील श्री शैल्यम कर्नाटकातील धर्मस्थळ, तामीळनाडूतील

 

  • कन्याकुमारी, रामेश्वर ही व अशी अनेक मंदिरे भारतभर आढळतात. भारतासारख्या उभ्या आडव्या देशालानैसर्गिक विविधतेबरोबरच सामाजिक वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म समभावाचे, धार्मिक विविधतेचे सौंदर्य लाभले आहे. हिंदू संस्कृती बरोबरच या प्रदेशात बौध्द जैन, इस्लाम, ख्रिस्ती, शीख इत्यादी धर्मही उदयास पावले व – गुण्यागोविंदाने नांदले. म्हणूनच बद्रीकेदार बरोबर लोक अमृतसर व नांदेडमधील गुरूव्दार वेलंकण्णी, गोवा येथील भव्य चर्चेस, अजमेरशरीफ, जामा मसजिद या ठिकाणांनाही आवर्जून भेट देतात. हे सर्व अनुभवताना दक्षिणेत रामचंद्रन रामभद्र, पश्चिमेस रामदास, पूर्वेस रामचरण, उत्तरेत रामगोपाळ रामप्रसाद भेटतात. भारतभर – भेटणाऱ्या या राम व कृष्ण व त्याबरोबरच भेटणाऱ्या रहीम व रॉबर्ट या सर्वांना भेटण्यासाठी सर्व सबबी दूर सारून विविध धार्मिक स्थळांना भेटी देणे आवश्यक.

संस्कृतीचे धार्मिकतेचे धागे दोरे समजून उमजून या सर्व धार्मिक स्थळांना भेटी देऊन भारतीय उज्वल धार्मिक दर्शन घेणे आवश्यक आहे. चला तर मग बॅग भरा.

उमा हर्डीकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..