नवीन लेखन...

जपानी पेहराव (जपान वारी)

पारंपारिक जपानी पोशाख

ज्या ठिकाणी संस्कृती जपलेली आहे अशा ठिकाणी पारंपारिक पद्धती आणि रूढी परंपरा अगदी मनापासून जपल्या जातात. पेहराव हा प्रत्येक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे.
भारतात पोशाखांचे अनेक प्रकार आहेत. इंडो-वेस्टर्न असा मेळ आजकाल ट्रेंडिंग असला तरी मुळ भारतीय पारंपारिक लुक ला तोड नाही! ग्लोबल होत आज जग जवळ आलंय परंतु पाश्चात्य देशातील संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
भारतात भाषेतील विविधते प्रमाणे कपड्यांमध्ये देखील विविधता असली तरी साधारणपणे साडी आणि धोतर हे दोन प्रकार त्यातल्या त्यात कॉमन आहेत. विविध राज्यांप्रमाणे साडी आणि धोतर नेसण्याच्या पद्धतींमध्ये व तेथील स्थानिक भाषेप्रमाणे त्यांच्या नावात फक्त बदल होतो.
त्यामुळे आपल्याला “तुमचा ट्रॅडिशनल ड्रेस कोणता?” असे कुणी विचारले तर आपण “महिलांचा पोशाख साडी व पुरुषांचा धोतर” असे सांगतो.जपान देशाने सुद्धा परंपरा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण जपलेले आहे.

चिनी लोकांच्या कडून भाषा आणि संस्कृतीचे बाळकडू जपान्यांनी घेतलेले असले तरी जपानची स्वतःची समृद्ध संस्कृती जग भरात नावारूपास आलेली आहे. आपण जपानचे प्रसिद्ध पारंपारिक खाद्यपदार्थ मागील भागात पहिले तसेच ह्या भागात पारंपरिक पोशाख ह्यांच्याविषयी माहिती घेऊया.

जपानचा पारंपारिक म्हणून प्रसिद्ध असणार्‍या पोशाखाला किमोनो असे म्हणतात. किमोनो म्हणजे अंगाबरोबर मापाचा पायघोळ अंगरखा!
अंगाबरोबर असे म्हणण्याचे कारण ह्या अंगरख्याला घेर नसतो. जाड, बारीक अशा कोणत्याही ठेवणीच्या माणसाला योग्य प्रकारे बांधल्यास (टेलर कडे खेपा घालून फ़िटटींग साठीचे वेगळे कष्ट न घेता) अगदी व्यवस्थित बसतो.

स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळे किमोनो असले तरी रचना व प्रकार साधारण एकसारखाच असतो.

भारतात साडी म्हटले की अनेक प्रकार पटकन डोळ्यासमोर येतात. साधं फक्त मराठमोळ्या महाराष्ट्रीय नऊवारी साडीचे किती प्रकार आहेत. जसे ब्राह्मणी नऊवारी, काष्टा ते अगदी आजकालची फेमस पेशवाई/मस्तानी नऊवार इत्यादी. तसेच जपान मध्ये सुद्धा महिलांच्या किमोनोचे काही विशिष्ठ प्रकार आहेत. जे सिझन किंवा ऑकेजन नुसार वापरले जातात.

लांब बाह्यांचे किमोनो (जास्त लांब-रुंद बाह्यांचे किमोनो तरुण मुली वापरतात), प्लेन किंवा सिझनल नक्षीकाम केलेले किमोनो, कॉटन चे किमोनो इत्यादी. किमोनो हा साधारणपणे सॅटिन कापडाचा असतो. मऊसूत फॅब्रिकचे सुंदर नक्षीकाम केलेले हे किमोनो अतिशय महाग असतात.

आपल्या इथे स्त्रियांच्या ‘साडी खजिन्यात’ जसे पैठणी, शालू असतात, पुरुषांकडे सफारी सूट, भरजरी कुर्ते, शेरवानी वगैरे असतात. तसे जपान मध्ये प्रत्येक घरी किमोनो नक्कीच असतो. पिढी जात वापरात असलेले किमोनो एक पिढी ते दुसरी पिढी असा प्रवास करत मोठ्या मानाने कपाटाच्या कप्प्यात विराजमान झालेले आढळतात.

किमोनो लेयर्ड ड्रेस म्हणूनही प्रसिद्ध आहे. किमोनो घालताना एकावर एक वेगवेगळ्या कपड्यांचे थर (अंगरखे) घातले जातात. उत्तम रीतीने किमोनो घालण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी स्पेशल क्लास घेतले जातात. किमोनो घालून पूर्ण होण्यासाठी किमान ३० मिनिटे लागतात असे ऐकले आहे.

ह्या किमोनोचे थोडे लाईट व्हर्जन म्हणजे युकाता. हा प्रकार मुख्यतः उन्हाळ्यात वापरतात. युकाता कॉटन कापडाचे असतात. सुंदर रंगात आणि निरनिराळ्या डिझाईन मध्ये युकाता पाहायला मिळतात. ड्रेसचा प्रकार म्हणाल तर सेमच, किमोनो चा छोटा भाऊ. पण किमोनो पेक्षा युकाता घालायला सोपा असतो. जपानी पद्धतीच्या पारंपरिक रयोकान (लॉजिंग बोर्डिंग हॉटेल) मध्ये युकाता रिलॅक्सईंग नाईट ड्रेस म्हणून सुद्धा वापरतात.ह्या पायघोळ अंगरख्यांना बटण, चेन/झीप किंवा हुक वगैरे काही नसते. ड्रेसना असलेली नक्षीदार कड कॉलर सारखी उठुन दिसते. युकाता व किमोनो घालताना डावी बाजू उजव्या बाजूवर घेऊन बांधला जातो. ओव्हरलॅप झालेली बाजु/ फ्लॅप ची कड उजव्या बाजुला दिसायला हवी, असा नियम आहे. उजवी बाजु वर असेल तर ही कड डाव्याबाजूला दिसते, ह्या पद्धतीने फक्त मृत व्यक्तींना किमोनो घातला जातो.
किमोनो किंवा युकाता एका कापडी बेल्ट ने बांधतात त्याला ओबी असे म्हणतात. या लहान मोठ्या कापडी बेल्ट म्हणजे ओबी चे सुद्धा विविध प्रकार आणि रंग रूप पाहायला मिळते.
हे पोशाख घालतात तेंव्हा त्या सोबत पांढर्‍या रंगाचे पाय मोजे (सॉक्स) घालण्याची पद्धत आहे त्याला ताबी असे म्हणतात.आता पारंपरिक कपडे म्हणलं की त्याला शोभा देणारे असे फुटवेअर सुद्धा वेगळे हवे नाही का? ह्या किमोनो व युकाता ड्रेस वरती झोरी किंवा गेता अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या चपला वापरतात. गेता म्हणजे लाकडी बेस असलेली उंच टाचेची चप्पल! लाकूड जमिनीवर घासले जाऊन येणार एक विशिष्ट पद्धतीचा आवाज पारंपरिक पेहरावात विशेष भर टाकतो. ह्या गेता वापरणे सहज सोपे नसले तरी सवयीने हळुहळु जमते.
किमोनो किंवा युकाता घालून चालताना पाऊल उचलून टाकणे (अंगाबरोबर फिट नेसण्याच्या पद्धतीमुळे) अवघड जाते. त्यामुळे पाऊल न उचलता जमिनीवर पाय घासत चालवे लागते. अर्थात ह्यात सुद्धा अनेक फॅशनेबल गोष्टी निघाल्या आहेत जेणेकरून कसली गैरसोय होत नाही. परंतु घरंदाज जपानी स्त्रिया पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा अदबीने पाळताना दिसतात.असे म्हणतात पूर्वीच्या काळी किमोनो घालून रस्त्यावरून चालताना खडबडीत किंवा असमान असणार्‍या रस्त्यांचा अंदाज येणे कठीण जात असे.
किमोनो घालून वावरताना रस्त्यांवरून चालणे बरेच धोकादायक असे (खास करून गेशा व्यवसायातील स्त्रिया). गेशा म्हणजे पारंपरिक जपानी संगीत व नृत्य पारंगत असणार्‍या, लोकांचे मनोरंजन करणाऱ्या सुंदर स्त्रिया! (हा एक वेगळा सविस्तर लिखाणाचा विषय आहे)
गेता वापरल्याने अशा स्त्रियांना जड किमोनो घालून सहज वावरणे शक्य होत असे.
याबरोबर सर्रास वापरला जाणारा प्रकार म्हणजे झोरी. ह्या साध्या टाचा (हिल) नसलेल्या चपलांसारख्या असतात. ज्याचा बेस वेता पासून विणलेला किंवा कापडाचा असतो.पुरुषांच्या किमोनो मध्ये एक प्रकार आहे. प्लेटेड स्कर्ट (निऱ्यांसारखा), किमोनो च्या वरून बांधतात त्याला हाकामा असे म्हणतात. स्त्रिया सहसा हाकामा फक्त कॉलेज च्या पदवीदान सोहोळ्याला वापरतात. हाकामा सामुराई (योध्ये) व काही जपानी ट्रॅडिशनल खेळाडूंचा पोशाख म्हणून ओळखला जातो.किमोनो किंवा युकाता वापरताना त्या वरून घातल्या जाणाऱ्या जॅकेट्सचे बरेच पारंपरिक प्रकार प्रचलित आहेत. जसे हाओरी, हानतेनहाप्पी कोट इ. जे ऋतु नुसार वापरले जातात.
असे हे नव्या संस्कृती बरोबरीने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलेले, जपानी संस्कृतीचे पाईक असणारे पारंपरिक पोशाख.

— © प्रणाली मराठे

लेखनाद्वारे जपानी पोशाखांची माहिती देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न केला आहे तरी अजून कल्पना येण्याकरिता ह्या पोशाखांचे फोटो दिलेल्या व्हिडीओ लिंक वरती जरूर पहा!

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

1 Comment on जपानी पेहराव (जपान वारी)

  1. Very Important information.
    watashi wa Santosh
    Just newly learning japani lgg.
    So it’s very useful for me

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..