मित्र हेमंत सिधयेने सकाळी सकाळी वैभव मांगलेचा गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या विषयीचा आदरलेख पाठविला. एकदम पुण्यातील बालगंधर्व मधील एक दिवाळी पहाट आठवली, किशोरीताईंना ऐकल्याची – सकाळी सहा ते नऊ ! दरम्यान लाईट जाणे, वाद्यमेळ न जमणे, मध्यंतर असल्या विषादांकडे लक्षही नसलेल्या ताई. त्या कोठल्या विश्वात होत्या हे कळत नव्हते. पण वैभव मांगलेचा शब्द न शब्द त्यादिवशी आम्ही बघितला. त्यांनी उभे केलेले स्वरब्रम्ह आम्ही बरोबर घेतले आणि घरी येईपर्यंत फक्त गप्प होतो.
१९७६ ला सोलापूरच्या भागवत थिएटर्स च्या भव्य प्रांगणामागील “मुक्तांगण” चे उदघाटन दस्तुरखुद्द पं भीमसेन जोशींनी केले होते. मित्र संजय झळकीकर बरोबर ते सुमारे पावणेचार तास मी ट्रान्स मध्ये घालवले होते.
भूपेन हजारिका असेच पहिल्या शब्दापासून त्यांच्या आसाम मधील “लोहित किनारे” घेऊन जातात.
माँ अमृतानंदमयी (अम्मा) त्यांच्या प्रवचनांमध्ये, रसाळ अभंगांमध्ये मधूनच ट्रान्स मध्ये जातात आणि आपण ते दृश्य पाहून थरारतो.
सकाळी सकाळी पत्नीने सारेगामा -कारवा मधील लताचे ” ऐ मालिक तेरे बंदे ” सुरु केलं आणि मीच बघता बघता ट्रान्समध्ये गेलो- ते नितळ प्रार्थना स्वर अलगद स्वतःचे विश्व तयार करीत होते, आणि ध्यान लागल्यासारखा मी त्यामध्ये ओढला गेलो. चक्क तीन मिनिटे समाधी अवस्था मी जगलो.
वेगळ्या जंगलांची, डोंगरातील गुहांची, निरव शांततेची गरज नव्हती.
” वीर-जारा ” मधील राणी मुखर्जीचा संवाद आठवला – ” ही कोठल्या जगातली माणसे असतात?”
आपल्या नक्कीच नसतील.
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply