मराठी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला समुद्र उल्लंघून जाऊ नये, पंचक्रोशीतच रोटी-बेटी व्यवहार करावा, यवनी म्हणजे उर्दू – हिंदी भाषा बोलू नये या सारखी समाजबंधनं त्या काळात होती. ‘महाराष्ट्र देशी वचीजे’ असा महानुभाव पंथात दंडक होता. तरीही नामदेवाचे ‘तीर्थावळीचे अभंग’, मराठ्यांच्या बखरींमधील उत्तर-दक्षिणेकडील चढायांच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाची वर्णने ही अव्वल इंग्रजी पूर्वकालीन प्रवासवर्णने म्हणता येतात.
एकोणिसाव्या शतकात राजकीय स्थित्यंतराबरोबर प्रवासाला महत्त्व आले. दळणवळणाची साधनं वाढली. रस्ते, रेल्वे, जलवहातूक यांचा झपाट्यानं विकास होत गेला. १८५७ च्या बंडाच्या आधी पेण वरसईजवळचे गोडसेभटजी प्रवासास निघाले. त्याच्या आठवणी त्यांनी शब्दबद्ध केल्या. त्या साली उत्तरेकडे वाराणशीला राजाने रमणा भरवल्याचे जुन्या कुलाबा जिल्ह्यातील पेणजवळच्या वरसई गावच्या गोडसेभटजींच्या कानांवर पडते आणि द्रव्याच्या मोहाने ते मजल दरमजल करीत तिथं गेले. पण दुर्दैवाने ते बंडात सापडले. ब्रिटिशांच्या आणि मराठ्यांसह हिंदुस्थानी सैनिकांच्या धुमश्चक्रीत ते सापडले. खिशात पैसा नाही, जवळ खायला अन्न नाही, सोबतीस जवळची माणसं नाहीत, अशा परिस्थितीत जीव वाचवत परतीचा प्रवास सुरू केला. झाशीच्या आसपास ते आले तो मुलाला पाठीला बांधून घोड्यावर स्वार झालेली राणी लक्ष्मीबाई त्यांना दिसते. तोच शत्रूचे सैनिक मिळेल त्याला कापून काढतात असे समजल्यावर रस्त्यालगत असलेल्या कोरड्या विहिरीत दाटीवाटीने उभे राहिले. बायकांच्या छात्या त्यांच्या छातीला लागलेल्या. पण शत्रूच्या आणि मृत्यूच्या भीतीने कोणाच्याही मनात कामविकार नव्हता, असं प्रामाणिक वर्णन गोडसे भटजी यांनी केले. हे लेखन असलेले ‘माझा प्रवास’ हे त्यांचे पुस्तक गाजले.
१८७० – १८८६ दरम्यान आपल्या नवऱ्याबरोबर प्रथम देशभरात आणि पुढे कलकत्याहून सिलोन मार्गे अमेरिकेला आनंदीबाई जोशी गेल्या. कलकत्ता, रंगून, सिंगापूर, हाँगकाँग, जपान करीत गोपाळराव जोशी अमेरिकेला पोहोचले. पुढे १८९१ – १८९३ मध्ये ते विलायतेला गेले. तेव्हा ‘केसरी’त त्यांनी प्रवासवर्णन लिहिले. ‘गोपाळराव जोशी यांचा जलप्रवास’ या नावाचे १५/१६ लेख तिथं प्रकाशित झाले आहेत. या लेखनातून गोपाळरावांचं माणसांचं निरीक्षण, मुंबई ते लंडन या जलप्रवासातील बंदरं, समुद्रप्रवासातील अनुभव, आगबोटीचं वर्णन, तिची रचना, खोल्या, अन्न, हमाल, कॅप्टन, माणसं, बंदरं, सुवेझ कालवा, गोद्या, लंडनमधील वहातूक, बागा, रस्ते, घरं इत्यादी विषयींचं चित्रण प्रथमच मराठी प्रवासवर्णनात आले.
नानासाहेब पावगी यांनी ‘माझा विलायतचा प्रवास’, गोविंद चिमणाजी भाटे यांनी ‘माझा अटकेपार प्रवास’, ‘माझा हिंदुस्थानचा प्रवास’, न. चिं. केळकर यांनी ‘माझी विलायतची वारी’, श्री. रा. टिकेकर यांनी ‘मुसलमानी मुलखातली मुशाफिरी’, गो. नी. दांडेकर यांनी ‘दुर्गदर्शन’, गंगाधर गाडगीळ यांनी ‘गोपुरांच्या परिसरात’, ‘साता समुद्रापलिकडे, जयवंत दळवी यांनी ‘लोक आणि लौकिक’, अरविंद गोखले यांनी ‘अमेरिकेस पाहावे जाऊन’, रमेश मंत्री यांनी ‘थंडीचे दिवस’, वसंत बापट यांनी ‘बारा गावचं पाणी’, रवींद्र पिंगे यांनी ‘आनंदाच्या दाही दिशा’, मीना देशपांडे यांनी ‘पश्चिमगंधा’ तर दिलीप चित्रे यांनी ‘शिबाराणीच्या शोधात’ ही प्रवासवर्णनं लिहिली. या प्रवासवर्णनात आबू धाबी आणि तिचा परिसर आणि व्यवस्था यांचे चित्रण यांनी साधले आहे. भिन्न देश, भिन्न संस्कृती, भिन्न वातावरण, भिन्न लोकाचार, भिन्न अन्न, भिन्न भाषा आणि वेषपरिवेष यांचं चित्रण या लेखनातून घडतं.
पां. वा. काणे यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपमधील देशांचा प्रवास केला. तेव्हा त्यांनी टिपणं काढून आपल्या कन्येला आपण काय काय पाहिले हे कळवले. त्यातून यांनी ‘माझा युरोपचा प्रवास’ हे पुस्तक सिद्ध केले. अनंत काणेकर यांनी ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, ‘खडक कोरतात आकाश’, ‘निळे डोंगर, तांबडी माती’, ‘सोनेरी उन्हात, पाचूची बेटे’ अशी प्रवासवर्णनं लिहिली. काणेकर आणि चित्रकार दीनानाथ दलाल यांनी ‘डोंगरे बालामृत’च्या सहकार्याने उत्तरेकडे प्रवास केला. काणेकरांचं लेखन आणि दलालांची त्याला अनुरूप चित्रे यातून ‘आमची माती, आमचं आकाश’ हे प्रवासवर्णन सिद्ध झाले.
प्रवासवर्णन या प्रकाराला त्याचा चेहरामोहरा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली ती पु. ल. देशपांडे यांनी. ‘पूर्वरंग’, ‘अपूर्वाई’, ‘वंगचित्रे’ या लेखनाने मानदंड निर्माण केले.
‘सृष्टीमध्ये बहु लोक ।
परिभ्रमणें कळे कौतुक ।’
असे समर्थ म्हणून गेले आहेत. पूर्वेचा झपाट्याने बदलणाऱ्या कौतुकाचे रंग पाहात बासष्ट साली जानेवारी ते मे महिन्यात मी आणि माझी (सुविद्य इ. ) पत्नी हिंडलो. कसलीही पूर्व तयारी न करता. पण ‘चुकोनि उदंड आढळते’ असे समर्थांनीच म्हटले आहे तसे झाले… यात्रा सफल झाली की मावंदे घालायचे. ‘अक्षरांचे धन असलेल्या लेखकाने पुस्तकाचे मावंदे घालायचे.’ असे म्हणून पुलंनी ‘पूर्वरंग’ वाचकांच्या हाती ठेवले आहे. प्रवाही निवेदन, चित्रमयशैली, विनोदाची झाक आणि प्रसन्न, प्रत्ययकारक चित्रण यामुळे हे लेखन अत्यंत वाचकप्रिय ठरले.
प्रभाकर पाध्ये, रा. भि. जोशी हे यानंतरचे बिनीचे लेखक म्हणता येतात. ‘तोकोनामो’ हा जपानच्या प्रवासातील अनुभवांवर पाध्ये यांनी लेखन केले. माधव गडकरी यांनी ‘मुंबई ते मास्को व्हाया लंडन’ हे प्रवासवर्णन लिहिले. डॉ. अरुण टिकेकर यांनीही जपान भेटीवर ‘ओच्या कोच्या’ हे प्रवासवर्णन लिहिले. ‘वाटचाल’, ‘मजल-दरमजल’, यासारखी सरस प्रवासवर्णनं राभिंनी लिहिली. प्रवासवर्णन या प्रकारामध्ये रा. भि. जोशी यांचं लेखन वैशिष्ट्यपूर्ण मानतात. एखाद्या प्रदेशाविषयी, तेथल्या माणसांविषयी, त्यांचं बोलणं, वागणं, ढब याविषयी रा. भि. जोशी अतिशय चित्रदर्शी शैलीत लेखन करतात. शिवाय हे लेखन उगाच पाल्हाळिक होऊ नये, वाचकाला त्याने सतत आपल्यामध्ये गुंतवून ठेवले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असायचा.
१९६१-१९६२ साली भारत-चीन युद्ध झाले. तेव्हा आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक कल्पना लढवल्या गेल्या. महाराष्ट्र शासनाने तेव्हा पाच लेखकांचा एक गट तिकडे पाठवला होता. त्या प्रत्येक लेखकाने तेव्हा आपल्याला आलेले अनुभव ‘दिपावली’ या तेव्हाच्या मासिकामध्ये प्रसिद्ध केल्याचे माझ्या पाहण्यात आले होते.
गंगाधर गाडगीळ यांनी ‘गोपुरांच्या प्रदेशात’ मध्ये दक्षिण भारताचा त्यांनी प्रवास केला त्यातील अनुभवांची चित्रे रंगविली. मुळात गाडगीळ हे शैलीदार लेखक. मानवी जीवनाचे त्यांना अपार कुतूहल. त्यामुळे मुंबईकर गाडगीळ जेव्हा बेळगाव, विजयनगर, हंपी, खजुराहो, विजयनगर, तिरूअनंतपुरम, मद्रास, त्रावणकोर, कन्याकुमारी, केरळ, या दक्षिण भारतातील स्थळांना भेटी देतात त्या सूक्ष्मतेने वाचकांना आंध्र, ओरिसा, मद्रास, केरळ, कन्याकुमारी यांचे समुद्रकिनारे, दक्षिणेकडील घरांच्या, देवळांच्या विशिष्ट रचना पध्दती, तिथले उंच उंच गोपुरे, अवाढव्य शिल्पांनी सुशोभित असलेली मंदिरे, नारळ – पोपळी – केळीच्या बागा, तिथले आडव्या अंगाचे काळेकभिन्न पुरुष, त्यांच्या अवघड भाषा… या साऱ्यांचे कथन गाडगीळ करतात. गाडगीळ यांनी चीनचा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी ‘चीन: एक अपूर्व अनुभव’ हे प्रवासवर्णन लिहिले.
त्यातील ‘पहिलंवहिलं दर्शन’ नावाच्या प्रस्तावनेत पुढील विचार व्यक्त केले आहेत-‘चीनला जाण्याचा योग येणार असे जेव्हा मला कळलं, तेव्हा मात्र एक अपूर्व असा अनुभव आपण घेणार आहोत अशी भावना माझ्या मनात उचंबळून आली. उत्सुकता लुकलुकत्या नजरेनं त्या अनुभवाची प्रतीक्षा करू लागलो… अनुभवांची नुसती नोंद न करता त्याचं विश्लेषण करून अन्वयार्थ लावला आहे. सुरुवातीला काही ओळख करून देणा-या व वातावरण निर्माण करणा-या धावत्या नोंदी, नंतर असे अन्वयार्थ लावणारे लेख व अखेर निरनिराळ्या स्थळांचं सौंदर्य, सांस्कृतिक संदर्भ इत्यादीचं चित्रण पुष्कळसं कलात्मकरीत्या करणारे लेख असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.’ असे पुस्तकाविषयीचं स्पष्टीकरण गाडगीळ यांनी दिलं आहे.
गो. नी. दांडेकर यांनी ‘कुणा एकाची भ्रमण गाथा’ हे प्रवासवर्णन आणि कादंबरी याचं सुंदर मिश्रण साधत लिहिलं. अलीकडल्या काळात मीना प्रभू यांनी ‘माझं लंडन’, ‘मेक्सिकोपर्व’, ‘दक्षिणरंग’, ‘ग्रीकांजली’, ‘न्यूयॉर्क न्यूयॉर्क’, ‘रोमराज्य’, ‘चिनी माती’, ‘दक्षिणरंग’, ‘अपूर्वरंग’, ‘इजिप्तायन’, ‘वाट तिबेटची’, ‘उत्तरोत्तर’, ‘गाथा इराणी’ अशी १४ प्रवासवर्णनं लिहिली. मीना प्रभू लंडनमध्ये स्थिरावलेल्या स्त्रियांच्या डॉक्टर. भरपूर वर्षं वैद्यकीत घालवल्यावर गेल्या २०/२५ वर्षांमध्ये त्यांच्या मनात प्रवासाची ओढ निर्माण झालेली. अलीकडल्या संगणक युगात तर विकिपिडियासारखे माहितीचे साधन उपलब्ध असल्यावर प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ती व्यक्ती आपण ज्या स्थळाला भेट देऊ इच्छिते तिचा इतिहास, संस्कृती, भौगोलिक वैशिष्ट्ये, प्रवासाची साधने, वहातूक, हॉटेले, विमानतळ इत्यादीविषयी माहिती गोळा करू शकते आणि त्यामुळे तिचा प्रवास सुखकर होऊ शकतो. शिवाय संबंधित स्थळासंबंधी उपलब्ध होत जाणाऱ्या पुस्तकांचे वाचन, सीडी-डीव्हीडी पाहून करून घेतलेले आकलन उपयुक्त ठरते. शिवाय आधीच केलेल्या टिपण- टाचणांना प्रत्यक्ष प्रवासातील अनुभवांची, माहितीची जोड दिली की प्रवासवर्णन तयार होऊ शकते. डॉ. मीना प्रभू यांनी अशारीतीने या वाङ्मयप्रकारावरील आपली हुकमत सिद्ध केली आहे.
‘दक्षिणरंग’ या पुस्तकाला त्यांनी ‘प्रिय वाचक’ शीर्षकानं पुढीलप्रमाणे निवेदन जोडले आहे ‘मराठी साहित्यात ‘प्रवास वर्णन’ ही आता अपूर्वाईची गोष्ट राहिलेली नाही. सुकर प्रवासामुळं देशी-विदेशी पर्यटन भरपूर वाढलं आहे. मातब्बर लेखकांनी उत्तमोत्तम प्रवासवर्णनं लिहून साहित्यात अमोल भर घातली आहे, पण हा प्रवास बहुतांशी युरोप-अमेरिकेसारख्या सुधारलेल्या पाश्चिमात्य वा सिंगापूर – जपानसारख्या पौर्वात्य देशात होत असतो. दक्षिण अमेरिकेसारख्या दूरच्या आणि अज्ञात खंडाकडं कुणी वळत नाही.
अशा खंडाकडं जाण्याची संधी मला सुदैवानं लाभली. या प्रवासावर काही लिहावं, अशी कल्पनासुद्धा सुरुवातीला मनात नव्हती. कुठलंही दडपण मनावर न ठेवता तीन महिने मुक्त संचार करायचा इरादा होता. पण प्रत्यक्ष तिथं पाऊल ठेवलं मात्र! हे जगावेगळे जग पाहताना आलेले विवक्षण अनुभव तुम्हांला सांगावेत, असं प्रकर्षानं वाटू लागलं. त्यामुळं हे पुस्तक प्रवासवर्णनापेक्षा ‘प्रवासानुभव’ स्वरूपाचं आहे. विराट निसर्ग आणि अनोखी संस्कृती ही या दक्षिण देशांची मुख्य ओळख. त्यांच्या तोंडओळखीत मी हरखून गेले. ती उत्कटता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे..’ भिन्न ठिकाणी आपण जे जे वेगळं, वेधक, आकर्षक, विराट आणि उग्र भेसूर पाहिलं ते वाचकांना भरभरून देण्याची मीना प्रभू यांची वृत्ती दिसते.
१९९० नंतर संगणकयुग निर्माण झाले. इकडे त्या शास्त्रातील पदवी घेतलेले बहुसंख्य तरुण परदेशांमध्ये जाऊ लागले. त्याच्यामुळं स्वाभाविकच त्यांचे पालकही. त्यामुळे या प्रकारात लेखन करणाऱ्यांची संख्या बेसुमार वाढली. त्यात तिकडे लग्न होऊन गेलेल्या आपल्या मुलीच्या बाळंतपणासाठी गेलेल्या आयांची संख्या वाढली. त्यांनी उत्साहाने लिहिलेली प्रवासवर्णनं वाढली. त्यातही सायकलवरून प्रवास करणारेही निघाले.आपल्या या जगावेगळ्या साहसाची, पराक्रमाची चित्रं ते उत्साहाने शब्दबद्ध करू लागले. अंबरनाथच्या प्रवीण कारखानीस यांनी ‘रोमायण’ नावाने प्रवासवर्णन लिहिले आहे. या खेरिज आणखी एक प्रकार अलीकडे लोकप्रिय होत आहे. कृष्णमेघ कुंटे आणि त्यांच्यासारखे इतर नर्मदा परिक्रमेसारखे प्रवास करतात आणि त्यावर आधारित पुस्तकं लिहितात. त्यातील अध्यात्मिक भाग आपण बाजूला करू. मग उरते ते निखळ प्रवासवर्णन. काही धाडसी दर्यावर्दी छोट्या आगबोटीतून जगप्रवास करतात. सुखरूप परतल्यावर आपल्या प्रवासाचे ते शब्दांकन करतात. हेही लेखन प्रवासवर्णन प्रकारात मोडते.
अलीकडच्या काळात मिलिंद गुणाजी आणि जयप्रकाश प्रधान यांनी या प्रकारात लक्षणीय भर घातली आहे. त्यातही या प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे. ‘माझी मुलुखगिरी’ आणि ‘अनवट वाटां’वरून मिलिंद गुणाजी यांनी केलेली भटकंती शब्दबद्ध केली आहे. ‘सह्याद्रीतले किती तरी डोंगर अनवट, आडवाटेला असलेले. त्यामुळे तिथला निसर्ग न्याहाळताना, त्यातले एक होऊन वावरताना, वेगवेगळ्या ऋतूंत आणि दिवसाच्या प्रत्येक प्रहरात त्याला अनुभवताना येणारी अनुभूती सुद्धा अनवटच.’ असं त्यांनी ‘अनवटवाटा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. त्यामुळे हे लेखन गड-कोट-किल्ले यातील विलक्षण भटकंतीतील अनुभवांचे आणि म्हणून रूढ मळलेल्या वाटेवरील वर्णनापेक्षा वेगळे आहेत.
जयप्रकाश प्रधान यांनी जगभरातील ७३ हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी या प्रवासातील अनुभवांचे लेखन केले आहे. ‘ऑफबिट भटकंती’ या नावानं त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
‘भटकण्याची आवड मोठी विलक्षण असते. आधी सहलीची आखणी, पूर्वतयारी, मग प्रत्यक्ष प्रवास आणि परतल्यावर पुढच्या प्रवासाचे वेध ! या चक्रात वर्षं कशी कशी सरकतात, तेच समजत नाही. मी आणि माझी पत्नी जयंती, आमचंही असंच झालं आहे. गेल्या पंधरा-सोळा वर्षांतील भटकंतीच्या नुसत्या आठवणीही मनाला विलक्षण आनंद देऊन जातात.’ असं त्यांनी प्रस्तावनेत लिहिलं आहे. हा जो ‘मनाला विलक्षण आनंद देऊन’ गेलेला अनुभव, त्याची विविध रूपं, ते वेगवेगळे प्रसंग, ती वेगवेगळी ठिकाणं, माणसं यांच्या संबंधीचं चित्रण त्यांनी या लेखनात केलं आहे. ‘भेट दिलेल्या देशांची केवळ संख्या वाढावी या हेतूने, त्या देशाला ‘भोज्या’ म्हणून नुसतं हात लावायला जायचं नाही. ते राष्ट्र, त्याची संस्कृती, तिथले लोक, त्यांच्या चालीरीती, खाद्यपदार्थ – पेय तेथील ग्रामीण भाग, अगदी ‘ऑफबीट’ जागा यांची जास्तीतजास्त माहिती मिळवणं हा, तो देश पाहाण्यामागचा मुख्य उद्देश आम्ही ठरवला.’ अशी त्यांनी आपल्या प्रवासामागील आणि लेखनामागील भूमिका विशद केली आहे.
वासंती घैसास यांनी ‘सफर पूर्वघाटाची’ नावाचं लेखन केले आहे. ‘भारतभूच्या कुशीत कितीतरी आगळी-वेगळी सौंदर्यस्थळं दडलेली आहेत याची नीटशी कल्पना आजच्या माहिती – संगणकाच्या युगातही आपल्याला बरेचदा नसते. तसं म्हटलं तर कित्येकदा आपल्या देशाबद्धलच आपल्याला खूप कमी माहिती असते. नवनवीन ठिकाणे धुंडाळणं, पहाणं यात नेहमीच दुधात साखर पडण्यासारखाच आनंद असतो. आवर्जून पाहावीत अशी एक नाही, तर अनेक वेधक स्थळं ओडिशा, मध्यप्रदेश छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश या चार राज्यांच्या मुख्यत्वे जंगलमय, आदिवासी भागातून केलेल्या पूर्व घाटाच्या सहलीत सामोरी येत गेली.’ असे म्हणून त्यांनी या डोंगराळ, दुर्गम भागात जे पाहिलं ते वाचकांना सांगावं म्हणून हा लेखनप्रपंच केला आहे.
अरुण गोडबोले यांनी ‘सातारा ते सिंगापूर’ आणि ‘अजिंक्यतारा ते आलास्का’ ही प्रवासवर्णनं लिहिली आहेत. प्रवास म्हणजे बखर किंवा इतिहास भूगोल नाही असे मी मानत असल्यामुळे या संपूर्ण प्रवासात टिपणे, नोंदी मी घेतलेल्या नव्हत्या. प्रवासाचा आनंद आपण प्रवास करताना मनमुराद घ्यावा आणि नंतर ते ते आनंदाचे क्षण अशा वर्णनातून वाचकापर्यंत पोचवावेत हीच माझी भूमिका आहे.” या शब्दांमध्ये त्यांनी आपली लेखनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘भटकंती अनलिमिटेड’ नावाचे प्रवासवर्णन महेश तेंडुलकर यांनी लिहिले आहे. प्रख्यात लेखक विजय तेंडुलकर यांचे ते चिरंजीव. त्यांनी लिहिले आहे, की ‘भटकंती करताना डायरी लिहिण्याची सवय असल्यामुळे ठिकाणं, माहिती, दिशा वगैरे सर्व काही अगदी हाताशी होतं. ‘
‘युरोप सहलीचा सोबती’ हे प्रवासवर्णन कल्याणी गाडगीळ वा. बा. कर्वे यांनी लिहिले आहे. ‘कोणत्याही शहरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असतात. परंतु सर्वच स्थळांची माहिती जागे अभावी देणे अशक्य असल्याने त्यातील महत्त्वाची स्थळे व त्यांची माहिती इथे दिली आहे.’ असे लेखकद्वयांनी लिहिले आहे.
मी स्वत: १९९९-२००० साली अमेरिकेचा पहिला प्रवास केला. त्यावर आधारित ‘ओ अमेरिका’ नावाचं छोटेखानी प्रवासवर्णन लिहिलं.
साधारणपणे माणूस हा एक भटक्या प्राणी आहे. कुठल्याही एका जागी राहाणं त्याला आवडत नाही. आपण ज्या एका पर्यावरणात राहातो तो सदा बदलत असतो. दिवसा – दिवसागणित त्याची रूपं बदलत असतात. त्याचं आल्हाददायक, सौंदर्यशाली रूप मनाला लोभावतं आणि वादळाच्या, भूकंपाच्या वेळचं रूप आपल्याला स्तिमीत करून टाकतं. हा नित्यनवा निसर्ग आपल्याला भावतो. काळाच्या प्रवाहात मानवी संस्कृतीच्या इतिहासात मानवानं देखील अनेक शिल्पं, इमारती, मनोरे यांचं बांधकाम केलं आहे. ते पाहाणं हा विलोभनीय आनंद असतो. ही विविधता प्रवासात एखादा आपल्या डोळ्यांनी पहातो, त्याचा आनंद लुटतो. त्यानं हे जे पाहिलेलं असतं ते त्याच्या चष्म्यातून तो टिपतो आणि शब्दबद्ध करतो. एकाच घटनेचं दोघांनी केलेलं निवेदन सारखं नसतं, म्हणून दोघांचंही लेखन वाचनीय ठरतं. प्रवासवर्णनात लेखकाचं व्यक्तित्त्व जितकं समृद्ध, व्यासंगी, बहुश्रुत तेवढं ते वर्णन वाचनीय आणि वाचकाला समृद्ध करणारं ठरतं.
जोपर्यंत माणसात विविध ठिकाणांना भेट देण्याचा उत्साह आहे आणि आपण पाहिलेलं लेखनबद्ध करण्याची ऊर्मी आहे, इतरांना ते वाचण्याचे अपार कुतूहल आणि जग जाणण्याची असीम जिज्ञासा आहे तो पर्यंत प्रवासवर्णन हा प्रकार अधिकाधिक समृद्ध होत जाईल, यात शंका नाही.
–अनंत देशमुख
(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply