मुख्यत्वे शंकराच्या मंदिरात असलेल्या दीपमाळा या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दिव्यांनी उजळलेल्या दिसतात.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असं म्हणतात. यादिवशी प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात. मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अनेक ठिकाणी याला ‘देव दिवाळी’ म्हणूनही संबोधलं जातं.
त्रिपुरी पौर्णिमेला या दीपमाळांवर त्रिपुरवात लावणे यालाच कोकणात टिपर पाजळणे असे म्हटले जाते. या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी, अंगणातात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.
त्रिपुरासुरांच्या वधाची एक अख्यायिका सांगितली जाते. तारकासुरांच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्माली आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही तीन स्थानं (पुरे) ‘त्रिपुरे’ म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे तीन शहरे, जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्या वेळी, मध्यान्ह समयी, अभिजीत मुहूर्तावर व चंद्र- पुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत!’ असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली अशी अख्यायिका सांगितली जाते.
यादिवशी शिव आणि विष्णुची भेट होते म्हणून बेल, तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply