श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ.. हे किंवा हिरवागार शालू नेसलेली धरित्री आणि मखमलीचे तृण गालीचे असे वर्णन वाचताना जो आनंद होतो ते शब्दात सांगता येत नाही. हिरवा शालू. हिरव्या बांगड्या यात मांगल्याचा आणि कदाचित सौंदर्याचा दृष्टिकोन असेल असे वाटते. सकाळच्या मोकळ्या वातावरणात बागेत. घरासमोरील हिरवळीवर अनवाणी चालणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशी हिरवळ डोळ्याचे पारणे तर फेडतात पण डोळे चांगले राहतात असे म्हणतात. यातून उगवणारे दुर्वाकुंर याची छोटी जुडी करुन दोन वेळा काही तरी मंत्र म्हणत ते डोळ्यावरून फिरवून एक विकार कमी झालेले मी पाहिले आहे. माझी काकू करायची हे. दुर्व्याचा रस औषध म्हणून देतात. आणि आपल्या लाडक्या बाप्पाला तर फार प्रिय आहेच पण आता मोठ्या शहरात अशा हिरवळीसाठी बागेत जावे लागते आणि ते सुद्धा ठराविक वेळी. त्यामुळे याला पर्याय म्हणून बाजारात अशीच एक कृत्रिम हिरवळ मिळते. हे फक्त नेत्रसुख किंवा भासमय एवढेच. त्याची किंमतही भरपूर. उन्हाळ्यात वाळून गेलेली हिरवळ पाऊस पडताच कशी उगवून येतात. हे देवाचे देण आता महाग झाले आहे. याचा आनंद. समाधान आणि सौंदर्य पहायचे असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच बघावे लागते….
घरात फ्रीज मध्ये बर्फ तयार होते. आणि तेही खाताना सदैव तेच बालपण आठवते. गारा पडत असतांना आईची नजर चुकवून ओरडा खावून. ओंजळीत. ओच्यात घाईघाईत वेचून आणून मैत्रीणीसह खाणे हे सगळे औरच असते. बर्फगोळा खातांनाही थोडा आनंद होतो. पण बर्फाचे विराटरुप पहायचे असेल तर हिमालयाच्या कुशीत शिरावे लागते. ते रुप पाहून मती गुंग होते. वाटते हे सगुण की निर्गुण रुप आहे ईश्वराचे. विज्ञानाच्या गप्पा मारणारे यांची बोलती बंद होत असावी. गावातील मोठ्या विहिरीत भोपळा. डबा बांधून पाण्यात भित भित पोहायल शिकलेली पोरं जेव्हा वरुन सूर मारून उड्या घेतात. ते धाडस आयुष्यात कामी येतं. नदीच्या पात्रात पोहणे ही सुद्धा एक कलाच आहे. आणि त्यात थोडी धार्मिक भावना असतात. एकाच वेळी अनेक जण स्नान करतात. तेव्हा मनात कसलीही शंका नसते. पोहता येणे हे आवश्यक आहे म्हणून शहरात कृत्रिम तलाव बांधले जातात आणि त्यात जंतू नाशक टाकलेले असते म्हणून परत नळाच्या पाण्याने अंघोळ करावी लागते. नैसर्गिक रित्या केलेले स्नान म्हणजे नदी किंवा विहिर यातून ओल्या अंगाने येऊन अंग व केस कोरडे करण्यातही मजा येते. त्यामुळे दुधाची तहान.. असे काही तरी करावे लागते. म्हणून पुढच्या पिढीला निदान एकदा तरी याचा अनुभव घेऊ द्यायला हवा यासाठी त्यांना किमान दाखवण्यासाठी निसर्गाची किमया बघण्याची संधी मिळाली तर असे अभासी जगात राहण्याचा मोह टाळता येईल.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply