तुजकडे पाहुनी मज,
गूढ काही वाटते,
ऊन सावली खेळ,
मनात, काहीसे दाटते,–!!!
तुझी चौकोनी नक्षी,
नजर फिरवी चोहीकडे,
आपल्यापल्याड काय चालते, लपवून ती दर्शवते,—!!!
काही दरवाजे उघडे,
का ठेवले कोणासाठी,
कोण तेथे वावरे,
कोण तिथे, संगती सोबती,–!!!
किरण प्रकाशाचे येती,
सावल्यांशी खेळत खेळत,
अस्तित्व कोणाचे असे,
कुणामुळे पसरत पसरत,–!!!
सुख दुखांचे शब्द ऐकशी,
जरी भले तू गवाक्षां,
निमूट सारे का ऐकून घेशी,
रडे ओरडे आणि संघर्षा,—!!!
किती भावनिक गुंता,
असेल तुझ्या देखत जाहला ताटातूट किती नात्यांची,
हा परिसर करून गेला,—!!!
कोण कळवळला, कोण नाचला, कोण आनंदे गहिवरून उठला,
उद्ध्वस्त होऊनी कोसळला,
काय कधी आणि कसे वागला, किती हिशोबांचा साक्षीदार तू
अचल तिथे तू खडा राहिला,—!!!
भासतोस निर्जीव जरी,
किती गुंतले तुझ्यात धागे,
तूही कोणात असा गुंतशी,
हिशोब सारे ठेवून मागे,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply