अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची हाक आहे. एकाच वेळी धरणी आणि आकाशावर प्रीत करायची जीवनशैली ही तुकोबा-जीवनशैली आहे. ते म्हणतात ‘आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी ।’ केवढा व्यापक पैस तुकोबा आपल्यासाठी आखतात. ते स्वतःला अगदी अणुरेणूहूनि थोकडा मानत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते आकाशाएवढे सिद्ध झाले. त्यांच्या मते संतजन ही फार मोठी सिद्धी होती. लब्धी होती. साधु संत ज्या दिनी घरी येतील तो त्यांच्यासाठी दिवाळी दसरा होता. संतजन म्हणजे सर्वत्र पसरलेले गगन आहे असे ते सार्थपणे म्हणतात.
तुकोबांनी वेदनेचा वेद वाचला व प्रेमाचे उपनिषद अभ्यासले. यामुळेच तर त्यांचे अभंग विचार प्रमेय बनलेत. यामुळेच तर ते धरणी-आकाशाच्या नात्याच्या मिलनाची महन्मंगल कथा मांडू शकले. सतराव्या झंझावाती शतकात तुकोबांचा तारा गगनात विलसतो. त्यांचा काळ हा १६०८ ते १६५० असा आहे. ही तुकोबांच्या जगण्याची, झुंजण्याची आणि समर्पित होण्याची बेचाळीस वर्षे आहेत. हा काळ इतिहासाच्या पटलावरचा अत्यंत संक्षिप्त असा काळ आहे पण असाच काळ तर शंकराचार्य काय आणि ज्ञानेश्वर काय यांना लाभला होता. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. तुकोबांची जीवनगाथा साधक, कवी, समाजसुधारक अशा त्रिपदा गायत्रीवर मंडित आहे. तुकोबा या त्रिवेणीवरील जंगम तीर्थ आहेत. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा हे नामदेवांच्या समकालीन होते. ते वारीला नियमितपणे जात असत. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आदेशावरून तुकोबांनी केलेल्या अभंग रचनेचे रहस्य उकलते.
तुकोबा हे नाव फार अद्भुत आहे. तुकणे म्हणजे तोलणे, वजन करणे. तुकणारा तो तुका. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई असून वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. त्यांना दोन भाऊ होते. मोठा सावजी तर धाकटा कान्होबा. दोन बहिणी होत्या. त्यांचे आई-बाबा निवर्तले आणि भाऊ सावजी गोसावी झाले. भावजय वारल्या. पहिली पत्नी रुखमा गेली. पुत्र संतोबा गेले. अन्नान्न दशा झाली आणि घरातल्या परिचित जनांच्या चिता धडधडताना बघाव्या लागल्या होत्या. तुकोबांची मशाल मात्र पेटती राहिली. वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा विवाह करावा लागला. पत्नी जिजाबाई म्हणजे आवली. तुकोबांच्या समोर संघर्षाच्या जळत्या वाटा संतप्त होत्या. दिवाणी दावा अंगावर कोसळला होता. घरादारावर जप्ती आली होती. बहिष्कार होता. गाव सोडून जायचा हुकूम झालेला. अशा प्रकारे तुकोबा निराधार झाले. तुकोबांना दुष्काळाने गाठले. त्यांचे दिवाळे निघाले. एकूणच उद्ध्वस्त जीवनाची ही दशा होती. इतिहासाची पाने फडफडत होती. तिकडे दक्षिणेत भयावह अशांतता होती. बहामनी मोगल संघर्ष वातावरणात दहशत पेरत होता. धाकदपटशा आणि अश्वारोहींच्या धुळीने जनजीवन माखलेले होते.
तुकोबांच्या पारंपरिक गतानुगतिक आयुष्याचा पट हा असा आहे सगळा. त्यांना ना जातीचे पाठबळ, ना गुरुंचा आसरा, ना कुणी मार्गदर्शक, ना हितकर्ता, ना कवडी ना चावडी म्हणजे ना पैसा ना अधिकार. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तिन्हीही स्तरावर उपासमार होती. एक पराभूत आणि लज्जित जीवन वाट्याला आले होते पण तुकोबांनी प्रत्येक संकटावर आंतरिक सामर्थ्याने मात केली. कठोर आत्मपरिक्षणाचा जळता वणवा सभोवती असताना चेहऱ्यावरील स्मितरेखा पुसू दिली नाही. प्रत्ययकारी आत्मसन्मानाची उजळती ज्योत असे त्यांचे जीवन राहिले. आंतरिक प्रतिभेचा स्वच्छ-निर्मळ प्रवाह वहाता होता. त्यांच्या ठायीच्या प्रकाश जाणिवा विरक्तीने झोडपल्या गेल्या पण आंतरिक उजेड मात्र कायम होता. कोवळी भाव संवेदना जळती आणि उजळती होती. ते म्हणत होते ‘अंतरी पेटता ज्ञानज्योत धवळेल जगदाकार.’
तुकोबांसाठी जगण्याचा अर्थ झुंजणे होता आणि संदर्भ समर्पित होण्याचा होता. आपल्या जीवनातील कुरुक्षेत्राला त्यांनी धर्मक्षेत्रात परिवर्तित केले. ‘रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन’ हे अंतरंगातील सत्य तुकोबांनी परखडपणे मांडले. कुठल्याही परिस्थितीत ना शरणागती स्वीकारली ना परिस्थितीशरण बनले. ‘न दैन्यं पलायनं’ हा गीताबोध ध्यानी घेऊन ते जळत्या पायवाटेवर अनवाणी प्रवास करत राहिले नि मळलेली पायवाट चालत राहिले. एक अनवट व अवघड वाट चालणारा हा फकीर अक्षरशः पंख मिटून बसलेल्या गरुडासारखा उज्ज्वल उद्याची वाट बघत राहिला होता.
तुकोबांना आपल्या मूळाचा नेमका शोध लागलेला असल्यामुळेच ते म्हणू शकत होते ‘आम्ही मूळचे वैकुंठीचे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते स्वयंभू आहोत केले नव्हे’ या प्रमाणे त्यांना आपल्या स्वप्नांना जागरणाचा संदर्भ सहजीच देता येत होता. बाबाजी चैतन्य त्यांच्या अध्यात्म साधनेचे अधिष्ठान होते. आपल्याला संत नामदेवांनी कविता कार्य सोपवले आहे याची खूणगाठ हे त्यांच्या कवित्व साधनेचे बलस्थान होते. तुकोबांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने गीता भाष्य लिहिले एकूणच परंपरा नाकारणारे बंडखोर असे मन त्यांना लाभले होते. हिंदी भाषेत असे मन कबीर यांना तर गुजराती भाषेत असे मन नरसी मेहता यांना लाभले होते. या वैष्णव वीरांनी शास्त्रसत्ता नाकारली. ग्रंथ सत्ता झुगारून दिली. कबीर ठामपणे म्हणाला होता ‘तू कहता कागज की लेखी में कहता आँखन को देखी. ‘ तुकोबा यामुळेच तर केवळ आपण वेदांचा अर्थ जाणतो असे हिंमतीने म्हणू शकत होते. कबीराच्या शैलीत तुकोबा माळा-टिळा-जानवे-ज्योतिष-कर्मकांड नाकारून कर्मयोगाचा स्वीकार करतात. ज्ञानसाधना आचरतात आणि दंभ व अहंकारापासून मुक्त होतात. भक्तिला कधीही विभक्त न होण्याची दीक्षा देत देखावा नाकारतात. पंचांची सत्ता नाकारत असल्यामुळेच ठणकावून सांगतात ‘सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत.’ तुकोबांच्या जाणीवांचे असे स्वनिर्मित विश्व आहे. यामुळे ते थोर महाकवी ठरतात. थोर महाकविचे रहस्य समजून घ्यायला हवे. असे कवी खोल मानवी आस्था, गहिरे करुणामूल्य, मानवतेची असहाय आर्तता व दुःखाला काव्यात्म परिमाण देण्याची क्षमता बाळगतात. प्रज्ञासंपन्न कविची शब्दसत्ता ही खरे तर त्याची अर्थसत्ता आहे. शब्दांचा अर्थ त्यांनाच कळतो जे अनुभवाचा ईसार देतात. बाकी लोकांना शब्दांचे पर्याय कळत असतात. शब्द मारतो अर्थ तारतो हे तुकोबांनी मनात जाणून घेतले होते. शब्दांचे शिक्षक असतात पण अर्थाचे आचार्य असतात अशा आचार्यांना हे पुरते ज्ञात असते की शब्द पुस्तकात असून अर्थ जीवनात शोधावा लागतो. तुकोबांच्या कवितेला यामुळे एक दृढता येते. ते म्हणतात ‘वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.’ शब्द आपल्या जीवाचे जीवन असल्यामुळे आपण जनलोकांसाठी शब्द वाहतो. आपल्या घरी धन शब्दांचीच रत्ने असल्याचा अभिनव साक्षात्कार त्यांना घडतो. तुकोबा यत्नपूर्वक मग शब्दांचीच शस्त्रे करतात. क्रांतिकारक, वैज्ञानिक, जीवन सन्मुख आणि ऋषी या चार लोकांचीच शब्दांवर सत्ता असते. तुकोबा या चारी वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतीक-प्रतिनिधी होते. आपला अनुभव आपले मित्र शत्रू होण्याचा आहे तर तुकोबांना आपले शत्रू मित्र झाल्याचा अनुभव आला. कवितेमुळे जन्मजात वैर विस्मरणात जाण्याची सिर्द्ध लाभते असा संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी दिला आहे. तुकोबांना हा अनुभव प्रत्यक्षात झेलता आला. त्यांचे शत्रू मित्र झाले. धर्मपीठावरून धर्माज्ञा करणाऱ्या रामेश्वर भट यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची आरती रचली.
तुकोबांची कविता समजून घेताना त्यांचे जीवन धडपणे समजून घ्यावे लागते. ते समजून घेण्यात जर गफलत झाली तर मग त्यांची वचने सामान्य बुद्धिच्या माणसांना अहंकार भरली वाटू लागतील. तुकोबा म्हणतात ‘आजि म्यां पांडुरंग पाहिला.’ आपल्या अध्यात्म अनुभवाचा असा जाहीरपणे डंका मिरवणारे तुकोबा कमालीचे निरलस आणि विनम्र आहेत. ‘मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास.’ असा आपला परिचय करून देणारे तुकोबा मग ‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ अशी संताघरची खूण सांगतात. सकलांच्या पाया दंडवत करतात याचे कारण आपापली चित्ते शुद्ध करा असा त्यांचा आग्रह असतो. तुकोबांचे पाईकाचे अभंग तर सैनिकाची आचारसंहिता आहे. शिवकल्याण राजा मावळतीच्या प्रदेशातील उजळते मावळे सोबत घेऊन एक क्रांती करू जात होता. त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळवताना आणि मिरवताना संत रामदास यांच्या सोबत तुकोबांच्या स्नेहाचे गाठोडे घेऊन चालावे लागते हा चमत्कार केवळ महाराष्ट्र देशीच घडला असे नाही तर एकूणच संत परंपरेत राजसत्ता आणि धर्मदंडाची ही जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते.
तुकोबांचे निवेदन यामुळे अतिशय परखड, स्पष्ट आणि कुणाचीही भीड मुर्वत न ठेवणारे आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही. कधीतरी या धरतीवर शंकराचार्य बोलले होते ‘न मे मोक्षस्याकांक्षा’ त्याच चालीवर तुकोबा म्हणतात ‘नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून वेगळे देईल जो’ आणि आपल्या आनंदलोकाचा परिचय या शब्दात करून देतात ‘तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ आणि त्यांनी व्यक्तवलेला ‘तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले’ हा समंजस सूर जीवन आणि ईश्वर या दोन संकल्पना मुळातून समजून घेण्याचा परिपाक आहे. मागणे काय तर ते लई नाही असे ते म्हणतात. पोटापुरते मागतात पण तुकोबांचे खरे सांगणे तर हे आहे ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.’
तुकोबांची कविता अमर आत्मतत्त्वासारखी दृढ प्रतिज्ञ आहे. तिचा पोत गीतेच्या आत्मतत्त्वा सारखा आहे. ‘नैनं छिदंति शस्त्राणि’ अशी ही कविता असल्यामुळे मंबाजीचे शस्त्रास्त्र तिजवर काही परिणाम करू शकत नाहीत. पंडित क्षोभाचे अग्निदिव्य तुकोबा पत्करतात आणि गाथेचे जलदिव्य साधले जाते. इंद्रायणीने तुकोबांची गाथा तारली की नाही हे काही माहित नाही पण लोककंठात ती सुरक्षित राहिली होती हे मात्र खरे. याचे कारण असे होते की ही गाथा कालोचित, कालसंमत आणि काळाला उत्क्रांत करणारी कविता आपल्या काळजाशी वागवून होती. कधी काळी उत्तरेत रामानंद साधुचा डंका वाजला होता ‘जातिपाँति पुछे नहीं कोई हरि को भजे सो हरिका होई.’ याचा आधार घेत कबीर बोलला होता ‘जाति न पूछो साधु की. ‘ तुकोबांनी या वचनांना मराठी पोशाख देत म्हटले ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ‘ या वचनांच्या मागे तुकोबांची कळकळ होती. ते म्हणाले होते ‘उपदेसी तुका मेघवृष्टिने आईका, ‘बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनि. ‘ तुकोबांनी रोकडा व्यवहार I शिकवला. स्वर्गाचे ना आकर्षण दाखवले ना भय दाखवले. त्यांनी हा ईहलोक भावसमृद्ध केला. ते म्हणाले होते ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार घ्यावे वनांतर भस्म दंड.’ ते अंधश्रद्धायुक्त समाज जीवनाला सश्रद्ध जीवनाचा आधार देत राहिले. अगदी सोप्या उदाहरणांनी समजावून सांगितले की बाबांनो ‘मंत्राकारणे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ‘ समाज जीवन ढवळून निघाले. त्यांच्या मते धर्मपालनाचा अर्थ होता पाखंड खंडन. धर्मनीतीचा संकेत होता अखंड सावधान असणे. ते म्हणतात ‘तुका सावधान हेचि देवाचे भजन’ या विचार मांडणीत कुठेही भोंगळपणा नाही, भोळसटपणा नाही. या उलट अगदी स्पष्टपणे ‘नाठाळाचे माथा हाणू काठी’ अशी प्रतिज्ञा आहे आणि ‘ऐशा नरा द्याव्या पैजारा मोजूनि’ असा सल्ला आहे. ते शिवपिंडीवरच्या विंचवाला वहाणेने ठेचावे असे सांगत होते.
तुकोबांनी माणूसपणाची व्याख्या आपल्या अभंगांमधून मांडली. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,’ ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. ‘साधूची व्याख्या करताना तुकोबा म्हणाले ‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो.’ त्यांना अपेक्षित होता वैष्णव धर्म. सारे जग विष्णुमय व्हावे अशी आशा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यांनी समाज जीवनाचे ऊर्धीकरण मांडले. हा नूतन युगधर्माचा संदेश होता. सामान्य माणूस व देव यांच्यातील दलालीचा हक्क सांगणारा शोधक पुरोहित वर्ग तुकोबांनी नाकारला, थांबवला आणि संपवला. त्यांनी कमालीचे तीक्ष्ण प्रश्न उपस्थित केले. ‘कोणे केले बाळा दुधाची उत्पत्ती ऊष्ण काळमासी फुटे तरुवर कोण तयासी जीवन देई.’ हे प्रश्न पडले की ‘कोण सांगावयासी गेले होते देशोदेश नेले वाऱ्याहाती माप समर्थ तो माझा बाप, ‘ ‘मुंगिचिया घरी कोण धाडी मूळ.
तुकोबा म्हणाले होते ‘आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । तुमची आमची भेटी येथूनिया जन्मतुटी. ‘ या जन्मतुटीबाबत विद्वानांचे मन आणि मत शंकांनी भरलेले आहे. ‘तुकोबांचे सदेह वैकुंठगमन की खून’ हा श्री. सुदाम सावरकर यांचा ग्रंथ यावर फार भेदक प्रकाश टाकतो. मीरा मुरलीधराच्या मूर्तीत सामावली हे पटत नाही. ती त्या मंदिराच्या मागे लहरणाऱ्या सागरात विलीन झाली असे अधिक तीव्रतेने वाटते. हे असे उदाहरण यापूर्वी नव्हते आणि नंतरही दिसले नाही. तुकोबा गेले निघून हे तर वाईट होतेच पण सर्वांत वाईट हे होते की त्यांची कविता बेपत्ता झाली. इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तिला बुडवता न आल्याचा शोक करणाऱ्यांनी हे पापकृत्य केले. एक शतक लोटले. थोर तुकारामभक्त वारकरी त्रिंबक कासार ४० वर्षे हिंडले आणि त्यांनी विखुरलेली मौखिक कविता गोळा केली. १९६९ साली तुकाराम भक्त इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट याने पुढाकार घेतला आणि ४५०० अभंगांची गाथा सिद्ध केली. ही गाथा पूर्णपणे निर्दोष नसली तरी अधिकृत आहे हे मात्र खरे. एकटा माणूस समाजपुरुष बनतो आणि तुका आकाशाएवढा बनतो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे.
– प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Leave a Reply