नवीन लेखन...

तुकोबा – संत की सुधारक?

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये चंद्रसेन टिळेकर यांनी लिहिलेला हा लेख


संत तुकाराम – तुकोबा – तुका आणि विं. दां. च्या भाषेत तुक्या देखील ! महाराष्ट्राच्या कडेकपारीत दुमदुमणारं नाव!! संत तुकाराम महाराज !!! मराठी साहित्याच्या दरबारातील मानाचा मानकरी… अफाट प्रतिभेचा प्रतिभावंत, महाकवी, भन्नाट अक्षरांचा स्वामी, भेदक शब्दकळा अवगत किमयागार… संत परंपरेतला कळस, ज्याची अभंगवाणी आसमंतात झाल्याशिवाय महाराष्ट्रदेशी पहाटच होत नाही असा मराठी विश्वातील भास्कर ! याची अक्षरं महाराष्ट्राच्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी अशी रुतून बसलेली की कुठलाही दगड हातात घेतला तर तो ‘तुका म्हणे’ म्हणतच तुमच्यापाशी येणार…

या ‘तुका म्हणे’नं अन तुकयाच्या म्हणण्यानं साऱ्या मराठभूमीला झपाटून टाकलंय गेली तीनशे वर्ष! अजूनही हे झपाटणे किती वर्षे राहील हे एक तुकोबाच जाणो. ज्याला काव्यातील ‘क’ कळत नाही त्याने सहज जरी तुका म्हणे म्हटलं तरी, “तुका म्हणे उगी रहावे । जे जे होईल ते ते मुक़ाट पाहावे,” नाहीतर, “नाही देहाचा भरवसा । उधार माल द्यावा कैसा” असे चतकोरी काव्य केल्याशिवाय राहाणार नाही.

वारकरी पंथ तुकोबाला ‘संत साहित्याचा कळस’ असे गौरवाने म्हणतात. कळस हा नुसता उंचावर असतो असे नाही तर तो तेवढा देखणाही असतो. तुकोबाच्या अक्षरांनी मानाच्या मानकऱ्यांनीही त्यांना मानाचाच मुजरा केलाय. साहित्यसम्राट आचार्य अत्रे तर आपल्या उशाला तुकारामाची गाथा घेऊन झोपत. त्यांनी आपल्या शिवशक्ती या वास्तूमध्ये तर जिन्याच्या दोन्ही बाजूला तुकारामाचे अभंग कोरून ठेवले होते. त्यांना भेटायला जाताना प्रत्येकाला आधी ते अभंग वाचित वाचितच त्यांच्यापर्यंत जावे लागे. ज्ञानपीठ विजेते प्रख्यात कवी विं. दा. करंदीकरांनी इंग्लंडचा विल्यम शेक्सपियर तुकारामाला भेटला अशी कल्पना करून, ‘विल्या भेटला तुक्याला’ अशी भन्नाट कविताही केली आहे. प्रख्यात कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे तर म्हणतात, ‘केवळ तुकोबांमुळेच मी कवी झालो.’ त्यांचं तर तुकोबाच्या संदर्भातील झपाटणं काही जगावेगळंच! त्यांनी तुकोबांचे अभंग इंग्रजीत करून जगभर मिरवले. असंख्य साहित्यिकांनी तुकोबाच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवली. केवळ एतद्देशीय नव्हे तर परदेशी विचारवंतही तुकोबाच्या विवेकी डोहात आजही डुंबताहेत.

हे झालं सारस्वत विश्वाबद्दल! पण आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कडे-कपारीत अन् सामान्य जनमानसात जे तुकोबा रुतून बसलेत त्यांचा कुणालाही अचंबा वाटावा असेच आहे. माझ्या मते त्याचे सारं श्रेय तुकोबाच्या लेखणीला म्हणजेच त्यांच्या शैलीला जाते. एकनाथाचा भारूड हा प्रकार जसा बहुजनांच्या घराघरात जाऊन बसला तशी तुकोबाची भाषा सामान्य माणसाच्या मनामनात जाऊन बसली. कारण ती त्यांचीच भाषा होती. तुकोबांनी जे लिहिले त्याचा प्रत्यय त्यांना येत होता इतकी ती प्रत्ययकारी होती. तुकोबांच्या भाषेत हळवे लालित्य नाही. भाषेचा फुलावा नाही जो कदाचित आपल्याला ज्ञानेश्वरांच्या लेखणीत दिसतो. इथे जे आहे ते सारे रोख-ठोक ! ताकाला जाऊन गाडगे लपविणे नाही. त्यामुळे त्यांची लेखणी प्रासादिकता वगैरे सांभाळत बसली नाही तिने सरळसरळ सांगूनच टाकलं,

भले देऊ गांडीची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणूं काठी ।।

तुकोबांचा रोख-ठोकपणा साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांना एवढा भावला होता की त्यांनी त्यांच्या ‘दै. मराठा’ वरवरील दोन ओळी छापल्या होत्या. (फक्त तिथे ‘कासोटी’ हा शब्द टाकला होता) आ. अत्रे गर्वाने सांगत, ‘मी तुकोबांच्या भाषेवर पोसलाय. ‘ जाणकारांचे तर स्पष्ट मत आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्र्यांच्या भाषणांनी जेवढी जागृती तेव्हा केली तेवढी दुसऱ्या कशानेही झाली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अत्र्यांची जहाल भाषणे ज्यांनी ऐकली असतील त्यांना हे पटेल. याचाच अर्थ मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात अप्रत्यक्षरीत्या का होईना तुकोबाचे योगदान आहे. पण त्याच बरोबर हे ही खरे आहे की असंख्य सुभाषितवजा वाक्यांनी तुकोबाची भाषा प्रसंग-परत्वे नटली आहे. गावागावातील अनेकघरात तुळयांवर ही सुभाषितं अजूनही पाहायला आपल्याला मिळतील.

असं असलं तरी तुकोबा हे भल्याभल्यांना पडलेलं एक कोडं आहे. धनवान माणूस आपल्या पाठीमागे उदंड संपत्ती ठेवून गेल्यावर त्याच्या वारसात जशी संपत्तीसाठी भांडणे होतात तशी भांडणे तुकोबा खरे कोणाचे होते यावरून अधूनमधून महाराष्ट्रात पुरोगामी आणि सनातनी यांच्यात होताना दिसतात. दोन्हीकडची मंडळी पुराव्यासाठी आपापल्या दप्तरातील तुकोबाचे अभंग पुढे करतात. सनातन्यांच्या मते तुकोबा संत होते तर पुरोगाम्यांच्या मते ते समाज सुधारक होते. खरे तर दोघांचेही म्हणणे पटावे अशी भूमिका तुकोबांनी घेतलेली दिसते. नास्तिकाच्या विरोधात जेव्हा तुकोबाचे अभंग सापडतात तेव्हा सनातनी सुखावतात तर,

आहे देव ऐसा वदवावा वाणी ।
नाही ऐसा मनी अनुभावावा ||
(तु. गाथा वैष्णव वेद ३२०८)

असा अभंग सापडला तर पुरोगामी संतोष पावतात. या वादात ‘विद्रोही तुकाराम’ ग्रंथाचे कर्ते डॉ. आ. ह. साळुंखे उतरतात तेव्हा ते काहीसे पुरोगामी मंडळींना दिलासा मिळेल असं मत मांडतात किंबहुना तुकोबांना संतांच्या पालखीत बसवल्या बद्दल नाराजीच व्यक्त करतात. ते म्हणतात, “तुकारामाचे विचार आमच्या समतेच्या कसोटीवर टिकत नाहीत, ते आपल्या अपेक्षेइतके पुरोगामी नाहीत असे वादासाठी मान्य करू या. पण तुकारामाचे विचार समतावाद्यांशी अधिक जुळणारे आहेत की विषमतावाद्यांशी? तुकोबा याच दिशेने चालत राहिले असते तर ते पुरोगाम्यांच्या पक्षात गेले असते की प्रतिगाम्यांच्या गोटात?”

तुकारामाबद्दल समाज-धुरिणांना कोडे पडते ते अगदी मूलगामीच। तुकारामाचा काळ तीनशे वर्षांपूर्वीचा ( १६०८ – १६५०). आजही आम्ही पुरेसे बुद्धिवादी झालेलो नाही. जातीचा, वर्णाचा पगडा अजूनही आमच्यावर आहे. आंतरजातीय लग्नामुळे असंख्य हत्त्या झालेल्यांच्या बातम्या आपण वाचतो. तीनशे वर्षांपूर्वी या संदर्भात किती प्रकारच्या तटबंदी असतील त्याचा विचारच न केलेला बरा. काही युगांपूर्वी धर्ममार्तंडांनी जाहीरच करून टाकलं की आता कलियुग सुरू झाले आहे त्यामुळे हिंदू समाजात फक्त दोनच वर्ण उरलेत, ते म्हणजे ब्राह्मण आणि शूद्र ! शूद्रांना ज्ञानाचा अधिकार नाही. तेव्हा लिहिण्या-वाचण्याचा प्रश्नच येत नव्हता. तुकोबा बहुजन समाजातील म्हणजे धर्माच्या ठेकेदारांच्या मते शूद्र ! अशा अविवेकी वातावरणात तुकोबा ठामपणे उभे राहतात आणि शब्दांचा महिमा काय आहे ते सांगतात. ते म्हणतात,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।।१।।
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन ।
शब्द वाटू धन जनलोक ||२||
तुका म्हणे पहा शब्दचि देव ।
शब्देचि गौरव पूजा करू || ३ ||

खरं तर या सुसंस्कृत भूमिकेबद्दल धर्माभिमान्यांसकट सगळ्यांनीच तुकोबाचे कौतुक करावयास हवे होते. पण झाले उलटेच! मंबाजी नावाच्या धर्म-पिसाटाने त्यांच्या विरोधात उभा दावा पुकारला. त्यातून तुकारामाने,

महारासी शिवे । कोपे तो ब्राह्मण नव्हे ||
करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण ।
तया देता दान नरका जाती उभयता ।।
(तु. गाथा वैष्णव वेद २९६४)

असे म्हणून मंबाजीच्या सोवळ्यावर शिंतोडे उडवल्यावर जात्याच दुष्ट असलेला मंबाजी स्वस्थ कसा बसणार? भरीस भर म्हणून वेद-उपनिषदांची पोपटपंची करणाऱ्या मंबाजीसारख्या घोकंभटाला, “वेदांचा अर्थ तो आम्हांसी ठावा । इतरांनी व्यर्थ भार वाहावा ।” असे फटकारल्यावर मंबाजीसारखा उथळ विद्वान खळखळाट करणार नाही काय? त्याला आपल्या वाणीने तुकोबाचा पराभव करणे शक्यच नव्हते. तसे ते कुणाही सनातन्याला आपल्या विरोधातल्या बुद्धिवाद्याचे करता येत नाही. सनातन्यांची झेप पळीपंचपात्राचा खडखडाट करण्यापुरतीच ! मंबाजीसारखा तुकोबांचा कीर्तन करण्याचा व्यवसाय नव्हता. त्यातून भंडाऱ्या डोंगरावर रोज चिंतन केल्याने त्यांच्या प्रतिभेला सर्व-व्यापकता आली होती. भक्तीच्या- धार्मिकतेच्या मर्यादा पार करून विश्वाचे अवलोकन करून ती समर्थ झाली होती. म्हणूनच ते उपदेशितात,

वृक्ष-वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ||२||
आकाश मंडप पृथ्वी असं ।
रमते तेथे मन क्रीडा करू ||३||
तुका म्हणे होय मानसी संवाद |
आपुलाची वाद आपणाशी ।।४।।
(तुकाराम गाथा, वैष्णव वेद २३७६)

तुकोबाच्या वाणीतील अन् लेखणीतील मधाळता अन रसाळता मंबाजीकडे औषधालाही नव्हती. होता फक्त उर्मटपणा, उद्धटपणा आणि धर्माचा बुरखा घातल्याने आलेली स्वाभाविक मस्ती! त्यामुळे तुकोबाच्या कीर्तनाला मोठी गर्दी तर मंबाजीच्या कीर्तनाला लाजे-काजेस्तव आलेला ब्रह्मवृंद! शिवाय तुकोबा म्हणायचे, “माझ्या कीर्तनाला येताना खाली हात या” मंबाजी शेतकऱ्याला खडसावून विचारायचे, “कायरे,” (येणारा वयाने कितीही मोठा असला तरी तो बहुतांशी बहुजनातील असल्याने ‘अरे-तुरेच) कीर्तनाला आलास ना, मग काय आणलेस?”

साहजिकच तुकोबाच्या कीर्तनाला गर्दीच गर्दी तर मंबाजीकडे खडखडाट! मग खलबते झाली. ‘तुकोबाचे आव्हान कायमचे संपवले पाहिजे नाही तर आपण उपाशी करू. त्याच्या अभंगांना इंद्रायणीत जलसमाधी दिली पाहिजे. तुकोबाचे अभंग बहिणाबाई पाठक या ज्ञानी स्त्रीने लिखित स्वरूपात जतन केले होते पण त्याहून अधिक भक्तांनी मुखोद्गत केले होते तेव्हा मंबाजीने नेमके कोणते अभंग बुडवले ते कळावयास मार्ग नाही. परंतु जे काही थोडेफार मिळवून बुडवले त्याचाही काही परिणाम झाला नाही कारण तुकोबाचे अभंग लोकांना पाठ झाले होते. म्हणूनच अभंग बुडाले नाही लोकांच्या ओठी तरले असे म्हटले जाते. एका अर्थी लोकांनीच ते तारले असे म्हणावयास हवे.

तुकोबा वैकुंठाला गेल्याचे या ब्रह्मवृंदांनीच उठवले होते. तुकोबाच्या गायब होण्यामागे मंबाजी सारखा दुष्ट धर्म-भ्रमिष्टही असावा असा कयास आहे. या संदर्भात १९६५ च्या सुमारास शासनाने संशोधन समिती नेमली होती. पण तिचा अहवाल जाहीर केला गेला नाही. सामान्य भाविक मात्र दरवर्षी देहूला तुकाराम बीजेच्या दिवशी लाखोंच्या संख्येने जमतात. त्या दिवशी भर दुपारी बारा वाजता तुकोबा सदेह वैकुंठाला गेले अशी त्यांची श्रद्धा आहे. जेथून तुकोबा वैकुंठाला गेले असे मानले जाते तेथील एका झाडाची फक्त एकच फांदी बरोबर बारा वाजता हलते असे भक्त मानतात. बरोबर बारा वाजता कुणी तरी ‘फांदी हलली’ असे मोठ्याने म्हणतो, मग गर्दीतूनही ‘फांदी हलल्या ‘चा गजर होतो आणि भक्त मंडळी आपापल्या घरी जातात.

सगळ्याच संतांनी कमी अधिक प्रमाणात अंधश्रद्धेच्या विरोधात लिहिले आहे. पण तुकोबांनी त्या संदर्भात जे आसूड ओढलेत त्याला तोड नाही. देवा-धर्माचे नाव घेऊन आणि कपाळाला भला मोठा टिळा लावून बुवा-महाराजांचे सोंग करणाऱ्या दांभिकांना तर तुकोबांनी अक्षरशः धोबीपछाड केले आहे. इथे ते आपले संतपण बाजूला ठेवून बिनधास्तपणे समाजसुधारकाची भूमिका घेतात. गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून तुकोबांच्या असंख्य विवेकी अभंगांचा उल्लेख करीत.

नका दंतकथा येथे सांगो कोणी ।
कोरडे ते बोल मानी कोण? ।। १ ।।
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ।
येरा गबाळ्यचे काय काम? ||२||
(तु. गाथा, वैष्णव वेद २४६०)

टिळा टोपी घालुनी माळा ।
म्हणती आम्ही साधू ।।१।।
दया धर्म नाही चित्ती ।
ते जाणावे भोंदू ||२||
वाढवूनि जटा फिरे दही दिशा ।
तरी जंबू वेश सहज स्थिती ।।३।।
(तु. गाथा, वैष्णव वेद ३०१२ )

हे सगळे बाबा-बुवा आपल्या अंगात सिद्धी, दैवी शक्ती असल्याचा दावा करतात. अशांना तुकोबा परखड सवाल करतात,

तयांचे स्वाधीन दैवते असती ।
तरी का त्यांची पोरे मरती ।।१।।
(तु. गाथा, वैष्णव वेद ३२६०)

आपल्या भारतीयांच्या संताबद्दलच्या कल्पना अनेक वेळेला अनाकलनीय वाटतात, नव्हे तर काही काही वेळेला त्या हास्यास्पद अन् विचित्रही असतात. सभ्यपणे अंगभर वस्त्रे घालून बसलेला साधू किंवा संत आपल्याला चालत नाही. त्याने अर्धनग्नच बसले पाहिजे, तो नशापाणी करीत असेल तर उत्तमच! असा संत आम्हाला अवलिया वाटतो. असे नशापाणी करीत असल्याच्या त्याच्या प्रतिमाही आम्ही घरात लावतो. अशा वल्लींसाठी तुकोबा म्हणतात,

सेवी भांग अफू तंबाखू उदंड ।
परी तो अखंड भ्रांती माजी ।।
(तु. गाथा, वैष्णव वेद १५७६)

तुकोबांना म्हणायचे आहे की जो सदैव नशेत असतो असा तो तुमचे कल्याण काय करणार?

तुकोबा भक्तिमार्गातील असले तरी तारतम्य बुद्धी बाळगून होते. एक ठिकाणी ते उपदेशितात, ‘पेरणीची वेळ आली अन् घरात मृत्यू झाला तर मढे झाकोनि पहिली पेरणी करून घ्यावी. ‘अलीकडे आबालवृद्धांनी पंढरीच्या वारीत जाणे एक रीतच होऊन बसली आहे. कामधंदा सोडून वारीत सामील झालेले लोक तुकोबांनी पाहिले असावेत. त्यांना ते बजावतात,

तीर्थी धोंडा पाणी ।
देव रोकडा सज्जनी ।।१।।
खऱ्या साधूचे ते वर्णन करतात,
जे का रंजले गांजले ।
त्यांसी म्हणे जो आपुले ।।१।।
(तु. गाथा, वैष्णव वेद ८९)

तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा || २ ||
इतकंच नव्हे तर,
साधू संत येति घरा ।
तोचि दिवाळी दसरा ||
(तु. गाथा, वैष्णव वेद २०४)

असा त्यांचा गौरवही करतात, वारीबद्दल जशी प्रतिकूल प्रतिक्रिया ते व्यक्त करतात तसे सिंहस्थ कुंभमेळ्यातील निष्फळताही आपल्या समोर खालील शब्दांत मांडतात,

आली सिंहस्थ पर्वणी ।
नाव्हया भटा झाली धणी ।।१।।
पाप गेल्याची काय खुण ।
नाही पालटले अवगुण || २ ||

तीच गोष्ट देव-देवतांना नवस बोलणे आणि नंतर तो फेडीत बसणे या बद्दलची! आजही गणपती उत्सवात, ‘आमचा गणपती नवसाला पावतो अशी भुरळ भक्तांना घातली जाते. खरं तर ही एक आपल्या समाजात शेकडो वर्ष रुतून बसलेली अंधश्रद्धा आहे. सगळ्यात जास्त नवस बोलले जातात ते मुलगा होण्यासंबंधी ! या संदर्भात तुकोबा खडसावतात,

नवसे कन्यापूत्र होती ।
तरी का करणे लागे पती ।।१।।

छपाई यंत्राचा शोध लागेपर्यंत अधिकतर साहित्य हे मौखिक स्वरूपातच असायचं. पुढे जेव्हा तो शोध लागला, ते कागदावर उतरविले जाऊ लागले. नेमके इथेच काही जणांनी आपल्या आवडीनुसार मूळ श्लोकात, अभंगात, भेसळ करावयास सुरुवात केली. त्यातून तुकाराम महाराजही सुटले नाहीत. आचार्य अत्रे व प्रबोधनकार ठाकरे एकदा देहूस गेले असता कोणीतरी त्यांना आपल्या संग्रही तुकोबाचे मूळ अभंग आहेत असे सांगितले. दोघांनी ते अभंग पाहिले. अत्र्यांनी मोठ्या भक्तीभावाने नमस्कार केला. प्रबोधनकारांचा नमस्कार मात्र ‘देखल्या देवा दंडवत’ या प्रकारातला होता. अत्र्यांनी तिथून बाहेर पडल्यावर त्याबाबत त्यांना विचारले तसे ते म्हणाले,

“बाबूराव, तुम्ही भारीच भाविक बुवा. अहो, त्यातले बरेचसे अभंग लाल शाईत होते. तुकोबांच्या काळी लाल शाई होती का?”

आचार्य अत्रे एकूणच तुकोबाच्या व्यक्तिमत्त्वाने भारून गेले होते हे मात्र खरे. त्यांना तुकाराम महाराजांवरती एक नाटक लिहावयाचे होते. त्यासाठी ते देहूस महिनाभर मुक्कामही करणार होते. सारी सिद्धता झाली होती, परंतु अकस्मात त्यांना मृत्यूने गाठले.

आचार्यांची तुकाराम महाराजांवर किती भिस्त होती त्याचे वर्ण, अॅड. मधुकर राव यांनी आपल्या, ‘न पाहिलेले अत्रे’ या ग्रंथात केले आहे.

ग्वाल्हेर संस्थानिकांच्या आमंत्रणावरून आचार्य अत्रे, अॅड. मधुकर राव यांच्यासह तेथे गेले होते परंतु भाषणाच्या आदल्या दिवसापर्यंत अत्र्यांचे भाषण तयार झाले नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता उठून अत्रे भाषण लिहित बसलेले रावांनी पाहिले. त्यांनी अत्र्यांना विचारले,

“एवढ्या थोड्या अवधीत भाषण कसे लिहून होईल?” अत्रे म्हणाले, “अहो, लिहून झाले देखील! जोपर्यंत हा माझा बाप माझ्याबरोबर आहे तोपर्यंत मला कसलीच काळजी नाही.” असे म्हणून त्यांनी बाजूला ठेवलेल्या तुकारामाच्या गाथेला वंदन केले.

तुकोबांसह सर्वच संतांचे गुणगान करताना या विज्ञानयुगात थोडं सावध राहिलं पाहिजे हे मात्र तेवढंच खरं! संतांनी भक्तीची पेरणी केली अन् जी त्यांच्या काळात आवश्यकच होती हे जरी मान्य केलं तरी महाराष्ट्रात अन् संपूर्ण देशभर अलीकडे भक्तीची जी लाट उसळलेली आपण पाहतो ती चिंता करायला लावणारी आहे. वारीमध्ये तरण्या-ताठ्या मुलं-मुलींनी सामील व्हावं हे अजिबात कौतुकास्पद नाही. मला तर वाटते आज जर तुकोबा असते तर

गागिलें तीर्थी धोंडा-पाणी ।
पोरे तरी धावती धोतरे नेसूनि ।।
असावी लेखणी हाती वा नागरी फाळ ।
नवल काय वर्तावे |
हाती तयांच्या मृदुंग-टाळ ||

-चंद्रसेन टिळेकर

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..