चार दिवसांपूर्वी सहज ‘लोकमत’ नजरेखालून घालत असताना एका बातमीने लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ सिनेअभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरचा (स्मृतिभ्रंश) त्रास सुरु झाला आहे. तिच्या मुलाने, अजिंक्यने सोशल मीडियावर हे वृत्त दिलं होतं. अशा आजाराने विस्मरण होतं, जवळच्या व्यक्तींनाही रुग्ण पाहू शकतो, ओळखू शकत नाही…
ही बातमी वाचून मला अतिशय वाईट वाटलं आणि मी भूतकाळात गेलो. सदाशिव पेठेत असताना गणपतीच्या दिवसांत ‘मोलकरीण’ हा चित्रपट मी शिवाजी मंदिरमध्ये पाहिला होता. रमेश देव, सीमा, सुलोचना यांचा अप्रतिम अभिनय असलेला हा भावनाप्रधान चित्रपट मनावर कायमस्वरूपी कोरला गेला. त्यातील दोन वेण्या पुढे घेणारी साडीमधील, सुंदर सीमा आजही आठवते आहे. त्यानंतर तिचे अनेक मराठी, हिंदी चित्रपट पाहिले.
तो काळच असा होता की, सार्वजनिक उत्सवात चित्रपटांची खैरात असे. ‘आधी कळस मग पाया’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘प्रपंच’, ‘पडछाया’ हे चित्रपट गर्दीत बसून मी पाहिलेले आहेत. ‘प्रपंच’ चित्रपटातील ‘बैल तुझे हरिणावाणी गाडीवान दादा..’ हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. आपल्या प्रियकराला स्टेशनवरुन गावात आणण्यासाठी सीमा पुरुषाच्या वेषात बैलगाडी घेऊन रेल्वे स्टेशनवर जाते. श्रीकांत मोघेला घेऊन गावाकडे जाताना हे गाणे चित्रीत केले आहे. गदिमांची रसाळ शब्दरचना, सुधीर फडकेंच्या सुमधुर संगीताने सजलेलं हे गाणं पहाणाऱ्याला अविस्मरणीय ठरणारं आहे.
सीमाचा जन्म १९४२ मध्ये गिरगावात झाला. तीन बहिणी, एक भाऊ व आई. वडिल गोल्डन टोबॅकोमध्ये कामाला होते. सीमा सर्वात धाकटी, तिला लहानपणापासूनच नृत्याची आवड. नऊ वर्षांची असल्यापासून ती एका बॅलेमध्ये काम करायला जात असे. त्याचे एका शोचे वीस रुपये मिळायचे. महिन्यातील चार शो केल्यामुळे घरखर्चाला तिच्या ऐंशी रुपयांचा हातभार लागत असे. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यातील आनंदजी यांचा त्यावेळी ऑर्केस्ट्रा होता, त्या मध्ये गायिका म्हणून सीमा जात असे.
इब्राहिम नाडियादवाला यांनी तिला ‘अयोध्यापती’ मध्ये पहिल्यांदा काम दिले. त्या कामाचे पाचशे रुपये मिळाले. फिल्मिस्तानच्या ‘आलिया भोगासी’ ची बोलणी करण्यासाठी लोकलने जात असताना एका रूबाबदार तरुणाने सीमाच्या डब्यात प्रवेश केला आणि नंतर तोच रमेश देव तिचा ‘जीवनसाथी’ झाला!
सीमाने ‘अंमलदार’ या नाटकातही काम करुन आईला घर चालवण्यासाठी मदत केली. त्यावेळी प्रत्येक प्रयोगामागे सीमाला तीस रुपये नाईट मिळायची. ‘आलिया भोगासी’ या पहिल्या चित्रपटानंतर ‘ग्यानबा तुकाराम’ या चित्रपटाच्या शुटींगचेवेळी रमेश देव यांनी सीमाला ‘माझ्याशी लग्न करशील का?’ असे विचारले. त्याचे पर्यावसान १९६३ साली त्यांचे ‘दोनाचे चार’ होण्यात झाले.
प्रत्येकाला जीवनात एकतरी गुरू भेटावा लागतो, तेव्हा त्याच्या कलेची भरभराट होते. तसे सीमाला राजा परांजपे हे दिग्दर्शक गुरू म्हणून लाभले. ‘जगाच्या पाठीवर’ मधील अंध मुलीच्या भूमिकेचे सीमाने सोने केले. राजा ठाकूर, बाबा पाठक, दत्ता धर्माधिकारी अशा नामवंत दिग्दर्शकांनी सीमाच्या अभिनयाला परीसस्पर्श दिला. तिने ऐंशीहून अधिक चित्रपटांतून काम केले. १९६३ मधील ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
राजेश खन्नाच्या ‘आनंद’ चित्रपटात डाॅ. प्रकाश कुलकर्णी व सुमन कुलकर्णीच्या भूमिकेत रमेश देव व सीमाने सहजसुंदर अभिनय करुन रसिकांची मने जिंकली. अनेक हिंदी मराठी चित्रपटांत दोघांनी एकत्र काम केलेले आहे.
२०१३ साली रमेश देव व सीमाच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांच्या दोन्ही मुलांनी पुन्हा दोघांचा बहारदार लग्नसोहळा साजरा केला होता.
सीमाने चार तपांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘या सुखांनो या’, ‘प्रपंच’ अशा चित्रपटांद्वारे रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. त्याचीच पावती म्हणून राजा परांजपे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार तिला मिळालेला आहे. २०१७ साली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार सोहळ्यात सीमाला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘झी गौरव’ च्या पुरस्कार सोहळ्यात सुलोचना दीदींच्या हस्ते सीमाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अशा या सोज्वळ, सात्त्विक व्यक्तिमत्त्वाच्या सीमाला अल्झायमरसारखा दुर्धर आजार देणाऱ्या त्या परमेश्वराला म्हणावसं वाटतं….
उद्धवा, अजब तुझे सरकार ! लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !….
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१९-१०-२०.
Leave a Reply