त्यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि ते सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागले. एका मागे एक गाड्या यंत्रवत उभ्या रहात गेल्या. नेहमीच हो काही क्षणांची प्रतीक्षा सतीश कुमार यांच्यासाठी विचित्र प्रकारची असते. अश्याच कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशीच याची तुलना होऊ शकते. अशा व्यक्तीच्या मनात न कुठले विचार असतात… न समोर बघण्यासारखे एखादे दृश्य असते. ती व्यक्ती अचल, स्थिर असते. आपल्यातच मग्न असते. जगात काय घडते आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाच नसते. जे काही घडते आहे त्याच्याशी तिला काही घेणे देणे नसते. सिग्नलवर देखील लाल, हिरवा दिवा बघण्याशिवाय त्या व्यक्तीच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. कोणतीही कविता, कोणतेही गीत नसते. फक्त इतकेच लक्ष असते की, दिवा हिरवा होईल तेंव्हा एक्सीलेटर वरचा पाय दाबून कारला गती द्यायची आहे.
नऊ वाजले होते आणि सतीश कुमार यांना भूक लागली होती. ते घाईने घरी पोहोचण्यासाठी बेचैन होते. पण शहरातील ही गर्दी पंधरा मिनिटाचा रस्ता एक तासाचा करते.
कारच्या आरश्यात एका मुलीचा चेहरा दिसला. सतीश कुमार गडबडले. मुलीचे वय साधारण १४/१५ वर्ष असावे. तिच्या अंगावरचे कपडे घाणेरडे होते. केस बांधलेले होते, पण एकदम कोरडे होते. पण डोळ्यात उमेद होती आणि त्यातून आलेली चमक होती. मग त्यांनी पाहिले की, मुलीच्या हातात झेंडे होते. विकण्यासाठी. अनुभव यांना मार्केटिंग शिकवतो. त्यासाठी कुठल्याही एम.बी.एच्या डिग्रीची किंवा कोणत्याही ट्रेनिंगची आवश्यकता नाही. जशी संधी असेल तश्या वस्तू फुटपाथवर आणि रस्त्यावर विकल्या जातात. बाजाराच्या पुढे काहीही जात-पात आडवी येत नाही. दिवाळीला कंदील, क्रिसमसला क्रिसमस ट्री, ईदला वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि टोप्या, दसऱ्याला रावणाचे मुखवटे. आता उद्या स्वातंत्र्य दिन आहे, म्हणून रस्त्यावर झेंडे विकले जाताहेत. जर ही मुलगी झेंडे विकत नसती तर सतीश कुमारने हिला भिकारीण समजले असते. कितीतरी प्रकारचे झेंडे तिच्याजवळ आहेत. छोटे-मोठे सगळ्या प्रकारचे. एकदम छोटे… पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराचे, पिनेने खिशायला लावायचे झेंडे देखील तिच्या जवळ आहेत. हाताच्या आकाराचे कागदाचे झेंडे देखील आहेत. त्याशिवाय प्लास्टिकचे झेंडे, एकमेकांना क्रॉस करून ठेवता येतील असे दोन झेंडे देखील तिच्या जवळ आहेत.
“साहेब…. पन्नासचा एक… पन्नासचा एक…” मुलगी मोठ्याने म्हणाली. ही भुकेची ताकद होती. प्लास्टिकचा झेंडा त्यांनी पाहिला.
“साहेब… यात चिकटवता येईल असाही झेंडा आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये ठेवू शकता.” ती मुलगी घाईघाईने बोलते आहे. तिला सिग्नल हिरवा होण्यापूर्वी सौदा करायचा आहे.
सतीश कुमार यांनी पाहिले की, झेंड्याच्या खाली प्लास्टिकचा स्टँड होता. त्यात स्टीकर टेप देखील होती. याचा अर्थ झेंडा टेबलावर किंवा कारमध्ये देखील उभा करता येणार होता.
“इतका महाग?” सतीश कुमारने म्हटले.
“साहेब… चाळीस मध्ये घ्या.” मुलीच्या स्वरात याचना होती.
तोपर्यंत त्यांची नजर सिग्नलकडे गेली.
“साहेब तीस मध्ये घ्या.” त्यांना समोर पाहताना ती काहीशी अस्वस्थ झाली.
आता सतीश कुमारला तिच्या भोळेपणात रस वाटू लागला.
“अरे, ठीक भाव सांग.” त्यांनी साहेबी रुबाबात म्हटले.
“साहेब, पन्नासमध्ये दोन घ्या… पन्नासमध्ये दोन. टू…टू…सर. ती आता रडवेली झाली.
त्यांना तिची दया आली. “तू भी क्या याद करेगी….
चल दोन झेंडे दे. स्टीकर वाले. चिकटले पाहिजेत कारमध्ये. पडले नाही पाहिजेत. कारमध्ये उभे राहिले पाहिजेत. नाही तर बघ.”
“पन्नास रुपये साहेब… पन्नास रुपये” तिचे डोळे चमकू लागले. ती प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती. “उगीच समजुतीचा घोटाळा व्हायला नको.”
सतीश कुमार यांनी खिशातून शंभराची नोट काढू तिच्या दिशेने पुढे केली. “बाकीचे पन्नास रुपये परत कर.”
“हो..हो…” त्यांना झेंडे देत तिने शंभराची नोट झडप घालून घेतली. त्याचवेळी अघटीत घडले. शंभराची नोट हातात येताच ती कारपासून दूर झाली. ते काही म्हणण्यापूर्वीच सिग्नल हिरवा झाला. गर्दी खूप होती. मागून गाड्यांनी हॉर्न वाजवायला सुरुवात केली. त्यांनी कार पुढे घेतली नसती तर पोलिसाने नक्की दंडाच पावती हतात ठेवली असती. कारचा एक्सिलेटर दाबत त्यांनी रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिले. ती मुलगी वेगाने मागच्या दिशेने चालली होती.
इतका मोठा धोका. इतकी चलाखी. सतीश कुमार यांचे रक्त खवळून उठले. एक तर झेंडे काही कामाचे नव्हते. त्यांनी तिची दया येऊन ते झेंडे खरेदी केले होते. पण ती मुलगी पूर्ण शंभर रुपये घेऊन गेली होती. शंभर रुपये ही त्यांच्यासाठी काही फार मोठी रक्कम नव्हती. पण दोन कवडीची मुलगी त्यांना वेडं बनवते हे त्यांना आवडले नव्हते.
एक तर रस्ता वन-वे होता. दुसरे म्हणजे रस्त्यावर इतकी गर्दी होती की, ते कार रस्त्याच्या कडेला लाऊ शकत नव्हते. कार पुढे घेत ते दात खात म्हणाले, “ कुणाचे भले करणे आजच्या काळात बरोबर नाही. जर पुन्हा कधी दिसली तर तिची अक्कल ठिकाणावर आणतों. डाव्या उजव्या बाजूच्या आणि मागच्या गाड्या होर्न वाजवत होत्या. अश्या चोरांना पोलीसांकडेही दिले नाही पाहिजे. उलट त्यांचे मारून मारून भुसकट पडले पाहिजे. मग त्यानी अचानक एक निर्णय घेतला. त्या मुलीला घडा शिकवला पाहिजे. थोडे पुढे जावून त्यांनी जरा शांत जागा पाहून रस्त्याच्या कडेला गाडी पार्क केली.
त्या मुलीला शोधलेच पाहिजे. वन-वे असल्याने पुढे जाऊन, वळून मागच्या चौकात जावे लागेल. शिवाजी नगर चौक. पण तिथे कार थांबवता येणार नाही. काही हरकत नाही. रिक्शातून तिथे जाईन पण त्या मुलीला सोडणार नाही… सतीश कुमार यांनी विचार केला.
कारमधून उतरून ते रिक्षाला हात दाखवू लागले. त्यांना जवळ जवळ तीन किलोमीटरची चक्कर मारून शिवाजीनगर चौकात जायचे होते. रिक्षा मिळायला उशीर झाला. शेवटी मिळाली. काही वेळानंतर ते त्या चौकात होते जिथे त्या मुलीने त्यांना ते झेंडे विकले होते आणि त्यांना पन्नासचा चुना लावून ती मुलगी पळून गेली होती. इतक्या गर्दीत त्यांचे डोळे त्या मुलीला शोधत होते. पण त्यांना ते मुलगी दिसली नाही.
उद्या पंधरा ऑगस्ट होता आणि त्यांना झेंडा वंदनाच्या कार्यक्रमासाठी ऑफीसमध्ये लवकर पोहोचायचे होते. पण सतीश कुमार यांनी त्या मुलीला धडा शिकवायचे ठरवलेच होते.
सतीश कुमार यांचा मोबाईल वाजू लागला होता. लाईनवर संजोता मेहता होती. अपंगांच्या विद्यालयाच्या पर्चेस ऑफिसर कम टीचर. त्यांच्या विद्यालयासाठी सतीश कुमार यांची कंपनी विभिन्न प्रकारची सामग्री पुरवीत होती. उद्या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शाळेत एक कार्येक्रम आयोजित केला गेला होता. त्या कार्येक्रमात विकलांग मुलांना विशेष प्रकारचे लॅपटॉप वाटण्यात येणार होते. त्यात दृष्टीबाधित मुलांसाठी विशेष स्पीच सॉफ्टवेअर देखील टाकण्यात आले होते. संजोता मेहता त्यांनी वेळेवर लॅपटॉप पुरवल्या बद्दल त्यांना धन्यवाद देत होत्या.
सतीश कुमार संतुष्ट होते. कारण त्यांच्या कंपनेचे हे खराब झालेले लॅपटॉप शेवटी या शाळेला देण्यात ते यशस्वी झाले होते. शाळेला पाठवण्यात आलेल्या तीस लॅपटॉपमध्ये मॅन्युफॅक्चरींग डिफेक्ट होता. त्यांना हे देखील माहिती होते की, दोन तीन महिन्यानंतर जेंव्हा मुलांना याचे अॅडव्हान्स युटिलायझेशन शिकवण्याची वेळ येईल तेंव्हा लॅपटॉपमधील तृटी लक्षात येऊ लागतील. पण कंपनीची जबाबदारी ते सिद्ध करू शकणार नाहीत. मग जास्तीचे पैसे घेवून कंपनी लॅपटॉपचे पार्ट बदलू शकेल. संजोता मेहता खुश होत्या, कारण उद्याच्या कार्यक्रमात एज्युकेशन डायरेक्टर स्वत: येणार होते. त्यांच्या हातूनच लॅपटॉपचे वाटप करण्याचे ठरले होते.
सतीश कुमार यांनी देखील त्यांना धन्यवाद दिले. आणि असेही सांगितले की, उद्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सकाळी सकाळी त्यांच्या घरी भेटवस्तू पोहोचवली जाईल. त्यांनी हे देखील सांगितले की, नेहमी प्रमाणे चांदी नाही… तर या वेळी कंपनीने त्यांच्या साठी गोल्ड कॉइनची व्यवस्था केली आहे.
संजोत मेहता हसल्या आणि म्हणाल्या की, याची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही मुलांसाठी आम्हाला कमी किंमतीत चांगला माल पुरवता आहात… तीच मोठी गोष्ट आहे.
त्यांनी स्पष्ट केले की, हा कंपनी प्रमोशनचा भाग आहे आणि भेटवस्तू तर त्यांना स्वीकारावीच लागेल. यावेळी संजोत मेहता जोराने हसल्या. सतीश कुमार यांना हे माहिती आहे की, पर्चेस ऑफिसर स्वतः देखील मुलांना शिकवतात. खूप सज्जन आहेत आणि त्यांना असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टीचे आकर्षण नाही. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देऊन कंपनीचा माल त्यांना विकता येणार नव्हता. हो, पण त्यांना वेडे बनवले जाऊ शकते. जसे की, या वेळी डिफेक्टिव्ह लॅपटॉप देवून त्याना वेडे बनवण्यात आले आहे. पण विद्यालयाचे जास्तीचे नुकसान होणार नाही. सतीश कुमार यांच्या मनात विचार आला. आता गोष्ट राहिली सोन्याच्या कॉइनची…. वास्तवात तो तर त्यांच्या प्रचार अभियानाचा एक भाग आहे आणि कंपनीकडून दिली जाणारी भेट आहे. संजोत मेहता हसतात खूप आणि हसताना त्यांचा गालाला खळ्या पडतात. तेंव्हा त्या इतर वेळेपेक्षा खूप सुंदर दिसतात. आताही त्या हसत आहेत… सतीश कुमार यांना माहिती आहे की, आत्ताही त्यांच्या गालाला खळ्या पडलेल्या आहेत.
वेळ पुढे पुढे चालला आहे. भूक लागली आहे. पण त्या मुलीला धडा शिकवायचा आहे. सतीश कुमार चारही बाजूला डोळे फाडून बघताहेत. मुलगी कुठेही दिसत नव्हती. वेळे बरोबर त्यांचा राग वाढत चालला आहे. भूक आणि थकवा या मुळे त्यांच्या रागात भरच पडते आहे. पोलीस या बाबतीत काय करू शकतात? … ते विचार करू लागले… हे म्हणजे फारच झाले. एक शेंबडी मुलगी त्यांच्या हातातून पैसे घेऊन पळून जाते म्हणजे काय? …
या बाबतीत पैसे खर्च झाले तरी हरकत नाही, पण त्या मुलीला धडा शिकवलाच पाहिजे. त्यांचा एक मित्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये सब-इन्स्पेक्टर आहे. सतीश कुमार यांनी आपल्या मोबाईल वरून त्याला फोन केला आणि त्याला सगळी घटना सांगितली. म्हणाले की, काही खर्च करावा लागला तरी मी तो करीन. मित्र हसत होता. त्यांची स्थिती त्याला समजत नव्हती. स्थितीचे गांभीर्य तो समजून घ्यायला तयारच नव्हता. तो म्हणाला की, “झुरळ मारण्यासाठी तलवार कशाला खरेदी करायची? मग म्हणाला ओके… ओके… नो वरी.’
त्यांची जिद्द बघून त्याने सांगितले की, उद्या इंडिपेंडन्स डेच्या बंदोबस्तात तो व्यस्त असेल. पण एकदोन दिवसात तो जरूर त्या मुलीचा शोध घेईल आणि तिला धडा शिकवण्याच्या कामात त्याला नक्की मदत करेल. त्याने सांगितले की, कमी वयाच्या मुलांकडून काम करून घेणे तसाही गुन्हा आहे. त्यासाठी कायदा आहे. तो त्यासाठी तिच्या आई वडिलांना देखील पकडेल. फोन ठेवता ठेवता देखील पी. एस. आय. हसत होता. त्यांचा मित्र हसत होता.
या धावपळीत रात्रीचे बारा वाजले होते. गर्दी अजूनही संपलेली नव्हती…. अर्थात कमी जरूर झाली होती. सतीश कुमार रिक्षा करून आपल्या कार पर्यंत जाऊ इच्छित होते. त्या मुलीने त्यांना चकमा दिला होता. ती आता सापडणार नव्हती. तेवढ्यात मागून त्यांचा कोट कुणीतरी खेचला. त्यांना झटका बसला.
“अरे साब… मी तुम्हाला कधीची शोधतेय…’ ती मुलगी समोर उभी होती. त्यांचा चेहरा ताणाला गेला. त्यांनी कदाचित तिच्या गालावर आपली पाच बोटे उमटवलीच असती, पण तेव्हड्यात त्या मुलीने दहा दहाच्या काही नोटा त्यांच्या पुढे धरल्या. विचित्र स्थिती होती, जणु एखादा नाटकातला प्रसंग.
“मी तुम्हाला किती शोधले साहेब… तुम्ही गाडी पुढे का नेली? मी सुट्टे आणण्यासाठी आई कडे गेले. तेवढ्यात तुम्ही गाडी पुढे पळवलीत. तिच्या स्वरात तक्रारीचा भाव आहे. “मी सिग्नलच्या पुढे देखील तुम्हाला पहायला आले.”
सतीश कुमार तिच्याकडे आश्चर्याने पहात आहेत. इतक्या रात्री देखील तू झेंडे विकते आहेस? ” “होना साहेब… आज नाही विकले तर नंतर कोण घेणार? कोण खरेदी करेल तुम्हीच सांगा. सण संपला की मालाची बरबादी. ती एखाद्या तत्ववेत्याप्रमाणे बोलत होती. “मी तुम्हाला काळ्या कोटावरून ओळखले.
तिकडून पळत पळत आले..”ती मुलगी त्यांच्या हातात दहाच्या पाच नोटा सोपवत होती. त्या क्षणी त्यांच्या मनांत काय विचार आला कुणास ठाऊक… “हे पैसे ठेव तू… नाही… हे ठेवून घे..” त्यांच्या मनांवर कशाचे गारुड पडले कोण जाणे.
“नाही साहेब…!” त्या क्षणी मुलीच्या डोळ्यात बेफिकिरी दिसली आणि संकोच देखील. त्याची त्यांनी बिलकुल अपेक्षा केलेली नव्हती.
“तुझे नाव काय? ” त्यांनी चकित होऊन विचारले.
मुलीने सांगितले की, तिचे नाव लक्ष्मी आहे. तिने ‘साहेब हे कशासाठी विचारता आहात?” असेही विचारले.
“अच्छा… दोन झेंडे अजून दे आणि हे पन्नास रुपये ठेवून घे. आता तर ठीक आहे ना?” त्यांचा भाव होता की, मी काही तुझ्यावर खैरात करीत नाहीये. आता तर खरेदी करतो आहे… झेंड्यांची किंमत देतो आहे….
मुलगी ताडकन म्हणाली, “साहेब यात स्टीकर नाहीये. खराब आहेत. ते कुठेही लावता येणार नाहीत. तुमच्या कामाचे नाहीत..” मुलगी दु:खी होती. खरेदी करणारा आहे पण विकू शकत नाही.
सतीश कुमार संकोचले. त्यांना कंपनीचे डिफेक्टिव्ह लॅपटॉप आठवले. संजोत मेहता यांचा चेहरा नजरेसमोर आला. त्या हसत होत्या.
“तर मग… हे पन्नास रुपये तुझी बक्षिसी… तू खरे बोललीस म्हणून… तर हे पन्नास रुपये माझ्याकडून बक्षीस…”
मुलीचे चमकदार डोळे आनंदाने लकाकले. यावेळी तिने ते पन्नास रुपये मुठीमध्ये घट्ट पकडले. ती मुलगी हसू लागली.
सतीश कुमार रिक्षा पकडून आपल्या कारपाशी आले. रात्र झाली होती. त्यांनी संजोत मेहता यांना फोन लावला. ते कारमध्ये बसूनच त्यांच्याशी बोलू लागले. “मॅडम.. हे बघा आमच्याकडून एक चूक झाली आहे. मला आत्ता समजले. मी अजून घरी पोहोचलो नाहीये. डिनर देखील केलेले नाही. तुमच्या लक्षात येतय ना मी काय म्हणतोय ते? … आज संध्याकाळी आम्ही जे तुम्हाला तीस लॅपटॉप दिले ते चुकून… काही डिफेक्टिव्ह पीस तुमच्याकडे आले आहेत… ते तुम्ही ओपन करू नका. तसेच राहू द्या… उघडू नका. आम्ही सकाळीच फ्रेश स्टॉक तुमच्याकडे पाठवून देऊ. तुमच्या कार्यक्रमापूर्वी. तुमचा कार्यक्रम ही आमची जबाबदारी आहे…’ ”
संजोत मेहता हसत होत्या. “भल्या माणसा इतक्या रात्री का त्रास करून घेताय? हे तुम्ही सकाळी देखील सांगू शकला असतात. मध्यरात्रीपर्यंत काम करायची सवय आहे तुम्हाला. वाह भाई..! स्वत: न खाता पिता काम करीत रहाणार… आणि दुसऱ्यांना देखील सुखाने झोपू देणार नाही. ” सतीश कुमार यांना माहिती आहे की, संजोत मेहता यांच्या गालावर आत्ताही खाळ्या पडल्या असतील.
“वा रे जमाना…” सतीश कुमार नाराज झाले. जो भेटेल तो हसतो आहे…
त्यांना खूप भूक लागली होती. त्यांनी कार स्टार्ट केली. कुणी कुणाला धडा शिकवला तेच त्यांना समजले नाही.
–डॉ. राजेंद्र श्रीवास्तव
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या स्वप्नांचे गणित ह्या पुस्तकामधून लेखक डॉ. राजेंद्र श्रीवास्तव ह्यांनी लिहिलेली ही कथा)
khup khup sundar. ayachit 9403030939