सर्वात सुखी कोण? ही गोष्ट थोडक्यात अशी आहे.’ एक कावळा रानावनात स्वतंत्र व स्वच्छंद जीवन जगत असतो. स्वतःला तो फार सुदैवी व सुखी मानत होता. एकदा त्याला पाण्यात पोहणारे बदक दिसले. त्याचा शुभ्र रंग पाहून स्वतःच्या काळेपणाचे त्याला दुःख वाटले.
तो बदकाकडे गेला आणि त्याच्या रंगाचे कौतुक करू लागला. बदक म्हणाले की त्याच्यापेक्षा पोपट अधिक सुखी आहे कारण त्याच्याकडे हिरवा व लाल असे दोन रंग आहेत. आता कावळ्याला वाटले की पोपटाला भेटायला हवे.मग तो पोपटाकडे गेला. पण पोपट म्हणाला की त्याच्याकडे तर दोनच रंग आहेत. मोराकडे जास्त रंग आहेत. सर्वात सुंदर,नशीबवान आणि त्यामुळे सुखी असा पक्षी म्हणजे मोर आहे.मग कावळा मोराच्या शोधात निघाला. मोर त्याला सापडला एका पक्षी संग्रहालयात. मोराचा तो डौलदार पिसारा व ते चमकदार रंग पाहून कावळ्याला स्वतःबद्दल फार कमीपणा वाटला.
तो जास्तच दुःखी झाला. मोराच्या सुंदर रुपाची स्तुती करु लागला. पण मोराने त्याचा भ्रमनिरास केला. तो म्हणाला की त्याच्या सुंदर रुपामुळेच तो पिंजऱ्यात कैदी आहे. तो एकाकी आहे. सर्व जातीचे पक्षी त्या संग्रहालयात आहेत. फक्त कावळा मात्र नाही. त्यामुळे खरं तर स्वतंत्र जीवन जगू शकणारा कावळाच सर्वात नशीबवान आणि म्हणून सुखी आहे.मोराचे बोलणे ऐकून त्या कावळ्याचा सुखी कोण हा शोध तिथेच संपला व समाधानाने तो रानात परत गेला.’
ती झाली कावळ्याची गोष्ट, माणसाचं काय? माणूस असा कोणाच्या सांगण्यावरून सहजासहजी स्वतःला सुखी थोडेच मानतो? स्वतःकडे काय आहे यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे जे माझ्याकडे नाही याकडे त्याचे जास्त लक्ष असते.
कावळ्याच्या या रूपक कथेचे संस्कारमूल्य ओळखून ही गोष्ट मी एका शालेय कार्यक्रमात सांगितली. लहान, मोठे सर्वांना ती आवडली. एक संस्कारगर्भ अनुभव मी इतरांना दिला याचे समाधान मला वाटले. ती गोष्ट माझ्या मनात घर करून बसली. काही दिवसांनी एका अनाथालयात कार्यक्रमासाठी जाणे झाले. तेथील मुलांसाठी काही देणगी व उपयुक्त साधने देण्याचा तो कार्यक्रम होता. इयत्ता चौथी ते दहावी या वर्गातील ती सर्व मुले अतिशय आनंदाने शिस्तीत बसली होती. त्यांच्यासाठी तो विशेष प्रसंग होता. कार्यक्रम संपेपर्यंत रात्र झाली. मुलांकडे बघता बघता माझ्या मनात आले की जेवणाची वेळ झाली. या मुलांना भूक लागली असेल का? आजच्या कार्यक्रमासाठी ते दिवसभर खूप झटले होते. माझे मन एकदम अस्वस्थ वाटले. असे वाटले की त्यांचे रोजच जीवन किती चाकोरीबद्ध आहे.वेळेत झोपणे, उठणे, जेवणे, अभ्यास, शाळा व खेळणे. ठराविक कामे करणे व तेही सामुहिकरित्या. खरेतर ती वेळ खेळण्याची, जेवण्याची, आई किंवा आजीच्या कुशीत झोपण्याची, गोष्टीचा लाडिक हट्ट पुरवून घेण्याची. मी त्यांना एक गोष्ट सांगाणार होते. मला वाटले कावळ्याची रूपककथा त्यांना सांगायलाच हवी. कारण त्यांच्याकडे तर बऱ्याच गोष्टींचा अभाव आहे. सधन व्यक्ती,सामाजिक संस्था व संचालक मंडळी यांच्या देणग्यांवर वर त्यांचे बालजीवन आश्रित आहे. अनाथालयात ते सारे समान असले तरी शाळेतील इतर मुलांसमवेत त्यांना निश्चितच काही उणिवा जाणवत असणार. त्यांची कोवळी मने हिरमुसली होत असणार. त्यांना ही कावळ्याची गोष्ट सांगायलाच हवी. मी ती गोष्ट सुरु केली. मुले एकाग्रतेने ऐकत होती. गोष्ट शेवटच्या टप्प्यात आले तेव्हा मी त्यांना एक प्रश्न टाकला की मोर कावळ्याला काय म्हणाला असेल? काही क्षण शांततेत गेले. मग हळूहळू चार पाच हात वर झाले त्यापैकी एकाने सांगितले की मोर म्हणाला असेल की मी सर्वात सुखी नाही कारण मी पिंजऱ्यात राहतो. प्रश्नाचे अचूक उत्तर ऐकून मी चकित झाले. त्याला शाबासकी दिली. गोष्ट संपली. परिस्थितीचा स्वीकार करावा, आपल्याला जे मिळाले नाही त्याचा सतत विचार करू नये व इतरांशी स्वतःची तुलना करून दुःखी होऊ नये इत्यादी तात्पर्य सांगितले. मुलांना गोष्ट खूप आवडली.परंतु त्यापूर्वी शाळेत गोष्ट सांगितल्यावर मला जे समाधान वाटले होते ते मात्र यावेळी वाटले नाही.
काहीतरी रुखरुख लागली. त्या मुलाने बरोबर उत्तर कसे दिले याचा मी विचार करू लागले. तो पण त्या मनस्थितीतून गेला असेल का? निश्चितच गेला असेल.कावळ्याप्रमाणे त्यालाही अनेक बदके, पोपट, मोर भेटत असतील. तो स्वतःची तुलना त्यांच्याशी करत असेल, तेव्हा त्याला दुःख होतच असणार. कसे सावरुन घेत असतील तो व त्याच्या सारखे इतर स्वतःला? माझे बोलणे हे भरल्यापोटीचे तत्वज्ञान होते.
पोरवयातच ही मुले खूप काही पचवत असणार. अनाथालयातील त्या मुलांच्या तरी सुदैवाने चांगली माणसे व संस्था लाभली, तरी पण असे कैक आहेत.
आपल्या घरातल्या लहान मुलांचे आपण किती लाड करतो. त्यांच्या सर्व गरजा, हट्ट पुरवतो. मायेने जवळ घेतो, प्रेमाचा वर्षाव करतो त्यांच्यावर. त्या अनाथ मुलांचे काय? त्यांच्या शारीरिक व भौतिक गरजा भागवल्या जात असल्या तरी प्रेम व सुरक्षा या मानसिक गरजांचे काय? आई, बाबा, भाऊ, बहीण, आजी, आजोबा या भावनिक विश्व समृद्ध करणाऱ्या नात्यांच्या गरजांचे काय? ही नाती जेवढी समृद्ध तेवढे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध . या नात्यांच्या अभावाचा एवढा मोठा खड्डा कसा भरून काढणार ही मुले? अशा मुलांसाठी आपण काही करू शकतो का? ही मुले भावनिकरीत्या कोरडी व्हायला नकोत. रक्ताची नसली तरी त्यापेक्षा अधिक सकस असणारी मानलेली नाती जोडायला आपण यांना शिकवायला हवे. या नात्यांमुळे ज्या गोष्टी मिळतात त्या पैशाने कुठेच विकत घेता येत नाहीत. ज्यांच्याकडे विकत घेता येणाऱ्या गोष्टींपेक्षा अशा गोष्टी जास्त असतात ते निश्चितच अधिक श्रीमंत असतात. अशी श्रीमंती तर आपण या मुलांना वाटू शकतो. मदत केवळ आर्थिकच नसते ना! आपले प्रेमळ शब्द, आश्वासन व पाठीवरुन हात फिरवत दिलेला धीर त्यांना खूप काही देईल. आपण या गोष्टी कितीही दिल्या तरी आपल्याकडे शिल्लकच राहतील. तेव्हा एवढे तर आपण नक्कीच करू शकतो. काळाच्या विस्तीर्ण पटावर हा संकल्प आपण लिहायचा का?
आराधना कुलकर्णी
Leave a Reply