राज कपूरच्या “हिना” मध्ये छान ओळी होत्या- “मैं देर करता नहीं, देर हो जाती हैं !” त्याच धर्तीवर आजच्या पोस्टचे शीर्षक !
खूप वर्षांपूर्वी मित्राच्या घराच्या वास्तुशांतीसाठी नाशिकला गेलो होतो. त्याचे श्वशुर तिथे भेटले. निवांत गच्चीवर गप्पा मारत आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला. बोलता-बोलता एकदम ते म्हणाले- “जयंताच्या लग्नाच्या नंतर तू एक सुंदर पत्र आम्हांला लिहिले होते. आम्ही अजूनही जपून ठेवलंय.” असेल बोवा ! माझी ट्यूब काही पेटली नाही. असं काही पत्र लिहिल्याचे अजूनही स्मरत नाहीए, पण ते म्हणाले म्हणजे असेल.
खूप वर्षांनी जळगांवला मामांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या मालकीणबाई माझ्या पत्नीसमोर माझी तारीफ(?) करताना बोलून गेल्या- ” अगं हा लहानपणी फार दंगेखोर, बंड(खान्देशी भाषेतला हा सर्रास शब्द) होता, बरं का? एकदा खेळताना असा बॉल मारला होता की आमच्या घरातील बल्बच फुटला होता. ”
मी ब्लँक ! असे काही विध्वंसक कृत्य आपल्या हातून घडले असेल याची सुतराम आठवण माझ्या मेंदूत उमटत नव्हती. पण (बहुधा) नुकसान झाल्यामुळे त्या काकूंनी मात्र हा प्रसंग मनात जपून ठेवला होता आणि तो योग्य वेळी (विवाहानंतर प्रथमच पत्नीला जळगांवला मामांकडे नेले असता) अलगद तिला विशद केला.
तिचे काय मत झाले असेल कल्पना नाही, तिला माझा स्वभाव उशीरा कळाला —-पण तोपर्यंत आमचे लग्न होऊन गेले होते.
मागील महिन्यात वयस्कर काकांच्या भेटीला वाकड ला गेलो होतो.आपल्या मुलीशी बोलताना ते म्हणाले- “अगं लहानपणी याला PMG (पोस्ट मास्टर जनरल ) व्हायचे होते.”
माझे वडील RMS (रेल्वे मेल सर्व्हीस ) मध्ये असल्याने घरी त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांचा राबता असायचा.तेथे पोस्टातील सर्वोच्च पदाबद्दल त्यांचे काही बोलणे होत असेल आणि लहानपणी कोणीतरी व्हायचे वेड प्रत्येकाला असते, या न्यायानुसार मी कदाचित PMG हे पद स्वतःसाठी निवडले असावे. मला काही आठवत नाही, पण त्यांची स्मृती मात्र इतक्या वर्षांनीही लख्ख होती.
रविवारी माझ्या घरी आमच्या हरीभाईच्या वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा झाला. रग्गड वीसेक जण जमले होते. २००५ साली आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचाही मी संयोजक होतो. पटकन एक मैत्रीण म्हणाली – “अरे,त्या भेटीनंतर तू आम्हां सगळ्यांना किती छान पत्र लिहिलं होतं.” पुन्हा मी ब्लँक!
यह मेरेही साथ क्यूं होता हैं?
“तुम मुझे भूलते नहीं , लेकीन मैंही भूल जाता हूँ ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply