नाना झिपऱ्याने आपला हेकटपणा सोडलानाही . झाडावर लटकणारे प्रेत खांद्यावर टाकून त्याने स्मशानाचा रस्ता धरला .
“झिपऱ्या तू ना त्या शांताबाई सारखा आहेस . उद्देश चांगला असलातरी मार्ग चुकीचा निवडतोस असे मला वाटते . आता तू शांताबाई कोण ? असे विचारशील . पण तू अजिबात तोंड उघडू नकोस , कारण तुझे मौन मोडले तर मी निघून जाईल ! आणि तुझी मेहनत वाया जाईल . ” नेहमी प्रमाणे प्रेतात वेताळाने प्रवेश केला होता .
” तर आटपाट नगर होते . येउ दे. त्यापेक्षा मी तुला शांताबाई आणि तिचा नवरा माधवराव यांचा सध्या चालू असलेला संवादच एकवतोना . लक्ष पूर्वक ऐक ? कारण माझ्या शंका मी नन्तर तुला विचारीन . तुला ठाऊक असून हि तू त्या शंकांचे निरसन केले नाहीस तर ,तुझ्या डोक्याची शंभर छकलें होऊन तुझ्याच पायाशी पडतील ! ok . तर मग ऐक . ” असे म्हणत वेताळाने आपले थंडगार हात झिपऱ्याचा दोन्ही कानावर हेड फोन सारखे ठेवले .
झिपऱ्या लक्ष देवून एकू लागला .
‘ आज काय तूप कढवलंस काय ? खमंग वास येतोय . असेल तर वाढ थेंबभर भाकरीवर . तेवढेच दोन घास ज्यास्त जातील . ‘
‘तूप ? कसलं तूप ? बायपास झालियय . डॉक्टर काय म्हणाले विसरलात काय ? कोलेस्ट्रॉल वाढत तुपाने !तूप -बीप काही नाही .!’
‘आग ,बायपासला दहा वर्ष होऊन गेली . परवाच्या रिपोर्ट मध्ये कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे . आता थोडं तूप खाल्लं तर हरकत नाही .’
‘ तुम्हाला तुमच्या तब्बेतीची काळजी नाही , मलाच ती करावी लागते . तेव्हा ‘नो ‘ तूप .! ‘
‘बर , तुपाचं राहूदे , किमान वाटीभर ताक तर दे . कोरडी भाकरी गिळत नाही , भिजून खाईन . ‘
‘ सदा खोकता , ताक काय खाताय ? डॉक्टर आंबट खाऊ नका म्हणालेत ना ?आणि तस हि ताक नाहियय! ‘
‘का ,काय झालं ?’
‘काय झालं काय ? तुम्हाला ठाऊकच आहे मी ताक नेहमी कडी पत्त्याच्या झाडाला टाकते ! अन काय हो कशाला दूध ,तूप ,ताक खाता ? तुम्हाला काही झालेतर कोण करणार आहे तुमचं ? पोर लांब आहेत , आता मलाही होत नाही. ‘
000
तर पाहिलंत ना असे आहेत आमचे ‘हे ‘. तुम्हाला म्हणून सांगते महागाई कोण वाढलीय बाई ?, हद्द झाली ! अन ‘यांना ‘ दूध -तूप पाहिजे ! तरी बर मी काटकसरीने संसार करणारी बाई आहे . बाकी बायकांसारखी उधळ मधाळ करत नाही ! आता दूधाचंच बघाना ? चाळीस रुपय लिटर ! महिना बाराशे ! पण कमीत कमी लिटरभर तर लागतच हो ! तसे ‘हे ‘ दूध-दही खात माहित , म्हणजे मीच देत देत नाही , कफ होतो ना ! अन मला ना मेलीला , का कोण जाणे लहानपणा पासूनच दूध आवडत नाही ! पण ना एक लिटर पेक्ष्या कमी दुधाच्या विरजणावर लोणी पडत नाही बघा . म्हणून एक लिटरचा वरवा चालूच ठेवलाय . चार सहा दिवसांनी गळवट गंज भर लोण्याचा गोळा निघतो . तरी मेला दूधवाला दूध म्हणून -काळपाणी -घालतो . पैसा मात्र खरा करतो ! तर काय सांगत होते – लोणी – छान पैकी नागवेलीच् पान टाकून कढवायला ठेवलंकी कॉलनी भर वास सुटतो हो ! ‘ काय काकू आज पुन्हा तूप कढवताय काय ? मस्त वास दरवळतोय ! ‘ मेले आमच्या कॉलोनीतले , वासवरच असतात ! सदा दुसऱ्याचाच घरावर यांचं लक्ष्य ! काम ना धंदा हरी गोविंदा ! ते जाऊ देत , तर काय सांगत होते – तूप – असं कढवलेलं साजूक तूप ,कडकड उन्हात कोरड केलेल्या डब्यात भरून ठेवते . कशाला काय ? मला रोज लागत ना ! देवा ,पुढे निरंजन लावायला !
देवा पुढे निरंजन लावून ,दोन्ही हात जोडून ,मी देवाला रोज प्रार्थना करते .
‘ देवा , परमेश्वरा , आम्ही दोघे एकटेच या गावात रहातोय !कृपा असू दे रे बाबा ! , लेकरं त्यांच्या संसारात रमलेत !त्यांनाही सुखी ठेव ! माझी अन यांची प्रकृती कमी ज्यास्त होते ,पण आता वय झालाय . ! तरी कृपा असुदे ! सांभाळ रे बाबा ! हीच माझी हात जोडून प्रार्थना ! असाच रोज साजूक तुपाचा दिवा तुझ्या पुढे लावीन !’
‘आता सांग झिपऱ्या , नवऱ्याला ‘उपाशी ‘ ठेवणाऱ्या शांताबाईचा , देवा पुढे ठेवण्याचा मार्ग तुला बरोबर वाटतो का ?”
“‘वेताळा ,हा काय चावट पणा आहे ? बेकूफ, तुला काय दुसरं घर नाही मिळाल ? माझ्याच घरची गोष्ट मलाच सांगतोस ! ”
” झिपऱ्या तुझं मौन भंगलंय , मी निघालो ,पुन्हा भेटूच ,Bye ! ”
— सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय .