आपलं म्हणून ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीचा अथवा गोष्टीचा मनापासून स्वीकार करतो तेव्हाच त्यांमधील आपला सहभाग वाढत जातो. तुझं-माझं करण्याच्या विचारांमुळे असणारा सहभाग केवळ माझ्या स्वत:शी संबंधित गोष्टींशीच राहतो. आपण सहजीवनाचा एकदा स्वीकार केला तरीही, का बरं करतो असं? दोन किंवा त्यांपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये मतभिन्नता असणं स्वाभाविक आणि नैर्सार्गिक असतं. पण मतभेद होत राहणं हे सकारात्मक सहजीवनास बाधक आणि घातक ठरू शकतात, ह्याचं भान राहणं आवश्यक असतं. अनेकदा घडणाऱ्या काही घटना, घडामोडी ह्या निसर्गनियमांमुळे सुरु असल्यासारखं वाटतं.
कदाचित सहभागाचा अभाव असल्याचं ते महत्वाचं कारण असावं. सहभागाचा आनंद हा केवळ त्याची प्रचीती आल्याशिवाय मिळत असतो. आपल्या भागाचं, वाट्याचं, नावचं, कर्तव्याचं भान ठेवून सहजीवनात सहभागी होणं महत्वाचं असतं. आनंदप्राप्तीसाठी सकारात्मक वातारणाची निर्मिती करत राहणं गरजेचं असतं.
सहजीवानांत सहकाराच्या, सहकाऱ्याच्या आणि सहकार्याच्या भावनाप्रधान विचारानं, मदतीनं सकारात्मक वातावरणाची निर्मिती होत असते. एकमेकांच्या जीवनांत अनावधानानं निर्माण झालेल्या असहकाराच्या विचार, वर्तन आणि व्यवहारानं निर्माण होणारी नकारात्मकता अनेकदा नैराश्यास कारणीभूत ठरत असते.
“मी आणि माझं” ह्या भावविश्वात अडकलेल्या व्यक्ती सहजीवानांत सकारात्मकता आणू शकतातच असं नाही. केवळ स्वतःपेक्षा दुसऱ्याचा, इतरांचा विचार करणारी व्यक्ती नकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरत नाही. “अनेकदा मला खूप काही करायचं असतं, पण सहकार्यच मिळत नाही”, असे सूर अनेकांच्या तोंडून निघत असतात.
सहजीवानांत समजून सांगण्याची नाही, तर समजून घेण्याचीच गरज अधिक असते. केवळ आपल्यालाच सगळं कळतं, ह्या भ्रमांत सहकाराची भूमिका कधीच बजावली जात नसते. जाणूनबुजून काहीही जाणून घ्यायचं नाही अशा मानसिकतेत सहकाऱ्याची बाजू त्याची कुवत असून देखील कमकुवत होत राहते.
– विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल: vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply