बॉलीवूड अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्विंकल खन्नाचा जन्म २९ डिसेंबर १९७४ रोजी पुणे येथे झाला. राजेश खन्ना आणि त्यांची मुलगी ट्विंकल खन्नाची जन्मतारीख एकच २९ डिसेंबर.
प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना व डिंपल कापडिया ह्यांची थोरली मुलगी असलेल्या ट्विंकलने १९९५ साली प्रदर्शित झालेल्या बरसात ह्या चित्रपटामध्ये बॉबी देओलच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जब प्यार किसी से होता है, बादशाह, मेला इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. ट्विंकलने २००१ साली अक्षय कुमार सोबत लग्न केले. काही निवडक चित्रपट केल्यानंतर ट्विंकलने २००१ मध्ये फिल्मी दुनियेला रामराम ठोकला आणि इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तसेच लेखीका म्हणून नाव कमवले. ट्विंकल खन्नाय यांनी लिहिलेल्या मिसेस फनीबोन्स या पहिल्याच पुस्तकाच्या एक लाखाहून अधिक प्रती खपल्यामुळे ती २०१५ सालच्या सर्वाधिक लोकप्रिय लेखिका ठरली. मिसेस फनीबोन्स या तिच्या पुस्तक प्रकाशनानंतर तिने आता गृहसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा संग्रह बाजारात आणलेला आहे. तो ‘द व्हाईट विन्डो’ या ब्रॅँन्डने प्रसिद्ध आहे.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अक्षय कुमार व ट्विंकलची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. असे म्हटले जाते, की ट्विंकलचा मेला हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे मेला हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. जर मेला हा चित्रपट त्यावर्षी हिट ठरला असता, तर आज अक्षय-ट्विंकल पती पत्नी नसते. जानेवारी २००१ मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट