२०२० च्या मार्च महिन्याच्या २४ तारखेला रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच मध्यरात्रीपासून २१ दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात खळबळ माजली होती.
देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतरच्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखावर गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात यश मिळाले होते.
लॉकडाऊन करण्याची तीन प्रमुख कारणे होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
पहिला लॉकडाऊन जाहीर झाला, तेव्हा म्हणजे २३ मार्च रोजी भारतात ‘कोव्हिड-१९’चे ४१५ रुग्ण आणि दहा मृत्यू नोंदविण्यात आले होते. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या १२५१ वर पोहोचली आणि ३२ मृत्यूंची नोंद झाली होती. एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्या ३३,०६२ वर आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १०७९वर गेला. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यास केवळ काही दिवस उऱले असताना म्हणजे १२ मे पर्यंत देशात ७४,०७९ रुग्ण आणि २,४१० मृत्यू नोंदविण्यात आले. याचा अर्थ मार्चच्या अखेरीपर्यंत केवळ सात दिवसांत रुग्णसंख्या आणि मृत्यू तिपटीने वाढले. एप्रिल अखेरीपर्यंत म्हणजे ३० दिवसांत रुग्णांच्या संख्येत ८० पटीने आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १०८ पटीने वाढ झाली. याचप्रमाणे १२ मे पर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत १७८ पटीने आणि मृत्यूंच्या संख्येत २४१ पटीने वाढ झाली होती.
अजून ही करोना गेलेला नाही. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे तरीपण आपण आजही हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळणे या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.
Leave a Reply