ज्या माणसाला कावीळ झाली असेल त्याला सारं जग पिवळं दिसतं. एखादी गंभीर घटना घडुन गेली की ती घटना लवकर विसरली जात नाही. अशी घटना माणसांच्या मनावर खोलवर रूजली जाते. कधी कधी अशी घटना अनुभवली असेल किंवा कोणाकडुन ऐकली असेल किंवा वर्तमान पत्रातुन वाचली असेल, अशा वेळी माणसाचं मन अधिकच व्याकुळ होतं आणि त्या घटनेबद्दल तो अधिकच जागरूक राहतो.
माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते.
आपणाला ज्या गोष्टीबद्दल मनांत एक अनामिक भीती निर्माण होते. अशी ही अनामिक भीती माणसाच्या मनांत एकवेळ बसली कि, मनुष्य त्या गोष्टीचा सतत ध्यास घेऊन बसतो. मग त्याच्या ध्यानी, मनी व स्वप्नी ती अनामिक भीती घर करून राहते. ही अनामिक भीती कशी असते त्या बद्दल एक मजेशीर अनुभव सांगणार आहे. खरं तर मजेशीर अनुभव म्हणता येणार नाही, तो आहे अगदी गंभीर स्वरूपाचा अशा अनेक घटना समाजात घडत असतात त्यातुन आपण, समाजातील लोकांनी कांहीतरी शिकावं हीच माफक अपेक्षा आहे.
साधारण वीस वर्षापूर्वीची म्हणजे १९९३ सालातली घटना आहे. मी नौपाडा पोलीस ठाणे येथे पो.उप निरीक्षक म्हणून कार्यरत होतो. अशाच एका रात्री पूर्ण रात्रभर नाईट राऊंड करून पहाटे पाच-साडेपाच वाजता पोलीस ठाण्यात परत येवून बसलो होतो. खुर्चीवर बसल्या बसल्या डोळा कधी लागला हे कळलंच नाही. तेवढयात फोनच्या घंटीमुळे झोपेची तंद्री उडाली.
समोर बसलेल्या हवालदाराने फोन माझ्या हातात देत हॉस्पीटल मधुन फोन असल्याचे सांगितले.
मी हवालदाराच्या हातातुन फोन घेतला, फोनवर पलीकडुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपण डॉक्टर बोलत असल्याचे सांगुन एका वयस्कर बाईला जखमी अवस्थेत दाखल केले असुन त्या बेशुध्द अवस्थेत असल्याचे सांगितले.
फोनवर माझे बोलणे संपल्यानंतर हवालदाराने माझ्या चेहऱ्याकडे पाहुनच कांहीतरी गंभीर घटना झाली असावी असा अंदाज करून मला विचारले, “साहेब काय झाले? ” मी त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कागद व फाईल घेऊन माझे बरोबर चल असे सांगताच तो माझे मागे बुलेटवर ( मोटार सायकल) बसला.
मी बुलेट चालू करून हॉस्पिटल मध्ये पोहोचेपर्यंत १० मिनिटात, रात्रभर नाईट राऊंड करून सुध्दा गंभीर घटना घडलीच कशी? हा विचार करत होतो.
हॉस्पीटल समोर गाडी थांबवुन मी व हवालदार पळतच पहिल्या माळयावर गेलो. समोर एक डॉक्टर उभे होते. त्यांना मी नमस्कार करून कोण बाई आहेत व काय प्रकार आहे याबाबत त्यांचेकडे विचारणा केली.
डॉक्टर मला अतिदक्षता विभागात घेउन गेले. अतिदक्षता विभागात बेडवर एक साधारण ६० वर्षे वयाची महिला बेशुध्द अवस्थेत निपचित पडलेली होती. डॉक्टरांनी, तिचे हाताला चाकुच्या जखमा झाल्याचे सांगुन तिला मानसिक धक्का बसला असल्याचे सांगितले. जखमी वृध्द महिलेला हॉस्पिटलमध्ये कोणी दाखल केले या संदर्भात मी डॉक्टरांना विचारणा केली.
अतिदक्षता विभागाचे बाहेर एक २२ ते २३ वर्षाचा तरूण उभा होता. तो अतिशय घाबरल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. त्यानेच त्या वृध्देला हॉस्पीटलमध्ये आणल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉक्टरांनी मला त्यांच्या केबीनमध्ये चलण्यास सांगुन त्या तरूणास केबीनमध्ये येण्याचा इशारा केला.
मी, डॉक्टर व तो तरूण व माझे बरोबरचे हवालदार असे आम्ही डॉक्टरांच्या केबीनमध्ये बसलो. डॉक्टरांनी चहा मागवला होता, चहा समोर होता, चहा पिण्याची खूप इच्छा झाली होती परंतु माझ्यातील पोलिसाला मात्र घटनेबद्दल जाणुन घ्यायची घाई झाली होती. मी डॉक्टरांकडे पाहुन त्या तरूणाच्या खांद्यावर हात ठेवला व काय घटना घडली याबाबत विचारणा केली.
त्या तरूणाने त्या घटनेची माहिती द्यायला सुरूवात केली.
त्याचे नांव बाबू (नांव बदललेले) असल्याचे सांगुन जखमी आजीबाई हया त्या तरूणाच्या नात्याने आत्या (वडिलांची बहिण) आहे. त्या विधवा असुन त्यांना एकच मुलगा आहे व तोही परदेशात नोकरी करत असल्याचे सांगितले.
आत्याबाई ठाणे नौपाडा भागात रहातात. त्यांच्या बरोबर एक घरकाम करणारी १५/१६ वर्षाची एक मुलगी रहाते. तो तरूण मुंबईत नोकरी करतो. सोमवार ते शुक्रवार डयुटी करून शनिवारी, रविवार आपले गांवी औरंगाबाद येथे जातो. दोन दिवस औरंगाबाद येथे राहुन सोमवारी पहाटे ठाणे येथे सकाळी सहा वाजता आत्याच्या घरी येतो, असा त्याने दिनक्रम सांगितला.
तो गांवी गेल्यानंतर घरी आत्या व एक आशा नांवाची कामवाली मुलगी अशा दोघीच रहातात. (आशा बदललेलं नांव) तो तरूण पुढे बोलू लागला.
तो शुक्रवारी रात्री ठाणे येथून औरंगाबाद येथे गेला व आज सकाळी तो औरंगाबाद येथुन नेहमी प्रमाणे सकाळी सहा वाजता पहाटे आत्याचे घरी आला. दरवाजावरची बेल वाजवली, एक-दोन मिनिटांत कामवाल्या मुलीनं दरवाजा उघडला.
त्या तरूणाला पहाताच तिने ‘दादा तुम्ही आलात काय? असे विचारुन त्याचे हातातील बॅग घेवून बाजुला ठेवली. त्या तरूणाने नेहमीप्रमाणे त्या मुलीला आत्या अजुन उठली नाही का? असे विचारले. आत्या त्यांच्या बेडरूम मध्ये असल्याचे तिने सांगितले. तो आत्याच्या बेडरूमचा दरवाजा उघडुन आत गेला. आतील दृष्य पाहुन त्याला धक्काच बसला.
बेडरूमधील लाईट चालू होती. गोदरेजच्या कपाटाचे दरवाजे उघडे होते, कपाटातील सामान जमिनीवर, बेडवर अस्ताव्यस्त पडलेले होते. परंतु आत्याबाई मात्र बेडरूममध्ये नव्हत्या. म्हणुन त्या तरुणाने काम करणाऱ्या मुलीला आवाज दिला, तशी ती मुलगी धावत बेडरूममध्ये आली व ते दृष्य पहाताच ती मटकन खालीच बसली.
ती खाली बसल्याबरोबर तिला बेडच्या खाली आत्याबाई जखमी अवस्थेत हातात चाकू घेउन गुडघे टेकुन गुडघ्यावर बसलेल्या दिसल्या. तशी ती मोठ्याने ओरडली “दादा आत्या बघ बेडखाली आहेत”.
त्या तरूणाने खाली वाकुन पाहिले आणि तो ‘आत्या हे काय झाले? असे विचारुन त्याने आत्याच्या हातातील चाकू काढुन बाजुला ठेवला व तिला बाहेर काढून काय झाले? असे विचारलं.
“बाबू आपल्या घरात चोरी झाली !” असे म्हणुन आत्या बेशुध्द झाली. तो लगेच रिक्षा करून तिला दवाखान्यात घेउन आला.
त्या तरूणाची हकीकत ऐकुण एवढया सकाळी सकाळी मला घाम फुटला. प्रश्न असा होता की, आत्याबाई बरोबर काम करणारी मुलगी घरात होती, तर मग हा प्रकार घडलाच कसा?
मी वरील घटना हॉस्पिटलमधुन फोन करून वरिष्ठांना कळविली व पोलीस ठाण्यात फोन करून माझे इतर सहकारी अधिकाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावुन घेतले व घटनेच्या अनुषंगाने योग्य त्या सुचना देऊन त्यांना कामाला लावले.
हॉस्पिटलमध्ये एक हवालदार थांबवुन मी त्या तरूणाची रितसर तक्रार नोंदवुन घेतली. पण एक गोष्ट मनाला खटकत होती, ती म्हणजे घरी काम करणारी मुलगी आशा हिचे म्हणण्यानुसार, रविवारी रात्री (काल रात्री) अकरा वाजताचे सुमारास आत्याबाई त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या आणि ती स्वतः हॉलमध्ये झोपली होती.
रात्रभर आतमध्ये कोणीही आले नसल्याचे मुलगी सांगत होती. परंतु त्यावर माझाच काय इतर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळास व हॉस्पिटलमध्ये भेट देउन घरात प्रत्यक्ष हजर असलेल्या मुलीकडे विचारपूस करत होते.
ती मुलगी कोणीही घरी आले नसल्याचे सांगत होती. तिच्या सांगण्यावर कोणी विश्वास ठेवण्यास तयार नव्हते.
घरातील दागदागिने, रोख रक्कम चोरीला गेल्याचे परिस्थितीवरून दिसत होते. आम्ही सर्व अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळाचे आजुबाजुस चौकशी करीत होतो. पण हाती कांहीही लागत नव्हते. कामवाल्या मुलीकडे तर प्रत्येकजण संशयाने पहात होता.
सिनिअर सिटीझनवर हल्ला करून दरोडा टाकल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. आम्ही आरोपींना अटक करणेसाठी शर्थीचे प्रयत्न करीत होतो. जखमी आत्याबाईकडुन खरी हकीकत समजुन घेण्यासाठी त्या शुध्दीवर येण्याची आम्ही वाट पहात होतो.
प्रत्येक दहा मिनीटांनी मी डॉक्टरांना भेटुन पेशंट शुध्दीवर आला की नाही याबाबत विचारणा करीत होतो. पण डॉक्टर तरी काय करणार? डॉक्टर अतिदक्षता विभागात हजर राहुन वरचेवर तपासणी करीत होते. पण जखमी आत्याबाई कांही प्रतिसाद देत नव्हत्या ज्या घरात घटना घडलेली होती तेथील परिस्थिती व जखमी वयस्कर बाईवर झालेल्या हल्ल्यामुळे वरिष्ठांचा दबाव वाढत होता.
पत्रकार मिनीटा-मिनीटाला माहिती घेत होते. जनता तर पोलिसांकडे त्यांनीच गुन्हा केला आहे अशा अविर्भावात बघत होती. आम्हाला हया गोष्टीची सवय झाली होती. नाहीतरी पोलिसांना चांगले म्हणणारे, त्यांची बाजू ऐकुन घेणारे कोणीच नव्हते व आजही नाहीत.
मी मात्र हॉस्पीटल मधून घटनास्थळावर व पुन्हा हॉस्पीटलमध्ये अशा फेऱ्या मारत होतो. आत्याबाई शुध्दीवर येण्याची वाट पाहात होतो. मधूनच आत्याबाईच्या घरात रहात असलेल्या कामवालीकडे विचारपूस करत होतो.
स्टाफमधील काही अंमलदारांनी कामवाली मुलीचे घरी जाऊन तिचे आई-वडील व भाऊ यांचेकडे चौकशी केली.
मुलीबद्दल संशय बळावत होता, परंतु तसा कोणताही पुरावा मिळत नव्हता आणि पुरावा मिळाल्याशिवाय पोलिसांना पुढे तपास करता येत नाही.
त्यातच काम करणारी मुलगी अल्पवयीन होती. तिच्याकडे विचारपूस करतांना अनेक कायदेशीर अडचणी येत होत्या. या सर्व घटनेत मात्र पोलिसांची तारेवरची कसरत चालू होती.
बघता बघता दुपार झाली, दोन वाजले. मी व माझे बरोबरचे रात्रपाळीचे अधिकारी, कर्मचारी असे आम्ही सर्वजण आरोपी कोण असेल?
त्याने गुन्हा कसा केला असेल? यावर तर्कांच्या आधारे तपास करीत होतो. परंतु हाती काही लागत नव्हतं. दरम्यान श्वान पथकाला पाचारण करून घटनास्थळी आणण्यात आले. परंतु श्वान घरातल्या घरात फिरून दरवाजापर्यंतच येत होता.
आमच्या पुढे एक मोठा पेच निर्माण झाला होता. जखमी आजी काही शुध्दीवर येत नव्हत्या. कामवाल्या मुलीकडूनही काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती. कशाचाच मेळ लागत नव्हता. त्यातच पोलीस आयुक्त मधूनच पोलीस ठाण्यात फोन करून गुन्हयाच्या तपासातील प्रगतीबाबत विचारणा करीत होते.
प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तरे देऊन देऊन मीही थकलो होतो. रात्रभर झोप नव्हती, सकाळी एक कप चहा घेतला होता. तहान-भूक कशाचंच भान राहिलं नव्हतं. एकच प्रश्न डोक्यात थैमान घालत होता, तो म्हणजे कसा घडला असेल हा गुन्हा?
त्याकाळात आता सारखे मोबाईल फोन अथवा कॉम्प्युटर नव्हते, कोणतीही संपर्काची साधने किंवा दळणवळणांची साधने नव्हती, जो काय तपास आम्ही पोलीस करीत होतो तो केवळ बातमीदार तसेच तक्रारदार यांच्या संपर्कात राहुन त्यांचेकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे.
सकाळ पासुन तर माझ्या हॉस्पीटलमध्ये दहा फेऱ्या झाल्या होत्या. जखमी बाई शुध्दीवर आल्या की त्यांच्याकडुनच गुन्हयाच्या तपासाची दिशा निश्चित होणार होती. आरोपींची थोडीजरी माहिती त्यांच्याकडून मिळाली तरी पोलिसांच्या दृष्टीने फार महत्वाचे होते. आता सुध्दा मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे केबिनमध्ये खुर्चीत बसुन विचार करत होतो. तेवढयात “साहेब !
असा आवाज देत माझेकडील (दप्तरी) हवालदाराने केबीनमध्ये प्रवेश केला. माझ्या विचाराची शृंखला तुटली. मी थोडे त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिले. बहुतेक त्याने माझा त्रासिक चेहरा पाहुन ओळखले असावे “साहेब घरून फोन आला… असे म्हणुन तो थांबला.
त्याच्या बोलण्यावरून माझ्या घरून माझे पत्नीने फोन केला होता हे समजले. फोन घरून माझे पत्नीने केला होता त्यात त्या दप्तरी हवालदारचा काय दोष? काल पासुन घरी गेलो नव्हतो आणि सकाळ पासुन हया सर्व कामाच्या व्यापात घरी फोन करायचे राहुन गेले होते. माझे घरी माझी पत्नी व एक वर्षाची मुलगी होती. सकाळ पासुनच्या धावपळीत मीच काय माझे बरोबरचे सगळेचजण कामात व्यस्त होते. कोणीही आपआपल्या घरी फोन केला नव्हता. मी माझ्या विचाराच्या तंद्रीतुन बाहेर आलो. मी दप्तरीला घरी फोन करून घरी येणार नाही असा मॅसेज द्यायला सांगुन डॉक्टरांचेकडे पाहिले. डॉक्टरांनी मला केबीनमध्ये थांबवुन ते अतिदक्षता विभागात गेले.
मी दप्तरीला कागदपत्र तयार करणेबाबत सुचना देत होतो. तेवढयात हॉस्पिटल मधील नर्स आम्ही बसलो होतो तेथे धावत आली व डॉक्टरांनी मला बोलावल्याचे सांगितले.
मी दप्तरीला माझे बरोबर येण्याचा इशारा केला व आम्ही अतिदक्षता विभागात जात असताना बेशुध्द आत्याबाईचा भाचा बाबू हा देखील आतमध्ये आला.
डॉक्टरांनी मला व बाबूला जवळ बोलावून आत्याबाई आताच शुध्दीवर येत आहेत असे सांगितले. तेथे डॉक्टर, नर्स तसेच मी व माझा दप्तरी असे आम्ही सर्वजण बेडचे बाजुला उभे राहुन आत्याबाईच्या हालचाली पहात होतो. आत्याबाईना डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासले व त्यांच्या चेहऱ्यावरून आत्याबाईंना आता कोणताही धोका नसल्याचे जाणवले. डॉक्टरांनी नर्सला कांही सुचना दिल्या व बेडजवळच थांबुन रहायला सांगितले. माझ्यातील पोलीस आता शांत बसण्यास तयार नव्हता. मी कधी एक वेळ आत्याबाईशी बोलतोय असे मला झाले होते. माझी चाललेली चळवळ पाहुन डॉक्टरांनी मला पुन्हा हातांनी दहा मिनीटे थांबण्याचा इशारा केला. डॉक्टरांचे ऐकण्यापलिकडे माझ्या हातात काहीही नव्हते. कारण एक तर मी हॉस्पीटलमध्ये होतो आणि दुसरे म्हणुन मी जखमी बाईला घाई-गडबड करून कांही विचारणे उपयोगाचे नव्हते.
मी अतिदक्षता विभागातुन बाहेर आलो व डॉक्टरांच्या केबीनमधुनच पोलीस ठाण्यात फोन करून आमच्या पी. आय. साहेबांना जखमी बाई शुध्दीवर आल्याचे कळविले. साहेबांनी मला फोनवर भराभर सुचना देऊन मी हॉस्पीटलमध्ये पोहोचतोच असे सांगुन फोन बंद केला. डॉक्टरांनी केबीनमध्ये येवून एक सिगारेट पेटवली आणि तोंडाचा चंबु करून हवेत धुराचे एक गोलाकार वलय सोडुन माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहिले.
डॉक्टर माझ्यापेक्षा वयाने व अनुभवाने मोठे असल्याने अगदी मुड मध्ये येवून “बोला व्यंकटराव, तुमचा पेशंट… ! त्यांना मी मध्येच थांबवुन “ माझा पेशंट? ” अशी प्रश्नार्थी मुद्रा केली.
डॉक्टर मला उद्देशुन म्हणाले, “अहो तुमचा पेशंट म्हणजे तुमच्या केसमधील साक्षीदार, असे म्हणायचे होते” असे बोलले. “पेशंट आता थोडा शुध्दीवर आला असुन आता थोडा वेळ त्यांना आराम करू द्या, मग आपण तिचेकडे चौकशी करू शकता, ” असे म्हणुन हातातील सिगारेट ऍशट्रे मध्ये विझवली व टेबलावरचे बेलचे बटन दाबले.
एक वॉर्डबॉय आत आला त्याला डॉक्टरांनी चहा आणण्यास सांगितले व समोरील ग्लासातील पाण्याचे दोन घोट पिउन म्हणाले, “फौजदार साहेब तुम्हाला सांगतो, हा डॉक्टरी पेशा आणि पोलिसी पेशा सारखाच आहे. पोलीस आणि डॉक्टर यांना वेळ, काळ कांहीही नसतो. फोन आला कि पळत सुटणे एवढेच माहित असते. आता हया जखमी पेशंटचेच पहाना, तिला तशी गंभीर जखम नाही, रक्तस्त्राव झालेला नाही पण हया बाई फक्त शॉकमुळे बेशुध्द झालेल्या असाव्यात असे मला वाटते !
डॉक्टर साहेब बोलत असतानाच वॉर्डबॉयने दोन कपात चहा आणुन ठेवला. डॉक्टरांनी स्वत: एक कप उचलुन मला चहा घेण्याचा इशारा केला.
डॉक्टरांनी बोलत बोलत चहा पिण्यास सुरूवात केली पण मी हातात कप घेवून पुन्हा मी माझ्या विचाराच्या तंद्रीत गढुन गेलो. या बाईकडे कधी एकदा विचारपुस करीन व काय प्रकार झाला हे समजुन घेण्यासाठी माझे मन आतुर झाले होते.
मी हया विचारात असताना बाहेरून कोणीतरी नमस्कार डॉक्टर साहेब!” असा आवाज दिला. मी तंद्रीतुन जागा झालो. तो आमचे पी.आय. साहेबांचा आवाज होता. तेंव्हा मी ताडकन उठुन उभा राहुन त्यांना सॅल्युट ठोकला.
साहेबांनी मला हातानेच प्रति नमस्कार करुन मला उद्देशुन म्हणाले, “व्यंकटराव काय म्हणतायत आत्याबाई? ” ( जखमी बाई ) मी म्हणालो, “डॉक्टरांनी थोडा वेळ थांबण्यास सांगीतले आहे.”
मी, आमचे साहेब व डॉक्टर असे झालेल्या घटनेबाबत चर्चा करू लागलो.
पी. आय. साहेबांनी डॉक्टरांना घटनास्थळावरील थोडक्यात माहिती देउन जखमी बाईचा जबाब नोंदवणे अतिशय महत्वाचे असल्याचे सांगितले.
डॉक्टरांनी पाच मिनीटे थांबण्याचा इशारा करून ते अतिदक्षता विभागात गेले.
मी व साहेब हा गुन्हा कसा व कोणी केला असवा याबाबत चर्चा करीत होतो. साहेबांनी मा. पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेला आदेश मला सांगितला. कोणत्याही परिस्थितीत गुन्हा उघडकीस आणला पाहिजे अशी तंबीच दिली असल्याचे सांगितले. तेवढयात वॉर्डबॉयने केबीनमध्ये येउन डॉक्टरांनी आम्हाला बोलावल्याचे सांगीतले.
मी विजेच्या चपळाईने उठुन अतिदक्षता विभागात पोहोचलो. माझे मागुन आमचे साहेब व माझा दप्तरी हवालदार हे आतमध्ये आले. जखमी बाईंच्या दोन्ही हाताला मनगटाजवळ तळहाताला, बोटांना जखमा झालेल्या होत्या.
डॉक्टरांनी जखमी बाईना उठवून बसवले. त्यांना थोडे पाणी प्यायला दिले.
जखमी बाई आता पूर्ण शुध्दीवर आलेल्या होत्या. परंतु त्या नजरेने हॉस्पीटल मधील आजुबाजुचे पेशंट डॉक्टर व आमचेकडे सर्वांकडे थोडया आश्चर्याने व गंभीर मुद्रा करून पहात होत्या.
त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना कोठे आणले आहे? मी कुठे आहे? असे त्यांना वाटत असावे. माझ्या बाजूला त्यांचा भाचा बाबू हा समोर आला व तो बेडजवळच्या स्टुलवर बसुन त्याने आत्याबाईंचा हात हातात घेउन अगदी काळजीच्या स्वरात “ आत्या काल रात्री काय झाले? कोण आलं होतं घरी? तुला कोणी मारलं? असे अनेक प्रश्न एका दमात विचारून पोलिसांच अर्धअधिक काम हलकं केलं होतं.
तेच प्रश्न आम्ही विचारले असते तर कदाचित त्या आणखीन घाबरल्या असत्या.
बाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच प्रश्न विचारल्यामुळे बाईंच्या मनावरील दडपण कमी झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. बाईंनी एक दिर्घ श्वास सोडला. परत आम्हा सर्वांच्याकडे परत एकवेळ पाहिले. बाईंच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसत होते. बाईंनी भाच्याला जवळ बेडवर बसण्याचा इशारा केला. भाचा स्टुलवरून उठुन आत्याजवळ बसला.
मी बाईंचे बोलणे ऐकू यावे म्हणुन बेडजवळ जाउन उभा राहिलो. मी त्या बाईंना काही विचारणार तोच डॉक्टरांनी मला त्यांच्या हाताने स्वत:चे तोंडावर बोट ठेवून न बोलण्याबाबत इशारा केला.
आत्याबाई जवळ बसलेल्या भाच्याने त्यांचेकडे एक वेळ पाहुन पुन्हा तोच प्रश्न विचारला. आत्याबाईंने भाच्याकडे पाहुन “मी इथे कशी आली? मला दवाखान्यात कोणी आणले आहे? पोलीस का आलेत? असे अनेक प्रश्न विचारून आम्हालाच बुचकळयात टाकले.
भाच्याने शांतपणे घडलेली घटना क्रमवार सांगीतली आणि आत्याबाईंच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले. थोडया आश्चर्याने आमचेकडे पहात राहिली.
माझ्या डोक्यात तर कोणी घाव घातला आहे असं वाटत होतं. मी एक वेळ डॉक्टरांकडे व आमचे पी. आय. साहेबांकडे पाहिले. डॉक्टरांनी पुढे होवून आत्याबाईंना काय झाले तुम्हाला काय आठवते? असे विचारले.
जखमी आत्याबाई जरा सावरून बसल्या व म्हणाल्या, ‘कोणी सांगीतले तुम्हाला चोरी झाली म्हणुन? अशी कुठली चोरी झालीच नाही, मी तर घरात झोपले होते. तुम्ही मला इकडे का आणले आहे? मला आताच्या आता घरी घेवून चला !” असे म्हणुन रडू लागली.
जखमी बाईंना त्यांच्या भाच्याने धीर देवून शांत केले. मी बाजुला टेबलावरील पाण्याचा ग्लास पुढे केला. त्यांनी माझ्याकडे एक वेळ नजर वळवून पाहिलं. मी थोडं धाडस करून पुढे होउन पाण्याचा ग्लास त्यांच्या तोंडाला लावला. ही माझी कल्पना एकदम लागू पडली. आत्याबाईंनी दोन घोट पाणी प्यायल्यानंतर मी ग्लास बाजुला ठेवला.
अतिदक्षता विभागात मघापासुन जी निरव शांतता होती ती भंग पावली.
डॉक्टर, नर्स व आम्ही आपसात कुजबुजु लागलो. डॉक्टरांनी पुन्हा त्या बाईंना काय झाले म्हणुन विचारले. त्यावर त्या बाईंनी जी हकीगत सांगितली ती ऐकुण आता पोलिसच बेशुध्द पडायची वेळ आली. बाईंनी हकीगत सांगायला सुरूवात केली.
“मी माझे घरी कामवाली मुलगी आशा हिचे सोबत रहाते. माझा मुलगा परदेशात नोकरी करतो व कधीतरी वर्षातुन एक वेळ येवून जातो. मी घरी एकटीच असते म्हणुन मी माझ्या भावाचा मुलगा बाबू यास माझे घरी ठेवले आहे. बाबू मुंबईत नोकरी करतो व आठवडयातुन शनिवार, रविवार तो त्याच्या आई-बाबांकडे औरंगाबाद येथे जात असतो. गेल्या शुक्रवारी रात्री बाबू नेहमी प्रमाणे औरंगाबाद येथे निघून गेल्याने मी व कामवाली मुलगी आशा असे आम्ही दोघीच घरी होतो. मी नियमितपणे सकाळी सकाळची आन्हीके उरकुन देवपूजा करते, नंतर काही वेळ वर्तमान पत्र वाचते व आराम करते.
गेल्या आठवडयात वर्तमानपत्र वाचताना सलग दोन ते तीन दिवस गुन्हेगारी वृत्ताबाबत बातम्या येत होत्या. त्यामध्ये एका गुंडाने एका महिलेला रस्त्यात अडवुन तिच्यावर वार करून दागिने लुटल्याबाबत बातमी होती. दुसरे दिवशीच्या पेपरमध्ये पुन्हा तशाच प्रकारची बातमी होती, त्यामध्ये दोन गुंडांनी एका घरात घुसुन एका वयस्कर महिलेवर चाकूने गंभीर वार करून घरात दरोडा टाकला अशी बातमी होती. सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा एका महिलेचे व तिच्या नोकरानीचे हातपाय बांधुन त्यांचे घरात चोरी केल्याची बातमी वाचली. या सर्व घटना सांगताना बाईंना बोलण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्या थोडावेळ डोळे बंद करून शांतपणे बसुन राहिल्या. त्या बाई पुढे काय सांगतात याकडे आमचे सर्वांचे लक्ष होते.
साधारण पाच मिनीटानंतर बाईंनी डोळे उघडले. एकवेळ तिने आपल्या भाच्याकडे पाहिले. ती बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरून ती अतिशय घाबरलेली दिसत होती.
एक दिर्घ श्वास घेउन पुढे बोलू लागली. “गेल्या आठवडयात सलग तीन दिवस वर्तमानपत्रात गुन्हेगारी बातम्या आल्यामुळे माझ्या मनात सुध्दा भितीने घर केले होते. मी स्वत: च विचारात मग्न झाले. त्या विचारात असताना मला असे वाटले की, माझे घरी तर आम्ही दोघीच आहोत, जर असे चोर घरात घुसले तर ते आपणालाही मारतील व घरात चोरी करतील. असा विचार व भीती मनात दबा धरून बसली होती. कितीही मनातील विचार काढले तरी पुन्हा-पुन्हा ते मनात येवून जास्तच भीती वाटू लागली. भीती जाईना म्हणुन पण माझ्या मनाशी निश्चय केला की, “येउ दे चोर नाहीतर गुंड, बघते मी तो कसा चोरी करतो ते! मी मनाशी निर्णय पक्का केला. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरात कामवाली मुलीला मी भाजी घेउन येते असे सांगुन घरा बाहेर पडले. नौपाडयामध्ये राम मारूती रोडने गोखले रोडला आले. गोखले रोडवरील एका भांडयाच्या दुकानात जाउन किचनमध्ये वापरण्यासाठी लागणारा एक मोठा चाकू विकत घेतला. येताना थोडी भाजी विकत घेऊन मी घरी तासाभरात परत आले. घरात आले, कामवाली मुलगी आशा हिने घरातील स्वयंपाकपाणी आटोपले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर दोघींनी जेवण केले. थोडावेळ वामकुक्षी घेतली. सायंकाळी नेहमी प्रमाणे आशाने स्वयंपाकाला सुरूवात केली. मी दिवाबत्ती करून थोडावेळ ज्ञानेश्वरी वाचली. आशाने संध्याकाळचा चहा तयार करून मला दिला. मी थोडावेळ सोसायटीचे गार्डनमध्ये फिरून पाय मोकळे करण्यासाठी गेले होते. गार्डनमध्ये आमचे बाजुच्या सोसायटीत रहाणाऱ्या सौ. प्रधान भेटल्या. त्यांचेसमवेत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या गप्पांच्या ओघात पुन्हा त्या ठिकाणी वर्तमान पत्रातुन आलेल्या बातमीचा विषय निघाला. सौ. प्रधानांच्या बोलण्यातसुध्दा गुन्हेगारी बद्दल चिंता दिसत होती. माझ्या मनात पुन्हा भिती दाटुन आली पण मी ते सौ प्रधानांच्या लक्षात येणार नाही याची दक्षता घेवून मी घरी परत आले. रात्री नेहमीप्रमाणे मी व आशाने जेवण केले. तिने भांडीकुंडी आवरली. मी माझ्या बेडरूममध्ये जाण्यापुर्वी म्हणाले, “दरवाजा आतुन व्यवस्थीत कडी लावून घे, सकाळी बाबु लवकर येईल त्यावेळी खात्री करून दरवाजा उघड !” मी माझ्या बेडरूममध्ये गेले. इथंपर्यंत बाईंनी हकीकत सांगितली आणी त्या थोडावेळ थांबल्या.
डॉक्टर, मी व आमचे पी. आय. साहेब असे आम्ही सर्वजण कानात प्राण आणुन आत्याबाईं पुढे काय सांगतात हे ऐकण्यासाठी आतुर झालो होतो. आतापर्यंत त्यांनी सांगितलेल्या हकीकतीमध्ये नवीन किंवा गुन्हयाच्या संदर्भात कांहीएक उपयुक्त माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा काळजीत पडलो, नक्की काय प्रकार काय झाला आहे? याची काहीही उकल होत नव्हती व गुंतागुंत वाढतच होती. आत्याबाईंना डॉक्टरांनी थोडी कॉफी दिली. त्यांनी दोन तीन घोट कॉफी घेवून कप खाली ठेवुन त्यांनी पुढे सांगण्यास सुरूवात केली.
‘मी रात्री साधारण दहा वाजता माझे बेडरूम मध्ये गेले. बेडरूममधील गोदरेजचे कपाटाला लॉक लावून चाव्या माझ्या उशाखाली ठेवल्या. डिम लाईट चालू करून टयुबलाईट बंद करून बेडवर आडवी झाले. ज्या गोष्टीची मला गेले दोन दिवसांपासुन मनामध्ये एक अनामिक भिती निर्माण झाली होती त्याचा गोष्टीनं पुन्हा डोकं वर काढलं. डोळया समोरून एकसारख्या वर्तमान पत्रातील बातम्या सरकु लागल्या. कांही केल्या डोळा लागेना, अगदी मनापासुन निद्रादेवीची प्रार्थना केली. तेवढयात गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मी सकाळी विकत आणलेला चाकू टेबलावर ठेवला होता. मी बेडवरून उठुन टेबलावरील चाकू माझे उशाखाली ठेवला. परत एक वेळ कपाटाच्या चाव्या उशाखाली असल्याची खात्री केली आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. निद्रादेवीने माझी प्रार्थना ऐकली असावी, मला झोप लागली! बाई बोलता बोलता थांबल्या. त्यांनी त्यांच्या हाताचे तळवे एकमेकांवर घासले व आपले तोंडावरून हात फिरवुन एक जांभई दिली.
पी.आय.साहेबांनी पुढे येउन बाईना उद्देशुन विचारले, “आत्याबाई बोला, पुढे काय झाले?
बाईनी आमचे साहेबांकडे एकवेळ पाहिले व हवेत दोन्ही हात हवेत वर करून हे काय चालले आहे हे परमेश्वरालाच माहित असे तोंडाने बडबड करून पुढे बोलण्यास सुरूवात केली.
‘साधारण माझी दोन तास झोप झाली असावी आणि मला अचानक अर्धवट जाग आली. झोपेतच मला पुन्हा त्या वर्तमानपत्रातील बातमी व त्या गुंडांचे चित्र माझ्या डोळयापुढे येवू लागले. मला असे वाटू लागले की, चोर माझ्या घरात घुसून मला मारून चोरी करेल म्हणुन मी उशाखालील चावी एका हातात व एका हातात चाकू घेउन गोदरेजचे कपाट उघडले. कपाटातील कपडे भराभर जमीनीवर फेकुन दिले. लॉकरमधील दागिन्यांचे बॉक्स काढुन त्यातील दागिने एका कपडयात गुंडाळुन हातात घेतले. हे सर्व करत असताना माझे हातातील बांगडया फुटुन हाताला जखमा होत होत्या. हातातील चाकु दोन्ही हाताला लागुन रक्त येत होते. पण मला आता कशाचीच पर्वा नव्हती. मी कपाटातील माझे जुने जवळ जवळ वीस तोळे दागिने, रोख रक्कम तीस ते पसतीस हजार हजार रूपए सर्व कपाटातुन काढले. कपाटातुन काढलेले दागिने, रक्कम लपविण्यासाठी जागा शोधली परंतु अशी जागाच सापडेना, म्हणुन माझे बेडवरील बेडशीट बाजुला केले व माझ्या हातातील चाकुने एका बाजुने गादी फाडली. त्यामध्ये सर्व दागिने, पैसे लपवुन ठेवले. पुन्हा बेडवर बेडशीट टाकले व मी हातात चाकू घेउन बेडच्या खाली गुडघ्यावर अवघडुन बसले आणि मग विचार केला की आता माझ्या घरी कोण चोरी करतेय ते बघतेच!
हा माझा खेळ जवळ जवळ तासभर चालला होता. मी त्याच अवस्थेत पहाटेपर्यंत बेडखाली बसून होते. किती वेळ मी बसले होते मला माहित नाही. त्यानंतर बाबू माझे बेडरूममध्ये आल्याची मला जाणीव झाली. परंतु माझे मेंदुवर आता ताबा राहिलाच नव्हता त्यानंतर काय झाले हे मला आठवत नाही.
बाईनी एका दमात वरील घटनाक्रम कथन केला. भाच्याकडे पाहुन ‘बाबू मला आताच्या आता घरी घेवून चल”. असे म्हणुन रडू लागल्या.
बाईंनी सांगितलेली हकीगत ऐकून आम्हा पोलिसांची मात्र अशी अवस्था झाली होती की कांही विचारू नका. मला तर कोणीतरी माझ्या डोक्यावरील बोजा खाली उतरून ठेवल्यासारखे वाटत होते.
डॉक्टर, मी व आमचे साहेब असे आम्ही एकमेकांकडे पहात होतो. आता हसावे की रडावे हेच समजत नव्हते. डॉक्टरांनी आमचे कडे पाहिले व माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, “चला फौजदार साहेब तुमचा आरोपी मिळाला !” असे म्हणुन ते मोठ-मोठयाने हसू लागले.
मी मात्र मख्खपणे पुतळयासारखा उभा राहुन आत्याबाईकडे पहात होतो.
आमचे साहेबांनी मला त्या बाईचा जबाब नोंद करण्यास सांगितले. मी मनातील शंका म्हणुन साहेबांना विनंतीवजा एक सुचना करण्याचे उद्देशाने मी साहेबांकडे पाहिले व म्हणालो ” सर, आपण जबाब नोंदवणे आवश्यक आहे परंतु त्यापुर्वी एकवेळ आत्याबाईच्या सांगण्याप्रमाणे दागिने घरीच असल्याची खात्री करूया का? ”
साहेबांनी माझ्या म्हणण्याला संमती देउन घटनास्थळावर चलायला सांगितले.
मी, माझे दप्तरी हावालदार यांना हॉस्पिटलमध्ये थांबवून मी व साहेब असे आम्ही दोघे आत्याबाईंचा भाचा बाबू यास सोबत घेवून नौपाडा येथील आत्याबाईंच्या घरी पोहोचलो.
सायंकाळचे पाच वाजले होते. घटनास्थळी बरेच पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर पब्लीक जमलेले होते. आम्ही तेथे पोहोचल्यावर पी.आय. साहेबांनी घटनास्थळी आलेले मा. सहा. पोलीस आयुक्त ठाणे विभाग यांना बाजुला घेउन त्यांना थोडक्यात हकीगत सांगितली. त्यानंतर आम्ही आत्याबाईंच्या बेडरूममध्ये गेलो व त्या ठिकाणी रितसर दोन पंचांना बोलावुन बेडची तपासणी केली.
बेडवरील गादी भिंतीकडील बाजुने फाडुन त्यात दागिने व रोख रक्कम ठेवल्याचे दिसले. पोलिसांची गडबड सुरू झाली. दागिने कसे मिळाले याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. कागदपत्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पी.आय. साहेबांनी थोडक्यात माहिती दिली. तसेच वरिष्ठांना माहिती देऊन गुन्हा कसा घडला याबाबत सविस्तर सांगितले.
ज्या कामवाली मुलीला पोलीस ठाण्यात चौकशीकरिता ठेवले होते तिला घरी पाठवून दिले. मी हॉस्पीटलमध्ये जाउन जखमी बाईंचा सविस्तर जबाब नोंदविला.
डॉक्टरांनी आत्याबाईंना हॉस्पीटलमधुन घरी पाठउन दिले व जाताना एक प्रेमळ सल्ला दिला, “ आत्याबाई वर्तमान पत्र वाचा पण पेपरपधील बातम्या जास्त मनावर घेउ नका !
आता आत्याबाई अशा लाजल्या की, आम्ही सर्वजण पहातच राहिलो. जो गुन्हा आम्ही जबरी चोरीचा म्हणुन दाखल केला होता त्या बाबत कायदेशीर अंतिम अहवाल पाठवुन गुन्हा फायनल केला.
सकाळी गुन्हयाची खबर मिळाल्यापासुन आम्हा पोलिसांची जी तारांबळ उडाली होती, जी धावपळ झाली होती, तसेच जनमाणसात पोलिसांबद्दल एक निराशाजनक वातावरण होते ते कांही क्षणात बदलुन गेले. प्रत्येकाच्या बोलण्यात सकाळपासुन जो पोलिसांवर रोष होता तो काही प्रमाणात का हाईना पण कमी झाला होता.
पोलिसांना नियमितपणे होणारे गुन्हे दाखल करावेच लागतात. त्याचा तपास करावाच लागतो. खरा गुन्हा घडला असेल तो उघडकीस आणताना जी कसरत करावी लागते त्यापेक्षा जास्त कसरत आजच्या गुन्हयात झाली होती. हया घटनेतुन एक वेगळा अनुभव मिळाला होता जो मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
तात्पर्य: मानवधर्मच असा आहे की, ज्यामध्ये मनुष्यप्राणी सतत कोणत्या ना कोणत्या काळजीत रहातो, काळजीत जगतो आणि या सर्व व्यापांमध्ये वर्तमानकाळ विसरून भुतकाळाच्या आठवणीची शिदोरी घेउन भविष्यकाळाचा वेध घेण्यासाठी सतत धडपडत असतो.
शेवटी एकच सांगावेसे वाटते, “जे जे मनी वसे ते स्वप्नी दिसे” हया म्हणीप्रमाणे माणुस एखाद्या विचारामध्ये गुंतला म्हणजे काय घडू शकते याचे ही कथा हे एक जिवंत उदाहरण आहे.
–व्यंकट पाटील
व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख.
अतिशय छान लेख…. 👏👏