कावळ्याचं एक जोडपं, सकाळच्या उन्हात एका इमारतीच्या खिडकीखाली आडोशाला बसलेलं होतं. आज पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस होता. गेल्या चौदा दिवसांत, त्यांना उसंत अशी मिळालीच नव्हती.. रोज ठिकठिकाणी जाऊन, विविध पदार्थ खाऊन खाऊन ते कंटाळले होते.
तो तिला म्हणाला, ‘अगं, तुला माहिती आहे का? आपल्या पूर्वजांशी, ही माणसं फारच आपुलकीने वागायची. तेव्हा घरासमोरच्या अंगणात, लहान बाळाला घास भरवताना ‘हा घास चिऊचा, हा घास काऊचा..’ म्हणून कौतुकानं आपलं नाव घ्यायची. त्यावेळी, प्रत्यक्षात जरी घास दिला नाही तरी ते बोलणं ऐकूनच, त्यांचं पोट भरायचं.. आता मात्र सगळं बदलून गेलंय.. आताची आई डायनिंग टेबलावर बाळाला बसवून, त्याला चमचानं ‘मॅगी’ खाऊ घालते. पूर्वीची आई बाळाला झोपवताना ‘चिऊकाऊ’च्या गोष्टी सांगायची.. आताची आई बाळाच्या हातात मोबाईल देऊन, स्वत: व्हाॅटसअपवर चॅटिंग करीत बसते.. मूल शाळेत जाऊ लागल्यावर, शिक्षक त्याला मडक्याच्या तळाशी असलेलं पाणी वर येण्यासाठी, त्यात खडे टाकणाऱ्या हुशार कावळ्याची गोष्ट सांगायचे..’
तिनं हे ऐकलं व होकारार्थी मान डोलावून म्हणाली, ‘सगळं माहिती आहे मला. पण आत्ता काय करायचं ठरवलंय, ते मला सांगा.. या पंधरवड्याची आपल्यावर सोपवलेली ‘ड्युटी’ संपायला आलेली आहे..’
‘ड्युटीचं ठीक आहे गं.. तुला वर्षातून, ही पंधरा दिवसांसाठी स्वयंपाकाला सुट्टी मिळते, ती बघ. कितीतरी प्रकारचं खायला मिळतं, नाही का? कुणाकुणाच्या काय काय आवडी निवडी असतात, त्या आपल्याला कळतात.. कुणी दाक्षिणात्य, इडली डोसा ठेवतो तर पंजाबी, मक्कईकी रोटी ठेवतो.. कुणी बंगाली मिठाई ठेवतो तर कुणी ढोकळा, पापडी ठेवतो.. मला मात्र महाराष्ट्रीय माणसानं ठेवलेलं खीर पुरीचं पान आवडतं.. त्यातूनही पुणेकराचं..’ तो उत्तरला.
ती खवळून म्हणाली, ‘मागच्या जन्मी माणूस असताना, मी तुमच्या जिभेचे सगळे चोचलें पुरवले होते, तरीदेखील अजूनही आत्मा शांत झाला नाही वाटतं? आजचा दिवस झाला की, उद्यापासून माझं ‘रांधा वाढा, उष्टी काढा’ आहेच की!’
तो वरमून म्हणाला, ‘ठीक आहे, मलासुद्धा आता भूक लागली आहे.. आपण माझ्या त्या मित्राकडे जाऊया. जो मला नेहमी पार्टी द्यायचा.’
ती फणकाऱ्याने उसळली, ‘अजिबात जायचं नाही त्याच्याकडं. तुम्हाला त्यानं नादी लावलं आणि बदनाम केलं.. त्याच्या बायकोने तुम्हाला कितीदा बजावलं होतं.. पण पालथ्या घड्यावर पाणी!! त्यापेक्षा माझ्या मैत्रिणीकडे जाऊयात..’
‘अजिबात नाही!! तिनं तिच्या सासू सासऱ्यांना कसं वागवलं ते माहिती आहे मला.. ती आपल्यासाठी टेरेसवर त्यांच्या नावानं काही ठेवेल असं मला नाही वाटत..’ तो उत्तरला.
‘मग आपण पूर्वीच्या घरमालकाकडं जाऊया? त्याच्या नातवानं मोठा बंगला बांधलाय, आपण रहात होतो, त्या जागेवर!’ तिनं विचारलं.
‘अगं तो देवमाणूस होता, त्याचा मुलगा, सून सगळे गेले. त्याच्या नातवानं आता एका पारशी मुलीबरोबर लग्न केलंय. त्या दोघांचं इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे, भारतीय संस्कृती, रुढी, परंपराबद्दल त्यांना काहीही माहिती नाहीये.’ तो नाखुशीने बोलला.
‘मग आपण असं करुयात का? आपल्या मुलांकडे जाऊ.. कसाही असला तरीही, तो आपलाच मुलगा आहे. मुलगी ही, परक्याचं धन.. तिच्याकडून काय अपेक्षा करायची?’ ती काकुळतीला येऊन म्हणाली.
‘मी येणार नाही.. तू गेल्यावर बायकोचं ऐकून, त्यानं मला वृद्धाश्रमात ठेवलं होतं.. तू जा, तुला पटत असेल तर.. मी तसाच उपाशी राहीन, पण तुझ्याबरोबर काही येणार नाही..’ रागाने तो थरथरत होता.
‘जाऊ दे, उगाच आपण वाद घालत बसलोय.. त्यापेक्षा कुठेही न जाता, मी खिचडी टाकते आपल्यासाठी.. आपण तीच खाऊन आजचा ‘समारोप’ साजरा करु.. उद्यापासून पुन्हा आपलं रहाटगाडगं चालू.. पुढचे साडे अकरा महिने जे मिळेल ते खायचं, प्रसंगी कचराकुंडी धुंडाळत बसायचं.. वड, पिंपळावरची फळं खायची व शहरातील झाडांची संख्या वाढवायची..’ ती म्हणाली.
‘खरं आहे तुझं म्हणणं.. माणसांनी आपला कितीही तिरस्कार केला तरी आपण त्यांच्या उपयोगी पडतो, हे तो विसरुन चाललाय… त्यानं सिमेंटची जंगलं उभी करण्याचा सपाटा लावलाय.. फुकटच्या नैसर्गिक प्राणवायूपेक्षा, विकतच्या कृत्रिम प्राणवायू न मिळाल्याने त्याला हकनाक मरावं लागतंय.. आपली देखील प्रजाती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.. जोपर्यंत आहोत, तोपर्यंत आपण आपल्या कर्तव्यात कसूर करायची नाही.. आपली पुढची पिढी ही आपल्यासारखीच असेल, असं मला तरी वाटत नाही..’ तो म्हणाला.
एवढं बोलून ते दोघेही, आपल्या घरट्याकडे झेपावले…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-१०-२१.
Leave a Reply