१.
मोठ्या शहराच्या कुठल्यातरी खोलगट उकीरड्यावर, जिथे सगळ्या शहरातील सगळ्या अशांत आणि टाकाऊंचे ओझे एका मुटकुळ्यांत फेंकले जाते, तिथे तरूण मरे आणि कॅप्टन दोघे भेटले होते आणि मित्र झाले होते. दोघेही आपल्या पूर्वीच्या स्वर्गसमान वाटणाऱ्या समाजातील सभ्य व आदरणीय स्थानावरून घसरून आपापल्या नशिबाच्या अगदी खालच्या पायरीवर पोहोचले होते आणि दोघेही आढ्यताखोर आणि अनाठायी आत्मविश्वास असणाऱ्या समाजाच्या खडूस मोजमापांचे बळी होते. कॅप्टन हा आता कॅप्टन राहिला नव्हता. शहरांत कधीतरी अचानक होणाऱ्या नीतीमत्तेच्या प्रलयंकारी झंझावातांत, तो त्याच्या पोलीस खात्यांतील उच्च आणि फायदेशीर पदाला मुकला होता. त्याचा बिल्ला आणि बटणे काढून घेतली गेली होती आणि त्याने जी कांही थोडी बचत घरांमधे गुंतवली होती ती सर्व वकीलांच्या घशात गेली होती. त्या महापुराने जातांना त्याला पूर्ण कफल्लक करून रस्त्यावर आणले होते. रस्त्यावर आल्यानंतर एका महिन्याने एका बारमालकाने मोफत जेवण घेणाऱ्यांच्या रांगेतून, मांजर जशी पिल्लांना मानेला धरून उचलते, तसा उचलून त्याला बाहेर काढला होता आणि फूटपाथवर फेंकून दिला होता. हे म्हणजे अगदीच नीच वाटतं पण त्यानंतर त्याने कसे तरी वरचे कपडे आणि गम बूट मिळवले आणि वर्तमानपत्रांना पत्रे लिहायला सुरूवात केली. मग एक दिवस महानगरपालिकेच्या धर्मशाळेंतील नोकराने त्याला अंघोळ घालायचा प्रयत्न केला, त्याच्याशी त्याने मारामारी केली होती.
२.
जेव्हा मरेने त्याला प्रथम पाहिले, तेव्हां इसेक्स स्ट्रीटवर त्याने लसूण आणि सफरचंद विकणाऱ्या एका इटालीयन बाईचा हात धरला होता आणि तो एका संगीतीकेतलं गीत गात होता. मरेची अधोगती इतकी उल्लेखनीय नसली तरी देखणी होती. त्याकाळच्या गांवातल्या सगळ्या छोट्या गाड्या त्याच्या मालकीच्या होत्या. तो जणू राजपुत्र होता. पर्यटकांचा गाईड त्याच्या काकांचा बंगला पर्यटकांना आवर्जून दाखवत असे. पण मग कधी तरी कांहीतरी प्रकरण झालं आणि त्याला बटलरतर्फे हाताला धरून बंगल्याबाहेर काढण्यात आलं. बुटाची लाथ ढुंगणावर मारल्यासारखंही त्याला वाटलं. आठवड्यानंतर तो कमनशीबी राजपुत्र आपल्या वारसाहक्काच्या तलवारीविना आपला विनोदी विदूषक मित्र ‘फालस्टाफ’च्या शोधात भटकत येऊन त्याला भेटला आणि त्याच्या बरोबर रस्त्यावर पडलेले पावाचे तुकडे जमवू लागला.
३.
एका संध्याकाळी ते उपनगरांतल्या एका लहान बागेमध्ये बाकावर बसले होते. कॅप्टनच प्रचंड धूड, जे उपासाने वाढल्यागत वाटत होतं आणि ज्याच्या मदतीच्या अर्जांना सहानभुतीऐवजी विटंबना वाट्याला येत होती, तें बाकाच्या हाताच्या आधारे आकारहीन मांसाच्या गोळ्यासारखं आडवं पडलं होतं. त्याचा चार पांच मस असणारा लाल चेहरा, आठवडाभर नीट न केलेले कल्ले, डोक्यावरची गवताची हॅट, ह्या सर्वांमुळे तो थर्ड ॲव्हेन्युतील एखाद्या जुनाट काळवंडलेल्या इमारतीसारखा दिसत होता आणि ती हॕट तुमच्या बुध्दीला, हा स्त्रीयांच्या हॅटचा कांही नवीन प्रकार होता की स्ट्रॉबेरीचा छोटा केक होता, हे ठरवायचे आव्हान देत होती. घट्ट आवळलेला पट्टा हा त्याच्या जुन्या पोलीसी कारकीर्दीचा अवशेष होता आणि त्याच्या शरीराचा घेर त्याने मधेच आक्रसला होता. कॅप्टनच्या बूटाला बटणे नव्हती. तो अगदी हलक्या आवाजांत स्वत:च्या दुर्दैवी ग्रहांना शिव्या देत होता.
तर मरे आपल्या कोपऱ्यात चिंध्या झालेल्या निळ्या कोटात गुंडाळी करून पडला होता. त्याने हॅट खाली ओढून घेतली होती आणि तो थोडा अलिप्तपणे, असल्या नसल्यासारखा किंवा एखाद्या शरीरातून भूत नुकतच निघून गेल्यासारखा निपचीत पडून राहिला होता.
४.
कॅप्टन ओरडला, “बाशानच्या बैलाच्या मांडीच्या नळीचे नाव घेऊन सांगतो की मला खूप भूक लागलीय. मी भूकेने मरतोय. आता मी आख्खं बोव्हेरी रेस्टॉरंट अगदी त्यांच्या आतल्या स्टोव्हसकट खाऊन संपवीन. मरे, तू कांहीच विचार सुचवू शकतं नाहीस? तू त्या ट्रक ड्रायव्हर रेजिनाल्डसारखे खांदे आवळून बसलायस. काय उपयोग आहे असा आव आणण्याचा? आपल्याला कुठे दोन घास खायला मिळतील ह्याचा विचार कर.“
मरे म्हणाला, “तू विसरतोयस! ही शेवटची जेवायला मिळेल म्हणून केलेली चुकीची सूचना माझीच होती.” कॅप्टन म्हणाला, “हो तुझीच होती की! फुकट गेली तरी काय झालं! अशा आणखी काही आपल्याला खायला मिळवून देतील अशा कल्पना आहेत कां?” मरे नि:श्वास सोडत म्हणाला, “मी मान्य करतो की आपला बेत हुकला. मागे मी पैसे देऊन त्या मलोनकडे जेवलो होतो, तेव्हा त्याने माझ्याशी बेसबॉलवर मस्त गप्पा मारल्या होत्या.” कॅप्टन म्हणाला, “जेव्हा त्याच्या नोकराने आपल्याला पकडले तेव्हा हा माझा हात कोंबडीच्या भाजलेल्या तंगडीवर आणि तळलेल्या छोट्या माशांवर होता.” मरे म्हणाला, “मी ऑलिव्हजपासून दोन इंचावर होतो. भरलेले ऑलिव्ह गेल्या दोन वर्षांत खाल्ले नाहीत.” कॅप्टन म्हणाला, “पण आपण काय करूया? भुकेने मरायचं नाही मला!”
मरे म्हणाला, “आपण भुकेने मरू शकत नाही? बरं वाटलं मला हे ऐकून! मला वाटत होतं आपण तसे मरू शकतो.”
कॅप्टन म्हणाला, “तू थांब इथेच. मी परत एकदा प्रयत्न करून पहाणार आहे. फार तर अर्धा तास लागेल. जर माझी युक्ती जमली तर मी आधीच येईन.” तो असे म्हणत उभा राहिला.
आपण व्यवस्थित दिसावे म्हणून त्याने सगळं ठाकठीक करायचा नेटाने प्रयत्न केला. आपल्या मोठ्या मिशांना पीळ भरला. पट्टा अधिकच घट्ट करून पॅंटला इस्त्री केलेली आहे असं भासवायचा प्रयत्न केला आणि प्राणीबागेतल्या गेंड्याप्रमाणे तो धडक मारायला निघाल्यासारखा त्या बागेच्या दक्षिण दरवाज्यातून निघाला.
५.
जेव्हां तो दिसेनासे झाला तसा मरे घाईघाईने पूर्वेकडल्या दरवाजातून बागेच्या बाहेर आला. तो जवळच्याच एका दोन हिरवे दिवे लावलेल्या इमारतीसमोर येऊन उभा राहिला.
तो आत गेला आणि समोरच्या टेबलावर बसलेल्या हवालदाराला म्हणाला, “पोलीस कॅप्टन मरोनी तुम्हाला एका गुन्ह्याच्या तपासांत हवा आहे ना? त्याच्यावर तीन वर्षांपूर्वी खटला भरला होता तो! मला वाटते, तो सुटला नव्हता खटल्यातून! तो हवाय ना तुम्हाला?” हवालदाराने मान वर केली व दम भरल्याच्या आवाजांत विचारले, “तू कां विचारतोयस हे?”
मरेने सहज स्पष्टीकरण दिलं, “मला वाटले की त्याची माहिती देणाऱ्याला बक्षिस मिळणार असेल! मी त्याला चांगला ओळखतो. सद्या तो स्वत: लपून छपून फिरतोय पण मी कधीही त्याला पकडून देऊ शकतो जर त्याला पकडून देण्याबद्दल मला कांही बक्षिस मिळणार असेल तर!”
“असं कांही बक्षिस वगैरे नाही आणि असा माणूस आम्ही शोधतच नाहीय. तो नकोय आम्हाला आणि तूही नकोस. चालता हो इथून. असं दिसतंय की तो तुझा मित्र आहे आणि तू त्याला विकायला निघालायस? झटकन बाहेर फूट, नाही तर धक्के मारून बाहेर काढू.” मरेने त्या अधिकाऱ्याकडे शांतपणे एक दृष्टिक्षेप टाकला आणि म्हणाला, “मी एक सभ्य नागरिक म्हणून
कर्तव्य करत होतो. मी कायद्याला एका गुन्हेगाराला पकडून द्यायला मदत करू शकलो असतो.”
६.
मरे घाईघाईने बागेतल्या बाकावर जाऊन बसला. त्याने हातांची घडी घातली आणि आपल्या कपड्यांत स्वत:ला आंखडून घेत तो भूतासारखा बसला. दहा मिनिटांनी कॅप्टन त्या ठरलेल्या ठीकाणी परत आला. कॅन्सस मधे ती रात्र वादळी, गडगडाटी होती. त्याची कॉलर फाटली होती, हॅट ने विचित्र आकार धारण केला होता. त्याचा रक्तरंगी शर्टसुध्दा फाटला होता आणि डोक्यापासून पायापर्यंत तो पाण्याने निथळत होता. त्याच्या नाकांत घुसलेला लसूण आणि मसाल्याचा वास शिंका आणत होता. मरे ओरडला, “कॅप्टन, काय हे! जर तू इतका घायकुतीला आला आहेस की कुठल्या तरी पिंपात तू कशात तरी तोंड बुडवून येणारायस, हे कळलं असतं तर मी थांबलो नसतो.” कॅप्टन कडक आवाजात म्हणाला, “जास्त बोलू नकोस. मी अजून कांही चुकीचं केलेलं नाही. सगळं व्यवस्थित आहे. इसेक्स मधली ती त्या फळांच्या दुकानाची मालकीण कॅटरीना, तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव करायला गेलो होतो. तिथे व्यवसाय वाढवायची संधी आहे. ती म्हणजे इटालीच पीच फळ आहे. मला वाटलं होतं की मी मागच्या आठवड्यांत तिला खूश केलं होतं पण बघ तिने आता काय केलं ते! मला वाटतय मी फार घाई केली. आणखी एक योजना बारगळली.
मरे त्याचा अत्यंत तिटकारा करत म्हणाला, “तू असं नको सांगूस की तुझ्या सध्याच्या सगळ्या अडचणींतुन बाहेर पडण्यासाठी तू तिच्याशी खरंच लग्न करणार होतास?
कॅप्टन म्हणाला, “मी! मी तर एक वाडगा. सूप मिळावे म्हणून चीनच्या राणीशी लग्न करीन, एका मटणाच्या थाळीसाठी खून करीन, एखाद्या अनाथाकडून पाणी चोरीन,
मी एक वाडगा दुधातल्या पोह्यासाठी मंदीराचा पट्टेवाला होईन.”
“मला वाटतं,” मरे त्याच्या हातावर डोकं ठेवून म्हणाला, “मी व्हिस्कीच्या एका ड्रिंकसाठी जुडास सारखा वागेन. तीस चांदीच्या तुकड्यांसाठी”–
“अरे, आता बास्स!” कॅप्टन वैतागून उद्गारला. “तू असे करणार नाहीस, मरे! मला नेहमी वाटायचे की झाडूवाल्याने त्याच्या मालकावर ओरडणे ही सर्वात हलकी गोष्ट आहे पण आता मी म्हणेन, “जो माणूस आपल्या मित्राला सोडून देतो तो समुद्री चाच्यांपेक्षा वाईट असतो.”
७.
पार्कमधून एक मोठा माणूस जिथे दिवा होता ते बाक तपासत होता.
तो ह्या दोघा भटक्यांसमोर येऊन थांबला. त्याने विचारले, “तो तूच आहेस, कां, मॅक?” त्याची हिऱ्याची स्टिकपिन चमकली. त्याच्या डायमंड जडलेल्या फोब चेनने ओळख द्यायला मदत केली. तो मोठा, गुळगुळीत आणि चांगला पुष्ट होता. “हो, मला दिसतंय तो तूच आहेस,” तो पुढे म्हणाला.
तो बोलतच राहिला. “त्यांनी मला माईकच्या हॉटेलमधे सांगितले की मी तुला इथे शोधू शकतो. मला काही मिनिटे भेटू दे, मॅक.”
कॅप्टनने तडफडत स्वत:च शरीर उचलून घेतले. जर चार्ली फिनेगन त्याला शोधण्यासाठी ह्या उकीरड्यावर आला असेल तर त्याला तसेच काहीतरी भारी कारण असेल. चार्लीने त्याला झाडाच्या सावलीत नेले. चार्ली म्हणाला, “तुला ठाऊक आहे? पोलिस खाते इन्स्पेक्टर पिकरींगवर लांच घेतल्याबद्दल खटला चालवत आहे.”
कॕप्टन म्हणाला, “तो माझा इन्स्पेक्टर होता.”
चार्ली म्हणाला, “त्याला पोहोचवायचाच आहे. पोलिसखात्यासाठी ते आवश्यक आहे. हे काम व्हायलाच हवंय. पिकरींग तुरुंगात जायला हवा. त्यासाठी तुझी साक्ष पुरेशी आहे. तू पोलिस खात्यात असताना तो तुझा वरिष्ठ होता. त्याचा काळ्या पैशाचा वाटा तुझ्या हातून त्याला मिळायचा. तू हे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहून सांगायचय.”
कॕप्टनने बोलायला सुरूवात केली, “तो नेहमी..”
चार्ली म्हणाला, “एक मिनिट थांब!” त्याने खिशांतून पिवळ्या नोटांच एक भेंडोळ बाहेर काढलं आणि म्हणाला, “पांचशे डॉलर्स आहेत ह्यात तुझ्यासाठी. दोनशे पन्नास आता आगाऊ आणि दोनशे पन्नास साक्ष दिल्यानंतर.”
कॕप्टन म्हणाला, “तो माझा मित्र होता. मी सांगितलं तुला. मी पिकरींगविरूध्द साक्ष देण्यापूर्वी, तुला आणि तुझ्या सर्व टोळीला आणि शहराला आग लागलेली पाहिन. मी गरीब झालोय, रस्त्यावर आलोय पण मी माझ्या मित्रांचा विश्वासघातकी नाही होणार.” कॕप्टनचा आवाज चढला आणि एखाद्या कर्कश्श ढोलासारखा तो ओरडला, “चार्ली फीनीगन चालता हो ह्या बागेतून. ही आमच्यासारख्या उचले, भटके आणि दारूडे यांच्यासाठी आहे. आम्ही तुमच्याहून बरे आहोत. आणि उचल तुझे ते घाणेरडे पैसे.”
चार्ली फीनेगनने पैसे खिशांत टाकले आणि तो हळू हळू चालत बागेतून बाहेर गेला. कॅप्टन परत बाकावर आपल्या जागेवर आला.
८.
मरे चुकचुकत म्हणाला, “तुमचं बोलणं न ऐकणं शक्यच नव्हतं. माझ्या कानांवर पडतच होतं. मला आतापर्यंत भेटलेल्यात तू महामूर्ख आहेस.”
कॕप्टनने विचारलं, “तू काय केलं असतसं?”
मरे म्हणाला, “मी पिकरींगला फासांवर पोहोचवला असता”.
कॕप्टन न रागावता म्हणाला, “मित्रा, तू आणि मी वेगळे आहोत. न्यूयॉर्क शहर दोन प्रकारच्या लोकात विभागलय. बेचाळीसाव्या रस्त्याच्यावरच आणि चौदाव्या रस्त्याच्या खालचं. आपण आपापल्या तत्त्वांच्या प्रकाशांत वागतोय. आपल्याला जे योग्य वाटतं तेंच करतोय.”
टॉवरच घड्याळ साडेअकरा वाजल्याच सांगत होतं. झाडे सांगत होती की बारा वाजायला अर्धा तासा राहिलाय फक्त. दोघेही बाकावरून उठून उभे राहिले आणि जणू एकच कल्पना एकाच वेळी दोघांच्या मनात आल्यासारखे दोघे बागेतून बाहेर पडले आणि एका निरूंद गल्लीतून जाऊन मोठ्या चौकात बाहेर आले. दुपारी गजबजाट असणारा चौक आता एखाद्या उपनगरातील आडरस्त्यासारखा निर्मनुष्य व शांत होता.
ते उत्तरेला वळले. तिथे उभ्या असणाऱ्या पौलिसाने त्यांना पाहिले पण त्याने ती वेळ आणि ते जात असलेली दिशा लक्षांत घेऊन व त्यांचे कपडे आणि अवतार पाहून त्यांना अडवलं नाही. कारण त्याचवेळी त्याभागातील प्रत्येक रस्त्यावरून अशा अनेक कळकट, फाटके कपडे घातलेल्या व केस न कापलेल्या आकृत्या घाईघाईने एकाच ठीकाणी निघाल्या होत्या. तिथे कोणतही स्मारक नव्हतं पण फक्त त्या खोबणींत दहा हजारांहून अधिक पावले शांतपणे वाट पहात उभी होती.
९.
९ व्या स्ट्रीटमधून सूट घातलेला एक उंच माणूस एका कारमधून उतरला आणि त्याने मोहरा पूर्वेला वळवला. त्याने मरेला पाहिलं आणि झडप घालून त्याला पकडून बाजूला दिव्याखाली घेऊन गेला. कॕप्टन हताशपणे काय चाललय तें पहात होता.
“जेरी!” तो गृहस्थ ओरडला, ” मी किती नशीबवान! उद्या मी तुमचा शोध सुरू करणार होतो. म्हाताऱ्या काकाचे निधन झालेय. तुम्हाला पुन्हा इस्टेटीचे सर्वाधिकार द्यायच्या सूचना देऊन गेले ते. तुमचे अभिनंदन. सकाळी ऑफिसला या आणि तुम्हाला हवे ते सर्व मिळवा. मला त्या संबधात हवी ती मोकळीक आहे.”
“आणि ती थोडीशी वैवाहिक तडजोड?” डोके कलते करून मरे म्हणाला.
“का?–अरे– ठीक आहे, नक्कीच, तुझ्या काकांना समजले आहे– तुझी आणि मिस वॅन्डरहर्स्टची सोयरीक होईल अशी अपेक्षा आहे”–
“शुभ रात्री,” मरे दूर जात म्हणाला.
“तू वेडा आहेस कां!” त्याचा हात धरून दुसरा ओरडला. “तू दोन लाखांच्या इस्टेटीचा त्याग करतोयस का”–
“अरे गृहस्था, तू कधी तिचे नाक पाहिले आहेस का?” मरेने गंभीरपणे विचारले.
“पण, कारण ऐका, जेरी. मिस वँडरहर्स्ट एकमेव वारस आहे, आणि”–तो गृहस्थ.
“तुम्ही कधी पाहिलतं कां?”
“हो, मी कबूल करतो की तिचे नाक नसल्यातच जमा आहे”–
“शुभ रात्री!” मरे म्हणाला. “माझा मित्र माझी वाट पाहत आहे. त्याच्याच भाषेत मी सांगतोय तुम्हाला ‘बिलकूल शक्य नाही’ असा अहवाल देण्यासाठी मी तुम्हाला अधिकार देतोय. निघा, शुभ रात्री.”
१०.
दहाव्या रस्त्यावरच्या घरापासून आता ती रांग अगदी चौकाच्या फूटपाथपर्यंत पोहोचली होती. मरे आणि कॅप्टन दोघे त्या वळवळणाऱ्या हजारो पायांच्या सरपटणाऱ्या प्राण्याच्या शेपटाशी जाऊन उभे राहिले. “कालच्याहून आज वीस फूट लांब आहे रांग!” मरे ग्रेस चर्चपासून सुरू झालेल्या रांगेच्या वळणांचा अंदाज घेत म्हणाला. कॅप्टन कळवळत म्हणाला, “अजून अर्धा तास तरी लागेल आपल्या पोटांत ढकलायला कांही मिळायला.” टॉवरच्या घड्याळात बाराचे ठोके पडू लागले, तशी पाव मिळणारी ती रांग पुढे पुढे सरकू लागली. त्या रांगेचे चामड्याचे पाय त्या रस्त्याच्या दगडांवर एखाद्या सापाने हिस्स करावे, तसा आवाज करत होते आणि आपापल्या तत्त्वाच्या प्रकाशात वागणारे ते दोघे रांगेच्या शेवटी चिकटले होते.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा- ॲकॉर्डींग टू देअर लाईटस
मूळ लेखक – ओ हेन्री (१८६२-१९१०)
तळटीप- प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो. न्यूयॉर्क पोलिसांना एका प्रामाणिक इन्सपेक्टरला काढायचा असतो. कॅप्टन आपल्या एकेकाळच्या वरिष्ठ सहकाऱ्याविरूध्द, मित्राविरूध्द साक्ष द्यायचं नाकारून पोलिसांनी देऊ केलेल्या सर्व फायद्यांवर पाणी सोडतो तर मरे त्याला महामूर्ख म्हणतो. अगदी विरूध्द तत्त्व दोघांची पण तत्त्वनिष्ठा सारखीच प्रबळ. आपापल्या तत्वाच्या प्रकाशात, एकत्र वाटचाल करत ते रस्यावरचं भणंग जीवन ते दोघे सहज स्वीकारतात.
Leave a Reply