नवीन लेखन...

उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?)

लताच्या स्वरांचे वय काय?

कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत?

स्वरकर्मी लता माझ्यासारख्याच्या यादीत १ ते १०० या क्रमांकांवर असते. १०१ पासून अनुराधा, कविता, अलका, साधना , बेला, सुनिधी वगैरे सुरु होतात. बाकीच्या माझ्या खिजगणतीतही नाहीत.

तिच्या गायकीवर , सुरांवर काहीही लिहिण्या / बोलण्याच्या योग्यतेचा मी नाही .

आम्हां इंजिनिअर्सना “PMM” (Perpetual Motion Machine) ही संकल्पना शिकविण्यात येते. अशी एखादी यंत्रणा /मशीन बनविता येईल कां, जेथे कोणत्याही प्रकारचे लॉसेस होणारच नाहीत आणि इनपुट = आउटपुट असेल. या प्रयत्नांत सारे अभियंते गुंतलेले आहेत. ही मग एक आदर्श यंत्रसामुग्री असेल.

परमेश्वर नामक संरचनाकाराने ही विश्वव्यापी परिपूर्णता आधीच दृश्य स्वरूपात आपल्यापुढे ठेवलेली होती असे मला वाटते.

मीनाताईंच्या भाषेत मलाही म्हणावेसे वाटायचे – “आम्ही जिवंत असेपर्यंत तिने जिवंत असावे.”

पण तसे झाले नाही. लताला भेटण्याचे, तिच्या चरणांवर माथा ठेवायचे स्वप्न अधुरे राहिले तरी लताचा कार्यक्रम प्रेक्षागृहातून “लाईव्ह” ऐकून कृतकृत्य झालेल्या आम्हीं तिच्या सुरांची आकाशझेप अनुभवली आहे.

आपले कान किमान ६० टक्के व्यापणारा स्वर आता “अबोल” झाला आहे. तो आवाज, ते खळाळतं हास्य आणि श्वेत वस्त्रांमधील ते पावित्र्य आता दिसत नाही.

पुलं म्हणतात- “आपली माणसे निव्वळ असून चालत नाही, ती डोळ्यांना दिसायलाही हवीत, नजरेसमोर असावीत.”

यंदा ६ फेब्रुवारीला तिचे दिसणे दृष्टीआड झाले आहे, पण कानांवर तर सतत आहेच. लताच्या स्वरांच्या कुशीत अजूनही अगणित वेळा डोळे मिटून पडता येते. रागदारी माहीत नसली तरी चालते, पंचम, गांधार, सप्तक इ. शिकलो नसलो तरीही चालते, लताच्या आवाजात निश्चिन्तपणे विसावता येते. ती आहेच, एवढा दिलासा सर्वदूर तारून नेतो.

माझ्याही अंगणात एक प्राजक्त आहे. पत्नी नेमाने त्याची हाती लागतील ती फुले वेचते. पूर्वी मला सांगायची- “जरा झाड गदागदा हलव, म्हणजे उंचीवरील फुले टपकन खाली पडतील.”

माझ्या हातात ती शक्ती नाही. उंचावरील फुले डोळ्यांना दिसतात पण हाती लागत नाहीत.ती खूप दूरवर, तेजोमय सदनाकडे निघून गेलेली आहेत.

आता फक्त कृतज्ञता आणि केवळ कृतज्ञता – आमचे जगणे जगणेबल केल्याबद्दल!!

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

3 Comments on उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!

  1. SIR YOU HAVE WRITTEN SO WELL..MY SELF RATNA HILE, I AM AUDIO ARTIST…READING FOR AUDIO BOOK WHICH IS NOT FOR COMMERCIAL PURPOSE..CAN I READ THIS ARTICLE..I WILL MAKE VIDEO ALSO OF THIS ARTICLE..YOUR PERMISSION REQUIRED..

  2. मोजक्या शब्दांत आमची भावना तुम्ही व्यक्त केलीत. – डॉ माधव मुतालिक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..