दुर्दैवाचा नाद निनादे झाकोळून ये आता
निराश माझे मन हे गाते मरणाच्या गाथा
मरण आहे मिसळून जेथे आयुष्याशी एखाद्या
कुणी धराव्या कशास आशा अप्राप्याच्या एखाद्या ॥ १ ॥
मरणास माझ्या मीच जातो हात पसरोनी सामोरा
उपेक्षिताचा निर्वाणसोहळा, साक्षीला मी अन् एक कोपरा
मनात माझ्या धडपडून आसू जमवू पहातो ओंजळभर
गीत माझे तुलाच लिहिले मृत मना हे सांत्वनपर || २ ||
तुझी नित्यनेमे भडकती चिता मी स्वये पाहिलेली
शोकसभेत तुझ्या हरेक सांत्वनाला तुला साथ केली
दुर्दैवाची झडप मिटते ज्याच्या नशीब नामक झरोक्याची
कसा जीवनांधकाराला छेद मिळावा आशा नामक किरणांचा ॥ ३ ॥
तुझ्या जीवनमूल्यांची उघड तुडवणूक तुला पाहवेना
पराभूत स्वप्नांचे शल्य तुझ्या, उरी तुला साहवेना
तुझ्या भग्न रुपापुढे अतृप्त आकांक्षा-आत्मे नाचताना
पाहून तुझ्या आदर्शाचे ठिक्कर कोळसे तुला राहवेना ॥ ४ ॥
युगायुगांची विदीर्णता ही, नित्य भंगणारी स्वप्ने
नैराश्यात घुसमटणारे आत्मे नि उदास उद्ध्वस्त मने
— यतीन सामंत
Leave a Reply